धराली महाप्रलयाचे तांडव - वास्तव, सत्य आणि तथ्य

18 Aug 2025 12:56:38
@डॉ. अमिता कुलकर्णी
 


Dharali Rescue
धराली येथे पूरसदृश्य परिस्थिती उद्भवली आणि होत्याचे नव्हते झाले. ढगफुटीमुळं खीर गंगा नदी प्रचंड वेगाने वाहू लागली. गाळ आणि अवशेष घेऊन वाहणारी ही नदी धराली गावात शिरली आणि विद्ध्वंस घडवून आणला.‘निसर्गाचं संतुलन सान्निध्य’ ज्यावेळी बिघडतं, तापदायक ठरतं, त्यामुळं पर्यावरणाचा समतोल बिघडतो.पर्वत,नद्या,जंगलं ही संपत्ती आहे. ही संपत्ती अबाधित राखणं हे आपलं कर्तव्य आहे. विकासासाठी प्रयत्न करत असतानाच हा विकास जास्तीत जास्त पर्यावरणस्नेही कसा होईल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.
 गल रहा चट्टान का तन
आज क्यों बनकर हिमानी?
दे रहा है सहसा किसी
भूचाल का इशारा..
 
अशी सध्याची हिमालयाची अवस्था आहे...
 
पाच ऑगस्टला गंगोत्रीजवळ धराली, हरशील या भागात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी व ढगफुटीमुळं महाप्रलयाचे तांडव दिसून आले. गंगोत्रीजवळ असणारं अत्यंत निसर्गरम्य गाव धराली. प्राचीन कल्पकेदार मंदिराचं अस्तित्व हे धरालीच्या ऐतिहासिक महत्त्वाचा मोठा पुरावा आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार इथं कधीकाळी 240 मंदिरांचा समूह होता. पण 19व्या शतकाच्या सुरुवातीला श्रीकंठ पर्वतावरून उतरलेल्या खीरगंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक मंदिरे चिखलाखाली गाडली गेली.
 
 
उत्तरकाशीतील भागीरथी व खीरगंगा यांच्या संगमावर वसलेलं धराली हे प्राचीन काळी श्यामप्रयाग या नावानं ओळखलं जात होतं.धराली हे ट्रान्स हिमालयातील एक भूकंपीय अतिसंवेदनशील क्षेत्र आहे. 1864 साली धरालीमध्ये पहिल्यांदा नैसर्गिक आपत्ती नोंदवली गेेली. त्या वर्षी ढगफुटी झाल्यामुळं गावात मोठी हानी झाली. 2013 आणि 2014 ही सलग दोन वर्षे, धराली गावाजवळील पर्वतावर ढगफुटी झाली. परिणामी, खीर नाल्याला अचानक पूर आला आणि त्यानं गावात विनाशकारी तांडव घातले.
 
 
सध्याची स्थिती
 
गेल्या दहा वर्षात धरालीमध्ये ही तिसर्‍यांदा ओढवलेली आपत्ती आहे. धराली गावात आलेल्या विनाशकारी पुराचं कारण ढगफुटी नव्हतं. तज्ज्ञांच्या मते, हा पूर वरच्या बाजूला असलेल्या एखाद्या हिमनदीच्या तुटण्यामुळं किंवा हिमनदतळे फुटल्यामुळं (Glacial Lake) आला. आधी ढगफुटीची शक्यता व्यक्त केली जात होती. श्रीकंठ शिखरावरील हँगिंग ग्लेशिअरचा तुटून अडकून पडलेला भाग हा कोसळून खीर गंगेच्या प्रवाहात आला, एखादा ग्लेशिअर वितळून किंवा फुटून त्यातलं पाणी जेव्हा वाहतं, तेव्हा ते प्रचंड वेगानं आपल्यासोबत पहाडांचे भाग घेऊन येतं तसंच धराली घटनेत घडलं असण्याची सर्वात जास्त शक्यता वर्तवली जातेय.
 

