भारतीय मजदूर संघ - सात दशकाची वाटचाल आणि पुढील दिशा...

02 Aug 2025 18:06:02
@अनिल ढुमणे
BMS 
सत्तर वर्षांच्या काळामध्ये कामगार क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. सार्वजनिक उद्योग हे कमी कमी होत गेले. कायम कामगारांची संख्या कमी कमी होत आहे. उद्योजकांची वाढती मुजोरी, सरकारी नियम यामुळे कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आणि असंतोष वाढत आहे. हा असंतोष दूर करणे आणि कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे काम भारतीय मजदूर संघ करत आहे. शून्यापासून सुरू झालेल्या भारतीय मजदूर संघाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केले आहे. आज लोकल ते ग्लोबल असा जगाला आश्चर्यचकित करणारा प्रवास आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यायी विचार स्थापित करत आहे, भारतमातेला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी सुरू झालेल्या अंतिम लक्ष्याकडे वाटचाल करत आहे.
भारतीय मजदूर संघाला 23 जुलै 2025 रोजी 70 वर्षे पूर्ण झाली. कार्यविस्तार, गुणवत्तावाढ, महिला आणि युवा सहभाग वाढवणे, संघटन आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, प्रत्यक्ष संपर्कावर भर देणे आदी उद्दिष्ट निश्चित करून वर्षभर विविध कार्यक्रम भारतीय मजदूर संघाच्या वतीने राबवण्यात आले. सत्तराव्या वर्षात 365 नवीन कामगार संघटना, 1 कोटी पेक्षा जास्त कामगारांपर्यंत प्रत्यक्ष मजदूर संपर्क अभियान, महिला व युवांचा कामगार चळवळीतील सहभाग वाढवण्यासाठी सर्व राज्यात युवा आणि महिला कामगार संमेलन, सामाजिक जागृतीसाठी कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वदेशी, नागरिक कर्तव्य आणि सामाजिक समरसता या विषयांसाठी पंचपरिवर्तन जागृती अभियान, निधिसंकलन आदीं कार्यक्रम संपन्न झाले. आता देशभर युवा आणि महिला अभ्यासवर्ग होत आहेत.
 
 
या 70 व्या वर्षाचा सांगताचा कार्यक्रम 23 जुलै 2025 रोजी नवी दिल्लीतील के. डी. जाधव इंडोर कुस्ती स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम येथे परम पूजनीय सरसंचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाने संपन्न झाला. भारतीय मजदूर संघाने आपल्या रिती, नीती आणि कार्यपद्धती यातून जगात एक आदर्श निर्माण केलेला आहे. कामगारहित, उद्योगहित आणि राष्ट्रहिताच्या पुढे जाऊन विश्वहिताची भूमिका भारतीय मजदूर संघाने घ्यावी आणि जगातील कामगार चळवळीला दिशा द्यावी, सत्तर वर्षाच्या कार्याचा आनंद व्यक्त करत असताना आपण हुरळून न जाता, सिंहावलोकन करत आपल्या लक्ष्याकडे अग्रेसर व्हावे, असे प्रतिपादन डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी BMSचे अखिल भारतीय अध्यक्ष हिरण्मय पंड्याजी होते. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, माजी सहसरकार्यवाह भागेय्याजी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, दिल्लीचे कामगार मंत्री कपिल मिश्रा, ILOच्या डायरेक्टरची Ms Michico Miyamoto (Japan), हिंद मजदूर सभा, आयटक, इंटक, AICCTU या केंद्रीय कामगार संघटनांचे पदाधिकारी, नेपाळमधील भारतीय मजदूर संघाच्या शाखेचे पदाधिकारी, FICCI, CII या उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी, दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता, माजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री संतोषजी, सहकार भारतीचे संघटनमंत्री संजय पाचपोर, संघाचे संजय आंबेकर याची उपस्थिती होती. तसेच देशभरातील भारतीय मजदूर संघाच्या राज्यांचे अध्यक्ष, महामंत्री, अखिल भारतीय महासंघाचे अध्यक्ष, महामंत्री, केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य, त्याशिवाय दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांतील सुमारे आठ हजार कामगार उपस्थित होते.
 
