अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना वाटते की, आपण सांगू ते या राष्ट्रवादी शासनाने केले पाहिजे. संघ विचार, संस्कार आणि प्रेरणा या मुशीतून गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्पच्या दादागिरीला भीक घालीत नाहीत, म्हणून ट्रम्प खवळले आहेत. पन्नास टक्के जकात लावण्याचा निर्णय त्यांनी केला आहे. हादेखील संघशक्तीचाच एक परिणाम आहे. अशा वेळी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांचे अमृतवचन आठवते. ते म्हणत,‘संकटे उगाच येत नाहीत, ती आपल्या धैर्याची आणि सामर्थ्याची परीक्षा पाहतात.’ हे शताब्दी वर्ष म्हणजे सर्व प्रकारच्या संकटांशी धैर्याने आणि साहसाने लढण्याचे वर्ष आहे. शंभर वर्षांत जे प्राप्त केले ते अभिमानास्पद आहे, परंतु आपण कृतकृत्य झालो असे मानण्यासारखे नाही. सर्व आसुरी शक्ती या एकवटून संघ शक्तीवर तुटून पडण्यासाठी सज्ज होत आहेत.
संघशताब्दी वर्षाचा उत्साह सर्व स्वयंसेवकांमध्ये पाहायला मिळतो. असंख्य स्वयंसेवक शताब्दी विस्तारक म्हणून आपल्या प्रांपचिक जीवनातून बाहेर पडून संघ सांगेल त्या ठिकाणी जाऊन काम करताना दिसतात. त्याच वेळी जे अशा प्रकारे विस्तारक जाऊ शकत नाहीत ते आपल्या रोजच्या जीवनातील जास्तीत जास्त वेळ संघाने सांगितलेले काम आपापल्या क्षेत्रात करीत आहेत.
शताब्दी साजरी करायची नाही असे संघाने पूर्वीच ठरविलेले आहे. शताब्दी साजरी करायची नाही म्हणजे मोठे जाहीर कार्यक्रम करायचे नाहीत, आपलाच उदो उदो आपण करून घ्यायचा नाही. संस्थेच्या प्रगतीचे ढोल पिटायचे नाहीत असे संघाने ठरविले, त्याचे कारणही तसेच आहे. संघाचे कार्य समग्र हिंदू समाज संघटनेचे आहे. संघकार्याला शंभर वर्षे झाली, तरीही समग्र हिंदू समाजाची संघटित अवस्था निर्माण झाली आहे, असे संघही म्हणत नाही. 1925 साली हिंदू समाजाची जी अवस्था होती, त्यापेक्षा 2025मधील हिंदू समाजाची अवस्था खूप चांगली आहे.
हिंदू समाज आता आपणहून शोध घेऊ लागला आहे की, आपली अस्मिता कशात आहे, आपली जीवनपद्धती कोणती आहे, आपला धर्मविचार कोणता आहे, आपले खरे महापुरुष कोण आहेत, आपले प्राचीन तत्त्वज्ञान कोणते आहे, आपल्या प्राचीन संस्कृतीची वैशिष्ट्ये कोणती आहेत, अशा एक ना अनेक गोष्टींचा स्वतंत्रपणे आणि स्वयंप्रेरणेने वेगवेगळ्या क्षेत्रात ‘स्व’चा शोध सुरू झालेला आहे. संघकार्याच्या शक्तीचा हा परिणाम आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.
संघकार्याची शक्ती क्रमाक्रमाने वाढत गेलेली आहे, ती क्रमाक्रमाने वाढत असताना क्रमाक्रमाने तिचा विरोध करणारी शक्तीदेखील संघटित होत गेलेली आहे. 1925साली तसा संघ नगण्य होता, तरीदेखील तेव्हा संघाची कुचेष्टा केली जात असे. लाठीकाठी फिरवून स्वातंत्र्य प्राप्त कसे करणार? असा प्रश्न स्वयंसेवकांना विचारला जाई. नुसत्या कवायती करून समाजात परिवर्तन कसे घडणार? एका थोर पुरुषाने म्हटले की, संघस्वयंसेवक शाखेत गेला, त्याने गणवेश घातला, संचलन केले, दंड फिरविला आणि एके दिवशी तो परलोकवासी झाला. त्यांना हे म्हणायचे होते की, समाजाच्या दृष्टीने काही न करता हा स्वयंसेवक स्वर्गवासी झाला. संघ हे निष्क्रिय लोकांचे संघटन आहे, असा त्याचा अर्थ झाला.
