कागदी वाघांच्या या डरकाळ्या आहेत. अशा युद्धखोर, जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवण्याची मानसिकता असलेल्या पाकिस्तानी नेत्यांना आसरा आणि अभय देत ट्रम्प शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्याची स्वप्ने पाहात आहेत. या विरोधाभासाला काय म्हणावे?
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठबळामुळे भुकेकंगाल पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे बाहू सध्या विलक्षण फुरफुरत आहेत. शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी स्वत:ला जगातील सर्वाधिक लायक व्यक्ती समजणार्या ट्रम्पना या अस्तनीत बाळगलेल्या सापांची कल्पना नाही, असे समजणे भाबडेपणाचे ठरेल.
काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांचा धर्म विचारून केलेल्या नृशंस हल्ल्याचा भारताने प्रतिशोध घेतला. आधुनिक शस्त्रास्त्रांच्या सहाय्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची मुख्य ठाणी तर उद्ध्वस्त केलीच, त्याचबरोबर पाकिस्तानमधील अण्वस्त्रांचे तळही उद्ध्वस्त केले. जेव्हा ही मोहीम थांबवण्याबाबत पाकिस्तानकडून विनंती करण्यात आली तेव्हाच भारताने या मोहिमेला स्थगिती दिली. हा अगदी अलीकडचा इतिहास. भारताकडून इतका जोरदार तडाखा बसल्यानंतरही पाकिस्तानचे उन्मत्त आणि उद्धट लष्करप्रमुख भानावर आलेले नाहीत. त्यानंतर, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांकडून मिळालेले अमेरिकाभेटीचे निमंत्रण म्हणजे आपल्यावर या बड्या राष्ट्राचा वरदहस्त तसाच असल्याची त्यांनी खूणगाठ बांधली. त्यामुळेच देश म्हणून झालेली वाताहात, आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली नाचक्की यापैकी कशाचाही परिणाम न होता अमेरिकेच्या भूमीवरून त्यांचे फुत्कार सोडणे चालूच आहे.
दीड महिन्याच्या अंतराने मुनीर यांचा हा दुसरा अधिकृत अमेरिका दौरा. तिथे ते वरिष्ठ लष्करी आणि राजनैतिक पदस्थांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांशीही संवाद साधत आहेत. भारतासोबतच्या संघर्षात भविष्यात आपल्या देशाच्या अस्तित्वाला धोका उत्पन्न झाल्यास आण्विक हल्ला करण्याची धमकी मुनीर यांनी फ्लोरिडाच्या टाम्पा येथे पाकिस्तानी जनसमुदायाला संबोधित करताना दिली. फ्लोरिडा हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मूळ राज्य. त्यावर, ‘अण्वस्त्रांच्या ब्लॅकमेलला भारत अजिबात बधणार नाही आणि राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलत राहील’, असे स्पष्ट करतानाच, ‘अणुबाँबची धमकी देणे ही पाकिस्तानची जुनीच खोड आहे,’ असा टोलाही भारताने लगावला आहे. भारत जे बोलतो ते करून दाखवतो याचा अनुभव अगदी ताजा असतानाच पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी हे औद्धत्य केले आहे.
