गारे काका सामाजिक समरसतेचा आदर्श वस्तुपाठ

26 Aug 2025 16:55:30

garekaka
गारेकाकांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी दिले. एक सामान्य कार्यकर्ता निष्ठेने ध्यासपूर्वक संघटनातून लोकहिताचे किती प्रकल्प उभे करू शकतो याचा आदर्श गारेकाकांनी आपल्या अखंड कार्यातून निर्माण केला. अनेक स्वयंसेवक त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन समाजहिताचे काम करायचा प्रयत्न करीत आहेत. ’मनांत प्रीती, हृदयी भक्ती, सेवा करणे निस्वार्थी’ हा भाव मनात साठवून भीमरावांनी सामाजिक बांधिलकी जपली. जय श्रीराम म्हणत ते फोन करायचे आणि माणसे जोडायचे. त्यांच्या कार्याचा सुगंध दीर्घकाळ संपर्कातील कार्यकर्त्यांच्या मनात दरवळत राहील.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व प्रचारक, नाशिक जिल्हा ग्रामविकास प्रमुख भीमराव त्र्यंबक गारे यांचे नुकतेच निधन झाले. 1984 पासून संघप्रचारक म्हणून नंदुरबार, तळोदा या वनवासीबहुल क्षेत्रात काम करताना ते आदिम संस्कृतीशी समरस झाले.
 
 
सामाजिक समरसतेचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी नकळतपणे घालून दिला. पुढील काळात हीच समरसता त्यांचे कार्यसूत्र ठरली. सर्व स्तरात ते गारे काका या नावाने ओळखले जाऊ लागले.
 
 
सर्वसामान्य परिवारातील भीमराव बालपणी संघ स्वयंसेवक झाले. आपल्या धडपड्या वृत्तीमुळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी, जनजाती (वनवासी) कल्याण आश्रमाचे अ.भा. कार्यकारिणी सदस्य गिरीश कुबेर, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्यासमवेत अनेक वर्षे संघकार्य करण्याची संधी गारे काकांना मिळाली. त्याचे सोने करीत वनवासी, ग्रामीण क्षेत्रात त्यांनी अनेक उपक्रम सातत्याने राबविले. प्रचारकाचा कार्यकाळ संपल्यानंतर नाशिकमध्ये वृत्तपत्रविक्री व्यवसाय केला. पहाटे 5 ते 9 घरोघरी वृत्तपत्र वितरण करताना त्यांनी अनेक घरे जोडली. सकाळी 10 नंतरचा पूर्ण वेळ त्यांनी समाजसेवेला वाहून घेतले. ग्रामीण विकासाचा ध्यास असल्याने भीमरावांनी महिलांना सक्षम, स्वावलंबी करण्यास सुरुवात केली. त्यासाठी कुटीर उद्योग निर्माण केले. गावोगावी पाण्याच्या टाक्या बांधून दिल्या. मंदिरे उभारली. गोशाळा तयार करून महिला, युवकांना गो-उत्पादनांचे प्रशिक्षण दिले. साधी राहणी, कुशल संघटक, कल्पक नियोजक, दांडगा जनसंपर्क, सहज संवाद साधण्याची कला व विलक्षण लोकसंग्रह ही गारेकाकांची वैशिष्ट्येे त्यांना आयुष्यभर सामाजिक समरसतेसाठी पूरक ठरली.
 
 
भिंतघरला गारे काकांनी वनवासी भगिनींशी संवाद साधल्यावर त्या गोधडी शिवायचा प्रकल्प करू शकतात, असे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी नाशिकमधून देणगीदाखल मिळालेले जुने कपडे, पडदे, साड्या गोळा करून वनवासी भगिनींना दिल्या. वनवासी भगिनींनी शिवलेल्या सुरेख गोधड्यांची विक्री नाशिकमध्ये सुरू झाली. हा प्रकल्प गेली अनेक वर्ष भिंतघर परिसरात उत्तम सुरू आहे. त्यातून शेतीचे काम नसलेल्या दिवसात भिंतघर गावाच्या पंचक्रोशीतील गावातील आदिवासी भगिनींना काम मिळते. गारेकाकांनी या प्रकल्पावर काम करताना नाशिकमधील अनेक महिलांना सहभागी करून घेतल्यामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला. या गोधड्यांना नाशिकसह मुंबई, पुणे व इतर ठिकाणांहून देखील मागणी वाढली आहे. नंतर आदिवासी भगिनींच्या मागणीनुसार तेथे शिवणकामाचा वर्ग सुरू करण्यासाठी नाशिकच्या दात्यांकडून काही शिलाई मशीन मिळवली. दर शनिवार, रविवारी पूर्ण दिवसभर नाशिकमधून श्रीमती जगताप तेथे शिकवायला जाऊ लागल्या. सुमारे 40 वनवासी भगिनी या तीन महिने चाललेल्या शिवणकाम वर्गात सहभागी झाल्या. नाशिकमधील अनेक स्वयंसेविका पूर्णवेळ त्याकरिता द्यायच्या. अगदी निरक्षर असलेल्या वनवासी भगिनी शिवणकाम वर्गासाठी तयार झाल्या. त्यांनी शिवणकाम शिकून घेतले. आता त्यातील बर्‍याच महिला भिंतघर परिसरात स्वतःचा शिवणकामाचा व्यवसाय करीत आहेत. स्वावलंबी होऊन आपले घर, प्रपंच चालवित आहेत.
 
