भारत-वैश्विक चिंतनाचा आधार

विवेक मराठी    08-Aug-2025
Total Views |
bharat 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने मा. भैयाजी जोशी(अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य) लिखित ‘हमारा सांस्कृतिक चिंतन‘ या ग्रंथाचा आरती देवगांवकर यांनी केलेला मराठी अनुवाद ‘मृत्युंजय भारत’ या ग्रंथातील ‘भारत वैश्विक चिंतनाचा आधार’ या प्रकरणातील काही अंश येथे देत आहोत. मोरया प्रकाशनाच्या वतीने येत्या 13 ऑगस्ट रोजी पुण्यात प.पू.स्वामी गोविंददेवगिरिजी महाराज यांच्या शुभहस्ते प्रकाशित होत आहे.
 
 
नजिकच्या भविष्यात सगळीकडे भारताचे साम्राज्य होईल अशी चर्चा होती. आजही ती चालूच आहे. काही लोकांच्या मते सध्या जे चालू आहे ते हिंदुत्वाचे शतक आहे. अशा वेगवेगळ्या संकल्पनांवर लोक चर्चा करताना म्हणायचे की,‘भारत महासत्ता होईल, तो सर्वोत्तम असेल.’ त्या लोकांनी ‘बेस्ट’ हा शब्द न वापरता ‘सुपर पॉवर’ असा शब्द वापरला. देशोदेशी प्रवास आणि अभ्यास करणार्‍या विद्वान व्यक्तीला मी एकदा विचारले,‘प्रत्येक जण म्हणत आहे, की भारत महासत्ता होईल. तुम्हाला काय वाटते?’ त्यावर ते म्हणाले,‘भारत केव्हाही महासत्ता होऊ शकतो; पण महासत्ता म्हणजे साम्राज्य, राज्य, जगावर नियंत्रण इत्यादी असा होतो. हे भारताच्या कल्पनेत, विचारात व्यवहारातही नाही. त्यामुळे भारत महासत्ता होणार नाही.’ मी विचारले,‘मग काय होईल?’ ते म्हणाले, ‘भारताला महासत्ता होण्याची गरज नाही. भारत हे महा-राष्ट्र व्हायला हवे. ‘सुपर पॉवर’ आणि ‘सुपर नेशन’ यात फरक आहे. हे राष्ट्र बलशाली करणे हे संघाचे उद्दिष्ट आहे. भारत जगासमोर आदर्श म्हणून मांडला गेला पाहिजे. अशा प्रकारचा उत्तम विचार करणारा देश दुर्बल असून चालणार नाही. त्याला सामर्थ्यशाली व्हावे लागेल, असे संघाने म्हटले आहे.
 
 
‘विश्वगुरू’ म्हणणे हा अहंकार नाही. ज्यांना काहीच कळत नाही त्यांना भारत काही शिकवणार आहे का? तर नाही, ती भारताची इच्छा नाही. आम्हाला गुरू म्हणून जगावर वर्चस्व गाजवायचे नाही. भारताला जगाचे नेतृत्व करायचे आहे, असे कोणी म्हणत असेल, तर तसेही काही नाही. मात्र जेव्हा राष्ट्र जीवनासंदर्भात एखाद्या महापुरुषाने ‘विश्वगुरू’ हा शब्द उच्चारला, तेव्हा त्यांच्या मनात एक मूलभूत संकल्पना, विचार होता; भारतीय तत्त्वज्ञान शाश्वत आहे, ते कोणत्याही काळात संपणार नाही, कालबाह्य होणार नाही, ते जगातील सर्व देशांसाठी आहे, ते जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात राहणार्‍या माणसांसाठी आहे. जागतिक, सार्वकालिक आणि सर्वांना उपयुक्त ठरेल असे विचार जर कुठे असतील, तर ते भारतातच आहेत. त्यामुळे विश्वगुरू या संकल्पनेची चर्चा करताना भारतामध्ये वेगळ्या प्रकारचा आदर्श निर्माण करण्याची क्षमता आहे असे म्हणता येईल. इतिहासात भारतावर प्रचंड संख्येने आक्रमणे झाली. भारताने जेवढे अत्याचार, अन्याय, मुस्कटदाबी सहन केली तेवढे इतर कोणत्याही देशाला सहन करायला लागले असेल असे वाटत नाही. ज्या देशांवर असे अन्याय झाले होते त्यातील छोटे देश तर उद्ध्वस्त झाले. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतून जाऊनही भारत अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहे याचं काहीतरी कारण असेल. ‘असे काही आहे, की आपले म्हणजेच भारताचे व्यक्तिमत्त्व ढासळत नाही. भारत कधीही नष्ट होणार नाही, असा त्याचा ललाटलेख आहे. तो अनंत काळापासून आहे आणि अनंत काळापर्यंत राहील. हे भारताचे भाग्य आहे. त्यामुळे लोक भारताला ‘मृत्युंजय’ म्हणतात. मृत्युंजय, म्हणजेच ज्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे असा आणि मृत्युंजय भारतात राहणारी व्यक्ती ‘अमृतपुत्र’ आहे. म्हणून स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, वयम् अमृतस्यपुत्रः म्हणजे आपण अमृताचे पुत्र आहोत.
 
