दिव्य देसममधील नेपाळचे मुक्तिनाथ

02 Aug 2025 13:30:39
Divya Desam
दिव्य देसम् मंदिरे ही मंदिरे पांड्य नाडू, मलई नाडू, चोळ नाडू, पल्लव नाडू अशा विविध नावांनी ओळखली जातात. तामिळनाडू आणि केरळ सोडून जी मंदिरे उर्वरित भारतात आहेत ती मंदिरे ‘वद नाडूत’ येतात. तमिळमध्ये ‘वद’ म्हणजे उत्तर. वद नाडू म्हणजे उत्तरेकडील प्रदेश. या वद नाडूत एकूण अकरा मंदिरे आहेत. या लेखात वद नाडूतील नेपाळमधील मुक्तिनाथ या तीर्थक्षेत्राची माहिती घेऊया. हे दिव्य देसम्मधील एकच स्थान भारताबाहेर आहे. पुढील लेखात आपण ‘वद नाडू’तील इतर मंदिरांकडे आपला मोर्चा वळवूया.
’दिव्य देसम्’ मंदिरांपैकी सर्वात अग्रस्थानी असलेल्या श्रीरंगम् देवस्थानाचे महत्त्व वादातीत आहे. ज्याप्रमाणे सत्य युगात ’बद्रीनाथाचे’, द्वापार युगात ’द्वारकेचे’ महत्त्व होते, कलीयुगात ’पुरीच्या जगन्नाथाचे’ महत्त्व आहे त्याचप्रमाणे त्रेतायुगात हे स्थान श्रीरंगम्ला मिळाले होते.
 
 
श्रीरंगाच्या दर्शनासाठी दिवसभरात काही ठरावीक वेळा असतात. पैकी पहाटेच्या मंगलसमयी ’विश्वरूप दर्शन सेवा’ असते. त्यावेळेस श्रीरंगाच्या गर्भगृहात प्रवेश मिळतो. प्रत्यक्ष श्रीरंगनाथस्वामींचे अगदी जवळून दर्शन आपल्याला होते. त्यानंतर सुप्रभात सेवा, अभिगमन आराधना अशा वेगवेगळ्या पूजा होतात. श्रीरंगाला मनमोहक रंगीबेरंगी फुलांनी, दागिन्यांनी सजवले जाते आणि वैदिक मंत्रोच्चारांनी व दिव्य प्रबंधमच्या पासुरामी गात अर्चना केली जाते. मुख्य पूजेनंतर परत एकदा दर्शन सुरू केले जाते आणि मध्यान्हीच्या ’उज्जियार’ पूजेनंतर दर्शन काही काळ बंद होते तर सायंकाळी परत एकदा दर्शन खुले होते. शयनसमयीच्या ’इरावू’ पूजेनंतर मात्र श्रीरंगाला विश्रांती देण्यात येते.
 
 
श्रीरंगम् हे वैष्णव सांप्रदायाचे केंद्रस्थान असल्याने संपूर्ण वैष्णव जगताचे, दिव्य देसम् मंदिरांचे नियमन इथूनच होते. मागच्या एका लेखात मी दिव्य देसम्ची मंदिरे विविध नाडूंत म्हणजे भौगोलिक भागांत विभागलेली आहेत यावर लिहिले होते. सर्वाधिक दिव्य देसम् मंदिरे असलेल्या चोळ नाडूत श्रीरंगम्च्या मंदिराचा समावेश होतो. तर अशा अद्वितीय द्राविडी शिल्पकलेने नटलेल्या, धार्मिक आणि ऐतिहासिक अतोनात महत्त्व असणार्‍या ह्या मंदिराविषयी मला अपार ममत्व आहे. या मंदिरात वैकुंठ एकादशीला घेतलेल्या अनुभूतीमुळेच दिव्य देसम् नामक अत्यंत देखण्या, सुकुमार सुमनाच्या पाकळ्या माझ्यासमोर अलवारपणे उलगडत गेल्या. हे अलौकिक स्थान बघण्याचा योग माझ्या भाळी लिहिला होता, यासाठी मी अत्यंत कृतज्ञ आहे. या मंदिरांवर खंड लिहून होतील मात्र कुठेतरी थांबावे लागेलच.
 
 
चोळ नाडूत एकूण चाळीस दिव्य देसम् आहेत. परंतु काही काळ आपण चोळ नाडूविषयी जाणून न घेता दुसरे जे नाडू आहेत त्यांचा परामर्श घेऊया. मुख्यतः दिव्य देसम् मंदिरे ही भौगोलिकदृष्ट्या तामिळनाडू व केरळ इथे आहेत. ही मंदिरे पांड्य नाडू, मलई नाडू, चोळ नाडू, पल्लव नाडू अशा विविध नावांनी ओळखली जातात. तर तामिळनाडू आणि केरळ सोडून जी मंदिरे उर्वरित भारतात आहेत ती मंदिरे ’वद नाडूत’ येतात. तमिळमध्ये ’वद’ म्हणजे उत्तर. वद नाडू म्हणजे उत्तरेकडील प्रदेश. या वद नाडूत एकूण अकरा मंदिरे आहेत.
 
