तोच पथ आवाहितो मज...

29 Aug 2025 16:29:38
@अरुंधती कावडकर
मा. प्रमिलमावशींची वत्सलता समितीच्या ’स्वभावाची’ संवाहक आहे. कोणत्याही संघटनेला समाजापर्यंत जो काही संदेश पोहोचवायचा असतो, त्याचं मूर्तरूप असतो त्या संघटनेचा कार्यकर्ता. समितीच्या स्वभावाचं मूर्तरूप असते सेविका. तिची जबाबदारी असते समिती जगणे. जेवढे दायित्व मोठे तेवढे हे जगणे अधिक सजग, अधिक सार्थ होणे असतं. कणाकणाने आणि क्षणाक्षणाने ’समिती’ जगणार्‍यांच्या दर्शनातूनही मग जीवनं उजळून जातात. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार लेख..
vivek
’मावशी, एकदा माझ्या शाळेत या नं...’
 
माझं मा. प्रमिलमावशींना सहज पण आर्जवी निमंत्रण...
मी एक सामान्य सेविका, सतत अधिकार्‍यांच्या संपर्कात असावं इतकं कोणतेही मोठेपण वा स्थान नसलेली. चंद्रपुरात राहणारी. तेही सर्व शहरी गजबजाटातून दूर एक ध्येय घेऊन घरापासून दूर शाळेतच राहणारी अशी सेविका. ’चंद्रपुरात आलात तर शाळेत याल मावशी’, असे समितीच्या ’प्रमुख कार्यवाहिका’ असताना मी मावशींना म्हणावं आणि एक दिवस अचानक मावशींचा चंद्रपूर प्रवास असताना मावशींनी माझ्या शाळेत दाखल व्हावं, हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. मला अजूनही तो दिवस आठवतो. आमचे गुरुदास कामडी सर धावतच माझ्याकडे आले व म्हणाले, ’मॅडम, प्रमिलमावशी आल्या आहेत.’ माझा विश्वासच बसेना. आपल्या शाळेत प्रमिलमावशी आल्या आहेत? त्यांच्या बैठकींच्या नियोजनात माझ्यासाठी, माझ्या शाळेसाठी वेळ काढून मावशी आल्या!
 
 
माझ्या मुलांसाठी वेळ काढून आल्या!
 
मन भरून आलं माझं...
 
त्यावेळी शाळेजवळ कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सभागृह नव्हतं. आमच्याजवळ खूप वेळही नव्हता. व्हरांड्यातच एक छोटेखानी कार्यक्रम घेतला. प्रमिलमावशींनी मुलांना मार्गदर्शन केले. सैनिकी शाळेत दाखल झाल्याबद्दल त्यांनी मुलाचं अभिनंदन केलं. त्यांना देशभक्तीचं अनुभूत पाथेय दिलं. मला प्रेमानं जवळ घेतलं. भरभरून आशीर्वाद दिला आणि त्या त्यांच्या पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेल्या. सारं अगदी सहज... नैसर्गिक. आपण पूर्णवेळ शाळेत राहून काम करतो. बाहेर कोणत्या कार्यक्रमांना जाणं होत नाही. गावातील समितीच्या कार्यक्रमांनाही कधी कधी जाणे होत नाही. पण समितीतील ज्येष्ठाची मायेची पाखर आपल्यावर आहे हे अधिकच जाणवलं आणि पुढे जाणवतच गेले.
 
 
मा. प्रमिलमावशींचं हे वागणं राष्ट्र सेविका समितीचा स्वभाव जागणारं होतं. प्रत्येक संस्था, संघटनेला तिचा स्वतःचा एक स्वभाव असतो. संघटनेच्या ध्येय-धोरणातून जन्माला आलेला ’भाव’ समर्पित कार्यकार्याच्या जगण्यातून सिद्ध होत जातो. एखादा मंत्र सिद्ध व्हावा तसा आणि मग तो अनेकांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरतो. ’राष्ट्र सेविका समितीचा ’स्व-भाव’ आहे ’वात्सल्य’. समाजाबद्दल वात्सल्य. म्हणूनच, त्या वत्सलतेतूनच ’पिता-पुत्र- भ्रातृश्चं भर्तारमेव, सुमार्गंप्रति प्रेरयन्तीमिह’ हा आत्मविश्वास जन्माला येतो,
 
