विदर्भातील शिवमंदिरे

01 Aug 2025 15:45:16
चारुदत्त कहू 9209863948
 
विदर्भात अनेक प्रसिद्ध शिवमंदिरे आहेत. त्यापैकी काही प्रमुख मंदिरे म्हणजे अंभोरा येथील श्री चैतन्येश्वर मंदिर, अमरावती जिल्ह्यातील गायमुख येथील शिवमंदिर, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा येथील मंदिर आणि नागपूर शहरातील जागृतेश्वर शिवमंदिर आणि श्रीकल्याणेश्वर मंदिर आहेत. त्यांची माहिती देणारा लेख..
भारतीय संस्कृतीत शिवपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिव, ज्यांना महादेव, शंकर, नीलकंठ अशा विविध नावांनी ओळखले जाते, हे हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक आहेत. त्यांना विनाशक आणि संरक्षक दोन्ही मानले जाते. शिवाची उपासना ज्योतिर्लिंगांच्या माध्यमातून केली जाते. देशाच्या विविध भागांत स्थित 12 ज्योतिर्लिंगे ही केवळ धार्मिक स्थळे नाहीत, तर प्राचीन इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्म यांचे संगम आहेत. याशिवाय देशात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवमंदिरे उभारली गेली आहेत. विदर्भातही शिव उपासक मोठ्या संख्येत आहेत. श्रावण महिना हा भगवान शंकराला (महादेवाला) समर्पित आहे. या महिन्यात भक्त उपवास, अभिषेक आणि विविध धार्मिक विधी करून शिवाची आराधना करतात. या महिन्यात शिवपूजन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
 

Shiva temples 
 
श्री चैतन्येश्वर मंदिर, अंभोरा
 
वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले, अंभोरा हे महाराष्ट्रातील नागपूरपासून सुमारे 65 किमी अंतरावर असलेले एक आध्यात्मिक ठिकाण आहे. भगवान शिवाला समर्पित असलेले हे प्राचीन तीर्थस्थळ चैतन्येश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. वैनगंगा, कन्हान, आम, कोलारी आणि मुर्झा या पाच नद्यांचा संगम या तीर्थक्षेत्री बघायला मिळतो. समृद्ध आध्यात्मिक इतिहास, दंतकथा आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे, अंभोरा हे शिवभक्तांसह पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र ठरते.
 
 
 
हिंदू पौराणिक कथांमध्ये चैतन्येश्वर मंदिराची मुळे खोलवर आहेत. काही दंतकथांनुसार, प्राचीन काळात ऋषींनी येथे ध्यान केले आहे. भक्तांचा असा विश्वास आहे की, या मंदिरात भगवान शिवाची दिव्य उपस्थिती असल्यामुळे ते एक महत्त्वाचे तीर्थस्थळ बनते तसेच पंच नद्यांच्या संगमात डुबकी मारल्याने पापे धुऊन निघतात. हे मंदिर अनेक शतकांपूर्वी बांधले गेले आहे. मराठा राज्यकर्त्यांच्या काळातील आणि इतर स्थानिक शासकांच्या स्थापत्यकलेचा मंदिराच्या बांधकामावर प्रभाव दिसून येतो. अनेक राजे आणि संरक्षकांनी अशा धार्मिक स्थळांना पाठिंबा दिला. मंदिर संकुलात महाराष्ट्रात आढळणार्‍या पारंपरिक हिंदू नागर शैलीच्या स्थापत्यकलेचे प्रतिबिंब दिसते. ज्यामध्ये कोरीव खांब, सुंदर कोरीव मूर्ती आणि दैवी ऊर्जेने भरलेल्या गर्भगृहाचा समावेश आहे. मंदिर संकुल प्रशस्त असून, येथे भाविक प्रार्थना, ध्यान आणि आध्यात्मिक प्रवचनांमध्ये सहभागी होऊ शकतात. वर्षभर भाविक आणि पर्यटकांचा येथे राबता असतो. मंदिराभोवती असलेले नैसर्गिक सौंदर्य त्याचे आध्यात्मिक महत्त्व वाढवते. हे भक्ती, इतिहास आणि शांतीचे स्थान आहे. या मंदिर संकुलाचे प्रमुख आकर्षण म्हणजे त्याचे घाट, जिथे यात्रेकरू नदीच्या जलदेवतेच्या शक्तीवर विश्वास ठेवून धार्मिक विधी आणि पवित्र स्नान करतात. मंदिरात उत्सव आणि धार्मिक समारंभ देखील आयोजित केले जातात. विशेषतः महाशिवरात्री आणि कार्तिक पौर्णिमेला अंभोर्‍याला भाविकांची मोठी गर्दी होते. येथील मुख्य मंदिराभोवती इतर देवतांना समर्पित लहान मंदिरेसुद्धा आहेत, जी या ठिकाणच्या पावित्र्यात भर घालतात. मंत्रांचा लयबद्ध जप आणि नद्यांच्या संथ प्रवाहासह शांत वातावरण एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव प्रदान करते. अंभोरा मंदिर परिसर केवळ पूजास्थळ नाही तर एक दिव्य आश्रयस्थान आहे जे शांती, भक्ती आणि अध्यात्माशी मानवाचा ऋणानुबंध प्रस्थापित करते. महाशिवरात्रीला संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघतो. पवित्र श्रावण महिन्यातही हजारो भाविक दूध आणि पाण्याने शंकराला अभिषेक करण्यासाठी मंदिरात येतात. धार्मिक उत्सवांव्यतिरिक्त, स्थानिक मेळे आणि सांस्कृतिक कार्यक्रम गावाच्या वातावरणात चैतन्य निर्माण करतात.
 
