@डॉ. शरत चंद्रा चेंदी
sharath.jaihind@gmail.com
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिमेने चोख उत्तर दिल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या सीमेवर क्षेपणास्त्रे व ड्रोन यांचा प्रचंड मारा केला. मात्र तो मारा भारताचे कोणतेही मोठे नुकसान करू शकला नाही. याचे कारण ती शस्त्रे हवेतच निष्प्रभ करण्याची भारतीय संरक्षण दलांकडे असणारी क्षमता. यातील उल्लेखनीय भाग म्हणजे विशेषतः भारताजवळील ड्रोनविरोधी प्रणाली स्वदेशी बनावटीची आहे. शिवाय भारतातील एका खासगी कंपनीने ती विकसित केली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने या प्रणालीची बरीच चर्चा झाली. ती विकसित करण्याचे श्रेय जाते ते हैदराबादस्थित ‘ग्रीनरोबोटिक्स’ या कंपनीला-त्यातही इंद्रजाल या तिच्या उप कंपनीला.
राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस असे म्हणाले होते की,‘आपल्या स्वातंत्र्याची किंमत स्वतःच्या रक्ताने देणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या बलिदानाने आणि परिश्रमाने आपण मिळवलेले स्वातंत्र्य आपण आपल्या स्वतःच्या ताकदीने जपू शकू.’ भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अव्वल राष्ट्रीय नायकांपैकी एक असणारे नेताजी बोस यांचे हे शब्द, राष्ट्राच्या अखंडतेचे रक्षण, सुरक्षितता आणि बळकटीकरण करण्यासाठी नेहमीच आवश्यक असलेल्या आत्मनिर्भरतेबद्दलचे कालातीत भान देणारे आहेत. नेताजी एक असाधारण नेता असल्याने, त्यांनी त्या काळात वसाहतवादी शासकांविरुद्ध राजकीयदृष्ट्या लढाईत केवळ पुढाकार घेतला नाही, तर ’आझाद हिंद सेनेचे’ नेतृत्व करून लष्करीदृष्ट्या त्यांचा सामना केला. नेताजींची राजनैतिक विचारसरणी, लष्करी नेतृत्व, धाडसी मानसिकता, स्वातंत्र्यलढ्याचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यांच्या तेजस्वी बुद्धिमत्तेतून आलेला हा गहन संदेश, भारतमातेच्या सुपुत्रांना, विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात, आत्मनिर्भरतेच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची प्रेरणा देतो.
सध्याच्या काळात विशेषतः संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता म्हणजे केवळ केंद्र सरकारचे एक धोरण नसून एक परिवर्तनाचे अभियान आहे; ज्यामध्ये खाजगी क्षेत्र, विशेषतः या क्षेत्रात नव्याने पदार्पण करणारे, तसेच तंत्रज्ञानावर आधारित स्टार्ट-अप्स, देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देण्यासाठी निर्णायक आणि धोरणात्मक भूमिका बजावत आहेत. सरकारच्या धोरणात्मक निर्णयांचे लक्ष्य हे खाजगी क्षेत्राच्या सहभागाची व्याप्ती वाढविण्याचे असल्याने त्याचे अनुकूल परिणामही दिसू लागले आहेत. खाजगी क्षेत्रांच्या नावीन्यपूर्ण कल्पना आणि उद्योजकीय क्षमता यांच्या विकासास पोषक वातावरण तयार झाले आहे. मात्र हे केवळ कल्पनेच्या किंवा प्रयोगाच्या स्तरावर न राहता राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्त्वाच्या क्षेत्रात खाजगी क्षेत्राने, विशेषतः स्टार्ट-अप्स आणि मध्यम-लघु-सूक्ष्म उद्योगांनी (एमएसएमई) केलेल्या मूल्यवर्धनामुळे जागतिक स्तरावर त्यांच्या व्यावसायिक नफ्यासाठी लक्षणीय संधी उपलब्ध होत आहेत.