Divya Desam  
या लेखात आपण नेपाळमधील मुक्तिनाथ या तीर्थक्षेत्राची माहिती घेऊया. हे एकच स्थान भारताबाहेर आहे. ज्या वेळी मी वद नाडूबद्दल जाणून घेतले होते, त्यावेळी माझ्या आश्चर्याला पारावर राहिला नव्हता. कारण पंधराशे वर्षांपूर्वी उत्तर भागातील अकरा महत्त्वाची महाविष्णुची मंदिरे आळ्वारांनी शोधली होती. त्यासाठी अत्यंत कठीण असा प्रवास केला होता. इतक्या प्राचीन काळी वाहतुकीची, संपर्काची कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. त्यावेळी ही स्थाननिश्चिती कशी काय बरं झाली असेल? त्यांतही भौगोलिक सानिध्यामुळे तामिळनाडू, केरळ व आंध्र प्रदेश त्यामानाने सोपे होते. मात्र उत्तर भारतातील स्थाने व मुक्तिनाथ समाविष्ट केल्याने माझ्या लेखी दिव्य प्रबंधन ग्रंथाचे महत्त्व खूपच जास्त आहे. त्या काळातले चीनच्या प्रवाशांचे प्रवासवर्णन उपलब्ध आहे. मात्र एका ध्येयाने भारावून मंदिरे निश्चित करणे हे सर्वस्वी वेगळे आहे. ही सगळीच स्थाने अत्यंत प्राचीन असल्याने कालौघात जरी त्यावेळी मोडकळीला आली असली तरी त्याच त्याच जागी परत परत मंदिरे बांधून झाली आहेत. मुक्तिनाथ मंदिरावर एक लेख मी काही वर्षांपूर्वी वाचला होता. विष्णुमूर्ती, काली गंडकी नदी, शाळिग्राम, रुद्राक्ष या सगळ्यांचे इतके बहारदार वर्णन होते, इतकी गूढरम्यता होती की मला मुक्तिनाथाला जावं असं अगदी तीव्रतेने वाटले होते. असो!! कुठे आहे हे मुक्तिनाथ? तर, ते वसलंय नेपाळ व तिबेटच्या सीमेवर, ’मस्टांग’ या अतिशय दुर्गम, डोंगराळ व अतिउंचावरील ट्रान्सहिमालयातील पर्वतरांगेत. ट्रान्सहिमालय म्हणजे हिमालयापलीकडील हिमालय. रौद्र, भयचकित करणारा निसर्ग. ’द ग्रेट हिमालयन रेंज’च्या कुशीत वसलेलं हे तीर्थक्षेत्र. ज्या वेळी मला हे समजले की, मुक्तिनाथाचा समावेश दिव्य देसम्मध्ये आहे त्यावेळेस मला अभूतपूर्व आश्चर्य वाटले होते. या मुक्तिनाथाला जाणे आजही अत्यंत कठीण आहे तर पंधराशे वर्षांपूर्वी ’थिरूमंगाई’ आळ्वार कसे काय त्या भागात गेले असतील काय माहीत? असं म्हणतात की, प्रत्यक्षात मंदिरापर्यंत ते पोहोचू शकले नव्हते परंतु मंदिराचे तिथे अस्तित्व आहे हे सुदूर दक्षिणेतील आळ्वारांना माहीत होते. थिरूमंगाई तसेच कुळशेखर आळ्वार व आंडाळ यांनीही मुक्तिनाथाच्या श्रीविष्णुवर पासुरामी रचल्या आहेत.
 
