भारतकन्या विश्वविजेती

विवेक मराठी    01-Aug-2025   
Total Views |
divya Deshmukh
जॉर्जियातील बटुमी येथे 5 ते 29 जुलै या दरम्यान फिडे महिला विश्वचषक खेळला गेला. गेल्या 3-4 वर्षांत बुद्धिबळ खेळात भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, मात्र त्यात प्रामुख्याने गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुन अशा पुरुष खेळाडूंची नावे सातत्याने ऐकायला मिळत होती. पण ह्यावेळी महिलांनीही तोडीस तोड कामगिरी करून दाखवली आणि एकीकडे तेंडुलकर - अँडरसन कसोटी क्रिकेट मालिका उत्कंठावर्धक स्थितीत असतानाही समाजमाध्यमांना आपली नोंद घ्यायला भाग पाडलं. महिलांचा हा विश्वचषक भारतीय खेळाडूंनीच गाजवला आणि थेट जेतेपदाला गवसणी घातली. याच यशस्वी बुद्धीबळ विश्वचषकाचा थोडक्यात घेतलेला आढावा...
जागतिक बुद्धीबळ संघटनेकडून 2021 मध्ये पहिल्यांदा महिलांसाठी बुद्धीबळ विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. दर दोन वर्षांनी ही स्पर्धा खेळली जाते. 2021 आणि 2023 ह्या पहिल्या दोन वर्षी भारतीय महिला खेळाडू फार चांगली कामगिरी करू शकल्या नव्हत्या, मात्र यंदा ती सगळी कसर भरून काढण्यात त्यांनी यश मिळवलं.
 
 
विश्वचषक 2025
 
जॉर्जियामध्ये पार पडलेल्या या तिसर्‍या फिडे महिला विश्वचषकात विविध फेडरेशन्सचे एकूण 107 खेळाडू सहभागी झाले. ही स्पर्धा 7 नॉकआऊट फेर्‍यांमध्ये खेळली गेली. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत म्हणजेच शेवटच्या आठ स्पर्धकांमध्ये भारताच्या चार खेळाडू होत्या, यावरून भारताचा दबदबा दिसून येतो. त्या चार खेळाडू होत्या - कोनेरू हंपी, हरिका द्रोणावली, वैशाली रमेशबाबू आणि दिव्या देशमुख.
 
 
उपांत्यपूर्व फेरी
 
या फेरीत ग्रँडमास्टर (GM) हरिका द्रोणावली विरूद्ध इंटरनॅशनल मास्टर (IM) दिव्या देशमुख असा सामना होता; त्यामुळे एक भारतीय खेळाडू पुढील फेरीत पोहोचणार हे निश्चित होतं. दिव्याच्या मानाने हरिका खूप अनुभवी खेळाडू आहे, पण या सामन्यात दिव्याने बाजी मारली. त्याआधी कोनेरू हंपीने आपला सामना जिंकून विश्वचषक उपांत्य फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला होता. हरिकाप्रमाणेच वैशाली रमेशबाबू ह्या फेरीत स्पर्धेबाहेर गेली.
 
divya Deshmukh 
 
उपांत्य फेरी
 
दिव्याची लढत चीनच्या टॅन झोंगयी या माजी विश्वविजेतीशी होती. पंधराव्या मानांकित दिव्याने तिसर्‍या मानांकित टॅन झोंगोईला 1.5-0.5 असे पराभूत केले. रेटिंग आणि मानांकनदृष्ट्या आपल्याहून वरचढ खेळाडूंना नमवत दिव्याने स्पर्धेची अंतिम फेरी गाठत अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला. दुसर्‍या सामन्यात चौथ्या मानांकित हम्पीने चीनच्या अग्रमानांकित लेई टिंगेईवर टायब्रेकरमध्ये 5-3 अशी मात केली आणि अंतिम फेरी गाठली. आता उत्सुकता होती भारत विरुद्ध भारत या अंतिम फेरीची.
 