 
 
गायमुखचा लहान महादेव - भंडारा
 
गायमुख हे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. वैदर्भीयांना या स्थानाची महती कळली असली तरीही घनदाट जंगलात असल्यामुळे गायमुख हे ठिकाण फारसे प्रसिद्ध नाही आणि महाराष्ट्रातील लोकांना या स्थानाबद्दल माहिती नाही. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या या गावाच्या टोकावर भगवान शिवाचे अत्यंत पवित्र मंदिर आहे. मध्यप्रदेशातील पंचमढी येथील भगवान शिव मंदिर ‘मोठा महादेव’ म्हणून तर गायमुख हे देवस्थान ‘लहान महादेव’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे बारमाही वाहणारा पर्वतीय झरा गाईच्या मुखातून एका जलकुंभात पडतो. यावरून या स्थळाचे नाव गायमुख असे पडले आहे. तुमसर शहरापासून केवळ 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या गायमुखला दरवर्षी माघ कृष्ण चतुर्दशीला म्हणजेच महाशिवरात्रीला 6 दिवसांची मोठी यात्रा भरते. या यात्रेला 200 वर्षांचा इतिहास आहे. नागपूर येथील रघुजी राजे भोसले आणि भंडारा येथील भोसल्यांचे सुभेदार यादवराव पांडे यांनी ही यात्रा सुरू केली. विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक महादेवाचा पोहा (भक्तमंडळींचा समूह) घेऊन नवस फेडण्यासाठी यात्रेत येतात. भाविक यात्रेत उत्साहाने जीवनोपयोगी साहित्य खरेदी करीत असल्याने आदिवासीबहुल गावकर्‍यांना त्यातून चांगले उत्पन्न मिळते.
 
Shiva temples
 
भगवान शिवाच्या प्रति श्रद्धा असणारे भक्त येथे नवस बोलतात. भक्तांची मागणी पूर्ण झाली की, ते मित्रपरिवारासह महाशिवरात्रीला महादेवाच्या यात्रेकरिता जातात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने गायमुख यात्रेला जाणार्‍या भक्तांच्या समूहाला पोहा या नावाने संबोधले जाते. भक्त मंडळींचा पोहा गावातून निघतो तेव्हा गावकरी नमस्कार करून त्यांना योग्य ती दान-दक्षिणा देतात. यात्रेला जाणार्‍या महिलांच्या झोळीत पोहे टाकून, त्यांनाही योग्य ते दान दिले जाते. गायमुखला गाईच्या मुखातून पडणार्‍या जलधारेखाली भाविक मोठ्या श्रद्धेने स्नान करतात. येथे पंचमुखी भोला शंकर मंदिरापासून पुढे हनुमान, अंबाबाई, गोरखनाथ यांची मंदिरेही बघायला मिळतात.
 