 
या कार्यक्रमात इ कार्यकर्ता हे पोर्टल प्रकाशित करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय मजदूर संघाच्या कार्याची माहिती देणारी छोटी फिल्म प्रदर्शित करण्यात आली. तसेच ऑर्गनायझर या मासिकाच्या विशेष अंकाचे प्रकाशन डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रचंड उत्साहात संपन्न झालेला कार्यक्रम आणि सरसंघचालकांचे मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
 
 
सात दशकाची वाटचाल....
 
सुमारे 100 वर्ष इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष, पहिलं महायुद्ध, दुसरे महायुद्ध यानंतर 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाले. या काळात जगात रशियन क्रांतीतून निर्माण झालेला कम्युनिस्ट आणि समाजवादी विचार पुढे आला. स्वातंत्र्यपूर्व काळातच कम्युनिस्ट आणि समाजवादी विचारांचे पक्ष व संघटना देशामध्ये स्थापन झाल्या. भारतामध्ये देखील कम्युनिस्ट राज्य आणावे या विचाराने अनेक चळवळी काम करू लागल्या. त्या चळवळीचे मुख्य केंद्र कामगार क्षेत्र होते. त्यातून कामगार क्षेत्रात AITUC UTUC, HMS, HMKP, UTUC(Lenin), UTUC(Marxist) आदी संघटना स्थापन झालेल्या होत्या. कम्युनिस्ट विचार म्हणजे देव, देश, धर्म, कुटुंब या सर्वांना विरोध आणि केवळ भौतिकतेच्या आधारावर समाजनिर्मिती. हे संकट आधीच्या संकटांपेक्षाही मोठे संकट होते. प्रदीर्घ लढ्यानंतर मिळालेले स्वातंत्र्य, त्यातून मिळालेला आनंद आणि त्याचवेळी पुन्हा येऊ घातलेल्या परकीय विचारांची व सत्तेची ही चाहूल होती. या पार्श्वभूमीवर पुन्हा गुलामी येऊ नये आणि कामगार क्षेत्र त्यासाठी कारण ठरू नये, या हमीची आवश्यकता होती. त्याचबरोबर कामगार संघटनांनी देशहिताला प्राधान्य देत उद्योग आणि कामगारांच्या प्रगतीसाठी कार्य करणे अपेक्षित होते.
या उद्देशाने 23 जुलै 1955 रोजी भोपाळ येथे देशभरातील 39 कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी भारतीय मजदूर संघ या केंद्रीय कामगार संघटनेची स्थापना केली. भारतीय संस्कृतीच्या आधारावर कामगार संघटन, राष्ट्रहित, उद्योगहित आणि कामगारहित ही विचारांची त्रिसूत्री. औद्योगिक चक्र, मानवी मूठ, अंगठा आणि शेतीचे प्रतीक म्हणून गव्हाच्या लोंब्या हे चिन्ह असलेला भगवा झेंडा स्वीकारण्यात आला. कामगारांचे दैवत भगवान विश्वकर्मा यांना आदर्श मानण्यात आले. राजकारण आणि राजकीय पक्ष यापासून अलिप्तता, सामूहिक निर्णय व सामूहिक नेतृत्व पद्धतीचा स्वीकार करत देशभर कार्यक्रम कामाला सुरुवात करण्यात आली. स्थापनेच्या वेळेला केवळ विचार केंद्रस्थानी होता. कार्यकर्त्यांनी देशभर बारा वर्षे काम केले. 200 पेक्षा जास्त संघटना, दोन लाखांपेक्षा जास्त सभासद संख्या झाली. 1967 साली पहिले अधिवेशन दिल्ली येथे झाले. त्यात पहिली कार्यकारिणी निवडण्यात आली.
 

