'स्वच्छ सर्वेक्षण 2023’पर्यंत जी शहरे लागोपाठ तीन वर्षे किमान दोन वेळा टॉप थ्रीमध्ये आहेत अशा शहरांसाठी ’सुपर स्वच्छ लीग’ ही विशेष कॅटेगरी निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबईला सुपर स्वच्छ मानांकन झालेले आहे. त्यामुळे नवी मुंबईने आता स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ’सुपर स्वच्छ लीग’ मध्ये मानांकन प्राप्त करीत आपली विजयपताका अक्षय फडकत ठेवली आहे.
पर स्वच्छ नवी मुंबई ही या शहराची ओळख होय, पण आता ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’मध्ये स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थान नवी मुंबईने प्राप्त केले आहे. त्यामुळे 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात ’सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट होणारे हे महाराष्ट्रातील एकमेव शहर ठरले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शहरी गृहनिर्माण व विकास मंत्रालयाने यावर्षी ’स्वच्छ सर्वेक्षण 2024’ करिता गुणांकन पद्धतीत बदल केला आणि ’सुपर स्वच्छ लीग’ ही नवीन विशेष कॅटेगरी निर्माण केली.
काही शहरे सातत्याने स्वच्छतेत नेहमीच अग्रभागी येत असत. तेव्हा इतरही शहरांना क्रमवारीत पुढे येण्याची संधी मिळावी, यादृष्टीने ’स्वच्छ सर्वेक्षण 2023’पर्यंत जी शहरे लागोपाठ तीन वर्षे किमान दोन वेळा टॉप थ्रीमध्ये आहेत अशा शहरांसाठी ’सुपर स्वच्छ लीग’ ही विशेष कॅटेगरी निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबईला सुपर स्वच्छ मानांकन झालेले आहे. त्यामुळे नवी मुंबईने आता स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ’सुपर स्वच्छ लीग’ मध्ये मानांकन प्राप्त करीत आपली विजयपताका अक्षय फडकत ठेवली आहे. यासोबतच कचरामुक्त शहराचे सर्वोच्च ’सेव्हन स्टार मानांकन’ तसेच ओडीएक कॅटेगरीमध्ये सर्वोच्च ’वॉटरप्लस’ मानांकन नवी मुंबईने कायम राखले आहे. नवी मुंबईची ही वाटचाल अभिमानास्पद अशीच आहे.
नवी मुंबईच्या या सातत्यपूर्ण स्वच्छता कार्याचा सन्मान नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात संपन्न झालेल्या ’स्वच्छ सर्वेक्षण 2024’ पारितोषिक वितरण सोहळ्यात महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वीकारला. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर, राज्यमंत्री तोखन साहू व सचिव श्रीनिवास करिकीथाला आणि महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची उपस्थिती होती. याप्रसंगी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर शहर अभियंता शिरीष आरदवाड उपस्थित होते. लक्षणीय बाब म्हणजे यांच्या प्रत्यक्ष कामामुळे शहराची स्वच्छता राखली जाते असे नवी मुंबई महानगरपालिकेचे दोन स्वच्छतामित्र व दोन स्वच्छतासखी या समारंभासाठी संबंधित अधिकार्यांसमवेत विशेषत्वाने उपस्थित होत्या.
हे सर्व घडून आले ते घनकचरा व्यवस्थापनात अत्याधुनिक स्मार्ट कार्यपद्धतींचा वापर केल्यामुळेच. नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक असे स्वच्छता उपक्रम राबवित भारतातील इतर शहरांसाठी एक मापदंड प्रस्थापित केला आहे. ’सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समावेशासाठी 85 टक्केपेक्षा अधिक गुणांकन राखणे अनिवार्य होते. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागावर भर देत अनेक उल्लेखनीय प्रकल्प राबविले गेले, उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले आणि ’सुपर स्वच्छ लीग’ या सर्वोच्च कॅटेगरीमध्ये नवी मुंबईने आपला समावेश निश्चित केला.
या शहराने कचरा वर्गीकरण, संकलन व वाहतूक प्रणालीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. जेथे कचरा निर्माण होतो त्या ठिकाणीच ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे कचरा वर्गीकरणावर भर देण्यात आला. या वर्षीपासून सॅनिटरी कचरा स्वतंत्ररित्या संकलित करण्यास सुरुवात झाली. कचरा संकलन आणि वाहतूक (सी अँड टी) प्रणाली लागू करण्यात आली. त्याकरिता मिनी टिपर्स, इलेक्ट्रिक ट्रक आणि कचरा कॉम्पॅक्टर्ससह 206 वाहनांचा ताफा कार्यरत आहे. त्यावर रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि मार्ग निरीक्षण व नियंत्रणासाठी आरएफआयडी-सक्षम जीपीएस वापरण्यात येत आहे. अशी ही नवी मुंबईची झेप आहे.
