भेटी दे रामदासी

05 Aug 2025 13:19:43
karunastake
रात्रंदिवस प्रत्येक क्षणाला तुझ्या निकट असून सुद्धा आम्ही तुला चुकलो, तुला ओळखू शकलो नाही. तू सर्व गुणांचा ज्ञानराशी असूनही आम्ही तुला विसरलो, तुझे वर्णन शब्दांत करता येत नाही. मला तुझा साक्षात्कार अजून होत नाही, तुझी अनुभूती आली तरी ती सांगता येणार नाही. तेही बरोबर आहे कारण वेद सुद्धा तुझे वर्णन करताना ’नेति नेति’ म्हणजे हे नाही, ते नाही असे सांगत आपली असमर्थता व्यक्त करतात. एवढेच नव्हे तर पृथ्वीचा भार शिरावर घेणारा शेष, सहस्र जिभा असूनही तुझे वर्णन करण्यास असमर्थ आहे. तेथे माझ्यासारख्या पामराने काय करावे. तू त्रिभुवनाला व्यापून उरला आहेस. तेव्हा हे रामा, आता तूच या रामदासाला, तुझ्या दासाला भेट दे, दर्शन दे.
या जगातील सर्वसामान्य माणसांचा एकंदर अनुभव पाहिला तर त्यांना वाटते की, सुख अत्यल्प पण दुःख मात्र मोठे आहे. सुख सुख म्हणत असताना त्यातून दुःख केव्हा समोर येऊन उभे राहाते ते कळतही नाही. ज्या भौतिकातून ही सुखदुःखे निर्माण होतात त्याचे वर्णन करताना ही माया आहे, असे सर्व संत सांगतात. ही मोहमयी माया सत्य झाकून टाकते. त्यामुळे सत्य समजत नाही, असा संतांचा अभिप्राय आहे. मायेचा प्रभाव विलक्षण असल्याने माणूस परमेश्वर, परब्रह्म किंवा आत्मज्ञान याविषयी साशंक होतो. साशंक मन अस्थिर असल्याने ते खरे समाधान अनुभवू शकत नाही. देहबुद्धी, आसक्ती, स्वार्थ इत्यादी विकारांमुळे सत्य काय आणि असत्य काय या विषयी मनात भ्रम निर्माण होतात, गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. यासाठी राम हा सकळ भ्रम नाहीसे करणारा व समाधान देणारा ’विश्रामधाम’ आहे, असे स्वामी मागील श्लोक क्रमांक 14 मध्ये म्हणाले.
 
 
स्वामी पुढे सांगतात की, माया बाजूला सारून आपला ’स्व’ रामरूपात विलीन करावा. अर्थात रामरूपात विलीन व्हावे असे कितीही वाटले तरी रामाने तुम्हाला आपलेसे केल्याशिवाय ते शक्य होत नाही. त्यासाठी निष्ठापूर्वक रामभक्ती व त्याच्या ठिकाणी शरणागतता हवी आणि तशी विनवणी रामाला केली पाहिजे. म्हणून मला आपलेसे करावे अशी विनंती स्वामी रामरायाला करतात (रघुकुळटिळका रे आपुलेसें करावें). वस्तुतः रामस्वरूप, अंतरात्मा, परब्रह्म हे विश्वात भरून उरले आहे. त्याच्याशिवाय रिकामी जागा विश्वात कोठे सापडणार नाही असे संत आजवर सांगत आले आहेत. तरीही रामरूपाची ओळख आम्हाला होत नाही. हे आता स्वामी यापुढील श्लोकात सांगत आहेत.
 
 
जळचर जळवासी नेणती त्या जळाशी।
निशिदिनि तुजपाशी चूकलो गुणराशी।
भूमिधरनिगमांसी वर्णवेना तयासी ।
सकळ भुवनवासी भेटि दे रामदासी ॥15 ॥
 
अन्वयार्थ-
 
जलचर, पाण्यात राहाणारे प्राणी (नेहमी पाण्यात असल्याने) त्यांना (वेगळेपणाने) पाणी माहीत नसते (त्या प्रमाणे) रात्रंदिवस तुझ्याजवळ असून (सुद्धा) गुणांचा साठा असलेल्या तुला जाणू शकलो नाही. पृथ्वीचा भार शिरावर वाहाणारा शेष (सहस्र जिभा असूनही) तुझे वर्णन करू शकत नाही.वेदसुद्धा (नेति नेति म्हणत) तुझे वर्णन करण्यास असमर्थ आहेत. त्रिभुवनात (सर्वत्र) वास करणार्‍या रामा, (तू) या रामदासाला भेट दे.
 
 
जलचर प्राणी पाण्यातच जन्माला येतात आणि पाण्यातच वाढतात. माशाच्या अवतीभवती, खालीवर, सगळीकडे पाणी असते ते पाणी मासा मुखावाटे आत घेतो आणि आणि कल्ल्यातून बाहेर सोडतो. ही क्रिया करीत असताना त्याला पाण्यात विरघळलेला जीवनावश्यक प्राणवायू मिळतो, हे सर्वांना माहीत आहे. स्वामी त्यापुढे जाऊन विचार करतात की, सर्व आयुष्य पाण्यातच राहाणार्‍या या माशाला पाण्याची जाणीव नसते. मत्स्याच्या आत बाहेर सगळीकडे केवळ पाणी असल्याने त्याला जलाला वेगळेपणाने पाहता येत नाही. त्यामुळे त्याला पाण्याची जाणीव संभवत नाही. अगदी तसाच प्रकार माणसाला ब्रह्म, आत्मा, परमेश्वर याविषयी होतो असे स्वामींना, पाण्यात कायम वास करणार्‍या मत्स्याच्या दृष्टान्ता द्वारा, सुचवायचे आहे.
 