 
भिंतघर, गुलाबी गावाचा कायापालट
अनेक मित्रांना, परिचितांना भीमरावांनी नियमित शाखेशी जोडून ठेवले होते. अनेक वर्ष प्रयत्न करून सुरगाणा तालुक्यातील वनवासी बांधवांशी मोठा संपर्क तयार केला होता. त्यासाठी नाशिकमधील अनेक पुरुष स्वयंसेवक व विशेषतः महिला स्वयंसेविकांचे संघटन उभे केले होते. भिंतघर परिसरात काही कौशल्य विकासाचे कार्यक्रम घेण्यासाठी महिला व पुरुष स्वयंसेवकांचा मोठा गट तयार केला. अनेक स्वयंसेवकांच्या मदतीने गोशाळा उभी केली. महाराष्ट्राचे राज्यपाल स्वतः गोशाळेच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी दोनदा भीमराव मला घेऊन गेले होते. तो वृत्तांत साप्ताहिक विवेकमध्ये प्रकाशित केला होता. शेजारच्या गुलाबी गावातही आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवला. भिंतघर, गुलाबी गावाचा कायापालट करण्यात गारेकाकांचा मोठा सहभाग ठरला.
 
सुरगाणा परिसरात प्रचंड पाऊस पडतो. परंतु हे सारे पाणी वाहून जात असल्याने जानेवारीनंतर तेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते. ही बाब लक्षात आल्यावर गारेकाकांनी पुढाकार घेतला. नाशिकमधील काही दात्यांच्या मदतीने तेथील अनेक गावांमध्ये पाण्याच्या टाक्या लावून देण्यात आल्या. त्यामुळे वनवासी बांधवांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली. भिंतघर परिसरात बर्‍याच गावांना सार्वजनिक शौचालय नव्हते. गीव्ह फाउंडेशनचे प्रमुख अय्यर यांच्या मदतीने अनेक गावांमध्ये सार्वजनिक शौचालय बांधून देण्यात आले. सुरगाणा तालुक्यात पावसाळा संपल्यावर फारशी कामे नसतात. त्यामुळे वनवासी बांधवांचे स्थलांतर होते. ते थांबवण्याकरता बकरी बँकेची संकल्पना पुढे आली. प्रत्येक गावात चार महिने वाढलेलं बकरीचे पिल्लू दात्यांच्या मदतीने मोफत दिले जाऊ लागले. वनवासी भगिनीने ते वाढवायचे. एक वर्षांनी बकरीला कोकरू होतं ते त्यांनीच घ्यायचे. दुसर्‍यांदा जेव्हा दोन कोकरं होतील, त्यातील एक आपल्या गावातील इतर भगिनींना मोफत द्यायचे. त्या बकरी बँकेचा विस्तार होतो आहे. त्यातून वनवासी भगिनींना स्वतःच्या बकर्‍या मिळाल्या. दरवर्षी दहा वीस हजार उत्पन्नाचे साधन मिळाले. हा प्रकल्प राबवण्यासाठी गारेकाकांनी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय आदर्शवत बकरी प्रकल्प सुरू झाला.
 
 
काही वनवासी बांधवांकडे स्वतःचे बैल नसतात. नाशिकमधील पांजरपोळ संस्थेचे अध्यक्ष जव्हेरी यांनी वनवासी बांधवांना पाच, सात महिने वाढलेले गोर्‍हे शेतीच्या कामाकरता मोफत द्यायचे मान्य केले. त्यातून गेली चार वर्ष दर वर्षी सुमारे पंचवीस वनवासी शेतकर्‍यांना मोफत गोर्‍हे देण्यात आले. त्यांंची ते नियमित काळजी घेतात व आता तीन-चार वर्षांपूर्वी दिलेले गोर्‍हे त्यांना शेतीसाठी उपयोगी ठरत आहेत. गारे काका दरवर्षी सुरगाणा परिसरातील वनवासी भगिनींचा दोन दिवसांचा प्रशिक्षण वर्ग नाशिकमध्ये घ्यायचे. त्यातून पुढील वर्षाची कामाची दिशा ठरवली जायची. सार्वजनिक कामात सहभागी असलेल्या स्वयंसेवकांचा मेळावा आयोजित करत. त्यात सर्वांना आग्रहाने पुरणपोळीचे जेवण देत. संपूर्ण महाराष्ट्रातून उत्कृष्ट सार्वजनिक काम केलेल्या व्यक्तीला बोलावून त्यांचे मार्गदर्शन घेण्याचा पायंडा त्यांनी सुरू केला. अशा प्रकारे गारेकाकांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी दिले. एक सामान्य कार्यकर्ता निष्ठेने ध्यासपूर्वक संघटनातून लोकहिताचे किती प्रकल्प उभे करू शकतो याचा आदर्श गारेकाकांनी आपल्या अखंड कार्यातून निर्माण केला. अनेक स्वयंसेवक त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन समाजहिताचे काम करायचा प्रयत्न करीत आहेत. ’मनांत प्रीती, हृदयी भक्ती, सेवा करणे निस्वार्थी’ हा भाव मनात साठवून भीमरावांनी सामाजिक बांधिलकी जपली. जय श्रीराम म्हणत ते फोन करायचे आणि माणसे जोडायचे. त्यांच्या कार्याचा सुगंध दीर्घकाळ संपर्कातील कार्यकर्त्यांच्या मनात दरवळत राहील.
 
त्यांच्या स्मृतींना मनापासून श्रद्धांजली !
संजय देवधर
 
(वरिष्ठ पत्रकार, नाशिक )
 
Powered By Sangraha 9.0