या पार्श्वभूमीवर, खासगी क्षेत्राच्या उल्लेखनीय योगदानाचे एक उदाहरण म्हणजे ’इंद्रजाल’. ही हैदराबादस्थित (तेलंगणा राज्य) ग्रीनरोबोटिक्स या कंपनीची उप कंपनी. अत्याधुनिक ड्रोनविरोधी हवाई संरक्षण प्रणाली आणि इतर ड्रोन-केंद्रित सेवा ही कंपनी प्रदान करते. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर भारताने केलेल्या अचूक हल्ल्यानंतर झालेल्या भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षादरम्यान इंद्रजालच्या शक्तिशाली प्रणालींनी भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्यात यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आत्मनिर्भरतेचे हे उत्तम उदाहरण ठरते. दुसरे म्हणजे, नवीन युगातील युद्धात ड्रोन-आधारित तांत्रिक नवकल्पनांचे महत्त्व त्यातून अधोरेखित होते. आणि तिसरे म्हणजे, केवळ राष्ट्रीय सुरक्षा राखण्यात या कंपनीच्या उत्पादनांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेपुरतेच नव्हे तर त्यातून जागतिक स्तरावर होणार्या आर्थिक लाभांवर देखील शिक्कामोर्तब करणारी इंद्रजालची प्रेरणादायी कहाणी आहे. याची परिणिती देशाच्या व्यापक सामरिक शक्तीच्या वृद्धीला हातभार लावण्यात होतच आहे; शिवाय भारताचे भू-राजकीय स्थान अधिक मजबूत करते आहे.

’आत्मनिर्भरता’ हा शब्द ’आत्मा’ आणि ’निर्भरता’ या दोन शब्दांचे मिश्रण आहे. म्हणून, भारतीय आत्मनिर्भरता हा शब्दप्रयोग असे सूचित करतो की, राष्ट्राची अखंडता केवळ त्याच्या स्वत:च्या ’आत्म्यावर’ अवलंबून आहे. अगदी प्राचीन काळापासून राष्ट्राला एकत्र बांधून ठेवणारी ती शक्ती आहे. राष्ट्राच्या अखंडतेचे, सार्वभौमत्वाचे आणि स्वाभिमानाचे हे प्रकटीकरण आहे. हेच सूत्र तंत्रज्ञानाला लावायचे तर आत्मनिर्भरतेचा संबंध स्वावलंबनाशी; राष्ट्रीय सुरक्षेशी, शत्रूच्या चालींना प्रतिबंध करण्याशी; भू-राजकीय प्रभाव वाढविण्याशी, जागतिक भूमिका आणि प्रतिष्ठा उंचावण्याशी आणि आर्थिक शक्ती प्रबळ करण्याशी आहे.
केंद्र सरकारने मे 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केले, जे पाच प्रमुख स्तंभांवर आधारित आहे. - झेप घेणारी अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, 21व्या शतकातील तांत्रिक प्रगतीची वैशिष्ट्ये असलेल्या प्रणाली, लोकसंख्याशास्त्रीय फायदा आणि त्यातून उद्भवणारी मागणी (डिमांड). या संदर्भात प्रमुख धोरणात्मक प्राधान्यांपैकी एक म्हणजे संरक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण, स्वदेशीकरण आणि उत्पादनाच्या बाबतीत स्वावलंबी होण्याचे ध्येय. नवीन युगातील युद्धात ड्रोनच्या प्रणाली वाढत्या प्रमाणात वापरल्या जात असल्याने त्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याला देशाने प्राधान्य देणे म्हणूनच क्रमप्राप्त ठरते.
