जय जय हे ओंकारा

25 Aug 2025 16:15:16
@उत्तरा मोने

lata mangeshkar
माझ्या गाण्यातून आणि गणपतीसाठी उभारलेल्या देखाव्यातूनच मी गणपतीची आराधना करत असते... असं सांगत आजही उषाताई, मीनाताई, हृदयनाथजी आणि आशाताई त्या सगळ्या देखाव्यांचं स्मरण करत आहेत. त्या देखाव्यांमागच्या, अष्टविनायक गीतांमागच्या सुरम्य आठवणी लेखात शब्दबद्ध केल्या आहेत..
स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिद: (श्लोक)
 
अष्टविनायकांचं वर्णन करणारा हा श्लोक गेली वर्षानुवर्ष आपण ज्यांच्या स्वरात ऐकतोय त्या प्रख्यात गायिका उषा मंगेशकर यांचं आणि गणपतीचं नातं त्यांच्या कलेतून नेहमीच साकारलं. गणेशोत्सवाचे दिवस आले की, त्यांनी गायलेली अष्टविनायक गीतं ठिकठिकाणी म्हटली जातात, त्यांच्या ध्वनिफिती लावल्या जातात. गणरायाचे स्तवन करण्यासाठी आणि घरबसल्या अष्टविनायक दर्शन करण्यासाठी या अष्टविनायक गीतांचा महिमा आजही घराघरांतून जागवला जातो. या अष्टविनायक गीतांमध्ये प्रत्येक गणपतीचं स्थानमहात्म्य आणि त्या त्या गणपतीचं वैशिष्ट्य अतिशय सुंदर शब्दात कविवर्य वसंत बापट यांनी वर्णन केले आहे. या गाण्यांना समर्पक असं संगीत पं. यशवंत देव यांनी दिलं आहे.
 
 
या गाण्यांच्या निर्मितीची कथा सांगताना उषाताई म्हणाल्या की, मला एक व्यक्ती भेटायला आली होती. त्यांनी मला सांगितलं की, मार्गशीर्षातले गुरुवार केले जातात, त्या दिवसांत महालक्ष्मीचे जे व्रत केलं जातं, त्या देवीची तुम्ही काही गाणी करा. पण काही कारणाने ते होऊ शकलं नाही. मग माझ्या असं मनात आलं की, खरं तर आपल्याकडे नवदुर्गा आहेत, आठ गणपती आहेत, बारा ज्योर्तिलिंगं आहेत. तर आपण यावर गाणी करायला हवीत, मग मी बाळ (हृदयनाथ मंगेशकर) कडे गेले. तर तो दीदीची गणपतीचीच गाणी करत होता. तो म्हणाला,‘मला काही फारसा वेळ मिळणार नाही. तू यशवंत देवांकडे जा. त्यांच्याकडे ही माहितीही खूप आहे आणि त्यांच्याकडे चांगली गाणी लिहिलेली मिळतील तुला.’ मग मी देवांकडे गेले. ते म्हणाले की,‘आपण कविवर्य वसंत बापट यांच्याकडून गाणी लिहून घेऊया. बापट यांनी प्रत्येक गणपतीचं वर्णन करणारी अतिशय सुंदर अशी गाणी लिहून दिली आणि ती रसिकांना खूपच आवडली. जी आजपर्यंत प्रत्येक गणेशोत्सवात सगळीकडे ऐकली जातात. मग आम्ही नवदुर्गेची गाणी करावी असं ठरवलं. मी पुन्हा देवांकडे गेले. यावेळी गाणी लिहिण्यासाठी वसंत बापट यांनी शांता शेळके यांचं नाव सुचवलं. शांताबाईही सिद्धहस्त गीतलेखिका. त्यांनीही अतिशय उत्तम गाणी लिहिली. अष्टविनायक गीतांच्या पाठोपाठ ‘आली आई भवानी स्वप्नात...‘सारखी एकाहून एक सरस देवीची नऊ गाणी तयार झाली.
 

