गणेशोत्सव हा संस्कृती, भक्ती आणि सामूहिक एकतेचा उत्सव. मात्र, गेल्या काही वर्षांत डीजे संस्कृतीमुळे त्याचे पावित्र्य हरवत चालले आहे. आरोग्य, पर्यावरण तसेच सामाजिक संतुलन बिघडवणार्या या चुकीच्या प्रवृत्तीवर आता मर्यादा आणण्याची वेळ आली आहे.
गणेशोत्सव, दहीहंडी किंवा कोणताही पारंपरिक उत्सव हा गोंगाटाचा नव्हे तर भक्तीचा उत्सव आहे. आणि नेमके याचेच विस्मरण गेल्या काही वर्षांत झाल्यामुळे, डीजे संस्कृतीने या उत्सवांच्या मूळ हेतूवरच आक्रमण केले आहे. कर्णकर्कश कानठळ्या बसवणार्या आवाजात परंपरेचा सुगंध कुठेतरी हरवला गेला आहे. तथापि, आता समाजात एक नवीन प्रवाह उगम पावतो आहे तो म्हणजे डीजेमुक्त उत्सवांची क्रांती. याच प्रवाहाचे सर्वात प्रभावी उदाहरण यंदा पुण्यात पाहायला मिळाले. ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, ढोल ताशांचा मंगलमय गजर, महाकाल नृत्य आणि वरळी बिट्सच्या पारंपरिक ठेक्यावर थिरकणारी तरुणाई, असे हे दृश्य महाराष्ट्रासाठी एक नवा आदर्श घालणारे ठरेल. पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेल्या 26 सार्वजनिक मंडळांच्या संयुक्त दहीहंडी उत्सवात यंदा डीजेचा गोंगाट नव्हता. त्याऐवजी प्रभात बॅन्ड, वरळी बिट्स, युवा वाद्य पथक, रमणबाग, शिवमुद्रा आदी ढोल-ताशा पथकांनी शिस्तबद्ध वादन करत पारंपरिक वाद्यांचे सामर्थ्य दाखवून दिले. ऐतिहासिक अशा लाल महाल चौकात उसळलेल्या जनसागरासमोर पारंपरिक वाद्यांच्या कल्लोळात राधेकृष्ण ग्रुपने दहीहंडी फोडली आणि डीजेमुक्त परंपरेचा पाया रचला गेला.
डीजेशिवायही उत्सव यशस्वी होतो, हे पुणेकरांनी दाखवून दिले. उत्सवाचा आनंद डीजेच्या आवाजात नाही, तर ढोल-ताशांच्या मंगलमय गजरात आहे, उत्सवात डीजेची गरज नाही; गरज आहे ती सर्वांनी एकत्र येण्याची, परंपरेचा सन्मान करण्याची, समाजमन जेव्हा एखादी गोष्ट ठरवते, तेव्हा नवा पायंडा पाडता येतो, हेच यातून अधोरेखित झाले. हा प्रयोग केवळ दहीहंडी पुरता मर्यादित नाही, तर महाराष्ट्रात सुरू झालेल्या डीजेमुक्त चळवळीचा प्रेरणादायी टप्पा आहे. दहीहंडी उत्सवाने डीजेमुक्त गणेशोत्सवाला चालना दिली आहे. हेच याचे गमक. या डीजेमुक्त दहीहंडीचा संदेश आता गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक ठरतो आहे. पुण्यात ढोल, ताशा, लेझीम, यांच्यामुळे दहीहंडी रंगली, तशीच रंगत गणेशोत्सवातही अनुभवता येऊ शकते, हाच संदेश यातून ठळकपणे दिला गेला आहे. यामुळे, आरोग्य व पर्यावरणाचे रक्षण तर होणार आहेच, त्याशिवाय पारंपरिक कलाकारांना रोजगार मिळेल, समाजात शांतता आणि भक्तीमय वातावरण वाढेल. हीच काळाची गरज आहे. डीजेच्या कर्णबधीर करणार्या आवाजात उत्सवाचे स्वरुप हरवत असून, पारंपरिक वाद्यांच्या गजरानेच उत्सव सर्वार्थाने खुलतात, डीजेमुक्त दहीहंडीने हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.

पुणेकरांनी डीजेमुक्त दहीहंडीला उस्फूर्त प्रतिसाद देत हा उत्सव यशस्वी केल्याबदल मी मनापासून आभार व्यक्त करतो. गतवर्षी आम्ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी सार्वजनिक मंडळांचा संयुक्त दहीहंडी उत्सव सुरू केला होता. यंदाच्या वर्षी डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प केला असून, त्याच भूमिकेतून दहीहंडीमध्ये डीजेचा वापर टाळण्यात आला. त्यामुळे ध्वनी प्रदूषण कमी झाले आणि पारंपारिक वाद्यवादकांनाही रोजगार मिळाला.
- पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप/विश्वस्त, उत्सव प्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
आता प्रत्येक गणेश मंडळ, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर ठामपणे सांगेल की, उत्सव प्रसंगी ढोल-ताशांचा मंगल गजरच हवा आहे. डीजेचा कर्कश गोंगाट नको, ही मागणी पुढे येऊ लागली आहे.
डीजेमुक्त गणेशोत्सवाची गरज
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय जागृती आणि भारतीय संस्कृतीचे जतन यासाठी नवा आयाम दिला. परंतु, गेल्या दोन-तीन दशकांमध्ये या उत्सवाचा मूळ हेतू झाकोळला गेला आहे. भव्य देखावे, मोठमोठाल्या मूर्ती आणि त्यापेक्षा कर्णकर्कश डीजेच्या भिंती यामुळे गणेशोत्सवाचे मूळ रूप विकृत होत आहे. आज डीजेमुक्त गणेशोत्सव ही केवळ सामाजिक मागणी राहिलेली नाही, तर ती सांस्कृतिक शुद्धतेसाठी तसेच सार्वजनिक आरोग्यासाठी आवश्यक अशी चळवळ म्हणून समोर येते आहे. गणेशोत्सव म्हटला की, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात एक वेगळीच रंगत येते.
लोकरंग, भक्तिभाव, सामाजिक ऐक्य आणि परंपरेशी निगडित आनंद यांचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव, असे ढोबळमानाने म्हणता येते. या उत्सवाचा मूळ भाव म्हणजे एकत्र येऊन श्री गणेशाचे पूजन करणे, एकमेकांशी सामाजिक संवाद वाढवणे आणि भक्तीच्या माध्यमातून जनतेमध्ये जागृती घडवणे. तथापि, गेल्या दोन दशकांपासून गणेशोत्सवाच्या उत्सवात डीजे नामक कलीने प्रवेश केला. हीच विकृती समाजाच्या आरोग्यास आणि परंपरेस धोकादायक ठरत आहे. म्हणूनच समाजाच्या विविध स्तरातून डीजे-मुक्त गणेशोत्सव या मागणीला अधिकाधिक जोर मिळत आहे. डीजेच्या आवाजाची पातळी साधारणतः 100 ते 120 डेसिबल्सपर्यंत पोहोचते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, 85 डेसिबल्सच्या पुढे गेलेला आवाज मनुष्याच्या श्रवणशक्तीस धोकादायक ठरतो. त्याहून अधिक ती गेल्यास कर्णबधिरता, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे, प्रसंगी हृदयविकाराचा धक्का अशा गंभीर समस्या निर्माण होतात. तरुणांच्या अंगभूत उत्साहाला डीजेने विकृत स्वरूप दिले. सातत्याने, कानठळ्या बसवणार्या आवाजाच्या तालावर नाचणे, रात्री उशिरापर्यंत गोंगाट करणे, यामुळे मानसिक ताण, निद्रानाश, श्रवणशक्ती कायमस्वरूपी बधिर होणे अशा समस्या या पिढीत वाढीस लागल्या आहेत. वयोवृद्ध लोकांना शांतता, विश्रांती हवी असते. मात्र, डीजेच्या गोंगाटामुळे हृदयविकाराच्या झटक्यांचा धोका वाढतो, डोकेदुखी व मानसिक अस्वस्थता वाढीस लागते. अनेक रुग्णालये, प्रसूतिगृहे गणेशोत्सवाच्या रस्त्यालगत असतात. तिथे गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना डीजेच्या आवाजामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. फक्त ध्वनीप्रदूषणच नव्हे तर पेट्रोल-डिझेल जाळणार्या जनरेटरमधून होणारे वायूप्रदूषण हेही तितकेच धोकादायक आहे.
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले तेव्हा त्यांचे उद्दिष्ट होते जनजागृती, सामाजिक एकात्मता आणि स्वदेशप्रेम. त्यावेळी कोणतेही डीजे नव्हते, तरीही उत्सवातील उत्साह, भक्तिभाव आणि समाजाभिमुख उपक्रम ओसंडून वाहत होते. परंपरेत नेहमीच पारंपरिक वाद्यांचे महत्त्व कायम राहिले आहे. ढोल, ताशा, लेझीम, शंख, मृदंग, झांज या वाद्यांचा आवाज भक्तीमय वातावरण निर्माण करतो.
डीजे का नको?
सर्वोच्च न्यायालय व महाराष्ट्र सरकारने डीजेवर वेळोवेळी बंदी घातली आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. डीजेवर बॉलिवूड व पाश्चात्य गाणी वाजवली जातात. यातून गणेशभक्ती नाही तर केवळ सवंगता वाढीस लागते. डीजेमुळे अनेकदा वाद, भांडणे, दंगल यासारखे नकोसे प्रकार घडतात. विसर्जन मिरवणुकीत आयटम साँग्स वाजणे, हे धार्मिक दृष्टीने विडंबनच ठरते.