नवीन युगातील युद्धांतील वैशिष्ट्यांपैकी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ड्रोनचा करण्यात आलेला व्यूहात्मक वापर. भारत-पाकिस्तान लष्करी संघर्ष (मे 2025), इस्रायल-इराण युद्ध (जून 2025) आणि रशिया-युक्रेन युद्ध (फेब्रुवारी 2022 पासून सुरू असलेले) अलीकडील काळातील या युद्धांत व संघर्षांत त्याचा प्रत्यय येतो. युद्ध आणि गुप्तचर कारवायांमध्ये ड्रोनचे वाढते महत्त्व ड्रोनच्या चार प्रमुख फायद्यांमुळे दिसून येते - एक, गैर-लढाऊ ड्रोनचे (नॉन कॉम्बॅट) लढाऊ ड्रोनमध्ये(कॉम्बॅट) रूपांतर करण्याची सोय; दोन, ड्रोनचा किफायतशीरपणा, (1 जून 2025 रोजी युक्रेनच्या ’ऑपरेशन स्पायडरवेब’ मोहिमेत 400 डॉलर्सच्या युक्रेनियन ड्रोननी सुमारे 40 रशियन विमाने नष्ट केली, ज्यामुळे जवळजवळ 7 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते); तीन, मानवरहित आणि स्वायत्त कार्यक्षमतेमुळे ड्रोन पाळतीच्या टप्प्याबाहेर राहू शकतात; परिणामतः सैनिकांची जीवितहानी टाळता येते; आणि चार, कमी उंचीवर देखील उडण्याची ड्रोनची क्षमता. या पार्श्वभूमीवर, खाजगी क्षेत्रातून, विशेषतः स्टार्ट-अप्स आणि ‘एमएसएमई’मधून विकसित होणारे ड्रोनकेंद्रित नवोपक्रम देशाचे सामरिक सामर्थ्य वाढावयास मोठा हातभार लावतात. हे सर्व हेतू साध्य करण्याच्या वाटचालीत इंद्रजालसारख्या कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत यात शंका नाही.

इंद्रजाल ही एक ’ड्रोन-इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनी आहे जी स्वायत्त ड्रोन विरोधी हवाई प्रणाली (एरियल शील्ड) विकसित करते. सन 2020 मध्ये तिची मूळ कंपनी, ‘ग्रीन रोबोटिक्स’ने या कंपनीची स्थापना भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) सोबत भागीदारीत, प्रामुख्याने भारतीय सशस्त्र दलांसाठी केली. मूळ कंपनी असणारी ग्रीन रोबोटिक्स ही तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रातील कंपनी आहे जी कृत्रिम बुद्धिमत्ताआधारित(एआय) स्वायत्त प्रणाली विकसित करते. 2008 मध्ये स्थापन झालेल्या ग्रीन रोबोटिक्सचे तत्त्वज्ञान, कंपनीच्या नावातच स्पष्टपणे दिसून येते. ते म्हणजे निसर्गाच्या संरचनेवरून बोध घेऊन यंत्रे व प्रणालींचा विकास करणे. साहजिकच त्यात शाश्वतता हे मूल्यदेखील अध्याहृत आहे. ’ग्रीन’ व ’रोबोटिक्स’ हे शब्द कंपनीचे प्रयोजन नेमकेपणाने सूचित करतात. त्याच तत्त्वज्ञानावर इंद्रजाल कंपनी आधारित असल्याने तिची प्रमुख वैशिष्ट्ये त्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत अशीच आहेत: नवोपक्रम, अभेद्यता आणि प्रेरकता.
