फूलशेतीला हवाय राजाश्रय

02 Aug 2025 16:01:53
floriculture in indiaसध्या राज्यात कृत्रिम अर्थात प्लास्टिक फुलबंदीचा विषय चर्चित आला आहे. पर्यावरणाला घातक असलेल्या प्लास्टिक फुलांनी बाजारपेठ काबीज केली आहे. या फुलांच्या अतिरिक्त वापरामुळे नैसर्गिक फुलांची बाजारपेठ संकटात सापडली आहे. परिणामी, फूल उत्पादक शेतकर्‍यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.

krushivivek
 
आज प्रचंड वेगाने वाढणार्‍या प्लास्टिक वस्तू किंवा पदार्थाने मानवी जीवनाला स्पर्श करणारी सर्व क्षेत्रे व्यापून टाकली आहेत. वैद्यकीय क्षेत्र असो की कृषी क्षेत्र किंवा माहिती व मनोरंजन क्षेत्र आदी सर्वच क्षेत्रात प्लास्टिकचा शिरकाव झाला आहे. प्लास्टिक उपयोगी असले तरी त्याचे गुणधर्म पर्यावरणाला हानी पोहोचवण्याचे काम करतात. गेल्या महिन्यात (17 जुलै 2025) झालेल्या प्लास्टिक फूलबंदीच्या मागणीने हा विषय मराठी जनांच्या दारात येऊन ठेपला आणि मग ही बंदी योग्य की अयोग्य? असा एक सूर उमटला. या प्रश्नाला काही उत्तरे आहेत. प्लास्टिक फुलांमुळे शेतकर्‍यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळत नाही व फूल निर्यातीला फटका बसत आहे, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे; तर दुसरीकडे प्लास्टिक फूलबंदी झाली तर प्लास्टिक उद्योग व त्यावर मोठ्या संख्येने उपजीविका असलेल्या घटकाच्या रोजगारावर त्याचा थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या क्षेत्रावर अवलंबून असणार्‍या घटकांनी भविष्याचा विचार करून निसर्गपूरक रोजगाराच्या वाटा शोधल्या पाहिजेत.
 
 
खरेतर, भारतात आक्षेपार्ह प्लास्टिकपासून बनणार्‍या वस्तूंची संख्या कमी झाली आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे चीनमधून चोरमार्गाने येणार्‍या प्लास्टिक शोभिवंत फुलांनी मुंबई व देशातील काही शहारातला बाजार व्यापला आहे. आकर्षक रंग, स्वस्त व किमान दोन वर्ष वापरण्याची गॅरंटी असते. या तीन कारणांमुळे याकडे ग्राहक आकर्षित होतात. सणासुदीच्या काळात घर, बंगला, कार्यालय, हॉटेल्स आदी ठिकाणे प्लास्टिक फुलांनी सजलेली असतात. ही फुले विविध आकारात, विविध रंगात, थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे बनविले जातात. मुख्य म्हणजे या फुलांमध्ये पॉलिथिन (जास्त वापरले जाणारे प्लास्टिक) व मायक्रोेन व घातक रंग वापरले जातात. नैसर्गिक फुलांचे विघटन व्हायला 1 ते 3 आठवडे लागतात. तर प्लास्टिक फुलांच्या विघटनास लागणारा वेळ, त्याच्या प्रकारानुसार आणि वातावरणावर अवलंबून असतो. त्यामुळे या फुलाच्या विघटनास अनेक वर्षे किंवा शतके देखील लागू शकतात. म्हणून हे पर्यावरणासाठी घातक आहे.
 
 
एका अहवालानुसार सध्या जागतिक कृत्रिम फुलाची बाजारपेठ 3.1 अब्ज अमेरिकन डॉलर आहे, ही बाजारपेठ 2034 सालापर्यंत सुमारे 6 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. प्लास्टिक फुलांच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी नैसर्गिक फुलांचा स्वीकार करणे हे निसर्गाच्या दुष्टीने अधिक संयुक्तिक आहे.
 

vivek 
 
नैसर्गिक फुलांचा व्यापार
 
भारतामध्ये हजारो वर्षांपासून निरनिराळे पीके व फुलांची शेती केली जाते. निरनिराळ्या धार्मिक विधी व सणामध्ये फुलांचे जतन व संवर्धन करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये पारिजातक, जाई-जुई, मोगरा, चाफा, कनकचाफा, सोनचाफा, कमळ या फुलांचा अनेक ठिकाणी उल्लेख केलेला आहे.
 