rss 
 
पुढे 2006 मध्ये आम्ही वं. प्रमिलमावशींना आमच्या सन्मित्र सैनिकी विद्यालयाच्या वार्षिकोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून बोलवायचे ठरवले. आम्हाला त्यांना आमच्या शाळेची परेड व अन्य प्रशिक्षणांचं प्रात्यक्षिक दाखवायचं होतं, त्यांना मानवंदना द्यायची होती. प्रमिलमावशींनीही आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि दि. 30 डिसेंबर 2006 रोजी आमच्या वार्षिकोत्सवासाठी प्रमिलमावशी माझ्या शाळेत आल्या होत्या. अत्यंत साधी व नीटनेटकी राहणी. समितीची सेविका म्हणून आपल्या प्रमुख संचालिका आज आपल्या शाळेच्या वार्षिकोत्सवासाठी आल्या आहेत, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होती.
 
 
’जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’ या समर्थांच्या संदेशाप्रमाणे माझ्या कुटुंबाकडून, समितीकडून मला जे जे प्राप्त झालं ते ते मुलांमध्ये पूर्णवेळ राहून त्यांना देण्याच्या प्रयत्नांना आज कौतुकाची थाप कशी मिळते, भविष्यासाठी मार्गदर्शन कसे मिळेल, सारं औत्सुक्य त्या दिवशीच्या सकाळपासूनच मनात होतं. ज्या समितीकडून आपण सतत शिकवण घेतली त्या समितीच्या प्रमुख संचालिकांचं पाथेय आज मुलांना आणि त्यांच्या पालकांना मिळेल याचा मनस्वी आनंद होता. कार्यक्रम कोणताही असो तो वेळेवरच सुरू व्हावा, असा आमचा कटाक्ष असतो आणि तसाच आमचा सरावही आहे. सैनिकी विद्यालय असल्याने मुलांमध्ये सैनिकी मूल्ये रुजविण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यात ’वक्तशीरपणा’ हे महत्त्वाचे मूल्य आहे. सैनिकांसाठी वेळेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे हे आपण जाणतोच. समितीतही तोच पायंडा असल्याने वार्षिकोत्सवाच्या कार्यक्रमाच्या नियोजित वेळेपूर्वीच मावशी शाळेत दाखल झाल्या. कार्यक्रमातील बाल सैनिकांनी दिलेली ती मानवंदना, मुलांची ती प्रात्यक्षिके मावशींनी मन लावून पाहिली. माझी मुलं हा भाव प्रत्येक क्षणी जागा होता, हे त्यावेळी आणि नंतर मावशींनी दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये जाणवत होतं. त्या वर्षीची आमची काही प्रात्यक्षिक जरा जास्तच धाडसाची होती. मावशींनी आपल्या भाषणात मुलांचं कौतुक केलं, त्यांच्या प्रशिक्षकांचं कौतुक केले. मुलांना त्यांनी आपल्या गौरवशाली परंपरेची आठवण करून दिली. देशप्रेमाचे धडे दिले. त्याचवेळी प्राचार्यांना आणि कार्यक्रमाच्या आयोजकांना धाडसी प्रात्यक्षिके करताना पुरेशी काळजी घेण्याचा प्रेमळ सल्लाही दिला. कार्यक्रमानंतर मला म्हणाल्या की, काही काही प्रात्यक्षिकांकडे मी अगदी श्वास रोखून बघत होते.’ आणि जाताना, निघताना नेहमीसारखीच कौतुकाची थाप आणि वत्सल स्पर्श.
 