Shiva temples 
 
मार्कंडा येथील मंदिरे
 
मार्कंडा हे नागपूरपासून 216 किलोमीटर अंतरावर असलेले वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. या गावातील मंदिरांना विदर्भातील खजुराहो म्हणून ओळखले जाते. ती मंदिरे चंद्रपूर-मूल -चामोर्शी रस्त्यावर आहेत. या गावात सुमारे 23 मंदिरांचा समूह आहे. 1777 च्या सुमारास येथे वीज पडून देवळाचे बरेच नुकसान झाले. सध्या तेथे दखल घेण्याजोगी 18 मंदिरे आहेत. यात मार्कंडऋषी, (ज्यांच्यावरून या गावास ’मार्कंडा’ हे नाव पडले) मृकंडुऋषी, यम, शंकर आदि मंदिरे प्रमुख आहेत. या मंदिरांचा उभारणीकाळ 11 वे शतक वा त्यानंतरचा असावा. येथील मंदिरांच्या भिंतींवर अनेक देवदेवतांची तसेच विविध सुरसुंदरींची चित्रे कोरलेली आढळतात. उत्तरवाहिनी वैनगंगा आणि तिच्या तीरावरची अप्रतिम स्थापत्यशैली असलेली ही मंदिरे, बघता क्षणीच मनाला भुरळ घालतात. मार्कंडा येथील देवालये दक्षिणोत्तर 196 फूट लांब आणि पूर्व-पश्चिम 168 फूट लांब अशी काटकोनात वसलेली आहेत. सभोवती 9 फूट उंचीची भिंत आहे आणि काटकोनी आकारामध्ये एकूण 18 देवळे आहेत. या देवळांपैकी मार्कंडेय ऋषींचे देऊळ, यमधर्म आणि महादेवाचे देऊळ हे उत्कृष्ट शिल्पकृतीचे नमुने आहेत. या प्रकारात मार्कंडेय ऋषी, नंदिकेश्वर, यमधर्म, भृशुंडीमुनी, मृत्युंजय, विठ्ठल रखुमाई, उमाशंकर, दशावतार, शक्तिदेवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भीमेश्वर, वीरेश्वर इ. मंदिरे आहेत. या मंदिराकडे बघतांना आपण खजुराहोची मंदिरे बघत असल्याचा भास होतो. मार्कंडाला महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू इथे दर्शनाला येतात. या काळात इथे लोकांची खूप वर्दळ असते. सलग दहा ते पंधरा दिवसांची ही जत्रा असते.
 
 
जागृतेश्वर महादेव मंदिर, नागपूर
 
नागपूरची ग्रामदेवता म्हणून उल्लेख असलेल्या जागनाथ बुधवारी भागातील श्री जागृतेश्वर महादेव मंदिर हे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. गोंड राजांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचे सांगितले जाते. जुन्या पिढीतील लोक या मंदिराचा उल्लेख ‘जागनाथ’, ‘जागोबा’ अथवा ‘जागोबाचे मंदिर’ असाही करतात. या मंदिरात हनुमंताची काळ्या पाषाणाची मूर्ती आणि गर्भगृहात सुंदर शिवलिंग असून, त्याची दररोज पूजा-अर्चना केली जाते. मंदिर परिसरात श्री सिद्धिविनायक गणपती, श्री अडीचलिंगेश्वर महादेव मंदिर, श्री काळभैरव मंदिर, श्री बटुक भैरव मंदिर, श्री उदारी मठ आदी मंदिरे आहेत. स्वयंभू मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. येथे जागोबा महाराजांची समाधीही बघायला मिळते.
 

Shiva temples 
 
श्री कल्याणेश्वर शिवमंदिर, तेलंगखेडी
 
श्रावण महिन्यात शिवमंदिरांमध्ये श्रीशिवमहिम्न स्त्रोत्र आणि रुद्रातील श्लोकांचे पठण नित्य होते. त्याला नागपुरातील तेलंगखेडी भागातील पूर्वाभिमुख प्राचीन श्रीकल्याणेश्वर मंदिरही अपवाद नाही. सुमारे सव्वादोनशे वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिरात प्रवेश करताच अंगात एक अद्भुत ऊर्जा प्रवेशल्याचा भास होतो. नागपूर नगरीचा इतिहास श्रीमंत राजे भोसले राजवंश आणि गोंड राजवंशाच्या भोवती फिरतो. याच राजवंशांमुळे नागपूर नगरीला वैभव प्राप्त झाले. त्यांच्या काळात बांधलेली मठ-मंदिरे, राजवाडे, बाग-बगिचे, बाजारपेठा, स्मारके, स्तंभ गतकाळातील वैभवाची प्रचीती देतात. त्या काळातील अनेक मंदिरे आजही सुस्थितीत दिसतात. श्री कल्याणेश्वर शिवमंदिराचे बांधकाम श्रीमंत राजे रघुजी भोसले यांनी 1785 मध्ये केल्याचे काही कागदपत्रांवरून दिसते. तर काहींच्या मते त्यांच्या आई चिमाताईंनी 1794 मध्ये हे मंदिर बांधले आहे. मंदिराबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. तथापि या मंदिराच्या उभारणीसाठी काळा दगड आणि वाळूचे खडे वापरण्यात आले आहेत. गर्भगृह, सभागृह आणि अंतराल अशी मंदिराची शैली आहे. मंदिराच्या सभामंडपात अनेक खांब दिसतात. आगळी स्थापत्याशैली असलेली या मंदिराची दगडी बांधणी जाळीदार नक्षीने सुशोभित झाली आहे.
 
 
श्रावण मासारंभाच्या निमित्ताने वैदर्भीय शिवमंदिरांच्या दर्शनाला जाताना -
 
जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले
 
गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकाम् ।
 
डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं
 
चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम् ॥
 
या अत्यंत ऊर्जादायी शिवतांडव स्तोत्राचे पठण करून अंतःकरणात भक्ति आणि शक्ति जागवूया!
Powered By Sangraha 9.0