 
सम्राट जहांगीराच्या काळात गुलाब अत्तराची निर्मिती झाली, असा पुरावा मिळतो. मध्ययुगीन काळात परदेशात भारतीय सुगंधी द्रव्याला मोठी मागणी होती. आज भारतात फूलशेती ही व्यापारी पीक म्हणून उदयास आले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी व अल्पभूधारक शेतकरी शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून फूलशेती करतात. यास केंद्र शासनाच्या ‘फूल उत्पादन अभियान‘ व ‘पुष्प उत्पादन विकास कार्यक्रमा‘ची जोड मिळाली आहे. 2024-25 च्या केंद्रीय आर्थिक सर्वेक्षणात फूलशेतीला ’ सूर्योदय उद्योग’ असे संबोधले गेले. नाजूक जाईपासून ते सुगंधी गुलाबापर्यंत भारतीय फुलांनी जगाला सुगंध दिला आहे. आज भारत हा चीननंतर दुसर्‍या क्रमाकांचा फुलांचा मोठा उत्पादक देश आहे. 2023-24 च्या आकडेवारीनुसार 19 हजार 677.89 मेट्रिक टन फुलांची (गुलाब, ऑर्किड व जरबेरा आदी फुले) निर्यात करण्यात आली आहे. तामीळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगला, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, हरियाणा, झारखंड, आसाम, जम्मू व काश्मीर हे फुल उत्पादक राज्ये समजली जातात.
 
 
महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर व नागपूर जिल्ह्यांमध्ये फूलशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. झेंडू, गुलाब, मोगरा, शेवंती, जाई-जुई, चाफा, गलडा, जरबेरा, ऑर्किड या व्यापारी फुलांचा लागवडीत (अंदाजे 4 लाख हेक्टर क्षेत्र) समोवश होतो. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा ही महाराष्ट्रातील फूलव्यापाराची प्रमुख केंद्रे आहेत. पारपारगाव (ता. महाबळेश्वर) हे गाव ’गुलाब’, यवत (पुणे) हे गाव ’शेवंती’, खांड व वाकूडपाडा (ता. विक्रमगड) ’मोगरा’, सोनसुडी सुपे हे गाव पुणे) ’गुलछडी’, गोळवण व आगाशी (ता. वसई) हे गाव ’जाई-जुई’, शिरसोली गाव (जळगाव) झेंडू व वसई हे गाव सोनचाफा लागवडीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
 
 
पॉलीहाऊस व ग्रीनहाऊस तंत्रामुळे वर्षभर शाश्वत फुलांचे उत्पादन शक्य झाले आहे. मात्र नैसर्गिक फुलांची नाशिवंतता, वाहतूक खर्च आणि बाजारपेठेतील चढउतार व कृत्रिम फुलांच्या शिरकाव्यामुळे फूल उत्पादक शेतकर्‍यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
 
 
vivek
 
सांगा, आम्ही कसं जगायचं?
 
प्लास्टिक फूलबंदी संदर्भात ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले, असे वीरगाव (ता.अकोले, जि. अहिल्यानगर) येथील फूल उत्पादक शेतकरी व विश्व हायटेक नर्सरीचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र थोरात सांगतात, “महाराष्ट्रात फुलांची परंपरा खूप प्राचीन आहे. फुलांचे सौंदर्य, सुगंध आणि त्यांचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व यामुळे महाराष्ट्रात फुलांची साधारणतः 6 ते 8 लाख एकरांवर लागवड केली जाते. यापैकी 70 ते 80 हजार एकरांवर पॉलिहाऊस व ग्रीन हाऊस मध्ये फुलांची लागवड मानली जाते. सातारा व पुणे हे दोन जिल्हे ’फूल हब’ म्हणून ओळखले जातात. फूललागवडीचा उत्पादन खर्च हा विविध फुलांवर अवलंबून आहे. जसे की, झेंडूचा एकरी उत्पादन खर्च हा 70 ते 80 हजार रूपये तर गुलाब लागवडीचा उत्पादन खर्च त्याच्या कलमानुसार बदलत जातो, साधारणतः हा खर्च एक लाखाच्या घरात जात आहे. फूलशेती हा खर्चिक आणि मेहनतीचा व्यवसाय आहे. बियाणे, कलमं, खते, पाणी, मजूर, व्यवस्थापन आणि वाहतूक यासाठी शेतकर्‍यांना मोठी गुंतवणूक करावी लागते. कृत्रिम फुलांमुळे फूल उत्पादक शेतकर्‍यांवर मोठे संकट कोसळले आहे.
 