भारत-पाकिस्तानदरम्यान चालू झालेले युद्ध थांबवल्याबद्दल आपण ट्रम्प यांचे ऋणी असल्याचेही मुनीर यांनी म्हटले आहे. जे भारतीय नेतृत्वाकडून वदवून घेण्यासाठी ट्रम्प प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत, ते पाकिस्तानसारख्या गुलाम राष्ट्राकडून वदवून घेणे सोपे आहे. मात्र, अशी कबुली देणारे मुनीर आणि त्यांच्या देशाची विश्वासार्हता आंतरराष्ट्रीय स्तरावर कधीच लयाला गेलेली असल्याने त्यांनी जाहीर ऋण व्यक्त केल्याने ट्रम्प यांचा भारत-पाक दरम्यानचा हस्तक्षेप सिद्ध होत नाही.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू जलवाटप करार ही पाकिस्तानची खरी दुखरी नस. त्याबाबत बोलताना, ‘आपल्या वाट्याच्या पाण्याचे रक्षण पाकिस्तान वाटेल ती किंमत देऊन करेल’, असा इशाराही मुनीर यांनी पाकिस्तानी समुदायासमोर बोलताना दिला. तसेच, काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्यातील नस असल्याचे सांगितले. भविष्यात भारताबरोबर लष्करी संघर्ष झाल्यास गुजरातच्या जामनगरमधील रिलायन्स इंडस्ट्रीजची रिफायनरी हे आमचे संभाव्य लक्ष्य असेल असे म्हणत त्यांनी भारताला धमक्या देण्याचे सत्र चालूच ठेवले आहे.
मुनीर यांच्या बेलगाम बोलण्यामुळे स्फुरण चढलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांनीही सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिल्याबद्दल भारताला धमकावले आहे. शरिफ यांच्याआधी पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनीदेखील ही स्थगिती उठवली नाही तर भारताशी युद्ध करण्यावाचून पर्याय नसल्याचे म्हटले आहे. थोडक्यात काप जाऊन भोके शिल्लक राहिल्यानंतरही पाकिस्तानी नेत्यांची युद्ध करण्याची खुमखुमी शिल्लक आहे. कागदी वाघांच्या या डरकाळ्या आहेत. अशा युद्धखोर, जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवण्याची मानसिकता असलेल्या पाकिस्तानी नेत्यांना आसरा आणि अभय देत ट्रम्प शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्याची स्वप्ने पाहात आहेत. या विरोधाभासाला काय म्हणावे?
त्यातच मुनीर यांचा अमेरिकेत मुक्काम असण्याच्या काळातच बलोच लिबरेशन आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करण्याची घोडचूक ट्रम्प यांनी केली आहे. स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी, पाकिस्तानपासून सुटका करून घेण्यासाठी प्राणपणाने लढा देणार्या बलोचना ट्रम्प यांनी दहशतवादी ठरवावे हे दुर्दैव आहे. पाकिस्तानी लष्कराने आजपर्यंत 21 हजाराहून अधिक बलोच नागरिक मारले आहेत. विमानातून बाँबफेक द्वारा त्यांच्यावर हल्ले केले आहेत. अनेक बलोच लोकांना बेपत्ता केले आहे ज्यांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. या संदर्भात एकदाच पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने, ‘यांचा पत्ता लागला पाहिजे. ही बेपत्ता माणसे कुठे आहेत ते आम्हांला सांगा,‘ असे बजावले होते. तरीही आजवर काही झालेले नाही. अशा बलोच संघटनेला दहशतवादी संघटना ठरवून ट्रम्प यांनी मुनीरना बळ देण्याचे काम केले आहे. त्यातून ते अधिक बेफाम वक्तव्ये करत आहेत.
मुनीरच्या अशा वक्तव्यांनंतर,‘मुनीर म्हणजे सुटाबुटातला लादेन आहे’, अशा शब्दांत पेंटॉगॉनच्या निवृत्त अधिकार्यांनी टीका केली आहे. खरे तर ट्रम्प यांना दिलेला हा सावधगिरीचा इशारा आहे. पेंटॉगॉनमधील निवृत्त अधिकारी मायकेल रुबिन यांनी पाकिस्तान हा एक सर्वार्थाने अक्षम देश असल्यासारखे वागत असल्याचे म्हटले आहे. ते म्हणतात,“मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीवरून अण्वस्त्रांच्या बाबतीत केलेले विधान इस्लामिक स्टेट आणि ओसामा बिन लादेनने केलेल्या वक्तव्यासारखे आहे.”
मात्र, एका अनुभवी आणि जबाबदार अधिकार्याचे हे उद्गार गांभीर्याने घेण्यासाठी ट्रम्प यांचे भानावर येणे गरजेचे आहे.