आसाममध्ये आनंदजी स्थायिक झाले आणि रोपवाटिका सुरू केली. चहाची रोपं विकताविकता आपला स्वतःचा मळा असावा अशी आकांक्षा त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यातून स्वतःचा चहाचा मळा तयार झाला. एका मळ्याचे पुढे चार मळे झाले आणि चहाचा कारखानाही उभा राहिला. आज कौटुंबिक एकोपा जपत त्यांनी आपल्या उद्योगाला जागतिक बाजारपेठ मिळवून दिली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत असे योगदान देणारे अनेक उद्योजक ईशान्य भारतात आहेत. त्या सगळ्यांचे प्रतिनिधी असलेले आनंदजी गोयल म्हणजे माझे नव्याने झालेले ‘चायवाले चाचा’ !!
आसामच्या चहाच्या मळ्यांमध्ये फिरत राहणे गमतीशीर असते. दूरदूरपर्यंत पसरलेले हिरवेगार मळे, त्या मळ्यांमध्ये उभी असलेली सावली देणारी उंच झाडे. आकाशात दाटून आलेले मेघ, हवेतला गारवा आणि मळ्याच्या मालकांच्या सुरस कथा!! अहाहा!! त्या कथा ऐकत ऐकत मळ्याच्या मध्यभागी असलेल्या बंगल्यात चहा घेत प्रदीर्घ गप्पा म्हणजे आनंदाची पर्वणी असते. अशीच आनंदाची पर्वणी म्हणजे आनंदजी गोयल यांच्यासोबतच्या गप्पांची मैफल!!
काही महिन्यांपूर्वी दिब्रुगड विमानतळावरून परतीच्या प्रवासात असताना आमच्या क्रीडा गणवेशावर लिहिलेले ‘ज्ञान प्रबोधिनी’ हे शब्द वाचून आनंदजी आमच्या गटाजवळ आले. त्यांनी अत्यंत प्रेमाने आम्हाला सगळ्यांना खाऊ दिला आणि आसामात येऊन त्यांना न भेटल्याबद्दल हक्काने रागावलेही!! त्यानंतरच्या प्रवासात मात्र आवर्जून त्यांना भेटायला गेलो. आमच्या सगळ्या गटाला त्यांचा मोठा चहाचा मळा दाखवला. दिग्बॉईजवळ पेंगिरी नावाच्या गावाजवळ आधुनिक तंत्रज्ञानाने सिद्ध असलेला चहाचा कारखाना पाहाताना डोळे दिपून गेले. एका अर्थाने आपल्याला मागास वाटणार्या या भागात उद्योगातून भारताच्या संपत्तीत भर घालणार्या आनंदजींचे काम अभिमानास्पद आहे.
दिग्बॉई परिसरात असलेली पहिली ऑईल रिफायनरी, चहाचे मळे आणि चहाचे कारखाने आणि त्या अनुषंगाने विकसित झालेले उद्योग असे पाहायला मिळते. इथल्या तेल संग्रहालयात तेलाच्या खाणीचा सगळा इतिहास - तेलाचा आजवरचा प्रवास - फारच आकर्षक पद्धतीने मांडला आहे. आनंदजींच्या प्रेमळ आग्रहामुळे एक दिवस दिग्बॉईमध्ये मुक्काम करून हे सारं पाहता आलं.
आनंदजींचे वडील स्वातंत्र्यापूर्वी हरियाणामधून अरुणाचलच्या जंगलात येऊन स्थायिक झाले. लहानसहान वस्तू विकण्याचे छोटे दुकान त्यांनी सुरू केले. आनंदजी हे त्यांचे द्वितीय पुत्र. वडिलोपार्जित व्यवसायातून आनंदजींचा प्रवास सुरू झाला असला तरी एखाद्या मारवाडी मुलाला शोभेल अशी उद्योजकता आनंदजींकडे होती. त्यामुळेच त्यांनी वडिलांच्या दुकानासोबत अरुणाचलच्या जंगलात जाऊन लाकडे गोळा करण्याचा, आणि ती लाकडे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. अभ्यासात फार न रमलेले आनंदजी तरुण वयात धडपडून आपली उद्योजकता जपण्याचा, वाढविण्याचा निरंतर प्रयत्न करत होते.
नंतरच्या काळात आसाममध्ये आनंदजी स्थायिक झाले आणि त्यांनी रोपवाटिका सुरू केली. चहाची रोपं विकताविकता आपला स्वतःचा मळा असावा अशी आकांक्षा त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यातून स्वतःचा चहाचा मळा तयार झाला. एका मळ्याचे पुढे चार मळे झाले आणि चहाचा कारखानाही उभा राहिला. आज कौटुंबिक एकोपा जपत त्यांनी आपल्या उद्योगाला जागतिक बाजारपेठ मिळवून दिली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून चहाची निर्मिती त्यांच्या कारखान्यात केली जाते. अनेक नामवंत ब्रँड्सना त्यांच्या चहाची गोडी लागली आहे.
अतिशय दर्जेदार उत्पादन करणार्या या उद्योगपतीकडे एक प्रकारचा नैसर्गिक आपलेपणा आहे, माणसं जोडून घेण्याची जबरदस्त क्षमता आहे. त्यामुळे अनेक लहानमोठ्या व्यावसायिकांशी, समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. भारतीय चहा मंडळाचे ते सदस्य आहेत.
समाजासाठी काही करण्याची उमेद आहे. त्यातून ते शैक्षणिक - सामाजिक कामांच्या यथाशक्ती पाठीशी उभे राहिले आहेत. शैक्षणिक कामांच्या निमित्ताने प्रबोधिनीच्या प्रशांत दिवेकर सरांशी झालेला परिचय त्यांनी आदरयुक्त मैत्रीत आणि त्यातून कामासाठी दृढ केला. दिग्बॉई रामकृष्ण मिशन, पतंजली योग पीठ, परिसरातील शाळा, स्थानिक सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळून परिचय आहे. या आणि अशा अनेक सामाजिक संस्थांच्या ते पाठीशी उभे आहेत.
देशाच्या अर्थव्यवस्थेत असे योगदान देणारे अनेक उद्योजक ईशान्य भारतात आहेत. त्या सगळ्यांचे प्रतिनिधी असलेले आनंदजी गोयल म्हणजे माझे नव्याने झालेले ‘चायवाले चाचा’ !!