 
ही फुले किमतीला स्वस्त आणि दीर्घकाळ टिकण्याच्या गुणधर्मामुळे बाजारात मागणी वाढली आहे. लग्न, सण, उत्सव कार्यक्रमात ही फुले मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली आहेत. त्यामुळे गुलाब, झेंडू, शेवंती, मोगरा यांसारख्या नैसर्गिक फुलांच्या मागणीत घट निर्माण झाली आहे. स्थानिक बाजारात ही परदेशातून (चीन) कृत्रिम फुले आयात केली जात आहेत आणि स्वस्तात विकली जातात. यामुळे सामान्य फूल उत्पादक शेतकरी स्पर्धेत टिकाव धरू शकत नाही. या समस्येमुळे उत्पादन खर्चही वसूल होत नाही. अनेक फूल उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. काही फुलशेती सोडून पारंपरिक शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे तुम्हीच सांगा, आम्ही फूल उत्पादक शेतकर्‍यांनी कसे जगावे?
 

vivek 
 
खरेतर, फूलशेती व्यवसायामुळे अनेक लोकांना रोजगार मिळतो. फुलांची लागवड, तोडणी, पॅकिंग आणि विक्री अशा सर्व प्रक्रियांमध्ये अनेकांना कायमस्वरूपी रोजगार मिळतो. शिवाय पर्यावरणाच्या दृष्टीने फूलशेती फायदेशीर आहे. फुलांच्या झाडांमुळे हवेतील प्रदूषण कमी होते आणि जैवविविधता वाढण्यास मदत होते. फूल आणि मधमाशी यांचे नाते खूप खास आहे. मधमाश्या फुलांमधील मकरंद आणि परागकण खाण्यासाठी फुलांवर येतात. या बदल्यात, मधमाश्या फुलांचे परागीकरण करतात, ज्यामुळे वनस्पतींची वाढ आणि प्रजनन शक्य होते. ही उपयुक्तता लक्षात फूलशेतीला शासनाकडून राजाश्रय मिळाला पाहिजे. प्लास्टिक फूलबंदी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक दर्शविली आहे, प्लास्टिक फूलबंदी निर्णयाचे त्वरित परिपत्रक काढून महाराष्ट्रातील फूलशेतीला चालना द्यावी.“
 
 
फूलशेतीचे असे असावे धोरण
 
फूलशेती व उद्योगात स्थलांतर करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे गावातच पैसा मिळत असतो. अनेक फुलांपासून तेल, सुगंधी द्रव्य, अत्तर, गुलकंद, गुलाब जेल आदी उत्पादने तयार केली जातात. यासाठी फुलाची निर्यात वाढावी यासाठी समूहकेंद्र (क्लस्टर) ही संकल्पना राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील गुलाब, मोगरा, शेवंती, झेंडू, आदी प्रमुख फूलपीके निश्चित करून त्याची राज्यभरात किमान पाच समूह केंद्रे तयार करावीत. याद्वारे फुलशेती मूल्यसाखळ्या उभारण्यास वाव मिळाले, यातून फुलांची उत्पादनक्षमता वाढेल. शीतसाखळी, विशेष प्रक्रिया केंद्र, निर्यात सुविधा केंद्र, वाहतूक सुविधा, पायभूत सुविधा उपलब्ध करून महाराष्ट्रात ’फुलांचे हब’ निर्माण करता येईल, हे सत्यात उतरेल तर फुलांवर प्राथमिक प्रक्रिया करून ते बाजारपेठांमध्ये विकता येईल. यामुळे शेतकर्‍यांना शाश्वत बाजारपेठ मिळेल व उद्योजकांना नव्या संधी मिळतील. राज्यात विविध फुलांचे समूहकेंद्र उभे राहतील आणि त्याद्वारे आवश्यक सुविधा याबरोबरच निर्यातीसाठी इतर अनेक सुविधाही उपलब्ध होतील. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती आणि समूह केंद्र, समूह उपकेंद्र सहायता कक्ष अशी रचना करणे गरजेचे आहे.
 
 
एकूणच फूलशेतीला उद्योगाचा दर्जा दिल्याशिवाय तरणोपाय नाही. त्यासाठी विद्यापीठ स्तरावर संशोधन झाले पाहिजे. फुलांचे उत्पादन वाढेल, शेतकर्‍यांना आर्थिक बळ प्राप्त होईल.
 
Powered By Sangraha 9.0