 
अंतिम फेरी
 
19 वर्षांची दिव्या देशमुख आणि 38 वर्षांची कोनेरू हंपी, वयातील मोठ्या फरकामुळे ही लढत battle of generations म्हणून ओळखली गेली. 26 आणि 27 तारखेला एक - एक क्लासिकल सामना खेळला गेला आणि त्यात 1-1 बरोबरी झाल्याने 28 तारखेला टायब्रेकर सामने झाले. त्यातही पहिला सामना अनिर्णीत संपला होता. दुसर्‍या सामन्यात मात्र दिव्याने बाजी मारली आणि तिसर्‍या फिडे महिला विश्वचषकाची मानकरी ठरली. या लढतीदरम्यान अनेक चढउतार पाहायला मिळाले. दोघीही जिंकण्याच्याच इराद्याने खेळत होत्या, चुकाही करत होत्या आणि सामना एकसमान स्थितीतही आणत होत्या. चषक भारतातच येणार होता, त्यामुळे भारतीय बुद्धीबळप्रेमी मात्र निर्धास्त होते.
 
divya Deshmukh
 
उपविजेती कोनेरू हंपी
 
भारतीय बुद्धीबळ जसं अनेक वर्षे विश्वनाथन आनंद या प्रमुख नावाभोवती फिरत होतं तसंच जर फक्त महिला बुद्धीबळाचा विचार केला तर कोनेरू हंपी हे नाव अग्रक्रमाने येतं. अवघ्या पंधराव्या वर्षी हंपी ’ग्रँडमास्टर’ झाली. हा त्यावेळचा विश्वविक्रम होता. ग्रँडमास्टर किताब मिळवणारी हंपी ही पहिली भारतीय महिला आहे. हंपीचे वडीलही बुद्धीबळ खेळाडू होते. मुलीची गुणवत्ता तिच्या लहानपणीच वडिलांनी ओळखली आणि त्याप्रमाणे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांची विजेतेपदे तिने मिळवली. 2017 मध्ये तिच्या मुलीचा जन्म झाला. त्या दरम्यान काही वर्षे ती खेळापासून दूर गेली होती. पुन्हा खेळायला सुरुवात केल्यावर तिला पूर्वीचा सूर सापडत नव्हता. पण जिद्दीने ती ह्या सगळ्यातून बाहेर आली. हंपी सध्या महिला गटातील ’वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियन’ आहे. तिची कारकीर्द युवा खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
 
या स्पर्धेत हंपीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं असलं; तरी त्यामुळे तिचं महत्त्व कमी होत नाही किंवा खेळही थांबणार नाही. या स्पर्धेतील पहिले तीन खेळाडू पुढील वर्षी होणार्‍या कॅन्डीडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत, त्यात अर्थातच हंपीचा समावेश आहे. त्यामुळे तिच्याकडे आणखी एक मोठी संधी असेल. कॅन्डीडेट्स स्पर्धेची विजेती खेळाडू वर्ल्ड चॅम्पियनला आव्हान देते, हंपीचं आणि तिच्या चाहत्यांचं आणखी एक स्वप्न त्या निमित्ताने साकार होऊ शकतं.
 
विश्वचषक विजेती दिव्या देशमुख
 
महाराष्ट्राच्या उपराजधानीतील ही मुलगी सध्या वर्ल्ड ज्युनियर गर्ल्स चॅम्पियन आहे (U-20), आणि याच कामगिरीच्या आधारे तिला विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली होती. स्पर्धेत तिला पंधरावं मानांकन होतं, त्यामुळे ती जेतेपदापर्यंत पोहोचेल असा विचार कुणीच केला नसेल. वयाच्या पाचव्या वर्षापासून दिव्या बुद्धीबळ खेळतेय. कमी वयातच एकामागून एक यशाची शिखरं तिने गाठली आहेत. दिव्याची आई डॉक्टर आहे, मात्र मुलीसाठी तिने तिचं काम बाजूला ठेवलं.
 