Dharali Rescue 
 
असंच काहीसं 4 वर्षांपूर्वीही घडलं... 7 फेब्रुवारी 2021 रोजी उत्तराखंडात ऋषिगंगा खोर्‍यात एक दुर्घटना घडली. नंदादेवी / राँटी सॅडल / त्रिशूल / त्रिशूली यापैकी एका शिखरावरील एक हँगिग ग्लेशिअर अर्थात हिमनदी, 5600 मी. उंचीवरून ऋषिगंगेत पडला, ज्यामुळं एक हिमनद तलाव (Glacial Lake) तयार झाला. याच्या पाण्याचा दाब आतून वाढल्यामुळं या तलावाच्या बंधार्‍याच्या फुटण्यामुळं प्रचंड मोठा हिमप्रपात प्रवाह, तसंच मोठमोठे दगड, असं सर्वच प्रचंड वेगानं खाली कोसळलं. या प्रपातानं ऋषिगंगेला प्रचंड पूर आला. त्यामुळं या खोर्‍यात निर्माणाधीन असणारे 13.2 मेगावॅट ऋषिगंगा हायड्रो पॉवर प्रॉजेक्ट व 4 किमी अंतरावरील 520 मेगावॅट शक्तीची तपोवन विष्णुगाड हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रॉजेक्ट्स हे नष्ट झाले. जीवितहानीही झाली.
 
 
हिमालय मानवतेची ठेव आहे. हिमालय म्हणजे भारताचं अस्तित्वच जणू. आपल्या संस्कृतीपासून हिमालय वेगळा करताच येणार नाही. 2500 कि.मी लांब आणि 350 कि.मी. रुंद हिमालय म्हणजे एखादी रांग नसून अनेक मैल पसरलेल्या अनेक हिमाच्छादित पर्वतरांगांनी बनलेला महाकाय पर्वत आहे. हिमालयाची निर्मिती झाली आहे ती इंडियन प्लेट आणि तिबेटिअन प्लेटच्या टकरीतून. इंडियन प्लेट व तिबेटिअन प्लेट यांच्यात प्रचंड घर्षण झाले. त्यामध्ये तिबेटिअन प्लेट वर उचलली गेली आणि हिमालयाची निर्मिती झाली. अत्यंत भुसभुशीत अशा पायावर हिमालय उभा आहे. हिमालयाचं अंतरंग व बाह्यरंगही ठिसूळ आहे. त्याचबरोबर इंडियन प्लेट आणि तिबेटिअन प्लेट यांच्यात सतत घर्षण आजही चालूच असतं.
 
 
या घडामोडीमुळं पर्यावरणात बदल होतात. जे निसर्गनिर्मित आहेत आणि मानवनिर्मितही. त्यामुळं नद्यांच्या पात्रांच्या दिशा बदलत जात आहेत आणि हिमनद्या वितळत चालल्या आहेत. त्यांच्या जागा बदलत आहेत, त्या मागं सरकणं असे बदल होत आहेत.
 
 
हिमालयातील नद्यांच्या मूळ स्त्रोतांना मानवी औद्योगिक विकासात बळी पडावं लागतंय. वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकरण यामुळं पर्यावरणातील घटकांचा वापर वाढला. शेती, वस्त्या आणि उद्योगधंद्यांच्या विस्तारासाठी रस्ते, तसंच रोजच्या वापरासाठी अत्यावश्यक वीजेसाठी, औद्योगिकरणासाठी पहाडी भागात होणारे बदल, टेक्टॉनिक प्लेट्सचं घर्षण यांचा एकत्रित परिणाम म्हणून आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळं हिमनगांचं आकारमान कमी होणं, ते वितळणं किंवा त्यांच्या जागा बदलणं हे घडत असतं.
 
 
हिमनदी किंवा ग्लेशिअर म्हणजे काय?
 