 
या विश्वात ब्रह्म आत-बाहेर सर्वत्र व्यापून असते. माणसाला ते वेगळेपणाने पाहता न आल्याने त्यांची जाणीव नसते. त्यामुळे त्याला ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान सहजासहजी होत नाही: या ब्रह्मज्ञानाची तर्‍हा अजब आहे, असे स्वामी म्हणतात. स्वामींनी दासबोध ग्रंथात या विषयावर सविस्तर लिहिले आहे. ब्रह्मज्ञानप्राप्ती हा केवळ तर्कशास्त्राचा विषय नसून तो अनुभूतीचा विषय आहे: ही अनुभूती सूक्ष्मातिसूक्ष्म असल्याने ती शब्दांत पकडता येत नाही. तरीही स्वामींनी दासबोधात त्यावर चर्चा घडवून आणली आहे.
 
 
भौतिक विषयांचे ज्ञान आपले मन इंद्रियांद्वारा मिळवत असते. तसेच काही प्रसंगी मन तार्किक अनुमानाच्या साह्याने हे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करते. अशारीतीने इंद्रियांद्वारा, कल्पनेद्वारा ज्ञानसंपादनाची मनाला सवय झालेली असते. तथापि ब्रह्मज्ञान निर्विकल्प तसेच इंद्रियातीत असल्याने ज्ञान मिळवण्याची वरील सवय येथे उपयोगी पडत नाही. मनाची ही भौतिक ज्ञानासंबंधीची सवय बाजूला सारून कल्पनांचा खेळ थांबविल्याशिवाय ब्रह्मसाक्षात्काराचा विचार करता येत नाही: आपण वर पाहिले आहेच की, आत्मसाक्षात्काराची ब्रह्मानुभूती इतकी सूक्ष्मातिसूक्ष्म, तरल असते की, तिचे शब्दांत वर्णन करता येत नाही. तथापि शिष्यांना आकलन व्हावे म्हणून समर्थांनी आपल्या प्रतिभासामर्थ्याने ब्रह्मानुभूतीचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. (दासबोध दशक 7), समास 6 व 7).
 
 
समर्थ म्हणतात, ब्रह्म शाश्वत म्हणजे कायमस्वरूपी राहाणारे असल्याने ते सदासर्वकाळ सर्वत्र असतेच असते. त्याच्याशिवाय रिकामी जागा दाखवता येत नाही. हे खरे असले तरी ब्रह्म वेगळेपणाने पाहायला गेले तर दुरावते, त्याची अनुभूती घेता येत नाही. दृश्य जगतातील भौतिक अशाश्वत वस्तू जाणून घेण्यासाठी जे उपाय आपण योजीत असतो, ते उपाय अद्वैत शाश्वत परब्रह्मतत्त्व जाणण्यासाठी उपयोगी पडत नाहीत, वस्तू जेवढी व्यापक तेवढी ती सूक्ष्म असते. सूक्ष्मातिसूक्ष्म ब्रह्म आतबाहेर सर्वत्र भरून उरले असल्याने ब्रह्मज्ञान अनुभवण्यातील गंमत अशी की, ’ब्रह्म म्हणजे नेमकी स्थिती समजत नाही’ असे अंतःकरणाच्या आतून वाटले की ब्रह्माची अनुभूती येते आणि मी ब्रह्म जाणले असे जो सांगत सुटतो त्याला ते अजिबात समजलेले नसते! कारण त्याच्या ठिकाणी ’मी’ आणि ’ब्रह्म‘ असे द्वैत निर्माण झाल्याने मूलतः अद्वैत ब्रह्मानुभूतीला बाधा येते. येथे जाणणारा व जाणायचे ते एकच असल्याने आपल्याला आपण वेगळेपणाने पाहू शकत नाही. असे स्वामी म्हणतात- त्यासाठी समर्थांनी दासबोधात योजलेली पुढील ओवी विरोधाभास अलंकाराचे उदाहरण आहे.
 
 
तें नुमजतांच उमजे । उमजोन कांहींच नुमजे।
तें वृत्तीविण पाविजे। निवृत्तिपद ॥ (दा. 7.7.24)
 
ब्रह्मज्ञानाची रामरूपाची ही जाणीव झाल्यावर समर्थ रामाला सांगत आहेत की, रात्रंदिवस प्रत्येक क्षणाला तुझ्या निकट असून सुद्धा आम्ही तुला चुकलो, तुला ओळखू शकलो नाही. तू सर्व गुणांचा ज्ञानराशी असूनही आम्ही तुला विसरलो, तुझे वर्णन शब्दांत करता येत नाही. मला तुझा साक्षात्कार अजून होत नाही, तुझी अनुभूती आली तरी ती सांगता येणार नाही. तेही बरोबर आहे कारण वेद सुद्धा तुझे वर्णन करताना ’नेति नेति’ म्हणजे हे नाही, ते नाही असे सांगत आपली असमर्थता व्यक्त करतात. एवढेच नव्हे तर पृथ्वीचा भार शिरावर घेणारा शेष, सहस्र जिभा असूनही तुझे वर्णन करण्यास असमर्थ आहे. तेथे माझ्यासारख्या पामराने काय करावे. तू त्रिभुवनाला व्यापून उरला आहेस. तेव्हा हे रामा, आता तूच या रामदासाला, तुझ्या दासाला भेट दे, दर्शन दे.
 
 
येथे ’अनुदिनी अनुतापे’ या करुणाष्टकातील श्लोकांची पूर्तता होते. यापुढे समर्थ, करुणाष्टकातील वेगळे भावपूर्ण विचार मांडणार आहेत. त्यांचा परिचय पुढील लेखांतून करून घेणार आहोत.
Powered By Sangraha 9.0