lata mangeshkar 
 
अष्टविनायक गीते तयार होत असताना देवांकडून गायकी छान शिकता आली. तसं देवांकडे मी पहिलं गाणं गायले होते ते म्हणजे केळीच सुकले बाग... या गाण्याच्या वेळीही देवांनी मला प्रत्येक शब्द कसा म्हणायचा, बाग म्हणताना तो ‘ग‘ जोरात न म्हणता सॉफ्ट कसा म्हणायचा हेही शिकवले होते. त्यांची शब्दप्रधान गायकी त्यावेळी मला शिकता आली. तोच अनुभव या अष्टविनायक गीतांच्या वेळी मला आला. या प्रत्येक गाण्यातले शब्द किती महत्त्वाचे आणि त्यातल्या भावना कशा समजून गायला हव्यात हे देवांनी फार छान सांगितलं. म्हणून ती गाणी इतकी उत्तम झाली. या गाण्यांकडे पाहण्याची एक दृष्टी त्यांनी दिली आणि त्यांची शिकवण्याची पद्धती इतकी छान होती की, आजही त्यांनी जे शिकवलं ते कायम लक्षात राहिले!
 
 
उषाताईनी या अष्टविनायक गीतांच्या निर्मितीची कथा तर सांगितली. आपणही त्यांच्या स्टेजवरच्या अनेक कार्यक्रमांतून ही गाणी आवर्जून ऐकली आहेत. स्वस्ति श्री गणनायको... या श्लोकाने त्यांच्या कार्यक्रमातल्या गाण्यांची सुरुवात होत असे. मग झुळझुळ वाहे.. या ओझरच्या गणपतीच्या गाण्याने कार्यक्रम पुढे जात असे, मग देवांचेच संगीत असलेली रेणुका माऊली उषाताईंच्या स्वरातून साकारत असे आणि एकेका गाण्याने कार्यक्रमाची चढती कमान प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असे...
 

lata mangeshkar 
 
दूरदर्शनचे निर्माते अरुण काकतकर यांनी गीतांचे चित्रिकरण केले आणि ती गाणी अतिशय सुंदर अशा दृश्यस्वरूपातही साकारली. ज्यामुळे या गाण्यांतून अष्टविनायकाच्या त्या त्या ठिकाणी केलेल्या चित्रिकरणामुळे अष्टविनायक यात्राच घडते. या गाण्यानंतरही गणपतीची काही गाणी उषाताईनी केली, ज्याच्या शेवटी पं. यशवंत देव यांच्या आवाजातली मंत्रपुष्पांजलीही आहे. मग मात्र अनेक वर्षांनी गणपतीची संस्कृतमधली गाणी करण्याचा योग आला.
 
 
फारशी प्रसिद्ध नसलेली गणपतीची ही संस्कृत गाणी मयुरेश पै याने संगीतबद्ध केली होती आणि उषाताईंनी ती गायली होती. किंवा प्रातःस्मरामि एक अतिशय वेगळा अल्बम उषाताईंच्या आणि मयुरेशच्या आवाजात झाला. ज्यात अनेक श्लोक, स्तोत्रं, प्रार्थना त्यांनी गायलेल्या आहेत. उषाताईंना आजही या सगळ्या रचना आठवतायत आणि भक्तिमार्गी अशा या रचना गाता आल्या, याचं एक वेगळं समाधान त्यांना निश्चित आहे.
 
 
पूर्वीही गणेशोत्सवात अनेक कार्यक्रम व्हायचे आणि अनेक कलाकार या कार्यक्रमांतूनच पुढे यायचे. मंगेशकर घरातच उषाताई असल्यामुळे ते सगळे प्रसिद्ध होतेच. पण त्यांनीही गणेशोत्सवातून अनेक कार्यक्रम केले आहेत. गिरगावातले किंवा पुण्यात केलेले अनेक कार्यक्रम त्यांना आजही आठवतायत. कधीकधी दिवसाला दोन-दोन कार्यक्रमही केले आहेत.
 
