प्रमिलाताई मेढे - एक ध्येयनिष्ठ जीवन

29 Aug 2025 16:34:05
राष्ट्र सेविका समितीच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलाताई मेढे यांनी वयाच्या 97व्या वर्षी या नश्वर जगाचा निरोप घेतला. संपूर्ण जीवन समिती समर्पित असलेल्या प्रमिलाताईंना राष्ट्रोत्थानाचा अहोरात्र ध्यास होता. त्या मातृत्वभावनेच्या उत्कट, उदात्त आविष्काराचे मूर्तिमंत प्रतीक होत्या. त्यांच्या संपर्कात जो कोणी येई त्याला या निरपेक्ष मातृप्रेमाचा अनुभव येत असे. समाजाचा अर्धा हिस्सा असलेल्या महिलांनी अन्य कर्तव्य निभावतानाच राष्ट्र प्रथम ही भावना मनात सतत जागी ठेवावी व कृतीतही तिचे प्रतिबिंब असावे, असे त्या सांगत. समाजाच्या विविध क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध करायला हवे, हे त्या आग्रहपूर्वक मांडत. त्यासाठी प्रेरणा देत. स्वतःच्या जगण्यातून उदाहरण समोर ठेवत. प्रमिलाताईंनी समितीच्या सर्व संचालिकांसमवेत काम केले होते. हे ही दुर्मीळच. वयाने शतकाच्या उंबरठ्यावर असतानाही भूतकाळात रमण्यापेक्षा, वर्तमानातील घडामोडींबाबत सजग असणार्‍या आणि भारतभूच्या भविष्याची चिंता-चिंतन करणार्‍या प्रमिलाताईंचे अवघे आयुष्य हे चंदनासम देह झिजवण्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. या पुरवणीच्या माध्यमातून साप्ताहिक विवेक आणि विवेक समूह त्यांच्या प्रेरक स्मृतींना विनम्र अभिवादन करीत आहे.
vivek 
 
 
@निवेदिता भिडे
प्रमिलाताईंशी संबंध उत्तरोत्तर वाढत गेले, गहिरे होत गेले. संघाच्या बैठकींमध्ये आम्ही भेटायचोच. पण हे फक्त भेटणे नव्हते कारण आम्ही सगळ्या महिला एकत्र राहत असल्यामुळे कधी शाखेमध्ये, तर कधी रात्री, कधी जेवताना आमच्या सहज गप्पा होत आणि त्या गप्पांमध्ये प्रमिलाताईंची ध्येयनिष्ठा, सतत जागृत असणे, प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करणे हे विशेष गुण लक्षात आले. काहीही जगात घडलेलं मुख्य रूपाने हिंदू समाजाच्या संबंधांमध्ये असेल तर त्याची नोंद त्या अवश्य घेत, त्यावर चिंतन करत आणि आपण काय करू शकतो असे एक कृतिशील चिंतन सगळ्यांबरोबर पण करत आणि म्हणूनच प्रमिलाताईंची ‘ओळख’ वाढत गेली.
प्रमिलाताई गेल्याचे ऐकलं आणि मन सुन्न झालं, कारण या वर्षीच्या प्रवासामध्ये नागपूरला नक्की जायचं आणि प्रमिलाताईंना भेटायचं, असं मी ठरवलं होतं. त्यांना भेटल्यानंतर एक समाधान, कार्य करायची ऊर्जा, सकारात्मकता मिळते आणि म्हणून त्यांना अवश्य भेटायचंच होतं. पण दुर्दैवाने आता ती भेट कधीच होणार नाही ह्या विचाराने अस्वस्थ झाले. त्यांच्या आठवणी परत परत मनात येत राहिल्यात. नेत्र ओलावले, मन दाटून आले। हृदयी भाव भरले, तव स्मरणे॥ अशी स्थिती झाली.
 
