सांगोड उत्सव - श्रध्दा, कला व एकात्मतेचा संगम

26 Aug 2025 14:41:17
@सागर अग्नी
सांगोड उत्सव ही फक्त एक रचना नसून ती श्रद्धा, संरक्षण आणि निसर्गाशी सुसंवाद साधण्याच्या प्रक्रियेचे प्रतीक आहे. सांगोड उत्सवाचे मनोहारी जलदृश्य अनुभवण्यासाठी स्थानिकांबरोबरच देशी-विदेशी पर्यटकही हजेरी लावतात. पर्यटकांना गोव्याच्या ग्रामीण संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची उत्तम संधी हा उत्सव देतो.

Goa
 
गोवा... भारताच्या नकाशावरील एक छोटेसे शहर. पण, तोच गोवा लोकप्रिय ठरतोय, तो इथली समृद्ध व श्रीमंत अशी परंपरा, संस्कृती व गोमंतकीयांचे आदरातिथ्य पाहून. गोव्याच्या याच भूमीत अनेक रत्ने उदयास आली. भगवान परशुरामनिर्मित गोव्यात केवळ पर्यटन नाही, तर अनेक गोष्टी अनुभवण्यासारख्या आहेत. त्यापैकीच कुंभारजुवेचा सुप्रसिद्ध असा सांगोड उत्सव.
 
 
गोव्यातील सांस्कृतिक परंपरा, लोककला आणि श्रद्धा यांचा संगम जर अनुभवायचा असेल, तर हा सांगोड उत्सव विशेष महत्त्वाचा मानला जातो. हा उत्सव अनोख्या धार्मिक श्रद्धांशी जोडला गेलाय.गावातील लोकांच्या एकोप्याचे आणि सामूहिक सहभागाचे सांगोड उत्सव हे प्रतीक आहे.
 
 
कुंभारजुवा हे गाव ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे. येथे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या श्रद्धेनुसार सांगोड उत्सव भाद्रपद महिन्यातील चतुर्थीनंतर सातव्या दिवशी साजरा होतो. समुद्र, खाड्या आणि नद्यांच्या सान्निध्यात राहणार्‍या गोमंतकीयांच्या श्रद्धा, संस्कृती आणि जलजीवनाचा संगम या उत्सवात पाहायला मिळतो. सांगोड उत्सव कुंभारजुवा येथील आसपासच्या खाडीकिनारी वसलेल्या गावांमध्ये होतो. हा एकंदर रंगतदार आणि अनोखा जलोत्सव आहे.
 
Goa
 
या उत्सवाचा संबंध शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण मंदिरातील गणपतीपूजनाशी आहे. गावासाठी हा उत्सव समृद्धी, आरोग्य आणि संकटमोचक असा मानला जातो. ग्रामस्थ सामूहिकरित्या मंदिरात पूजलेल्या श्रीगणेशाची मनोभावे पूजा करून, सातव्या दिवशी वाजतगाजत विसर्जन मिरवणूक काढतात. त्यासोबतच गावातील सात दिवसांच्या गणरायांचे नदीकिनारी विसर्जन करण्यात येते. गणेशभक्त गणरायाच्या जयघोषाने आणि पारंपरिक वाद्यांच्या तालाने, ढोल-ताशांचा गजराने आसमंत दुमदुमून टाकतात. पूर्वीपेक्षा आता या उत्सवाला भव्य स्वरूप आले असून गणरायांच्या स्वागतासाठी बोटीवर चित्ररथ तयार केले जातात.
 
 
चित्ररथांच्या माध्यमातून इथले स्थानिक कलाकार आपल्या अंगभूत कलांचे सादरीकरण करतात. राज्यात केवळ सांगोड उत्सवच नाही तर शिगमोत्सव, कार्निव्हल दरम्यानही गोमंतकीय कलेची महती सांगणारे चित्ररथ असतात. सांगोड उत्सव हा सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. उत्सवात प्रत्येक घरातील सदस्य सहभागी होतो.
 
Goa 
 
सण-उत्सवाला घरात आलेल्या पै-पाहुण्यांच्या स्वागतासाठी येथील महिला वर्गाकडून पारंपरिक पदार्थांची मेजवानी तयार केली जाते. आबालवृद्ध असे सारेच जण या उत्सवात हौशीने सहभागी होतात. हा उत्सव गावातील जुन्या परंपरा जिवंत ठेवतो. त्यातूनच पिढ्यान्पिढ्यांना आपली सांस्कृतिक ओळख आणि आपलेपणाची भावना प्रदान करतो.
 
 
सांगोड उत्सव ही फक्त एक रचना नसून ती श्रद्धा, संरक्षण आणि निसर्गाशी सुसंवाद साधण्याच्या प्रक्रियेचे प्रतीक आहे. सांगोड उत्सवाचे मनोहारी जलदृश्य अनुभवण्यासाठी स्थानिकांबरोबरच देशी-विदेशी पर्यटकही हजेरी लावतात. पर्यटकांना गोव्याच्या ग्रामीण संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची उत्तम संधी हा उत्सव देतो.
 
Goa 
 
‘सांगोड’ म्हणजे पारंपरिक होडी किंवा नौका. ही नौका गावकरी फुलांनी, नारळाच्या पानांनी, रंगीबेरंगी कापडांनी, विद्युत रोषणाईने सजवतात. या सजवलेल्या नौकांमध्ये गणेशमूर्ती व अन्य देवतांच्या प्रतिमा ठेवून खाडीत किंवा नदीवर जलमिरवणूक निघते. सजवलेल्या नौकांसोबत ढोल-ताशा, पारंपरिक गाणी, फुगडी व लोकनृत्यांचा जल्लोष असतो. नौकांवरील देखाव्यातून सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संदेशही समाजापर्यंत पोचवले जातात.
 
 
श्रीगणेश आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी जलप्रवास करतो, ही या सांगोड उत्सवामागील लोकभावना. जलपरंपरेशी निगडित हा सोहळा गोव्याच्या नद्यांशी असलेल्या भावनिक नात्याचे प्रतीक आहे. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली ही परंपरा गावकर्‍यांमधील ऐक्य आणि सहकार्य वृद्धिंगत करते.
 
 
संध्याकाळच्या वेळी पाण्यावर तरंगणार्‍या, दिव्यांनी उजळलेल्या नौकांचा नजारा पाहणार्‍यांच्या मनात कायमचा घर करून राहतो. सांगोड उत्सव हा केवळ धार्मिक विधी नाही, तर तो गोव्याच्या लोकसंस्कृतीचा, जलजीवनाचा आणि सामूहिक आनंदाचा जिवंत उत्सव आहे. खाडीकिनारी नांदणार्‍या लोकांच्या जीवनातल्या श्रद्धा, कला आणि एकात्मतेचे दर्शन घडवणारा हा सोहळा गणेशोत्सवाला एक वेगळेच आकर्षण देतो.
 
लेखक वरिष्ठ पत्रकार आणि गोव्याच्या माहिती तंत्रज्ञान मंत्री पर्यटनमंत्र्याचे माध्यम सल्लागार आहेत.
Powered By Sangraha 9.0