आपले शहर स्वच्छ राखण्यासाठी या महानगरपालिकेने अतिशय दक्षता घेतली आहे. नमुंमपा मुख्यालयातील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर ( आयसीसीसी) व्दारे जीपीएस-सक्षम वाहने, सीसीटीव्ही फीड्स आणि नागरिकांचे अभिप्राय अशा विविध माध्यमांचा प्रभावी वापर करून नवी मुंबईतील स्वच्छताविषयक कामांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येते. रिअल-टाइम डेटा अॅनालिटिक्समुळे वाहनांची उपलब्धता, कचरा संकलन ट्रॅकींग आणि सेवांचे अनुपालन यांचे निरीक्षण व नियंत्रण करणे अधिक सोयीचे झाले आहे, असा या सेवेतील कर्मचार्यांचा अनुभव आहे.
वस्त्र कचरा हा मोठ्या शहरांना सतावणारा विषय आहे. पण या कचर्याचे संधीमध्ये रूपांतरण करणारा देशातील लँडमार्क प्रकल्प येथे आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने राबविला. घनकचरा प्रकल्प स्थळावरील कचर्याचा भार कमी करण्यासाठी आणि कचर्याचे पुनर्वापरयोग्य संसाधनांमध्ये रूपांतर करण्यासाठी ’टेक्सटाइल रिकव्हरी फॅसिलिटी (TRF)’ या अभिनव प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत वस्त्रोद्योग समितीचा सहयोग मिळाला. वस्त्रकचरा उपयोगात आणणारा हा देशातील पहिलाच प्रायोगिक स्तरावर राबविला जाणारा अभिनव प्रकल्प ठरला.
इमारतीत बांधकामासाठी पेव्हर ब्लॉकचा उपयोग होतो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी 150 टन प्रतिदिन क्षमतेचा बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहे. येथे बनविले जाणारे पेव्हर ब्लॉक बांधकामाकरिता वापरले जातात. महत्वाचे म्हणजे या पेव्हर ब्लॉक निर्मितीत 85 टक्के सी अँड डी कचरा वापरला जातो.
ओल्या कचर्यापासून खतनिर्मिती तसेच सुक्या कचर्याचा पुनर्वापर करण्याची दृष्टी येथे अंगीकारलेली आहे. प्रकल्पस्थळी येणार्या साधारणत: 750 टन प्रतिदिन कचर्यापैकी 350 टन ओल्या कचर्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येते तसेच 400 टन सुक्या कचर्यातून प्लास्टिक, काच, कपडा, कागद अशा प्रकारे कचरा वेगवेगळा करण्यात येऊन तो पुनर्वापरात आणण्याची प्रक्रिया करण्यात येते. यामधील प्लास्टिक आरडीएफ सिमेंट उद्योगांमध्ये बॉयलर्सकरिता वापरात आणले जाते तसेच प्लास्टिकचे ग्रॅन्युल्स हे डांबरी रस्तेनिर्मितीच्या वेळी कोटींगसाठी वापरले जातात.
त्याचप्रमाणे घनकचरा प्रकल्पस्थळी 10 टन प्रतिदिन क्षमतेचा नारळाच्या कचर्यावर प्रक्रिया करून त्यापासून तंतू वेगळे करण्याचा अभिनव प्रकल्प राबविला जात असून त्याचा उपयोग कॉयर करण्यासाठी तसेच विविध मूर्ती तसेच शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी केला जातो.
एकात्मिक प्रक्रिया केंद्र हा घनकचर्यावरील प्रक्रियेत निघणारे पाणी अर्थात लिचेटवर प्रक्रिया करणारा प्रकल्पही याठिकाणी कार्यान्वित आहे. लिचेटवर शद्धीकरणाची प्रक्रिया करून ते प्रक्रियाकृत पाणी तेथील वृक्षराजी फुलविण्यासाठी उपयोगात आणले जाते. अशाप्रकारे कचर्यातील सर्व गोष्टी जास्तीत जास्त उपयोगात आणल्या जातील असा प्रयत्न घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी करण्यात येतो.