Divya Desam  
मुक्तिनाथाची यात्रा ही खूप कठीण यात्रा आहे. अगदी आत्तापर्यंत तिथे जायला रस्तेसुद्धा नव्हते. नेपाळमधला ’अन्नपूर्णा सर्किट’ किंवा ’अराउंड द अन्नपूर्णा’ हा अतिशय प्रसिद्ध ट्रेक आहे. आठ हजार मीटरवर अशी जी काही पूर्ण जगात चौदा शिखरे आहेत त्यांत धवलगिरी व अन्नपूर्णा या शिखरांचा समावेश आहे. अन्नपूर्णा सर्किट ट्रेकच्या शेवटी त्याच वाटेवर मुक्तिनाथ येते. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून 3710 मीटर उंचीवर आहे. तर मुक्तिनाथ मंदिराजवळून धवलगिरी शिखराचे विहंगम दर्शन होते. हे स्थान हिंदू तसेच बौद्धांसाठी परम पवित्र आहे. मुक्तिनाथ येथे ज्वालामयी गोंपा म्हणजे बौद्ध विहार आहे. हा गोंपा ’अवलोकितेश्वर’ या बुद्ध अवताराला वाहिला आहे. आपल्याकडे मुक्तिनाथाबद्दल फारशी माहिती नाही परंतु भौगोलिक सान्निध्यामुळे उत्तर भारतात तर दिव्य देसम्मुळे दक्षिणेकडे मात्र या स्थानाची जागरुकता आहे. तसेच अन्नपूर्णा सर्किट हा खूप प्रसिद्ध ट्रेक असल्याने इथे विदेशी ट्रेकर्स मोठ्या प्रमाणावर येतात. मागे आपले पंतप्रधान मोदी मुक्तिनाथाच्या दर्शनाला जाऊन आले होते. हे मंदिर महाविष्णुचे असले तरी मंदिराचे स्थापत्य ’पॅगोडाच्या’ आकारात आहे. मंदिराचे पुजारी बौद्ध आहेत. इथे एक कुंड आहे की ज्याच्या एकशेआठ गोमुखांतून येणार्‍या जलधारा म्हणजेच कृष्ण गंडकी नदीचे उगमस्थान आहे. हे कुंड म्हणजे मुक्तिनाथाची पुष्करिणी आहे. या कुंडात स्नान करून मुक्तिनाथाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. मुक्तिनाथ हे एकावन्न आदिशक्तीपीठांपैकी एक स्थान आहे तसेच महाविष्णुच्या आठ स्वयंभू स्थानांपैकी एक तीर्थ आहे. या स्थानाला ’मुक्तिक्षेत्र’ म्हणजेच मोक्षस्थान असं संबोधित केलं जातं. मुक्तिनाथाला जाण्यासाठी आपल्याला नेपाळमधील पोखरा येथे जावे लागते. पोखर्‍याहून पुढचा प्रवास रस्त्यामार्फत किंवा छोट्या विमानांतून होतो. ही विमाने पोखरा ते जोमसोम हा प्रवास अवघ्या वीस मिनिटांमध्ये करतात. तर रस्त्याने ह्याच प्रवासाला दोन ते तीन दिवस लागतात. जोमसोमहून पुढे अठरा किलोमीटरवर मुक्तिनाथ आहे. आधी जोमसोमहून मुक्तिनाथाला पायी जावे लागत असे मात्र आता जीपची सोय आहे. या प्रवासात काली गंडकी नदी सदोदित आपल्यासोबत असते. ह्याच काली गंडकीने युगानुयुगे वाहण्याच्या प्रक्रियेत, मुक्तिनाथाच्या जवळ धवलगिरी व अन्नपूर्णा या दोन अति उंच पर्वतरांगांना दुभागणारी गॉर्ज किंवा घळ तयार केली आहे. जी जगातील दुसरी सर्वात खोल अशी घळ आहे असे मानले जाते. मुक्तिनाथाच्या या भागात अतिशय बेभरवश्याचे वातावरण असल्याने मोसम कधीही खराब होऊ शकतो. छोट्या विमानांचा प्रवास अतिशय धोकादायक आहे.
 
 
मंदिरातील महाविष्णुचा विग्रह हा शाळीग्रामचा आहे. हा ’निंद्रा’ प्रकारातील म्हणजे उभ्या स्थितीतील विग्रह आहे. इथल्या महाविष्णुला ’थिरूशाळीग्राम’ म्हणतात तर लक्ष्मीथायरला ’श्रीदेवी नच्चियार’ म्हणून ओळखले जाते. महाविष्णुच्या बाजूला श्रीदेवी व भूदेवीच्या मूर्ती आहेत. महाविष्णुच्या पूजेसाठी अत्यंत पूजनीय असणारे शाळिग्राम, कागबेणी या गावातील काली गंडकी व कृष्ण गंडकीच्या संगमाजवळ विपुल प्रमाणात सापडतात. ज्याप्रमाणे पवित्र कैलास पर्वत व मानसरोवर हे महादेवाचे निवासस्थान आहे. कैलाशाजवळ मानसरोवर हा जलाशय आहे, तत्त्वत मुक्तिनाथाजवळ ’दामोदर कुंड’ आहे. ते मुक्तिनाथापासून 77 किमीवर आहे. ह्या दामोदर कुंडात महाविष्णुचा अधिवास असल्याची मान्यता आहे. हे कुंड खूपच दुर्गम भागात आहे की जिथे पदभ्रमण करून जाणेही दुरापास्त आहे. मात्र आता तिथेही चॉपर सर्व्हिस सुरू झाली आहे.
 
 
आपल्या भारतात किती नैसर्गिक आश्चर्ये आहेत. हिमालयासारख्या सृष्टिसौंदर्याच्या माहेरघरी आपल्या हिंदुंची खूपशी देवस्थाने वसली आहेत. देवाच्या निमित्ताने ’केल्याने देशाटन’ होईल व आपल्याच देशाचा भूभाग आपल्याला नव्याने गवसेल, परिचित होईल तसेच निसर्गाशी जवळीक साधता येईल, या अनुषंगाने कित्येक देवस्थानांची निर्मिती झाली असावी. हिमालयातील हे मुक्तिस्थान अगदी अव्वल व गूढरम्य स्थान आहे, यात मला कोणतीही शंका नाही.
Powered By Sangraha 9.0