 
lata mangeshkar
 
पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीच्या निमित्ताने एक आठवण सांगताना उषाताई थेट त्यांच्या बालपणात जाऊन पोहोचल्या. त्या म्हणाल्या, “मी अगदी सहा वर्षांची होते. तेव्हा तिथल्या गणपतीच्या मंदिरात आम्ही जायचो. तिथे एक मिठाईचं दुकान होते आणि तिथे स्वत: दगडूशेठ बसून दूध आटवायचे. मोठा माणूस, अगदी पहिलवानासारखा, तो बसून दूध आटवत असायचा. मला हे दृश्य अंधुक आठवतंय, त्यामुळे मी म्हणायची की, मी दगडुशेठना पाहिलंय. त्यावेळी त्यांचं गणपतीचे मंदिर अगदीच साधं आणि छोटंसं होतं. याच देवळाजवळ एक बाहुलीचा हौद होता. एक छोटीशी बाहुली तिच्या खांद्यावर घागर घेऊन उभी होती. त्या घागरीतून पाणी पडत असे. म्हणून तिला बाहुलीचा हौद म्हणत असत. तिथे मंदिराच्या अगदी शेजारीही जागा होती. गणपतीला एक मोठा मंडप घातला असायचा. हजारो लोक तिथे बसत असत. या गणपतीतल्या कार्यक्रमात बाबा गायलेले होते, दीदी गायलेली होती हे मला अगदी पुसट आठवतंय. दगडूशेठ गणपतीत गाण्याची आमची परंपरा बाबांपासून सुरू झालेली आहे. बाबा आणि दीदीनंतर मी आणि हृदयनाथ गायलो. आदिनाथ आणि राधाही तिथे गायले आहेत. आजही हृदयनाथ आणि राधा तिथे गणपतीत कार्यक्रम करतात. आज आदिनाथचा छोटा मुलगा अगदी लहान आहे, पण आमची गाण्याची परंपरा तो नक्की पुढे नेईल, असे वाटते.
 
 
गणपतीच्या दिवसांत माई आणि मुलं आम्ही अनेकदा मुंबईत आणि पुण्यातही गणपती बघायला जात होतो. मुंबईत लालबागचा राजा आणि पुण्यात दगडूशेठ गणपती तसेच मानाचे पाच गणपती बघायचे आणि घरी जायचे, असा आमचा नेम असे... उषाताई गणपतीच्या दिवसातल्या या आठवणी सांगत होत्या.
 
 
मा. दीनानाथ यांची कोल्हापूरला नाटक कंपनी होती. कोल्हापूरहून ती सगळी मंडळी जेव्हा मुंबईत आली, तेव्हा उषाताई आणि हृदयनाथ दोघेही खूप लहान होते. तेव्हा मुंबईत ते नाना चौकात राहायचे. तिथे शेजारी एक शंकराचे देऊळ होते आणि तिथे एक बालगणेश मंडळ होते. त्यांच्या घरात एक मोठा हॉल होता. तसा तो हॉल रिकामाच होता. त्या बालगणेश मंडळाने माईंना विचारलं की, आम्ही इथे गणपती बसवू का? माईनी अर्थातच परवानगी दिली. स्टेज बांधून तिथे त्यांनी गणपती बसवला. त्याच परिसरात एक छोटेसे दुकान होते - गजानन स्टोअर. तिथे कपाटात छोट्याछोट्या बालगणेशाच्या मूर्ती होता. खरं तर तिथे लहानगे उषा आणि हृदयनाथ एक-दोन आण्याच्या गोळ्या-बिस्किटे आणायला जात असत.
 