गुरुत्वाच्या प्रभावाखाली सावकाशपणे वाहणार्‍या बर्फाच्या प्रचंड मोठ्या राशीला हिमनदी म्हणतात. हिमनदीत अनेक वर्षे साचलेले व घट्ट झालेले हिम असून त्याच्या वजनानं अखेरीस त्याचे खालचे थर दाबले जाऊन बर्फ बनलेला असतो. हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ वितळला की, बर्फाचं पाणी बर्फाच्या राशीत खोलवर पाझरते आणि हिमस्फटिक व बर्फाचे कण यांच्यामधील रिकाम्या जागा त्या पाण्यानं भरल्या जातात व ते पुन्हा गोठतं. या खोलवर पाझरलेल्या पाण्यात खाली हिमखंड असतात. या पाझरलेल्या पाण्याची तळी बनतात, त्यांना हिमनद तलाव म्हटलं जातं. या हिमनद तलावांतील हिमखंड वेगानं वितळले तर त्यातील पाण्याची पातळी वाढून या हिमगर्ताच्या नैसर्गिक भिंतींवर त्याचा दाब पडून ते फुटतं. अन त्यातील पाणी, हिमखंड, हे वेगानं बाहेर पडून विध्वंसक बनतात.
 
धराली / उत्तरकाशी आपत्ती समजून घेताना..
 
5 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी दीडच्या सुमारास ढगफुटीमुळं खीर गंगा नदी प्रचंड वेगाने वाहू लागली. गाळ आणि अवशेष घेऊन वाहणारी ही नदी धराली गावात शिरली आणि विद्ध्वंस घडवून आणला. दहा वर्षात ओढवलेली ही तिसरी आपत्ती आहे. खीर गंगेचा पूर्वीचा मार्ग जो आत्ताच्या मार्गापेक्षा वेगळा होता, तो आधीच्या पूरस्थितीमुळं बदलला, आणि तिच्या पूरक्षेत्रात नवीन वसाहती केल्या गेल्या. तिच्या पूर्ण पूरक्षेत्रात आता बांधकामं केली गेली. जुन्या लोकांनी आपली घरं सुरक्षित ठिकाणी बांधली, पूर्वीपासूनच..
 
 
आताच्या या घटनेमुळे गाळ व अवशेष घेऊन आलेली ही नदी प्रचंड वेगाने आपल्या मूळ मार्गाने वाहिली. नदी आपला मार्ग विसरत नाही अन इथं हेच घडलं. जुन्या प्रवाहमार्गाने सर्व काही उद्ध्वस्त करत ती भागिरथीत शिरली. भागिरथीच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ करत..
 
 
यामागची कारणमीमांसा जाणून घेताना
 
आपत्तीच्या दिवशी हरशील येथे फक्त 6.5 मिमी पाऊस झाला, तर भटवाडी येथे 24 तासांत 11 मिमी पाऊस झाला. हे प्रमाण ढगफुटीच्या तांत्रिक व्याख्येपेक्षा खूपच कमी आहे. कारण ढगफुटी मानली जाण्यासाठी एका मर्यादित भागात एका तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस आवश्यक असतो.
 
 
या विसंगतीमुळं तज्ञांचं म्हणणं आहे की या प्रचंड पूराचं मूळ कारण ढगफुटी नसून, कदाचित हिमनदी सरोवर फुटून आलेला पूर किंवा हिमनदीचं कोसळणे असू शकते. ही घटना तेव्हा घडते जेव्हा वितळलेल्या हिमनद्यांमुळं तयार झालेली हिमनदी सरोवरं अचानक त्यांच्या नैसर्गिक भिंतींना भेदून प्रचंड प्रमाणात पाणी खाली सोडतात.
 
