प्रथम तुला वंदितो...- नृत्यातून गणेशभक्तीचा आनंद

25 Aug 2025 13:04:07
ganesh festival 2025
गणपती ही कलेची, बुद्धीची, विद्येची अधिष्ठात्री देवता. कलाकारांसाठी तर गणपती हा विशेष जिव्हाळ्याचा विषय. या आराध्य देवतेविषयीच्या त्यांच्या भावना, आठवणीतला गणेशोत्सव याविषयी कलाकारांनी व्यक्त केलेले मनोगत...
गणपती हा माझा लाडका देव आहे. माझा वाढदिवस गणेशोत्सवात येत असल्याने दुहेरी आनंद असतो. गणपती, वाढदिवस आणि मोदक हे एक छान समीकरण जुळून येतं. आपण एक भक्त म्हणून गणपतीची आराधना, भक्ती करतो. पण षोडशोपचारातील एक उपचार म्हणजे नृत्य आहे. मी एक भरतनाट्यम नृत्यांगना असल्याने अनेकदा गणपतीची नृत्यातून आराधना करण्याची संधी मिळते. गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यामुळे अनेकदा वाढदिवसाच्या दिवशी नृत्यसेवा करण्याची संधी मिळते. ती भावना खूप समाधान देणारी असते. त्या शक्तीसमोर नतमस्तक व्हायला होतं. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून मी कलावंत ढोल ताशा पथकात ढोल वाजवत आहे. ती ऊर्जा, अनुभव शब्दात मांडताच येणार नाही.
 

ganesh festival 2025 
 
लहानपणीची एक खास आठवण म्हणजे एचएमव्हीची लता दीदींची अष्टविनायक गीते ही व्हिसीडी आली होती. त्यावेळी मी पाचवी सहावीत होते. माझी आई स्वाती दैठणकरदेखील भरतनाट्यम नृत्यांगना आहे. यातील ’गणराज रंगी नाचतो’ हे गाणं माझ्या आईने बसवलं होत आणि ते माझ्यावर चित्रित झालं होतं. व्हिडिओ पाहून लतादीदींनी माझ्या नृत्याचं विशेष कौतुक केलं होतं. ती शाबासकी मी कधीही विसरू शकत नाही.
 
 
आपल्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. माझ्या लहानपणी घरच्या गौरींचं विसर्जन झालं की बाबा आम्हाला गणपती दाखवायला घेऊन जायचे, खांद्यावर बसवायचे. त्यावेळी डीजे प्रकार नव्हता, वेगवेगळ्या विषयांवरचे जिवंत देखावे असायचे. त्या आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत. आज माझा मुलगा पाच वर्षांचा आहे. गणेशभक्तीची ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत जावी असं मला वाटतं.
 
 
- नुपूर दैठणकर
भरतनाट्यम नृत्यांगना व अभिनेत्री
Powered By Sangraha 9.0