शेतीमित्र कीटकांची नवलाई

25 Aug 2025 17:11:50
@सोनाली कदम
 


krushivivek 
पीकांवर कीटकनाशक फवारणी करण्यापूर्वी किडींची ओळख करून घेणे गरजेचे असते. कारण पिकावर आढळणार्‍या काही किडी अपायकारक असतात तर काही किडी शेतीसाठी वरदान असतात. अशाच काही कीटकांची ओळख आपण करून घेणार आहोत जे शेतामध्ये सैनिक म्हणून आपली भूमिका पार पाडत आहेत. त्यांना आपण शेतीतले खरे साथीदार असेही म्हणू शकतो.
कीटक हे आपल्या जीवसृष्टीतील महत्त्वाचे घटक मानले जातात. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार कीटकांच्या 10 लाख प्रजाती आढळतात. संपूर्ण कीटक विश्वाचा पसारा अद्याप पूर्णपणे ज्ञात झालेला नाही. ढालकिडा, मुंगी, मधमाशी, ट्रायकोग्रमा, सोनपाखरू, ड्रॅगनफ्लाय या मित्रकीटकांविषयी शेतकरी बांधवांना फारशी माहिती नसते. या कीटकांची उत्पत्ती, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांचा जीवनक्रम या विषयी मला जे थोडेफार ज्ञात झाले ते स्तिमित करणारे आहे.
 
पहिल्या हरितक्रांतीनंतर शेतीने व्यावसायिक रूप धारण केले. शेतीमध्ये अनेक सकारात्मक बदल झाले, पण अज्ञानामुळे बेसुमार कीटकनाशक फवारणीदेखील सुरू झाली. त्याचे भयंकर परिणाम एकविसाव्या शतकापासून जाणवायला लागले.
 
कीटकनाशकांचा वापर करत असताना शेतातील नेमक्या कोणत्या किडींचे नियंत्रण होते आहे याचा कोणीच विचार करत नाही आणि यामुळेच शेतातील सर्वंच प्रकारच्या किडींचा नायनाट होतो. शेतीच्या दुनियेत कीटक हा शब्द बहुतेक वेळा पिकांचे नुकसान, अळ्या, रोग यांसोबत जोडला जातो. पण निसर्गातले सर्वच कीटक हानीकारक नसतात. खरे तर, अनेक कीटक पीकांचे संरक्षक म्हणून काम करतात. यास मित्र कीटक म्हटले जाते. हे मित्रकीटक हानिकारक किटकांना खातात, त्यांच्या अंड्यांचा नाश करतात किंवा पिकांचे परागीभवन करून उत्पादन वाढवतात. त्यामुळे ते सेंद्रिय शेती, एकात्मिक कीड व्यवस्था आणि पर्यावरणपूरक शेती यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
 
मित्र कीटक म्हणजे काय?
 
ज्या कीटकांचा शेतीला थेट किंवा अप्रत्यक्ष फायदा होतो ते मित्र कीटक म्हणून ओळखले जातात. यांच्याकडून शेतीला आणि शेतकर्‍यांना कोणताही अपाय नसतो. ते त्यांच्या क्षमतेनुसार शेतकर्‍यांना पीक संरक्षणामध्ये फायदेशीर ठरत असतात म्हणूनच त्यांना मित्रकीटक म्हणून संबोधले जाते.
 
त्यांच्या कार्यपद्धतीनुसार ते तीन गटांत विभागले जातात.
 
1)भक्षक ः थेट हानिकारक कीटक पकडून खातात.

2)परजीवी ः हानिकारक कीटकांच्या शरीरात/अंड्यात अंडी घालून त्यांचा नाश करतात.

3) परागीभवन करणारे ः पीकांच्या फुलांचे परागीभवन करून उत्पादन वाढवतात.
 
ढालकीडा, परभक्षी कीटक, ड्रॅगन माशी, ट्रायक्रोग्रमा, सोनपाखरू, मधमाशी, गांधील माशी, लेडीबर्ड व्हिल, क्राय सोपा अशी काही मित्र कीटकांची नावे आहेत. हे मित्र कीटक नुकसानकारक किडींपेक्षा आकाराने लहान असात. या किडी एकात्मिक कीड व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे शाश्वत व सेंद्रिय शेतीसाठी हे उपयुक्त कीडनाशके आहेत.
 

krushivivek 
 
ढालकीडा -लेडीबर्ड बीटल
(Coccinella Septempunctata)
 