ज्युनिअर चॅम्पियन झाल्यावर दिव्या म्हणाली होती की, लवकरात लवकर ग्रँडमास्टर होणं हे तिचं स्वप्न आहे. या विश्वचषकाच्या सुरुवातीला तिच्याकडे एकही ग्रँडमास्टर नॉर्म नव्हता, ह्या स्पर्धेदरम्यान तिने तिचा पहिला नॉर्म मिळवला. मात्र स्पर्धा संपली तेव्हा इंटरनॅशनल मास्टर असलेली दिव्या, ग्रँडमास्टर झाली होती. भारताची 88वी ग्रँडमास्टर.
 
जागतिक बुद्धीबळ संघटनेच्या (FIDE) नियमानुसार ग्रँडमास्टर होण्यासाठी 3 नॉर्म्स आणि 2500+ रेटिंगची गरज असते. मात्र विश्वचषक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा या अशा महत्त्वाच्या स्पर्धा आहेत ज्यात विजेत्याला थेट ग्रँडमास्टर किताब मिळतो. दिव्याने हेच साध्य केलं. भारतातील 88 ग्रँडमास्टर्समध्ये केवळ 4 महिला खेळाडू आहेत. कोनेरू हंपी, हरिका द्रोणावली, वैशाली रमेशबाबू आणि दिव्या देशमुख. ह्या दृष्टीने दिव्याचा हा विजय फार महत्त्वाचा ठरतो.
 
दिव्याची दमदार कामगिरी
 
विश्वचषक विजेतेपद मिळवणे ही सर्वात मोठी कामगिरी असली तरी तितकीच महत्त्वाची आणखी एक गोष्ट या विजेतेपदामुळेे दिव्याने साध्य केली आहे. 2026 मध्ये होणार्‍या कॅन्डीडेट्स स्पर्धेसाठी ती पात्र झाली आहे. कॅन्डीडेट्स स्पर्धा 8 खेळाडूंमध्ये खेळली जाते आणि विजेत्याला संधी मिळते वर्ल्ड चॅम्पियनशिप सामना खेळण्याची. गेल्या वर्षी कोनेरू हंपी आणि वैशाली रमेशबाबू या स्पर्धेत खेळल्या होत्या, पुढील वर्षासाठी आत्तापर्यंत हंपी आणि दिव्या ही दोन भारतीय नावे निश्चित झाली आहेत. दिव्याचा खेळ बर्‍यापैकी आक्रमक आहे, डाव सहज बरोबरीत सोडवायला ती तयार नसते आणि जिंकण्यासाठी जोखीम पत्करण्याची तिची तयारी असते. नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी दिव्या तिच्या खेळातूनही ते वेगळेपण दाखवून देते.
 
 
गेल्या वर्षी भारतीय महिला संघाने चेस ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं, दिव्याला त्यावेळी वैयक्तिक सुवर्णपदकही मिळालं होतं. गेल्या काही वर्षात सातत्याने ती तिच्या खेळात सुधारणा करत आहे. यात तिच्या घरच्यांचं सहकार्य आहेच, पण प्रशिक्षकांचाही मोलाचा वाटा आहे. नागपूरचे राहुल जोशी हे तिचे अगदी सुरुवातीचे प्रशिक्षक. पुढील काळात आर.बी.रमेश, अभिजीत कुंटे, श्रीनाथ नारायण असे अत्यंत अनुभवी प्रशिक्षक तिला लाभले. आनंद - वेस्टब्रीज अकादमीतही तिने प्रशिक्षण घेतलं.
एखादी मोठी स्पर्धा जिंकली की पुढील काळात सर्वांचंच लक्ष त्या खेळाडूवर केंद्रित होतं, अपेक्षा वाढतात. अशा वेळी खेळाडूची खरी परीक्षा असते. येणार्‍या काळात दिव्या ह्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावी हीच सदिच्छा!
 
2025 चा हा फिडे विश्वचषक भारतासाठी खर्‍या अर्थाने संस्मरणीय ठरला. एखाद्या वैयक्तिक क्रीडा प्रकारात जेव्हा दोन भारतीय खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा चाहत्यांची त्याहून जास्त अपेक्षा ती काय असणार.. अशी वेळ पुन्हा पुन्हा येवो आणि परक्या देशात आपला राष्ट्रध्वज अभिमानाने फडकत राहो !!