BMS 
 
राष्ट्रहित, उद्योगहित आणि कामगारहित या त्रिसूत्रीनुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. कामगारहितामध्ये अनेक विषय मजदूर संघाने हाताळले. त्यात महागाई ग्राहक निर्देशांक काढण्याच्या पद्धतीत असलेले दोष शास्त्रशुद्ध पद्धतीने शोधून काढून ते दूर करण्यासाठी झालेला संघर्ष, त्यासाठी घडवून आणलेला मुंबई बंद, सर्वांना बोनस ही मागणी आणि त्यास मिळालेली शासकीय मान्यता, प्रथम वेतन आयोगाला देशातील समस्त कामगार वर्गाच्या वतीने दिलेले सर्वसमावेशक निवेदन यामुळे भारतीय मजदूर संघ प्रकाशात आला.
 
 
चीन आणि पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळी अन्य संघटना देशावरील संकटात संधी शोधत असताना राष्ट्रहिताच्या अंतर्गत कामगारांच्या मागण्या आणि आंदोलन बाजूला ठेवून एकत्रित होऊन देशासाठी कामगारांना काम करण्याची प्रेरणा दिली. 1975 साली इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या वेळी लोकशाही वाचवण्यासाठी झालेल्या आंदोलनात पूर्णपणे झोकून देऊन काम केले. हजारो कार्यकर्ते तुरुंगामध्ये गेले, शेकडोंच्या नोकर्‍या गेल्या. अशा प्रकारे आणीबाणी दूर करण्यात पार पाडलेली महत्त्वाची भूमिका, कामगारांच्या मागण्यांसाठी 24 दिवस झालेल्या रेल्वे कामगार संपात आपल्या मागण्यांचा आग्रह धरत असताना, उद्योगाच्या संपत्तीचे नुकसान होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक केलेली जागृती यामुळे कामगारांमध्ये भारतीय मजदूर संघाला स्थान निर्माण झाले.
 
 
त्यानंतर भारतीय मजदूर संघाने आपली कामाची घौडदौड सुरूच ठेवली. 1981 साली भारत सरकारने कामगार संघटनांच्या सदस्यांची मोजणी सुरू केली आणि 1984 साली भारतीय मजदूर संघ देशातील दुसर्‍या क्रमांकाची कामगार संघटना म्हणून पुढे आली. त्यानंतर दहा वर्षांनी 1991 मध्ये झालेल्या सदस्यता चाचणीत भारतीय मजदूर संघ पहिल्या क्रमांकावर आला. 1994 पासून भारतीय मजदूर संघ सर्वाधिक सदस्यसंख्या असलेली देशातील प्रथम क्रमांकाची कामगार संघटना म्हणून काम करत आहे. 1994 पासून आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO मध्ये भारतीय मजदूर संघ देशातील कामगारांचे प्रतिनिधित्व करीत आहे. आज BMS 28 राज्यांत, 44 महासंघांत आणि 6630 संघटनांतून सक्रिय आहे. नेपाळमध्येही BMSचे कार्य सुरू आहे, हे संघटनेच्या आंतरराष्ट्रीय विस्ताराचे लक्षण आहे.
 
 
असंघटित क्षेत्र
 
कामगार क्षेत्र हे दोन भागात विभागलेले आहे. जिथे दहापेक्षा जास्त कामगार काम करतात, त्यांना विविध प्रकारचे वेतन, बोनस, सामाजिक सुरक्षा आधी कायदे लागू होतात असे संघटित क्षेत्र. तर ज्या ठिकाणी 10 पेक्षा कमी कामगार काम करतात आणि ज्यांना कुठलेही कामगार कायदे, सामाजिक सुरक्षा लागू होत नाही असे असंघटित क्षेत्र. आज देशात केवळ 8 ते 10 टक्के कामगार संघटित क्षेत्रात, तर 90 टक्के कामगार असंघटित क्षेत्रात काम करत आहेत.
 
देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही सन्मानजनक वेतन, मोबदला आणि सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे यासाठी भारतीय मजदूर संघाने काम सुरू केले. त्यासाठी जास्तीत जास्त कामगार, कायद्याच्या छताखाली आले पाहिजे यासाठी कामगार कायद्यांमध्ये बदल करण्याची मागणी भारतीय मजदूर संघाने केली. त्यासाठी देशभर आंदोलने सुरू केली. वेळप्रसंगी सर्व कामगार संघटनांना बरोबर घेतले.
 