तथाकथित या ‘निष्क्रिय’ स्वयंसेवकाने या देशात एक प्रचंड शक्ती निर्माण केली. या शक्तीने चारशे वर्षांहून अधिक काळ कुजत पडलेला रामजन्मभूमीचा विषय संपवून टाकला. या शक्तीने पूर्वांचलातील फुटिरतावाद निष्क्रिय केला. या शक्तीने खलिस्तानी आंदोलन फार वाढू दिले नाही. या शक्तीने कम्युनिस्टांचा प्रभाव अतिशय मर्यादित केला आणि याच शक्तीने जातवादी शक्तींना लगाम घातलेला आहे.
आपल्या सनातन पारिभाषिक शब्दांचा उपयोग करायचा तर या सर्व आसुरी शक्ती आहेत. त्या लगेच संपत नाहीत. संघशताब्दी वर्षाच्या काळात या शक्ती पूर्वी जेवढ्या सक्रिय होत्या त्याहून अधिक सक्रिय बनू पाहात आहेत. प्रसारमाध्यमांचा मन मानेल तसा उपयोग करून खोटी कथानके समाजात सर्वदूर पसरविण्याचे काम या शक्ती करतात. ही कथानके अशी आहेत - संघ संविधानविरोधी आहे, संघ दलितविरोधी आहे, संघ मुस्लिमविरोधी आहे, संघ शिखविरोधी आहे, संघ लोकशाहीविरोधी आहे. या कथानकांचे समाजमानसावर परिणाम होत असतात.
संघशक्तीच्या प्रभावामुळे नेहरू-गांधी काँग्रेसने संघाला शत्रू मानलेले आहे. पं. नेहरू पंतप्रधान झाल्यापासूनचा हा वारसा आहे. राहुल गांधी तो प्रामणिकपणे पुढे नेत आहेत. संघशक्तीच्या प्रभावामुळे राष्ट्रवादी लोक सत्तेवर आले. काँग्रेस सत्तेपासून दूर झाली कारण तिने देशाचा आत्मा ओळखला नाही. त्यामुळे लोकांनी काँग्रेसला जवळ केले नाही. काँग्रेसची नेतेमंडळी स्वतःच्या कमतरतेचे खापर संघावर फोडीत राहतात. त्यांचीदेखील एक राजकीय शक्ती आहे आणि ती संघविरोधात आहे.
देशात राष्ट्रवादी सरकार आहे, ते अमेरिकेला चालत नाही. हे शासन देशाच्या सावर्र्भौमत्वाशी तडजोड करीत नाही. महासत्ता अमेरिका किंवा रशिया यांच्या दबावाखाली काम करीत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना वाटते की, आपण सांगू ते या राष्ट्रवादी शासनाने केले पाहिजे. संघ विचार, संस्कार आणि प्रेरणा या मुशीतून गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्पच्या दादागिरीला भीक घालीत नाहीत, म्हणून ट्रम्प खवळले आहेत. पन्नास टक्के जकात लावण्याचा निर्णय त्यांनी केला आहे. हादेखील संघशक्तीचाच एक परिणाम आहे.
अशा वेळी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांचे अमृतवचन आठवते. ते म्हणत,‘संकटे उगाच येत नाहीत, ती आपल्या धैर्याची आणि सामर्थ्याची परीक्षा पाहतात.’ हे शताब्दी वर्ष म्हणजे सर्व प्रकारच्या संकटांशी धैर्याने आणि साहसाने लढण्याचे वर्ष आहे. शंभर वर्षांत जे प्राप्त केले ते अभिमानास्पद आहे, परंतु आपण कृतकृत्य झालो असे मानण्यासारखे नाही. सर्व आसुरी शक्ती या एकवटून संघ शक्तीवर तुटून पडण्यासाठी सज्ज होत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर डोनाल्ड ट्रम्प हा त्याचा चेहरा झालेला आहे.
या सर्वांना आपल्याला पुरून उरायचे आहे. रामायणातील एक प्रसंग आहे. रामदूत बनून अंगद रावणाच्या दरबारात जातो आणि रावणाला सांगतो की, सीतामाईला सन्मानाने परत पाठवून दे आणि प्रभू रामचंद्रांना शरण जा. रावण त्याला म्हणतो की, फार तोंड सोडू नकोस, तुला उचलून दरबाराच्या बाहेर फेकून देईल. तेव्हा अंगद म्हणतो की, मी तुझ्या दरबारात पाय ठेवला आहे. ज्या कुणात शक्ती असेल त्याने तो तेथून हलवून दाखवावा. सर्व रावणवीर प्रयत्न करतात, पण अंगदाचा पाय एक इंचदेखील हालत नाही.
संघाचे गीत आहे, ‘चरण अंगद ने रखा है। आ इसे कोई हटाये’ अशा आत्मविश्वासाने आणि आत्मशक्तीने सर्व दुर्जन शक्तींशी आपल्याला सामना करायचा आहे.