सुलेखनातून गणेशपूजा

25 Aug 2025 14:57:05
@पद्मश्री अच्युत पालव

ganesh festival 2025 
सुलेखनाद्वारे गणपती साकार करतो तीच माझी पूजा आहे. वेगळी पूजा कधी करावी लागत नाही. कागदावर व्यक्त होणं हीच चित्रकाराची पूजा असते.
श्रीगणेश ही आकृतीच मुळी लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत कोणीही साकारू शकतो. कुठलाही माणूस म्हणतो की, मला चित्र काढता येत नाही, पण प्रत्येक माणूस गणेशाचं चित्र काढतोच. प्रत्येक माणसाला नकळतपणे कुठेतरी जाणीव झालेली आहे की, मी गणपतीचे चित्र काढू शकतो. तो चित्र काढू शकतो असं तो म्हणणार नाही. ज्याला काहीच माहीत नाही, अशा दोन-तीन वर्षांचा मुलगादेखील काढतो ते पहिल चित्र असतं गणपतीचं.
 
 
सगळे देव-देवता माहीत असले तरी गणपती हे एकच दैवत असे आहे की, जी सर्वांच्या जास्त जवळची आहे. प्रत्येकजण स्वत:ला मिळालेला अनुभव त्या चित्रातून साकारत असतो. नुसती सोंड काढली तरी गणपती तयार होतो.
 
 
असं सगळं अनेक वर्षे सातत्याने होतं असलं तरी दरवर्षी नवीन नवीन गणपतीचे फॉर्म बघायला मिळतात. कारण आकारातून व्यक्त होणारी कलाकृती काय असेल तर ती गणपती आहे. प्रत्येक चित्रकाराला असं वाटतं असतं की, हे माझं गणपतीचं रूप आहे. मी ज्या वेळेस अक्षरातून चित्र काढत असतो, त्यावेळेस कधी कधी मला गणपतीची सोंड दिसते. कधी कधी ओममधून गणपतीचं रूप अचानक बाहेर येतं. गणपती काढण्यासाठी विचार करावा लागत नाही. विचाराची मुहूर्तमेढ मनात झालेली असेल की, ती आकारातून बरोबर बाहेर पडते आणि त्यातून गणपती साकार होतो असं मला वाटतं.
 
 
मी गणपतीची वेगळी पूजा करीत नाही. सुलेखनाद्वारे गणपती साकार करतो तीच माझी पूजा आहे. वेगळी पूजा कधी करावी लागते जेव्हा तुम्ही काम करीत नाही. कागदावर व्यक्त होणं हीच चित्रकाराची पूजा असते. त्यासाठी वेगळी पूजा मांडावी लागत नाही. एक कागद, एक कॅनव्हास, एखादा मातीचा गोळा, याच्यातून सतत एखादी गोष्ट मांडली जाते ना त्याचं नाव पूजा आहे. जेव्हा चित्रकार गणपती कॅनव्हासवर साकारतो तेव्हा बघणार्‍याला आनंद होतो. हा संवाद माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि हीच माझी गणेशवंदना आहे.
Powered By Sangraha 9.0