 
धराली गावापासून सुमारे 7 किमी वर, समुद्रसपाटीपासून सुमारे 6,700 मी. उंचीवर, हिमनद्यांमुळं तयार झालेल्या glacial deposits एक समूह आढळला आहे. यांची अंदाजित उभी जाडी 300 मी. आहे आणि त्याचं क्षेत्रफळ सुमारे 1.12 चौ.कि.मी. आहे. यांची रचना glacial moraines and glacio-fluvial materials यांनी बनलेली असल्याचं संशोधन आहे... it is an unstructured mass located within a hanging glacial cirque. ग्लेशिअरमध्ये असणारे असे भाग कधीही अस्थिर होऊन तुटून वेगानं वाहात येऊ शकतात.. धरालीमध्ये झालेल्या घटनेमागं ही कारणमीमांसा असल्याचं सांगितलं जातं..
 

Dharali Rescue 
 
मानवी हस्तक्षेपांनी हिमालयातील आपत्तींचा धोका अधिक वाढवला आहे. अस्थिर, तीव्र चढाईवर, उतारांवर व पूरप्रवण नदीकाठांवर बांधकाम, भूवैज्ञानिक सर्वेक्षणाविना वसाहती उभारणं, तसंच पर्यावरणीय र्‍हासात डोंगर कापणं आणि जंगलतोड यामुळं नैसर्गिक संरक्षणकवच नष्ट होणं, अपुरी जलनिस्सारण व्यवस्था आणि नदीपात्रांवरील अतिक्रमण, बेकायदेशीर खाणकाम यांचा समावेश आहे. ग्लेशिअर्स आज आपली मूळ जागा सोडून मागं-पुढं सरकत आहेत. ते जलवायु परिवर्तनामुळं. या जलवायु परिवर्तनासाठी माणसंच बर्‍याच मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहोत.
 
 
नदीपात्रातील व इतर ठिकाणी होणारं बेसुमार बांधकामं स्थानिकांनी अनेक ठिकाणी नदीपात्रांत बेकायदेशीर बांधकामं केलेली आहेत. त्यासाठी नदीपात्रातून दगड व वाळू खणण्याचं काम करण्याच्या या बेकायदेशीर कृत्यांमुळं नद्या, त्यांची पात्रं रुंद होणं व नद्यांच्या प्रवाहांच्या दिशा बदलणं हे होत राहातं, जे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे.
 
 
गेल्या काही वर्षांत चारधाम यात्रेची गर्दी वाढत गेली तसतशी वाटेतली छोटी-छोटी गावंही वाढत गेली. पण ती सर्व वाढत असताना डोंगरांना फोडून वाढली. आणि हा सारा विस्तार होत असताना एक गोष्ट लोकांनी साफ नजरेआड केली, ती म्हणजे इथे उपलब्ध असणारी सपाट जमीन.
 
 
इथला केवळ 7.43% भाग हा सपाट प्रदेश आहे. याचाच अर्थ असा की, इथे मोठ्या वसाहती वा पर्यटकांसाठी राहण्याची सुविधा उभारण्यासाठी लागणारी जमीन ही अत्यंत अत्यल्प आहे. केवळ पर्यटकांच्या राहण्याबद्दल नाही तर त्यांच्यासाठी रस्ते व इतर वाहतूक सुविधा करण्यासाठी देखील जी काही उपलब्ध जमीन हवी ती तुटपुंजीच आहे. हे सत्य नजरेआड करून या भागात अस्ताव्यस्त बांधकामं, नदीकाठी, डोंगर फोडून केली गेली. अत्यंत प्रतिकूल आणि अजूनही सतत जडणघडण सुरू असलेल्या या डोंगररांगांमध्ये या सार्‍या विस्ताराला कोणताही धरबंद नव्हता. या सगळ्या गोष्टींचा व्हायचा तोच एकत्रित परिणाम 2013 मध्ये झाला..
 