नवोपक्रम
इंद्रजाल आणि ग्रीन रोबोटिक्सचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे रोबोटिक्स-केंद्रित स्वायत्त प्रणालींच्या अफाट क्षमतेवर विश्वास ठेवून सतत नावीन्यतेला प्राधान्य देणे. कंपनीचे सह संस्थापक किरण राजू यांच्याशी बातचीत करून त्यांची कंपनी, कंपनीचे धोरण, उत्पादने यांविषयी जाणून घेतले. ते म्हणतात,‘जेव्हा तुम्ही बहुतेक दुर्लक्षित केलेल्या त्रुटी वेळीच ओळखता आणि त्या दूर करण्याचा दृढनिश्चय करता तेव्हा नवोपक्रम उदयास येतो. ड्रोनच्या क्षमतेची पुरेशी जाणीव जगाला होण्यापूर्वी आम्ही आमच्या संशोधनाला आणि उत्पादन क्षमतांना आकार देण्यास सुरुवात केली. आम्ही मोठ्या आर्थिक पाठबळाची वाट पाहत बसलो नाही की आपल्याला जागतिक मान्यता मिळेल किंवा नाही याची चिंता करीत बसलो नाही. देशाच्या सुरक्षिततेला असणार्या धोक्यांची जाणीव ठेवून आम्ही कामाला लागलो; कारण निष्क्रियतेची काय किंमत असते याची आम्हाला जाणीव होती.’ आपल्या अनुभवावरून राजू हे असे स्टार्ट-अप सुरू करणार्यांना, नवउद्योजकांना सल्लाही देतात. ते म्हणतात, ‘आपल्याला बाजारपेठ किती उपलब्ध आहे याचा अभ्यास किंवा चिंता करतानाच एखाद्या प्रणालीतील संभ्याव त्रुटी अगोदरच दूर करण्यावर, तिचे निराकरण करण्यावर भर देण्याची सवय व वृत्ती विकसित केली तर नवोपक्रम जन्माला येतो’. इंद्रजालने तीच दृष्टी ठेवली.
अभेद्यता
इंद्रजालच्या ड्रोनविरोधी हवाई संरक्षण प्रणाली किती सक्षम आहेत याचा प्रत्यय ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारताची जी कुरापत काढली त्यावेळी प्रकर्षाने आला. पाकिस्तानने ड्रोनचा मारा भारत-पाक सीमेवर केला. त्यांनी लक्ष्यभेद केला असता तर भारतीय मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले असते. पण इंद्रजालच्या ड्रोनविरोधी प्रणालीने तो मारा हवेतच निष्प्रभ केला आणि आपली अभेद्यता सिद्ध केली. ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात इंद्रजालच्या प्रणालींच्या यशाच्या प्रमाणाबद्दल विचारले असता राजू म्हणाले,‘त्या अत्यंत -सतर्कतेच्या काळात आमच्या प्रणालींनी अनेक प्रतिकूल मानवविरहित यंत्रणांच्या हल्ल्यांना यशस्वीरित्या टिपले, ट्रॅक केले आणि निष्प्रभ केले. गोपनीयतेमुळे सर्वच सांगणे शक्य नसले तरी तरी मी एवढे ठामपणे सांगू शकतो की आम्हाला मिळालेले यश जवळपास शंभर टक्के होते. इंद्रजालच्या प्रणालींनी केवळ शत्रूचे हल्ले टिपले नाहीत तर ते निष्प्रभ केले; तेही कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय. याचाच अर्थ स्वायत्तपणे यंत्रांनी निर्णय घेतले आणि अतिशय विषम हवामान, खडतर भौगलिक प्रदेश आणि शत्रूकडून मोठ्या प्रमाणावर हल्ले होत असतानाही आम्ही विकसित केलेली प्रणाली कार्यक्षम ठरली.’ देशावर संकट आलेले असताना किंवा संघर्षच्या काळात इंद्रजालसारख्या खासगी स्टार्ट अप कंपनीपासून टाटासारख्या प्रचंड मोठ्या कंपनीपर्यंत अनेकांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका ही संरक्षण क्षेत्रात खासगी कंपन्याचे योगदान तर अधोरेखित करतेच, शिवाय आत्मनिर्भरतेच्या वाटचालीतील मैलाचा दगड सिद्ध होते. इंद्रजाल कंपनी तीन निकषांवर चालते-3 पी - तत्त्वज्ञान, (फिलॉसॉफी), उद्देश (पर्पज) आणि कामगिरी (परफॉर्मन्स). निसर्गाच्या अविश्वसनीय कार्यक्षम आणि शाश्वत यंत्रणेपासून शिकणे हे इंद्रजालाचे तत्त्व आहे. त्यातून अत्याधुनिक-प्रणाली विकसित करायच्या हा इंद्रजालची नीती आहे. ’राष्ट्र प्रथम’ हे इंद्रजालचे तत्त्वज्ञान आहे.