 
प्रमिलाताई आणि माझे विवेकानंद केंद्रातील कार्य ह्याची आधीपासून सांगडच आहे. मी जेव्हा विवेकानंद केंद्रात यायचे ठरवले, तेव्हा त्याप्रमाणे जशी पद्धत होती की, माननीय एकनाथजींनी आमची मुलाखत घेतली आणि आम्हाला नंतर पत्रही आलं की, तुम्हाला जीवनव्रती प्रशिक्षण घेण्यासाठी निवडले आहे. पण तुम्ही अमुक दिवशीच्या ट्रेनमध्ये बसून, 8 सप्टेंबर 1977 ला कन्याकुमारीला पोहोचायचे आहे. कारण त्यावेळी कन्याकुमारीला भोजनाची नित्य व्यवस्था नव्हती. जर शिबीर असेल, म्हणजेच जीवनव्रती कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण असेल तरच तात्पुरती भोजनव्यवस्था कार्यरत व्हायची. आणि म्हणून आम्हाला कुठल्या दिवशी कन्याकुमारीला पोहोचायचे, कुठल्या रेल्वेने पोहोचायचे हे सगळे कन्याकुमारीहून कळविण्यात आले. म्हणजे विवेकानंद केंद्रात जायचं निश्चित जूनमध्ये झालं, पण कन्याकुमारीला 8 सप्टेंबरला पोहोचायचे होते. तर हा जो मधला काळ होता तो खूप विशेष काळ होता. म्हणजे जिथे जायचं आहे तिथे अजून पोहोचलो नाही आणि सध्या जिथे आहे ते मागे सुटणार आहे.
 

vivek 
 
अशा काळामध्ये एके दिवशी मला एक पत्र आले. मला आश्चर्य वाटले. कारण फक्त कन्याकुमारीहून दोन पत्रे मला आली होती. पण माझ्या नावाने आलेलं अजून एक पत्र बघून मला जरा आश्चर्य वाटलं. खपश्ररपव पत्र होतं आणि मागे प्रमिला मेढे, राष्ट्र सेविका समिती असं प्रेषकाच्या ठिकाणी नाव लिहिलं होतं. मी जरा बुचकळ्यात पडले. असं नाही की, मला राष्ट्र सेविका समिती माहीत नव्हती. जेव्हा जेव्हा माझ्या घरासमोर समितीची शाखा लागायची तेव्हा मी शाखेत जायची. पण मला समितीच्या सगळ्या अधिकार्‍यांची वगैरे नावे तेव्हा माहीत नव्हती. म्हणून हे पत्र आल्यावर, ह्या कोण अशा उत्सुकतेने मी ते पत्र फोडले आणि वाचायला सुरुवात केली. अत्यंत आपुलकीने लिहिलेले आणि धैर्य वाढवणारे, विवेकानंद केंद्रात मी कार्य करायला जाणार आहे म्हणून अभिनंदन करणारे, या मार्गावर जात असताना कसे जायचे असे एक सहजपणे मार्गदर्शन केलेले असे ते पत्र होते. पत्र वाचूनच मला खूप छान वाटलं. अनोळखी व्यक्तीला इतक्या आपुलकीने पत्र लिहिणे सोपे नाही. माझी प्रमिलाताईंची जी ओळख झाली ती अशी पहिली पत्ररूप ओळख. तेव्हा त्या बहुधा विदर्भ प्रांत कार्यवाहिका होत्या. नंतर जेव्हा मी कन्याकुमारीला पोचली तेव्हा मला असं कळलं की, माझ्या बॅचमध्ये ज्या सहाजणी आम्ही होतो त्या सर्वांनाच प्रमिलाताईंचे पत्र आलं होतं. मला खूप आश्चर्य वाटलं. मग पुढे आम्हाला कळलं की, तेव्हा विवेकानंद केंद्रामध्ये कोणीही वरिष्ठ महिला कार्यकर्ती नसल्यामुळे, एकनाथजी प्रमिलाताईंना पत्र लिहायला सांगत असत. पण केवळ सांगितलंय म्हणून लिहिलंय असे त्या पत्राचे स्वरूप अजिबात नव्हते तर या पत्रामध्ये एक खूप सहज हृदयस्पर्शी अशी आपुलकी होती आणि म्हणूनच प्रमिलाताईंना माझ्या भावविश्वात तेव्हापासून एक स्थान प्राप्त झाले. माझी त्यांच्याशी पुढे प्रत्यक्ष भेट झाली.
 
