मोखाडा : जे श्रेष्ठ असतात त्यांना समाज कधीही विसरू शकत नाही. नवसुदादा अशा श्रेष्ठ व्यक्तींपैकी एक होते. तरुण वयात स्वीकारलेल्या संघाच्या विचारांची प्रखरता आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी कायम टिकवली अशा शब्दात संघाचे ज्येेष्ठ स्वयंसेवक आणि पूर्व सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी नवसुदादा वळवी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
वनवासी क्षेत्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि वनौषधी तज्ज्ञ नवसुदादा वळवी यांचे 2 जुलै 2025 रोजी वयाच्या 86व्या वर्षी देहावसान झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोखाडा येथील साई मंदिरात शुक्रवारी एका श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना भैयाजी जोशी म्हणाले की, नवसुदादांचे नाव हजारो लोकांच्या हृदयावर कोरले गेले आहे. त्यांनी स्वत:साठी काहीच केले नाही तर त्यांनी सारे आयुष्य समाजासाठी समर्पित केले होते. त्यांच्यासारख्या कितीतरी कार्यकर्त्यांनी अथक कार्य केल्यामुळे आज मोखाडासारखा तालुका विघटनकारी शक्तींपासून सुरक्षित आहे. आदिवासींना धर्म नाही असे वातावरण निर्माण केले जात असताना नवसुदादांनी ’आम्ही हिंदू आहोत’ हे इथल्या वनवासी बांधवांना स्पष्टपणे म्हणण्यास शिकवले, असे गौरवोद्गार भैयाजी जोशी यांनी काढले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भय्याजी जोशी यांच्यासह जिल्हा संघचालक नरेश मराड, वनवासी कल्याण आश्रमाचे प्रांताध्यक्ष विष्णू सुरूम, नवसुदादांचे बंधू राजू वळवी यांनी नवसुदादाच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत वनवासी कल्याण आश्रमाचे महेश काळे यांनी केले. त्यांच्यासोबतच गोपीनाथ अंभिरे, विद्याधर मुळे, नरेश मराड, डॉ. रुपेश कोडीलकर, सजन खुताडे गुरुजी, तुकाराम महाले, पत्रकार ज्ञानेश्वर पालवे, प्रकाश बंधू चौधरी यांनीदेखील नवसूदादा वळवी यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.
यावेळी नवसुदादा वळवी यांच्यावर विविध कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या आठवणींवर आधारित एका पुस्तिकेचे प्रकाशन भैयाजी जोशी यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे संचालन कल्याण आश्रमाचे श्रद्धाजागरण प्रमुख जगन हिलिम यांनी केले. शांतीमंत्रानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास पालघर जिल्ह्यातील संघ व विविध संघटनांचे कार्यकर्ते, वनौषधी तज्ज्ञ, जव्हार, मोखाडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.