कचरा गोळा करून नंतर त्यावर प्रक्रिया करण्याच्या किचकट सूत्रापेक्षा निर्मितीच्या ठिकाणीच कचर्याच्या विल्हेवाटीवर भर देण्याचा प्रयत्न झाला. जेथे दररोज 100 किलोपेक्षा जास्त ओला कचरानिर्मिती होते अशा सोसायट्या, हॉटेल्स, संस्था यांनी त्यांच्याकडील ओल्या कचर्याची विल्हेवाट त्यांच्या जागेतच करावी असा विचार करून 38 ठिकाणी ओल्या कचर्यापासून बायोगॅस निर्मिती वा खतनिर्मिती प्रकल्प राबविले जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने शून्य कचरा झोपडपट्टी मॉडेलची अभिनव संकल्पना राबविलेली आहे. यामध्ये परिसर सखी या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कचरावेचक महिलांना एकत्र आणून त्यांची परिसरनिहाय पथके नियुक्त केली गेली. त्या महिला प्रत्येकी 250 घरांपर्यंत जाऊन कचरा वेगवेगळा गोळा करतात. त्यांना हे काम सोपविले गेल्यामुळे कायमस्वरूपी रोजगार निर्माण झाला आणि त्यांचे राहणीमान उंचावले. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी चांगला हातभार लागला आहे.
नवी मुंबई शहरात 99.9% सांडपाणी व्यवस्थापनाचे जाळे पसरलेले आहे. उर्वरित केवळ 42 सेप्टिक टाक्या असून त्यादेखील यांत्रिक उपकरणांद्वारे नियमितपणे स्वच्छ केल्या जातात. दररोज 235 द.ल.लि. इतके 100% सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. सर्व केंद्रांची एकूण क्षमता कितीतरी अधिक 454 द.ल.लि. इतकी आहे. एसबीआर, सी-टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर 7 मलप्रक्रिया केंद्रे कार्यान्वित असून स्काडा ऑटोमेशनची सुविधा आहे. प्रक्रिया केलेल्या 30% पेक्षा जास्त सांडपाण्याचा वापर हा उद्याने व वृक्षरोपांचे सिंचन, बांधकाम आणि सार्वजनिक ठिकाणे व सुविधांची स्वच्छता अशा बाबींसाठी केला जातो. सद्यस्थितीत 45 द.ल.लि. क्षमतेचे 3 टशिअरी ट्रिटमेंट प्लान्ट (टीटीपी) असून आता बेलापूरमध्ये 7.5 द.ल.लि. क्षमतेचा टीटीपी उभारण्यात आलेला आहे. औद्योगिकीकरणात पाण्याच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी एमआयडीसीसोबत सामंजस्य करार करण्यात आला असून त्या माध्यमातून सध्या 54 उद्योगसमुहांना पुनर्प्रक्रियाकृत पाणी पिण्याव्यतिरिक्त उपयोगासाठी दिले जात आहे. तसेच हे पाणी बांधकाम, उद्याने यासाठीही वापरले जात आहे.
कोणतीही मोहीम लोकांचा सहभाग लाभल्याशिवाय यशस्वी होत नाही हे लक्षात घेऊन विविध उपक्रमांमध्ये लोकसहभागावर भर देण्यात आला. नवी मुंबई शहरातील मुख्य रस्ते, चौकांप्रमाणेच दुर्लक्षित जागा, पडीक ठिकाणे, खाडीकिनारे यांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहिमा हाती घेण्यात आल्या. सर्वसाधारपणे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी अनेक स्वयंसेवी संस्था-संघटनांनी व स्वच्छताप्रेमी नागरिकांनी या स्वच्छता उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेऊन या मोहिमा यशस्वी केल्या. विशेष म्हणजे यात महिला, ज्येष्ठ नागरिक अगदी तृतीयपंथी नागरिकही उत्साहाने सहभागी झाले. शहरातील मुख्य सायन पनवेल महामार्ग, ठाणे बेलापूर मार्ग या 2 मोठ्या मार्गांवर तसेच आशियातील सर्वात मोठे एपीएमसी मार्केट, रेल्वे स्टेशन्स, मार्केट, डेपो अशा वर्दळीच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहिमांचे नियमित आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध स्वयंसेवी संस्थांसोबत श्रीनानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या हजारो श्रीसदस्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
मॅनग्रुव्हज् क्लीन मार्शल या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी सातत्याने खारफुटी स्वच्छता मोहीम राबविली. ’स्वच्छता ही सेवा’ व प्रत्येक मोहिमांमध्ये नागरिकांसह शहराचे उद्याचे नागरिक असणार्या एनएसएस व एनसीसी विद्यार्थी युवकांचा मोठ्या संख्येने उत्साही सहभाग राहिला. या सर्वांच्या एकत्रित सहभागातून शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिल्याचे चित्र अनुभवायला मिळाले.