pramilatai medhe  
 
1993-94 मधील ’वन्दे मातरम् अभियानातील’ माझ्या आठवणी अगदी ताज्या आहेत. महर्षी बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांची स्मृतिशताब्दी (1994). राष्ट्र सेविका समिति महिलांमध्ये काम करते. समितीच्या सर्वच उपक्रमांमधून मग ते नित्य असो की नैमित्तिक, कुटुंबात, नवीन पिढीत देशप्रेम वाढीस लागावं यासाठी सजगता आढळतेच. स्वातंत्र्याचा महामंत्र ’वन्दे मातरम्’ देणार्‍या महर्षी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या देहावसानाला 1994 मध्ये 100 वर्षे पूर्ण होणार होती (मृत्यू - एप्रिल 1994). ज्या गीताने देशाचा इतिहास रचला, ज्याच्या रचनेचा ’सुवर्णमहोत्सव’ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनला घडवून आणला होता, ज्याने वंगभंगाच्या वेळी देशाला जोडलं, त्या गीताच्या उद्गात्याच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने समितीने सारा देश ढवळून काढला. ठिकठिकाणी ’वन्दे मातरम्’ कार्यक्रम झाले. मिरवणुका, पथसंचलनं, चौकाचौकांत सभा, व्याख्याने, अनेकानेक कार्यक्रम झाले. माझ्यासारख्या तरुणींना, सेविकांना अभ्यासासाठी समितीनं साहित्य निर्माण करून दिलं. सुशीलताई अभ्यंकरांचं ’वन्दे मातरम्’, चित्राताई जोशींचं ’इतिहास के पन्नों से वन्देमातरम्’ यासह अमरेन्द्र गाडगीळांचं ’वन्दे मातरम्’ आदि अनेक संदर्भ उपलब्ध करून दिले.
 
 
चंद्रपूरला मा. प्रमिलमावशींचं ’वन्दे मातरम्’ याच विषयावर व्याख्यान झालं होतं. प्रमिलमावशींच्या भाषणाचं वैशिष्ट्य असायचं. मावशी शांतपणे एकेक शब्द उच्चारून आपला विषय प्रतिपादन करत. मावशींचा आवाज गोड होता. आवाजातील गोडवा कायम राखत विषयासाठी आवश्यक असणारा निग्रह, स्पष्टता, आग्रह ठेवणे ही तशी दुर्मीळ गोष्ट, प्रमिलमावशींजवळ ती होती. त्यांचं भाषण ऐकतच राहावं असं वाटायचं. ’वन्दे मातरम्’च्या संदर्भातील अनेक संदर्भ, इतिहासातील प्रसंग सांगत प्रमिलमावशींनी ’वन्दे मातरम्’ चा भाव अगदी सहज उलगडला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना कृतकृत्य झाल्याचा अनुभव येत होता.
’वन्दे मातरम् अभियानाच्या’ दरम्यान, तसेच वं. मावशींच्या प्रदर्शनीच्या वेळी आलेला अनुभव असा की, आपण आपले मावशी बोलायला संकोचावं आणि त्यांनी मात्र दोन पावलं पुढे येऊन हात हाती घ्यावा, प्रेमानं कवटाळावं आणि विचारावं, ’कशी आहेस?’ त्यांचा प्रेमळ, गोड आवाज, कानात घुमत असे आणि आपल्या शब्दांच्या पलीकडील प्रतिक्रियांसाठी, मनातले भाव वेधणारी त्यांची नजर, आपल्या नजरेवर स्थिर होत असे. प्रत्येक भेटीतला हाच अनुभव. बुद्धी आणि मन यांचा सुरेख मेळ. भाषणातही भावनेबरोबर विद्वत्ता असायची. स्पर्शातला मायेचा ओलावा आणि मनाचा ठाव घेणारी बुद्धीची नजर. मा. प्रमिलमावशींना समितीच्या कार्यक्रमांच्या दरम्यान मी जशी भेटलेय, तशी माझ्या बहिणीच्या घरच्या कार्यक्रमांमध्येही भेटलेय. नागपूरला डॉ. श्रीरामजी जोशी यांच्या नातवाच्या - भार्गवच्या - मौंजीत जेव्हा भेट झाली तेव्हा आपल्या घरचं कार्य आहे, या साधेपणाने मावशी वावरताना दिसल्या. माझी बहीण मालिनी जोशीने एक प्रसंग मला आवर्जून सांगितला होता, तिच्या सासूबाई आजारी असताना उषाला (सविता जोशी) ’पलंग’ आवश्यक आहे म्हणून ’माझा हा पलंग तिच्यासाठी घेऊन जा’ असे म्हणून त्यांनी स्वतःच तो पलंग पाठवला आणि स्वतः साध्या पलंगावर झोपल्या. देशभरातील सर्व व्याप सांभाळताना कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात इतकं सहभागी होणं (प्रसंगी स्वतःची गैरसोयही झाली तरी) हे कर्मठ कार्यकर्त्यांनाच जमू शकतं.
 