 
दुसरा वेतन आयोग आणि नवीन कामगार कायदे
(लेबर कोड)
 
2000 साली भारत सरकारने दुसर्‍या श्रम आयोगाची घोषणा केली. माजी कामगार मंत्री रवींद्र वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय समिती नियुक्त करण्यात आली. त्यात भारतीय मजदूर संघाचे प्रतिनिधी होते. या समितीने दोन वर्ष अभ्यास केला. लोकांच्या भेटीगाठी निवेदन आणि त्यातून आपला अहवाल 2002 साली पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सादर केला. त्यात प्रचलित कामगार कायद्यांचे चार गटात वर्गीकरण करून ते कायदे वेगवेगळ्या गटात एकत्र करावेत अशी सूचना करण्यात आली होती. त्यावर 2009 ते 2019 या 10 वर्षात विविध चर्चा पार पाडून नवीन 4 लेबर कोड केंद्र सरकारने पारित केले.
 
 
कामगारहितामध्ये नवीन कायद्यांचे समर्थन व विरोध
 
सन 2019, 2020 यावर्षी केंद्र सरकारने संसदेत 29 कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार नवीन कोड तयार केले. त्यातील सामाजिक सुरक्षा कोड, 2019 आणि वेतन कोड, 2020 हे कामगारहिताचे असल्याने त्याचे भारतीय मजदूर संघाने समर्थन केले. तर औद्योगिक संबंध कोड, 2020 आणि औद्योगिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती कोड, 2020 यातील अनेक तरतुदी या कामगारविरोधी असल्याने त्याचा स्पष्ट विरोध केला. त्या तरतुदी वगळण्याची मागणी भारतीय मजदूर संघाने केली.
 
 
BMS
 
70 वर्षाच्या काळात अनेक अडचणी व संकटे आली तरी भारतीय मजदूर संघाने आपली ध्येयधोरण आणि कार्यपद्धती यात बदल केला नाही. सरकारमध्ये कोण आहेत, ते आपल्या विचारायचे आहेत की विरोधी विचाराचे यावर कधीही आपली धोरण बदलली नाहीत. त्यामुळे नवीन लेबर कोड असो अथवा अन्य कोणतेही विषय भारतीय मजदूर संघाने राष्ट्रहित, उद्योगहित, कामगारहित या विचारांच्या आधारावर स्पष्ट भूमिका घेऊनच संबंधित विषयाचे समर्थन अथवा विरोध केला. त्यामुळे भारतीय मजदूर संघाची विश्वासार्हता केवळ टिकलीच नाही तर वाढत चाललेली आहे.
 
 
जागतिक स्तरावर नेतृत्व 
 
1994 पासून आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेत भारतीय मजदूर संघ देशातील कामगारांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्याचबरोबर या काळात विविध देशांतील कामगार संघटनांशी सलोख्याचे संबंध भारतीय मजदूर संघाने निर्माण केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भांडवलशाही विचारांच्या प्रभावाखाली असलेली ICFTU आणि साम्यवादी विचारांच्या प्रभावाखाली असलेली WFTU या संघटनांशिवाय पर्यायी विचार असण्याची आवश्यकता आहे हा विचार पुढे आणला.
 
 
2023 मध्ये भारतात झालेल्या G20 राष्ट्रांच्या परिषदेच्या निमित्ताने स्थापन झालेल्या L20 (लेबर 20) गटाचे नेतृत्व करण्याची संधी भारतीय मजदूर संघाला मिळाली. या माध्यमातून एका देशातून दुसर्‍या देशात नोकरीच्या निमित्ताने जाणार्‍या जगातील कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यात सामाजिक सुरक्षेचे जागतिकीकरण, सामाजिक सुरक्षा फंडाचे एका देशातून दुसर्‍या देशात हस्तांतरण व वहन, महिला कामगार समस्या, कार्यस्थळातील समस्या, पाचव्या औद्योगिक क्रांतीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intellectual)Ai निमित्ताने बदलते कामगार विश्व आणि कामगारांच्या कौशल्य विकासात विविध घटकांची भूमिका आदी प्रश्नांवर एकमत घडवून त्यास G20 राष्ट्रांची मान्यता मिळवली.
 
