श्रीमद्भगवद्गीतेची संथा घेणार्‍यांसाठी मार्गदर्शक - ‘अमृताचा घनु’

18 Aug 2025 15:22:01

vivek 
 
‘अमृताचा घनु’ हे श्रीगुरुकुलम् न्यासाचे पहिलेच प्रकाशन आहे. गेल्या दशकाहून अधिक काळापासून श्रीमद्भगवद्गीतेचे संथा वर्ग हा श्रीगुरुकुलम् न्यासाचा समाजहितैषी असा अग्रणी उपक्रम आहे. सनातन वैदिक धर्माची अक्षुण्ण विचारधारा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याचा निर्धार करत, न्यासाने प्रस्थानत्रयींमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या व प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रग्रंथाच्या स्थानी स्थित असणार्‍या श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथापासून आपला कार्यारंभ केला.
 
श्रीगुरुकुलम् न्यासाच्या श्रीमद्भगवद्गीता संथा वर्गांत श्रीमद्भगवद्गीतेतील 700 श्लोकांची शास्त्रशुद्ध लयबद्ध संथा दिली जाते. ही संथा देताना प्रत्येक श्लोकातील प्रत्येक अक्षराच्या स्वरूपाचा बारकाईने, व्याकरणिक तथा उच्चारशास्त्राच्या नियमानुसार उलगडा करून सांगितला जातो. उच्चार करताना वैदिक परंपरा असलेल्या परसवर्ण पद्धतीचा अवलंब केला जातो. उच्चारशास्त्राधारित व्याकरणिक पद्धतीनुसार श्लोक शिकताना, प्रत्येक छात्रास प्रत्येक शब्दाचा, जोडशब्दाचा, खुणेचा उच्चार प्रत्यक्ष ऐकून तो आत्मसात करणे आवश्यक असते. यासाठी न्यासाचे संथा वर्ग हे प्रत्यक्ष उपस्थितीत घेतले जातात.
 
 
आजपर्यंत ठाणे, मुंबई, नाशिक, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी असे वर्ग होत आहेत. हे वर्ग निःशुल्क असतात. हे पुस्तक न्यासाच्या अध्यक्षा मंजिरी फडके यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे शिक्षक, शिक्षकेतर सहकारी व छात्रांनी तयार केले आहे. यात मुख्यत्वे प्रत्येक श्लोक मोठ्या व ठळक टंकात छापलेला आहे. त्यांची संथा घेताना आवश्यक असणार्‍या आघात, र्‍हस्व, दीर्घ, अवग्रह, विसर्ग, अनुस्वार दर्शविणार्‍या विविध खुणा प्रत्येक श्लोकात उद्धृत केल्या आहेत. यापूर्वी अशा खुणा न्यासाचे शिक्षक संथा वर्गात छात्रांना लिहून देत असत. यापुढे छात्रांनी हे पुस्तक वापरल्यास त्यांचा त्यासाठी लागणारा वेळ निश्चितच वाचणार असून प्रत्येकाला अचूक खुणाही प्राप्त होतील. या खुणांचा अर्थ तपशीलवार समजून घेण्यासाठी पुस्तकातच उच्चारशास्त्राची नियमावलीदेखील जोडली आहे. ही अभ्यासपूर्ण नियमावली वसुधाताई पाळंदे ह्यांच्या मार्गदर्शनानुसार तयार केली आहे.
 
 
न्यासाचेच एक छात्र सुभाष शुक्ल यांनी ते स्वतः गीतेची संथा घेत असताना, प्रत्येक अध्यायाची संथा घेऊन पूर्ण झाल्यावर वर्गात ऐकलेल्या निरुपणाच्या आधारे संबंधित अध्यायाशी अनुरूप अशी चित्रे काढली. म्हणून प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभीच त्या त्या अध्यायाशी संबंधित उक्त चित्राचा समावेश केला आहे. या पुस्तकातच कृष्णाच्या मानसनीति, राजनीति, कूटनीति या गुणांवर आधारित प्रसंगकथा मंजिरीताईंनी लिहिल्या आहेत. त्याचप्रमाणे याच पुस्तकात गीतेतील प्रत्येक अध्यायाच्या अंती त्यांनी संबंधित अध्यायाचे सार लिहिले आहे. ही या पुस्तकाची खास बाजू ठरली आहे. गीतेच्या माध्यमातून आपल्याला सदैव मार्गदर्शन करणार्‍या योगेश्वराची गीतेत विशेष अशी काही सुवचने आढळतात. ही भगवंतांच्या वाणीतून प्रकटलेली सुवचने या पुस्तकात लक्षवेधी स्वरूपात वेगळी दर्शविलेली दिसतील.
 
 
न्यासाचे हे पहिलेच प्रकाशन आहे. याची फलनिष्पत्ती साधताना त्रुटी राहणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली गेली आहे. अखिल विश्वातील प्रत्येक घटकास योगेश्वराने सांगितलेले परम श्रेय प्राप्त होणे सुकर व्हावे आणि यादृष्टीने कार्यरत असलेल्या प्रत्येक प्रयत्नास, न्यास म्हणून आपण कायम सहाय्यभूत व्हावे, या भूमिकेतून न्यासाने हे काम केले आहे.
 
 
श्रीगुरुकुलम् न्यास प्रकाशित ‘अमृताचा घनुु’
देणगीमूल्य - रू. 50/-
किमान 50-100 पुस्तकांची मागणी नोंदवू शकता. पोस्टेजचा खर्च आणि पुस्तकांची रक्कम जीपे करू शकता.
श्रीगुरुकुलम् न्यास (प्रकाशन)
दि कल्याण जनता सहकारी बँक लि., कल्याण.
खाते क्रमांक 0020100100062637
आयएफएसी कोड KJSB0000002
गणेशचतुर्थीपासून पुस्तक उपलब्ध होईल.
संपर्क : मंजिरी फडके - 8007976343
Powered By Sangraha 9.0