 
प्रमिलाताईंशी संबंध उत्तरोत्तर वाढत गेले, गहिरे होत गेले. संघाच्या बैठकींमध्ये आम्ही भेटायचोच. पण हे फक्त भेटणे नव्हते कारण आम्ही सगळ्या महिला एकत्र राहत असल्यामुळे कधी शाखेमध्ये, तर कधी रात्री, कधी जेवताना आमच्या सहज गप्पा होत आणि त्या गप्पांमध्ये प्रमिलाताईंची ध्येयनिष्ठा, सतत जागृत असणे, प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करणे हे विशेष गुण लक्षात आले. काहीही जगात घडलेलं मुख्य रूपाने हिंदू समाजाच्या संबंधांमध्ये असेल तर त्याची नोंद त्या अवश्य घेत, त्यावर चिंतन करत आणि आपण काय करू शकतो असे एक कृतिशील चिंतन सगळ्यांबरोबर पण करत आणि म्हणूनच प्रमिलाताईंची ‘ओळख’ वाढत गेली.
 
 
उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात्परं बलम् ।
सोत्साहस्य लोकेषु न किञ्चिदपि दुर्लभम् ॥
 
उत्साहापेक्षा मोठे बल नाही. उत्साही माणसाला काहीच अशक्य नाही. प्रमिलाताईंचा उत्साह प्रचंड. वंदनीय प्रमुख संचालिका असताना आणि त्या दायित्वातून मुक्त झाल्यावर सुद्धा. 108 ठिकाणी सतत प्रवास त्यांनी केला. तेव्हा आम्ही भेटलो तर अगदी सहजपणे म्हणाल्या, ‘अगं तेच तेच बोलायचे नाही तर रोज वेगळे बोलायचे म्हणून मला रोज विचार करावा लागतो.’
एकदा मला प्रमिलाताईंनी सांगितलं की, अहिल्या मंदिरामध्ये दरवर्षी रामायणावर प्रवचन होतात, तू पण एकदा प्रवचन द्यायला ये. मला तर त्यांनी पहिल्यांदा असं सांगितल्यावर अत्यंत संकट उभं राहिलं, कारण रामायणावर प्रवचन देणे! प्रवचन शब्दच भारदस्त वाटतो म्हणून पण असेल आणि अर्थात नऊ दिवस रामायणावर बोलणे ते चांगलेच कठीण वाटले. पण प्रमिलाताईंना नाही कसे म्हणायचे, हा पण एक खूप मोठा प्रश्न होता. तरीही शेवटी मी नाहीच म्हटले. पण त्यांनी मला काही सोडले नाही. त्यांना माहीत होतं की, हिच्या मागे लागल्याशिवाय ही काही करणार नाही आणि जर करेल तर त्या निमित्ताने तिचा अभ्यासच होईल. कार्यकर्त्याला घडविण्याच्या दृष्टीने त्यांचा हा आग्रह होता. दोन-तीन वर्षे नाही म्हणून, काही ना काही कारण देऊन आणि कार्यकर्त्यांना तर काय काम असतातच कारणं देण्यासाठी, त्यामुळे कारणे मिळत गेली आणि मी नाही म्हणत गेले. पण एका वर्षी प्रमिलाताईंनी मला सांगितलं की, तुझ्या दैनंदिनीमध्ये आत्ताच नोंद करून ठेव की पुढच्या वर्षीचा हा वेळ रामायण प्रवचनासाठी ठेवायचा आहे. त्यांचा आग्रह हाच त्यांचा आणि श्रीरामाचा अनुग्रह समजून मी शेवटी हो म्हटले. पण हो म्हणून काही होणार नव्हते.
 