मित्रकीटकांमधला महत्त्वाचा कीटक म्हणजे ढालकीडा. हा परभक्षी प्रकारातील मित्रकीटक आहे. दिसायला लहान, गोलसर आकाराचा कीटक असून पाठीवर लाल किंवा केशरी रंग आणि काळे ठिपके असतात. म्हणून यास ’ठिपक्याचा कीडा’ असेही म्हटले जाते. याची लांबी साधारण 5-8 मिमी असते. जगभरात Coccinella कुळाच्या सुमारे 5 हजार प्रजाती आहेत. या कीडी चावून खाता येईल, असे दात असतात. या कीडीच्या संपूर्ण जीवनचक्रामध्ये प्रौढ कीड, अंडी, अळी व कोष अशी अवस्था असते. प्रौढ अवस्थेत बाजूचे पंख कडक व गोलकार असतात. अंडी अवस्थेत मादी लंबगोलकार अंडी घालते. कोष हा पिवळ्या व भगव्या रंगाचा असतो तर अळ्या राखाडी/काळसर असून काटेरी दिसतात. हे कीटक मावा, पांढरी माशी, लाल कोळी इत्यादी कीटकांचे भक्ष्य करतात. काळ्या व पिवळसर डाग असलेल्या अळ्या अतिशय भुकेल्या असतात आणि प्रचंड प्रमाणात भक्ष्य खातात. एक प्रौढ लेडी बर्ड आयुष्यात हजारो मावा नष्ट करू शकतात. या कीडीच्या संवर्धनासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, शिवाय शेताभोवती फुलझाडे लावावीत.रासायनिक कीटकनाशकांचा कमी वापर करावा.
 
 
सोनपाखरू (ग्रीन लेसविंग)
 
सोनपाखरू हे अत्यंत सुंदर व आकर्षक कीटक मानले जाते. त्याच्या मोठ्या आकारामुळे ग्रामीण भागात पाखरू तर झाडीपट्टीत सोनपाखरू म्हटले जाते. हे परभक्षी कीटक दिवसेंदिवस कमी होत आहेत. नाजूक हिरवे पंख, जाळ्यासारखी रचना, सोनेरी डोळे अशी त्याची मुख्य ओळख. या कीडीची अंडी देठावर एकेकटी असतात, अळी अवस्थेत शिकारी स्वभाव असतो. मावा, तुडतुडे, पांढरी माशी, अळ्यांचा मुख्य आहार म्हणून समावेश असतो. या कीटकाची एक अळी दररोज 20-30 मावा खाते. विशेषतः अळी अवस्थेत पिकांचे संरक्षण करते. या कीडीचे संवर्धन करण्यासाठी झेंडू, सूर्यफूल, मका यासारखी फुलझाडे लावणे फायदेशीर ठरते.
 
 
चतुर (ड्रॅगनफ्लाय) (Pantala flavescens)

krushivivek 
 
संधिपाद संघाच्या ओडोनेटा गणाताील हा कीटक आहे. हा परभक्षी कीटक असून लांबट शरीर, हिरवा रंग व पारदर्शक पंख, जलद उडणारे असतात. तलाव, ओढे किंवा पाणथळ जागांच्या आसपास यांचा निवारा असतो. यास चटकचांदणी असेही नाव आहे. हवेतल्या हवेत भक्ष्य पकडणारा चतुर हा एकमेव कीटक आहे. डास, गोमाशी, घोडामाशी कीटक खाऊन आपली उपजीविका करतात. चतुर हा पूर्णपणे शिकारी किटक आहे. पीकांवरील रसशोषक किडी, माश्या, भुंगे, पांढरी माशी, लहान पतंग व इतर हानिकारक कीटक भक्ष्य करतो. या कीटकाचे संवर्धन करण्यासाठी शेतातील विहीर व शेततळ्याजवळ पाणी कायम ठेवणे आवश्यक आहे.
 
 
ट्रायकोग्रमा (Trichogramma Chilonis)
 
जैविक कीड नियंत्रणासाठी उपयोगात येणारा हा एक प्रमुख परोपजीवी मित्र कीटक आहे. अंडीचे परजीवीकरण करणारा हा कीटक हायमेनोप्टेरा गणात मोडतो. या कीटकाचा जीवनक्रम अंडी 1 दिवस, अळी 3-4 दिवस, कोष 4-5 दिवस व प्रौढ 6 ते 8 दिवस अशा चार अवस्था असतात. या कीटकाचे संपूर्ण आयुष्य 15 ते 20 दिवस असते. या कीटकाचा आकार अतिसूक्ष्म म्हणजे 0.5 मिमी इतका व रंग पिवळसर असतो.
 
 
फुलकिडा, फळ पोखरणारी अळी, डिंकधारी अळ्यांची अंडी हा त्याचा मुख्य आहार असतो. हानिकारक कीटकांच्या अंड्यात अंडी घालते. अळी आत वाढून अंडे नष्ट करते.
 