ज्या स्वच्छतामित्रांच्या बळावर हे घडून आले त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले आहे. या स्वच्छतामित्रांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना (PMBSY) त्याचप्रमाणे महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. स्वच्छताकर्मींची आरोग्य तपासणी करण्यात येते तसेच त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयात विनामूल्य उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. तसेच स्वच्छताकर्मींच्या जीवनानुभवावर आधारित ’अंधे जहां के अंधे रास्ते’ हा विशेष नाटयप्रयोग विष्णुदास भावे नाट्यगृहात खास स्वच्छताकर्मींसाठी आयोजित करण्यात आला होता. हे नाटक बघताना उपस्थित स्वच्छताकर्मी भारावून गेले.
या सर्व उपक्रमात भावी नागरिक असलेल्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग लाभला. विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्थेतील मतदानाचे महत्त्व कळावे यादृष्टीने स्वच्छताविषयक मतदान हा अभिनव उपक्रम शाळांमध्ये राबविण्यात आला. महानगरपालिका शाळांतील 21 हजाराहून विद्यार्थ्यांनी सहभागी होत शहर स्वच्छतेविषयी आपले मत नोंदविले व मतदान केले. तसेच महाराष्ट्रातील पारंपरिक दिंडीला जोड देत स्वच्छता दिंडी उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये 91 शाळा सहभागी झाल्या. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी कचरा वर्गीकरण, प्लास्टिक बंदी आणि शहराचे सौंदर्यीकरण यासारख्या विषयांवर सादरीकरण केले. बुद्धीबळाच्या पटावरून कचरा वर्गीकरण शिकविणारा व या माध्यमातून शालेय मुलांमध्ये स्वच्छतेच्या जबाबदार सवयी वृद्धिंगत करणारा बुद्धीबळावर आधारित स्वच्छता बुद्धीबळ मॉडेल हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
याच्या जोडीला खालील महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले:
’सफाई अपनाओ - बिमारी भागो’ अभियान : ‘डॉक्टर्स डे’चे औचित्य साधून महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रूग्णालयात या अभियानाची सुरुवात केली. सर्व आठही विभागांत महिनाभर विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये स्थानिक नागरिकांच्या व्यापक सहभागावर भर देण्यात आला. 14,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी झालेला आरोग्यविषयक जागरूकतेचा सुप्रसिद्ध बालरोगतज्ञांसह फेसबुक लाइव्ह उपक्रम उत्साहाने साजरा झाला. रन विथ डॉक्टर्स हाफ मॅरेथॉन यासारख्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वच्छता आणि तंदुरूस्ती याविषयी जनजागृती करण्यात आली.
गुठली रिटर्न्स मोहीम : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या ’गुठली रिटर्न्स’ अर्थात खाऊन झालेल्या आंब्याच्या कोयी संकलित करून त्यापासून आंब्याची रोपे तयार करण्याची मोहीम यशस्वीपणे राबवित तब्बल 53,000 हून अधिक आंब्याच्या कोयी संकलित केल्या. रेड एफएम व आरजे मलिष्का यांचा मोहिमेत सहभाग लाभला.
स्वच्छ मॅरेथॉन : स्वच्छता आणि आरोग्य यांची सांगड घालत पाम बीच मार्गावर स्वच्छ मॅरेथॉन 2024 आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध वयोगटातील 6 हजारहून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत स्वच्छता संदेश प्रसारित केला.
स्वच्छता सायक्लोथॉन : पर्यावरण जागरूकता वाढविण्यासाठी आणि प्लास्टिकला नाकारण्यासाठी केंद्र सरकारच्या स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत आयोजित स्वच्छता सायक्लोथॉनमध्ये 500 हून अधिक नागरिक उत्साहाने सहभागी झाले.
स्वच्छता महोत्सव 2024 : शहर स्वच्छतेसाठी दररोज मौलिक योगदान देणार्या स्वच्छतामित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा एक भव्यतम उत्साही उपक्रम स्वच्छता महोत्सवाच्या स्वरूपात सांस्कृतिक सादरीकरणातून आयोजित करण्यात आला. यामध्ये स्वच्छताकर्मींप्रमाणेच 5 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून महोत्सव यशस्वी केला.
अशा प्रकारे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनामध्ये विविध प्रकारच्या अत्याधुनिक कार्यप्रणालींचा वापर करून तसेच स्वच्छताविषयक नानाविध उपक्रम राबवून नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल स्थान मिळविण्यासाठी आघाडीवर राहिली आहे.
- प्रतिनिधी