 
पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण राखणं. त्यासाठी आधी किती पर्यटक या परिसरात सामावून घेता येतील याचा विचार केला जावा. एका वेळी किती पर्यटक सोडायचे याचे गणित मांडावे लागेल. यात्रेकरुंच्या संख्येवरही निर्बंध हवेत. बेजबाबदार पर्यटन हाही एक चिंतेचा विषय होत चालला आहे. इथल्या लोकांना उत्तम रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, रोजगार, वैद्यकीय सेवा, मोबाईल नेटवर्क यासारख्या मूलभूत सुविधा मिळणं हा त्यांचा हक्क आहे. खरं म्हणजे ती काळाची गरज आहे..
 
 
तरीही हिमालय आध्यात्मिक प्रेरणेचा स्त्रोत तर आहेच पण ती एक प्राकृतिक देणगीही आहे. नद्या, हिमनद्या, जंगलं, जमीन यांना कायमच राखण्यात आपलं योगदान असायला हवं. केंद्र सरकारनं हिमालय क्षेत्राच्या विकासासाठी एक वेगळे धोरण बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हिमालयी राज्यांसाठी हरित निर्माण, वनाधिकार, प्राकृतिक आपत्ती प्रबंधन, सूक्ष्म वा लघु जलविद्युत परियोजनांचा विचारपूर्वक विस्तार, जलसंरक्षण, हरित व कृषि क्षेत्रांचं संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. जेणेकरून या क्षेत्रातल्या स्थानिक लोकांच्या उपजीविकाही सुनिश्चित होतील.
 
 
‘निसर्गाचं संतुलन सान्निध्य’ ज्यावेळी बिघडतं, तापदायक ठरतं, त्यामुळं पर्यावरणाचा समतोल बिघडतो. याला कोण कारणीभूत? तर आपणच सर्वजण. विज्ञान ही दुधारी तलवार आहे. त्याला जपून वापरणे हेच इष्ट.
 
 
या भागाची माहिती न करून घेता अंदाधुंदपणे जायचं नुसतं. आपल्या अशा वागण्यामुळं आपल्या सांस्कृतिक वारशाचं नुकसान किती होतंय हेही जाणून घेण्याची आवश्यकता वाटत नाही. पर्यटन हा उत्तराखंडाचा मोठा महसूल स्रोत आहे, पण त्याचं नियोजन केलं नाही तर तेच राज्याच्या मुळावर उठू शकतं. पर्यटक म्हणून आपणा सर्वांचीही जबाबदारी आहे. पर्यटकांनी केलेला कचरा यात्रा काळात सर्वत्र दिसून येतो. प्रदूषण वाढले आहे. चांगल्या सवयी व वागण्याचे नियम यांचं पालन होणं आवश्यक आहे. विकासाच्या नावाखाली विनाशाची जी रेखा नद्यांपासून ते हिमनद्यांपर्यंत आपण आखलीय ती लवकरात लवकर नियंत्रित करण्याची गरज आहे..
 
 
हिमालय बचाओ! देश बचाओ! ही फक्त घोषणा नाही..
 
 
हा हिमालयीन क्षेत्रांत भावी विकास प्रकल्प धोरणांना दिशाहीन होण्यापासून वाचवण्याचा मार्ग आहे. हिमालयाच्या अगणित देणगीसाठी आपण त्याचे ऋणी आहोत, अन राहू. परंतु, आपण त्याला काय दिलं? त्याच्या आपत्तीच्या अनेक कथा, व्यथा आपण अनेक रूपांत बघतोय. अनेक प्रश्न उभे आहेत आज. हिमालयाप्रति कृतज्ञता दर्शवण्याची जबाबदारी फक्त हिमालयवासीयांचीच आहे की संपूर्ण देशातील नागरिकांची आहे?
 
 
पर्वत, नद्या, जंगलं ही संपत्ती आहे. ही संपत्ती अबाधित राखणं हे कर्तव्य आहे आपलं. विकासासाठी प्रयत्न करत असतानाच तो जास्तीत जास्त पर्यावरणस्नेही कसा होईल, यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.
Powered By Sangraha 9.0