 
उसावरची खोडकिड, कांडीकीड, कपाशीवरची बोंडअळी, भाजीपाल्यावरील फळ आणि खोड पोखरणार्‍या अळ्या, सूर्याफुलांवरील घाटे आळी, भातावरील खोडकिडी ट्रायकोग्रमा चांगल्या प्रकारे फस्त करतो. ट्रायकोग्रमा कार्ड आणल्यानंतर शेतात वेळेत लावावेत. या कीटकाचे संवर्धन करण्यासाठी कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्रांमध्ये पॅकेट स्वरूपात उपलब्ध असलेले ट्रायकोग्रमा शेतात सोडावेत. उशीर झाला तर अंड्यातून प्रौढ ट्रायकोग्रमा निघून तो मरण्याची शक्यता असते. शेतात ट्रायकोग्रामा सोडल्यानंतर हानिकारक औषधांची फवारणी करू नये. सकाळी अगर सायंकाळी ट्रायकोग्रमा शेतात सोडावा. पिकास पाणी दिल्यानंतर ट्रायकोग्रामा सोडणे जास्त फायद्याचे ठरते, काळी अंडी दिसली, की त्यातल्या ट्रायकोग्रमाची पूर्ण वाढ झाली असे समजावे.
 

krushivivek 
 
मधमाशी
 
हा एक सर्वपरिचित कीटक. परागीभवन करणार्‍या गटातील मुख्य किटक म्हणून ओळख असणारी पिवळसर-काळ्या पट्ट्यांचे शरीर, सामाजिक कीटक म्हणून ओळख आहे. मधमाशीचा समावेश हायमेनॉप्टेरा गणाच्या एपिडी कुलात केला जातो. जगात मधमाशीच्या एपिस मेलिफेरा, एपिस डॉरसॅटा, एपिस सेराना इंडिका आणि एपिस फलोरिया चार जाती आढळून येतात. या चारही जातींच्या मधमाशा त्यांच्या आकारातील फरक सोडला तर एकसारख्या असतात. शरीरावर रंग काळा किंवा तपकिरी असतो. कामकरी माशी, राणी माशी व नर माशी या तीन प्रकारात मधमाश्यांचे वर्गीकरण केले जाते. या सर्व वसाहत करून राहतात. मधुरस व परागकण हा मुख्य आहार असून कापूस, सूर्यफूल, फळभाज्या यांचे परागीभवन होते. शिवाय मध उत्पादनात फायदेशीर असून त्यांचे संवर्धन करण्यासाठी शेतात पोळी बसवणे, फुलोर्‍याच्या काळात कीटकनाशक फवारणी टाळणे आवश्यक आहे. शेताच्या कडेला असणार्‍या झाडांवर मधमाशांसाठी रिकामे मडके टांगणे. शेतात फुलझाडांची लागवड करणे फायदेशीर ठरते.
 
 
हव्हर फ्लाय (Syrphus Ribesii)
 
परभक्षी + परागीभवन करणारा कीटक म्हणून ओळख असणारे हे कीटक मधमाशीप्रमाणे दिसतात. हवेत स्थिर उडतात. या कीटकांच्या माद्या पानावर अंडी घालतात. अंंडी - मावाखाऊ अळी - कोष - प्रौढ असा जीवनक्रम असतो. अळी अवस्थेत मावा, प्रौढ अवस्थेत मधुरस खातात. मावा नियंत्रण व परागीभवन करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यांचे संवर्धन करण्यासाठी शेतात फुलझाडांची विविधता ठेवणे, वेगवेगळ्या फुलझाडांची लागवड करणे फायदेशीर ठरते.
 
 
ग्राउंड बीटल (Carabidae family)
 
भुंगेर्‍यासारखा हा कीटक परभक्षी गटात मोडतो. काळसर, जमिनीवर राहणारा आहे. जलद पळणारे कीटक अशी त्याची खास ओळख आहे. दिवसा जमिनीखाली, गवताखाली, मातीतील फटीत किंवा पिकांच्या पानाखाली लपून बसतात; रात्री सक्रिय होऊन शिकार करतात.
 
हा कीटक गोगलगाय, मुळांवरील कीटक, अळ्या खातो त्यामुळे जमिनीतील हानिकारक कीटक नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो. या कीटकाचे संवर्धन करण्यासाठी शेतातील ओलसर भाग जपणे फायदेशीर ठरते.
 
 
परभक्षी माशी (Robber fly) - Asilidae family)
 
परभक्षी कीटक म्हणून ओळख असणार्‍या या माशीचे शरीर लांबट, केसाळ, आणि बळकट असते. रंग तपकिरी, काळा किंवा करडा असतो. डोळे मोठे व पुढे असतात. पाय मजबूत व काटेरी असतात. ते शिकार पकडण्यासाठी मदत करतात. तोंड चोचेसारखे लांब असते, ज्यातून शिकारीची रसशोषण प्रक्रिया होते. या माशांचा मुख्य आहार उडणारे कीटक पकडून खाणे हा असतो.
 