भू-राजकीय फायदे
विशेषतः ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर त्याची महत्त्वाची भूमिका लक्षात घेता आधुनिक सुरक्षा प्रणालींचा निर्यातदार म्हणून जागतिक स्तरावर इंद्रजालच्या हवाई संरक्षण प्रणालींचा एक विशिष्ट ठसा उमटला आहे. त्याचा अनुकूल परिणाम इंद्रजालची निर्यात वाढण्यात होऊ शकतो. त्याबद्दल राजू म्हणाले,‘मे 2025 नंतरचा टप्पा इंद्रजालच्या आंतरराष्ट्रीय मार्गक्रमणात एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. आग्नेय आशिया आणि मध्य पूर्वेतील सरकारांनी, विशेषतः ज्यांना हवाई धोक्यांचा सामना करावा लागत आहे, त्यांनी इंद्रजालच्या ‘ऑपरेशनल’ यशाची दखल घेतली आहे. त्यानंतर आम्ही निर्यातपूर्व सल्लामसलत सुरू केली आहे आणि तीन देशांशी चर्चा व नियोजन अंतिम टप्प्यात आहे.’
या यंत्रणा विकसित करण्यासाठी लागणारी तांत्रिक लवचिकता हे इंद्रजालचे मर्म असल्याने अनेक देशांसाठी तो मुद्दा आकर्षक ठरत आहे. विशेषतः ज्या देशांना अशा प्रणालींची तैनाती तातडीने हवी आहे ते देश यात विशेष रस दाखवत आहेत. याचे एक कारण म्हणजे सर्वच देशांना आता केवळ उत्पादने विकत घेण्यात स्वारस्य नसून पूर्ण प्रणाली विकत घेण्याची इच्छा आहे. किंबहुना याच बाबतीत इंद्रजाल सरस ठरते असा विश्वास राजू व्यक्त करतात. ’आम्ही रडार उत्पादक नाही; किंवा जॅमर पुरवठादार किंवा ड्रोन इंटरसेप्टर विक्रेता नाही; कमी उंचीवरील ड्रोन हल्ल्यांचा प्रतिरोध करणारी यंत्रणा विकसित व पुरवणारी कंपनी आहोत...आम्ही एखादं दोन उत्पादने विकत नाही तर आम्ही क्षमता विकसित करतो व ती सेवा देतो. ‘कॅपॅबिलिटी ऍज या सर्व्हिस’ हे आमचे व्यवसायाचे प्रारूप आहे’, असे राजू अभिमानाने सांगतात. सीमा सुरक्षा, सार्वभौम संरक्षण आणि धोरणात्मक धोक्याच्या प्रतिबंधासाठी ड्रोनद्वारे संरक्षणावर लक्ष केंद्रित करणारी नेटवर्ककेंद्रित प्रणाली म्हणजे इंद्रजाल असे समीकरण बनल्याचे ते सांगतात.
जगभरातील विविध देश रशियाच्या एस-400 किंवा अमेरिकेच्या ‘थाड’सारख्या अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्यात रस दाखवत आहेत. त्याचप्रमाणे, नजीकच्या भविष्यात, जगभरातील व्यूहात्मक (स्ट्रॅटेजिक) क्षेत्रात कार्यरत असलेले विविध देश आणि कंपन्या इंद्रजालच्या ड्रोनविरोधी हवाई संरक्षण प्रणालींमध्येे विशेष रस घेतील अशी अपेक्षा आहे. ही कामगिरी इंद्रजालचे आत्मनिर्भर भारत अभियानातील योगदान अधोरेखित करतेच पण ’विकसित भारत 2047’च्या राष्ट्रीय स्वप्नाच्या बळकटीकरणात आपल्या स्थानाचे मोल सिद्ध करते. इंद्रजालसारखी कंपनी संरक्षण क्षेत्रातील अन्य स्टार्ट-अपसाठी प्रेरक उदाहरण आहे यात शंका नाही.
लेखक इन्स्टिट्यूट ऑफ इन्क्लुजिव गवर्ननन्स, हैदराबाद येथे संशोधक आहेत.
अनुवाद - राहुल गोखले