 
यानिमित्ताने झालेल्या अमृतसर आणि पटना येथील दोन आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये 27 देशातील कामगार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच G20 ने कामगार क्षेत्रातील प्रश्नांना मान्यता देण्याची घटना घडलेली होती. यातील भारतीय मजदूर संघाचे यशस्वी नेतृत्व आणि महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे जागतिक महत्त्व वाढले. अनेक देशांमध्ये भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांना निमंत्रित केले जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगार संघटनांची प्रचलित आणि कार्यपद्धती म्हणजे राजकीय पक्षाचे अंग म्हणून सर्वत्र कामगार संघटना काम करत असताना, राजकारण आणि राजकीय पक्षांपासून अलिप्त राहून सामूहिक नेतृत्वाच्या आधारावर कामगार संघटना केवळ उभी राहत नाही तर ती वाढत जात आहे, हे जगातील कामगारांसाठी आश्चर्य आहे. त्यामुळे प्रचंड आकर्षण भारतीय मजदूर संघाबद्दल निर्माण झाले आहे. अनेक देशातील प्रतिनिधी भारतीय मजदूर संघाचा अभ्यास करत आहेत. BRICS देशांच्या गटातील कामगार संघटनांचे नेतृत्वही भारतीय मजदूर संघाने करावे असा आग्रह होत आहे. रशिया, इटली, फ्रान्स, जपान, चीन, मलेशिया, टर्की, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आदी विविध देशांमध्ये भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. जागतिक कामगार प्रश्नांवर भारतीय मजदूर संघाची भूमिका काय याकडे जगातील सर्व कामगार संघटनांचे लक्ष आहे. देशातील कामगार चळवळ ही क्षीण होत असताना भारतीय मजदूर संघ मात्र आपले तत्त्वज्ञान कार्यपद्धतीच्या आधारावर तावून सुलाखून आणखी पुढे जात आहे. श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांचे यशस्वी दूरदर्शीपणा नेतृत्व, असंख्य कार्यकर्त्यांनी त्याग-तपस्या आणि बलिदानच यातूनच हे चित्र निर्माण झालेले आहे.
 
कामगार क्षेत्रापुढील बदलती आव्हाने
 
 
सत्तर वर्षांच्या काळामध्ये कामगार क्षेत्रात अनेक बदल झाले. सार्वजनिक उद्योग हे कमी कमी होत गेले. कायम कामगारांची संख्या कमी कमी होत आहे. सध्या 30 टक्के कायम कामगार आणि सुमारे 70 टक्के कंत्राटी कामगार अशी संघटित क्षेत्रातील स्थिती आहे. कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीकडे सरकारचे असलेले दुर्लक्ष, कामगारांचे होणारे शोषण, वाढती आर्थिक विषमता, असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा, कामगार कायदे झाले मात्र त्याची अंमलबजावली होत नाही असे अनेक प्रश्न आज कामगार चळवळीत आहे. 12 तासांची शिफ्ट, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट, हायर अँड फायर, उद्योजकांची वाढती मुजोरी, सरकारचे कामगार क्षेत्राकडे होणारे दुर्लक्ष यामुळे कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आणि असंतोष वाढत आहे. हा असंतोष दूर करणे आणि कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे काम भारतीय मजदूर संघ करत आहे.
 
 
अशा प्रकारे शून्यापासून सुरू झालेल्या भारतीय मजदूर संघाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करून लोकल ते ग्लोबल असा जगाला आश्चर्यचकित करणारा प्रवास आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यायी विचार स्थापित करत, भारतमातेला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी सुरू झालेल्या अंतिम लक्ष्याकडे वाटचाल करत असताना कामगार क्षेत्रातही वसुधैव कुटुंबकम्चा विचार प्रस्थापित करण्याचे काम भारतीय मजदूर संघ करत आहे.
 
 
लेखक भारतीय मजदूर संघ
महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत.
Powered By Sangraha 9.0