 
मावा, पांढरी माशी, तुडतुडे, फुलकीडे, बोंड अळी नियंत्रणासाठी ही माशी उपयुक्त आहे. याचे संवर्धन करण्यासाठी शेताच्या कडेला नैसर्गिक गवताळ जागा जपणे फायदेशीर ठरते.
 

krushivivek 
 
मुंगी (Camponotus Spp.)
 
मुंग्या मधमाश्यांप्रमाणे सर्वांना परिचित असेलला परभक्षी कीटक आहे. मुंग्यांच्या सामाजिक जीवनात निरनिराळ्या जाती अस्तित्वात आहेत. भारतात जवळपास 1 हजार जातींच्या मुंग्या आढळतात. मुंग्यांच्या काही प्रजाती हानिकारक आहेत. काळसर किंवा तपकिरी रंगात एका वारूळात जास्तीत जास्त 5 लाख मुंग्या असतात. कामकरी मुंग्या, शिपाई मुंग्या, नर मुंग्या आणि मादी मुंग्या या चार प्रकारात मुंग्याचे वर्गीकरण केले जाते. जमिनीतील हानिकारक कीटकांची संख्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. या मुंग्याचे संवर्धन करण्यासाठी मुंग्यांची वस्ती व वारुळे नष्ट करू नयेत.
 
 
लेसविंग(Mallada Boninensis)
 
परभक्षी कीटक म्हणून ओळख असलल्या या कीटकांचे पातळ-पतंगाप्रमाणेे पंख, हिरवा रंग, मोठे डोळे असे वैशिष्ट्य असते.
अंडी - अळी - कोष- प्रौढ असा जीवनक्रम असतोे. हे कीटक मावा, पांढरी माशी, तुडतुडे, लाल कोळी या कीटकांवर आपली उपजीविका करतात. भाजीपाला, फळझाडांवरील कीटक नियंत्रणासाठी उपयुक्त असतात. या कीटकाचे संवर्धन करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर कमी करून शेताच्या कडेला फुलझाडे लावणे फायदेशीर ठरते.
 
 
प्रार्थना कीटक- (Mantis Religiosa)
 
कीडींचा फडशा पाडणारे परभक्षी मित्र कीटक म्हणजे प्रार्थना कीटक होय. या कीटकांचे समोरील पाय हात जोडल्यासारखे दिसतात म्हणून यास प्रार्थना कीटक म्हणतात. या कीटकांचे लांबट हिरवे/तपकिरी शरीर असते. पुढचे पाय शिकारीसारखे वाकलेले असताते. पीकांवरील अळ्या, फुलकिडे, माशी हा या किडींचा मुख्य आहार असल्यामुळे यांपासून पीक संरक्षण होते. या कीटकाचे संवर्धन करण्यासाठी शेताच्या कडेला गवताळ भाग व फुलझाडे ठेवणे फायदेशीर ठरते.
 
असे करा मित्रकीटकांचे संवर्धन
 
1)रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळा किंवा शक्य तितका कमी करा, कारण यामुळे मित्र कीटकसुद्धा नष्ट होतात.
 
2)फुलपाखरांचे आकर्षण वाढवण्यासाठी आणि मित्र कीटकांना आधार देता यावा म्हणून शेताभोवती आणि शेतात फुलझाडे लावा.
 
3)किडनाशक फवारणी करण्यापूर्वी शेतात मित्रकीटकांची उपस्थिती पहा. जास्त प्रमाणात उपयुक्त कीटक आढळल्यास रासायनिक फवारणी टाळा.
 
4) फरमोन ट्रॅप, लाइट ट्रॅप, बर्ड परचेस (पक्ष्यांना बसायला लाकडी काठी) इ. जैविक उपायांचा वापर करा.
 
5) पीक फेरपालट पद्धती आणि आंतरपीकांचा अवलंब केल्याने मित्रकीटकांची संख्या वाढते.
 
6)जैविक कीटकनाशकांचा (उदा. नीम अर्क, व्हर्टिसिलियम लेकॅनी इ.) वापर करा, जे मित्रकीटकांसाठी सुरक्षित असतात.
 
मित्रकीटकांचे संवर्धन आणि जोपासना केली तरच पर्यावरणपूरक शाश्वत शेती शक्य आहे. त्यामुळे मित्रकीटक जपून शेती केल्यास निश्चितच उत्पादन खर्च कमी होईल आणि जमीन व मानवी आरोग्य निरोगी राहिल. मित्रकीटक जपा, शाश्वत शेतीचा मार्ग खुला करा.
 
लेखिका येवला तालुका सहाय्यक कृषी अधिकारी आहेत.
Powered By Sangraha 9.0