lata mangeshkar 
 
उषाताई या आठवणी जागवत म्हणाल्या,‘त्या काळात दोन आणे आम्हाला मिळाले की, दिवस अगदी आनंदात जायचा. त्या दिवशी आमच्याकडे दोन आणे होते. गजानन स्टोअरमध्ये ठेवलेल्या छोट्या छोट्या सुंदर मूर्तींनी आमचं अगदी लक्ष वेधून घेतलं. मला रंगांची खूपच आवड होती. एका छोटी दीड इंचाची गणपती मूर्ती आम्हाला दोघांनाही खूप आवडली. आमच्याकडचे दोन आणे आम्ही त्या दुकानदाराला दिले. तो गणपती आम्ही घरी आणला आणि त्या बालगणेश मंडळाच्या गणपतीच्या शेजारी बाळने ती मूर्ती ठेवली. माईने विचारलं की, हा गणपती कुणी ठेवला. बाळ म्हणाला की, मी ठेवला. तर माई म्हणाली की, आता दरवर्षी आपण तुझ्या नावाने गणपती आणूया. त्या बालगणेश मंडळाचा गणपती पुढचे दोन ते तीन वर्षेच होता. पण आमच्या घरचा गणपती मात्र त्या वर्षापासून सुरू झाला.’
 
 
मग आम्ही वाळकेश्वरला राहायला आलो. तिथे आमची जागा लहान होती, पण तिथल्याही हॉलमध्ये आम्ही गणपतीत स्टेज करून गणपती बसवत होतो. राज कपूर किंवा भगवानदादा यांच्याकडून किंवा राजकमलमधून आम्ही तयार स्टेज आणत असू. मला डोंगर-पाणी असा सगळा देखावा उभा करायचा असे. दिग्दर्शक माधवराव शिंदे यांनी मला शिकवले की, या स्टेजवर डोंगर कसा उभा करायचा, दरी कशी दाखवायची, पाणी कसे आणायचं. मग त्यावर एखादी शंकरांची, कृष्णाची किंवा देवीची मूर्ती ठेवायची. हे सगळे मी करायला लागले आणि मग त्यानंतर दरवर्षी मी हे देखावे साकार करू लागले. माईला, दीदीला हे सगळं खूप आवडायचे. पुढे प्रभुकुंजमध्ये आल्यावर मात्र आम्हाला मोठी गॅलरी मिळाली. त्या गॅलरीत मोठं स्टेज उभं करायचं आणि तिथे दर गणपतीत विविध देखावे उभे करायचे, हे होत राहिलं. माई गेल्यावर मात्र दोन वर्ष काहीच केले नाही. पण मग दीदीने मला खूप आग्रह केला आणि त्यानंतर पुन्हा दहा दिवस गणपती आम्ही सुरू केले आणि माझी गणपतीची सजावटही पुन्हा सुरू झाली.”
...उषाताई सांगत होत्या आणि त्यांच्या डोळ्यात या आठवणी पुन्हा एकदा जागल्या होत्या.
 
 
उषाताईंनी केलेली ही सजावट पाहण्यासाठी अनेकजण आवर्जून येत असत. उषाताईंनी उभे केलेले देखावे मी स्वतः पाहिले आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने हे देखावे साकारलेले होते. एका वर्षी त्यांनी केलेल्या या देखाव्यात दोन बाजूला डोंगर, मध्ये दरी आणि त्यातून वाहणारी नदी त्यांनी दाखवली होती. एका बाजूने सूरदास येत आहेत. पण नदीवरचा पूल पडलेला आहे. तो मध्ये लोंबकळतो आहे. सूरदासांना दिसत नसल्यामुळे ते चाचपडत आहेत आणि एका बाजूने भगवान कृष्ण त्यांना हात देतो आहे, असे दृश्य होते.
 