 
प्रमिलमावशी गेल्यानंतर आमच्या शाळेतील गुरुदास कामडींनी प्रमिलमावशींची आठवण सांगितली. ते म्हणाले की, ’मी त्यावेळी अ.भा.वि.प.चा पूर्णकालीक कार्यकर्ता होतो. नागपूरला देवी अहिल्या मंदिरात जायचा जेव्हा योग यायचा त्यावेळी, प्रमिलमावशी अत्यंत मायेने विचारपूस करायच्या. वैयक्तिक माहितीही विचारायच्या आणि कार्याविषयीही, त्यानंतर अनेक वर्षांनी शाळेच्या कार्यक्रमात भेट झाली. त्यावेळी ही ’सध्या काय सुरू आहे?’ असं मायेने विचारले. मा. प्रमिलमावशींची ही वत्सलता समितीच्या ’स्वभावाची’ संवाहक आहे. कोणत्याही संघटनेला समाजापर्यंत जो काही संदेश पोहोचवायचा असतो, त्याचं मूर्तरूप असतो त्या संघटनेचा कार्यकर्ता. समितीच्या स्वभावाचं मूर्तरूप असते सेविका. तिची जबाबदारी असते समिती जगणे. जेवढे दायित्व मोठे तेवढे हे जगणे अधिक सजग, अधिक सार्थ होणे असतं. कणाकणाने आणि क्षणाक्षणाने ’समिती’ जगणार्‍यांच्या दर्शनातूनही मग जीवनं उजळून जातात.
 
 
मी वं. मावशींना बघितले नाही, पण त्यांच्या प्रतिमेतील सुहास्य मुद्रेतून आणि त्यांच्या शब्दांतून व्यक्त झालेल्या चरित्रांतून त्यांच्या वात्सल्याबाबत अंदाज बांधला. मी वं. ताईंना प्रत्यक्ष भेटलीय. चंद्रपूरच्या एका भव्य कार्यक्रमासाठी वं. ताई आपटे चंद्रपूरला आल्या होत्या. वं. ताई छोटी-छोटी नित्याची उदाहरणे देत आपला विषय प्रतिपादन करत आणि लोकांच्या मनाचा ठाव घेत. चंद्रपूरला त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप ’यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:। तत्र श्रीर्विजयो भूतिधृवा नीतिर्मतिर्मम॥’ या श्लोकाने केला. भाषणानंतर सभागृहातून बाहेर पडताना मी त्यांना हळूच म्हणाले, ताई, तुमच्या भाषणाचं सार मला ’यत्र योगेश्वर कृष्ण...’ हेच वाटत आहे. स्नेहार्द्र नजरेने त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि पाठीवरून हात फिरवला. स्पर्श तोच समितीच्या सदैव जाणवणार्‍या मायेच्या ओलाव्याचा.
 
 
नागपूरला शिकत असताना देवी अहिल्या मंदिरात जाणं व्हायचं. वं. उषाताईंना भेटले की, त्या सर्वांची आस्थेने चौकशी करायच्या. एकदा मी त्यांना म्हटले, ’मावशी, ’असू अम्ही सुखाने, पत्थर पायातिल’ची चाल हवीय मला’. मावशींनी लागलीच आपल्या रसाळ आवाजात गाऊन दाखवलं. मी निघताना नमस्कार केला... पाठीवरून तोच मायेचा हात... आणि आता शांताक्कांना भेटल्यावर तेच हात हाती घेणं... तसेच मायेचे शब्द आणि तोच समितीच्या ’स्व-भावा’चा स्पर्श.....
 
 
भारतमातेच्या दिव्यार्चनाचा हा एक मार्ग आहे. प्रमिलमावशींनी अध्ययनपूर्ण साधनेने तो प्रशस्त केला. ’दत्तं दत्तं मया दत्तं’ असा मंत्र जपत तो मंत्र जगण्यासाठी सर्वांच्या हाती दिला ..
 
तोच पथ आवाहितो मज, तो पथिकही कार्य करण्या
प्रेरणा ती तीच शक्ती, सेविकांना कार्य करण्या.
 
लेखिका सन्मित्र सैनिकी विद्यालय, चंद्रपूर येथे प्राचार्य आहेत.
Powered By Sangraha 9.0