 
मी मूळ वाल्मिकी रामायण खूप आधी वाचले होते, पण त्यावर बोलायचे म्हटलं तर परत एकदा नीट वाचून खूप व्यवस्थित चिंतन करणं आवश्यक होतं आणि मी त्याची सुरुवात केली. प्रमिलाताईंचा हेतू इथेच पूर्ण झाला. रामायण असे आहे की, तुम्ही जितके अध्ययन कराल तितके तुम्ही त्यात डुंबत जाता, माझेही थोडेफार तसेच झाले. शेवटी मी अहिल्या मंदिरामध्ये नऊ दिवस भाषण दिले. पहिल्या दिवशीचे जेव्हा भाषण झाले तेव्हा प्रमिलाताई मला परत वर त्यांच्या निवासस्थानी घेऊन गेल्या. वर गेल्यानंतर त्यांनी माझी अत्यंत मायेने दृष्ट काढली. त्या म्हणाल्या, ‘खूप छान बोललीस गं. तुला नजर लागायला नको म्हणून मला तुझी दृष्ट काढायची आहे’.
 

pramilatai medhe  
 
एका दिवशी बोलताना माझा घसा सतत खवखवत होता. माझे वडील पण रोज यायचे ऐकायला. दुसर्‍या दिवशी जेव्हा मी प्रवचनासाठी गेली तेव्हा माझे वडील माझ्यासाठी लवंग आणि खडीसाखर घेऊन आले होते. त्यांनी सांगितलं की, हे थोडं तोंडात ठेव म्हणजे घसा कोरडा पडणार नाही. मी ती डबी हातात घेतली आणि जशी व्यासपीठावर गेली तेव्हा तिथे माझ्या समोरच्या टेबलावर पण एका डबीत खडीसाखर आणि लवंग ठेवली होती. नंतर मला कळलं की, हे प्रमिलाताईंनी ठेवायला सांगितलं होतं. म्हणजे जी आत्मीयता माझ्या वडिलांची होती, तशीच मला प्रमिलाताईंची अनुभवता आली.
 
 
माझ्या लक्षात आलं की, प्रमिलाताईंचा आग्रह माझ्यासाठी किती आवश्यक होता. असे कार्यकर्त्याला घडविणे त्याचा उत्साह वाढविणे ही त्यांची खासियत होती. कधीही त्यांना भेटायला जाण्याआधी फोन केला, तर त्या म्हणायच्या, ‘असं कर तू जेवायलाच ये’. मग त्यांच्याबरोबरच जेवण पण व्हायचं. मग त्या प्रेमाने कधी पाठीवर हात ठेवून, कधी हात हातात घेऊन अत्यंत मायेने विचारपूस करत. ही पण त्यांची एक शैली होती की, तुझं काय वाचन सुरू आहे, काही लेखन झालंय का, इतक्यात केंद्राचं काय काय नवीन काम सुरू आहे, कसं सुरू आहे... असे प्रश्न विचारत त्या सर्वांना आपलेसे करत. बर्‍याचदा भेटायला जातांना मी क्वचित जर घरून गेली असेल तर माझी वहिनी जयश्री भिडे हिला घेऊन जात असे. घरी आल्यावर जयश्री मला म्हणायची की, किती छान आहेत ना प्रमिलाताई. खूप छान वाटलं त्यांना भेटून...
 
 
असे अनोळखी लोकांना सुद्धा आपलेसे करायचे त्यांचे कौशल हे कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे, जसे भागवतात म्हटलं आहे - तितिक्षवः कारुणिकाः सुहृदः सर्वदेहिनाम् ॥
याचा अर्थ: कार्यकर्त्याने सहनशील, करुणामय आणि सर्व जीवांचे हित करणारे असावे.
 
 
प्रमिलाताई आपल्यातून गेल्यावर अनेक जणांचे अनुभव मला प्रसारमाध्यमांमध्ये वाचता आले, ऐकता आले आणि जाणवले की, त्यांचे प्रत्येकाशी विशेष वागणे होते. सहज मनात विचार आला, त्यांचे जीवन म्हणजे,
 
मी व माझे काहीच नुरले, ध्येयरूप होऊन गेले।
साधक तो दूर होता साधन - साध्य एक झाले॥
 
लेखिका विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
Powered By Sangraha 9.0