 
एका वर्षी विश्वरूपदर्शनाचा मोठा मनोरम देखावा उषाताईंनी उभारला होता. भगवान कृष्ण उभा आहे. अर्जुन त्यांच्यासमोर हात जोडून उभा आहे. सहा फुटांचा मोठा चेहरा तयार केला. त्यातून कापूस भरून तो चेहरा तयार केला. त्यातून मोठी जीभ खाली आलेली. त्याच्या डोक्यावर डोंगर, त्याचे केस म्हणजे झाडी, त्यातून वाहणार्‍या नद्या म्हणजे त्याच्या अंगावरचा घाम, एका डोळ्यात सूर्य आणि एका डोळ्यात चंद्र, सगळं जग म्हणजे मीच आहे. मीच सगळ्यांचा नाश करतो आणि मीच सगळ्यांची निर्मिती करतो. अशा विश्वरूपदर्शनांचा देखावाही मोठा विलोभनीय होता. धीरज चावला हे खूप मोठे फोटोग्राफर आले होते. त्यांनी त्या देखाव्याचा रंगीत फोटो काढला होता. एकदा तर उषाताईनी पाणी पर्वतावरून वाहत खाली येतंय आणि त्याच्या शेजारी शंकर-पार्वती नृत्य करतायत, असा देखावा केला होता. पाण्यावर बर्फ पडलाय. छोटी छोटी कमळं वर आली आहेत. गवत वर आलेय, असे सुंदर दृश्य उभे केले होते.
 
 
त्याची एक गंमत उषाताईंना आठवली. हे दृश्य सगळ्यांना खूपच आवडले, विशेषत: त्यावर जे संथ पाणी दिसत होतं. तर अनेकांना प्रश्न पडला की, हे पाणी कसे काय इतके छान राहतंय? गणपतीच्या दर्शनासाठी एक कलादिग्दर्शक आले. उषाताई त्यांना काही ओळखत नव्हत्या. ते आरतीच्या आधी आले. देवाला नमस्कार करताना त्यांचं लक्ष खालच्या पाण्याकडे गेले. त्यांनाही तोच प्रश्न पडला की, हे पाणी इथे कसे राहतंय. त्यांनी हळूच त्या पाण्यात बोट घालून पाहिले. तर बोट पाण्यात बुडालंच नाही. मग त्यांनीही उषाताईना हे कसे केले त्याविषयी विचारले. तर उषाताईनी त्यांच्या डायनिंग टेबलवरची काच काढून तिथे लावली होती. त्याखाली छोटी कमळांची चित्रे कापून लावली होती. गवत चिकटवले होते, मुळात ही कलाकुसर उषाताई गणपतीच्या दिवसात सुंदर करत असत. अशी दृश्य तयार करण्यासाठी फ्लेक्स लावायचे, ते हवे त्या प्रमाणात कापायचे, चिकटवायचे, डोंगर उभे करायचे, रंगवायचे ही सगळी कामं त्या दिवसात प्रभूकुंजमध्येे देखण्या पद्धतीने होत असत.
 
 
म्हणूनच पुढच्या काळातही तिरुपती, महालक्ष्मी, सप्तशृंगी, एकविरा अशा देवतांची चित्रणं उषाताईंनी साकारली. ती इतकी हुबेहूब होती की त्या त्या देवतांचे भक्त येऊन ते देखावे घेऊन गेले. कुणी त्यांच्या घरात ते देखावे मांडले तर कुणी त्या त्या देवीच्या मंदिरात. लतादीदी स्वतः याचे फोटो काढत असत आणि जपूनही ठेवत असत.
 
 
गणपती ही कलेची देवता, बुद्धीची देवता... कलाकारांच्या माध्यमातून या देवतेचं स्मरण आणि पूजन म्हणजे आमची कला. माझ्या गाण्यातून आणि गणपतीसाठी उभारलेल्या देखाव्यातूनच मी माझी आराधना करत असते... असं सांगत आजही उषाताई, मीनाताई, हृदयनाथजी आणि आशाताई त्या सगळ्या देखाव्यांचं स्मरण करत आहेत.
 
 
आदिनाथने आपल्या फोनमध्ये जपून ठेवलेल्या फोटोंमुळे आज ती दृश्यं आपल्यापर्यंत पोहोेचवता आली आणि ज्या देखाव्यांची मीही साक्षीदार होते त्या देखाव्यांमागच्या, अष्टविनायक गीतांमागच्या सुरम्य आठवणी या वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मला आपल्यापर्यंत पोहोचवता आल्या, याचं मला एक वेगळेच समाधान निश्चितच आहे.
Powered By Sangraha 9.0