गणेशोत्सव म्हणजे निखळ आनंद, भक्तीभाव वाढीस लागणारा परंपरेचा उत्सव. मात्र, डीजेच्या गोंगाटामुळे त्याचा अर्थच आज बदलला आहे. तरुणांमध्ये नाचणे, उधळपट्टी करणे, स्पर्धा लावून अधिक आवाज कोणत्या मंडळाचा, यालाच महत्त्व प्राप्त झाले आहे. आणि त्यांच्यासाठी हाच उत्सव आहे. अनेकदा त्यामुळेच उत्सवाच्या कालावधीत वाद-विवाद होत असतात, कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. गणपती बाप्पाच्या आराधनेत शांतता, भक्ती, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. डीजेने ही सारी मूल्ये केव्हा नाहिशी केली, हे कोणालाच समजले नाही. पुण्यातील मध्यवर्ती भागात राहणार्या विशेषतः पेठांमधील नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होताना दिसून येतो.
यातूनच डीजेमुक्त उत्सवाची गरज पुढे आलेली दिसून येते. श्रवणशक्ती, हृदयविकार, मानसिक ताण टाळण्यासाठी डीजे-मुक्त उत्सव आवश्यक आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील दुर्बल घटकांचा विचार होणेही आवश्यक असेच आहे. पर्यावरणपूरकतेसाठी वायूप्रदूषण व उर्जेचा अपव्यय टाळण्यासाठी डीजे नकोच, अशी भूमिका घेणे अनिवार्य झाले आहे. त्याचवेळी आपल्या परंपरेच्या जतनासाठी, संस्कृतीला साजेशी अशी पारंपरिक वाद्यांचा गजर केल्यास, उत्सवाला वेगळेच माधुर्य लाभते. विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणारी ढोल-ताशा मंडळे, त्यांचे तालबद्ध, शिस्तबद्ध वादन पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कोणे एके काळी पुणेकर लक्ष्मी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत असत. आता मात्र डीजेच्या गोंगाटाला त्रासून तो मिरवणुकीपासून दूर जाताना दिसून येतो.
डीजेमुक्त उत्सवाची मागणी
अनेक सामाजिक संस्था, पर्यावरण कार्यकर्ते, डॉक्टर आणि नागरिक आता गणेशोत्सव डीजेमुक्त व्हावा, अशी मागणी करत आहेत. पुणे, कोल्हापूर, नाशिक अशा ठिकाणी डीजेमुक्त गणेशोत्सवाचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. अनेक गणेश मंडळांनी पारंपारिक ढोल-ताशांना प्राधान्य दिले आहे. समाज माध्यमांवर से नो टू डीजे हा ट्रेंड वाढत चालला आहे.
डीजेमुक्त उत्सव म्हणजे उत्सव नाही, असे नाही. उलट, डीजेवर खर्च होणारा पैसा शैक्षणिक मदत, आरोग्य शिबिरे, स्वच्छता उपक्रम, रक्तदान शिबिरे अशा उपक्रमांवर खर्च केल्यास गणेशोत्सव मंडळांच्या नावाचा अधिक लौकीक होईल. गावोगावी ढोल-ताशा पथके, लेझीम मंडळे यांना प्रोत्साहन दिल्यास तरुणाईचा उत्साहही योग्य अशा मार्गावर राहील. त्याशिवाय, या पथकांमुळे स्थानिक कलाकारांना रोजगारही मिळेल. न्यायालयाने वेळोवेळी डीजेवरील बंदीबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. ध्वनीप्रदूषण कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे. पण अंमलबजावणी केवळ पोलीस प्रशासनावर टाकून चालणार नाही. गणेश मंडळांनी स्वतःहून पुढाकार घेऊन डीजे टाळण्याचा निर्णय घेतला, तरच गणेशोत्सवातून हरवलेल्या प्रथा-परंपरा पुन्हा प्राप्त होतील.
गणेशोत्सव हा केवळ साउंड शो नाही. तो भक्तीचा, संस्कृतीचा आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव आहे. डीजेच्या उन्मादात हा उत्सव हरवत चालला असून, परंपरा जपायची असेल, आरोग्य आणि पर्यावरण वाचवायचे असेल, तर डीजेमुक्त गणेशोत्सव ही काळाची गरज आहे. ज्या ढोल-ताशांच्या गजरात स्वातंत्र्यलढा पेटला, ज्या आरतीच्या स्वरांनी समाज एकत्र आला, त्या परंपरेला आपण पुन्हा आपलेसे केले पाहिजे. डीजेमुळे होणारा अनर्थ टाळून, पारंपारिक मार्गाने गणपती बाप्पाचे स्वागत केले, तर खर्या अर्थाने तो मंगलमूर्ती मोरया ठरेल.