• पुस्तक : मृत्युंजय भारत
• लेखक : सुरेश उपाख्य भैयाजी जोशी
(राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, रा. स्व.संघ)
• मराठी अनुवाद : आरती देवगांवकर
सवलतीत घरपोच मागवण्यासाठी संपर्क मोरया प्रकाशन
 
 
भारत कधीच नाहीसा होणार नाही म्हणजेच हिंदू समाज कधीच नष्ट होणार नाही. मग या समाजाची जबाबदारी काय आहे?
‘एकं सत् विप्रः बहुधा वदन्ति।’ हे भारताशिवाय दुसरे कोण सांगू शकेल, हिंदूंशिवाय दुसरा कोण आहे? आमचा मार्ग सर्वोत्तम आहे, तुम्हाला हाच मार्ग अवलंबावा लागेल, असे म्हणणारा एक वर्ग आहे. परंतु जगातील अनेक समूहांपैकी एकाचे आपण प्रतिनिधित्व करतो, जो म्हणतो, ‘तुमचाही मार्ग आहे, आमचाही मार्ग आहे.’ जेव्हा जग ही संकल्पना आणि हे तत्त्व स्वीकारेल, तेव्हा जगातील सर्व प्रश्न संपतील. जगाला हे सांगणे भारताचे काम आहे. जोपर्यंत भारताची ही भूमिका संपत नाही तोपर्यंत भारत तसाच राहणार आहे. महर्षी अरविंद म्हणतात,‘आम्ही जिथे जाऊ तिथे भारत नेऊ, असे भारतातील लोकांनी सांगायला हवे.’ आता ही भूमिका निभावणारा भारत गरजेचा आहे. अनेकांनी वेळोवेळी या देशात येऊन अनेक गैरकृत्ये केली आहेत. त्यांना वाटले, भारत मंदिरांमध्ये आहे, म्हणून त्यांनी मंदिरांची तोडफोड केली. मंदिरे पाडूनही ना भारत संपला ना हिंदू समाज. काही लोकांना आपला हिंदू धर्म हा धर्मग्रंथात आहे असे वाटले म्हणून त्यांनी नालंदा आणि तक्षशीला येथील मोठमोठी ग्रंथालये जाळून टाकली. मात्र तरीही भारत संपला नाही; कारण भारत काही केवळ त्यात सामावला नव्हता. ते लोक ज्ञानाचा नाश करू शकले नाहीत. ग्रंथ पुन्हा लिहिले गेले. त्यामुळे भारताचा नाश करण्यासाठी बाहेरच्या लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी ते यशस्वी होऊ शकले नाहीत. राजांना संपवले तर हिंदुत्व भारतातून संपेल, असेही त्यांना वाटले. अनेक राजे पराभूत झाले; पण त्यामुळे भारत देश संपला नाही; कारण भारत मंदिरांत, धर्मग्रंथांत किंवा राजांमध्ये नाही. हिंदुत्व हे आपल्या समाजव्यवस्थेत आहे. समाजाचा गाडा चालवणार्‍या वेगवेगळ्या शक्ती आणि त्यांची वेगवेगळी केंद्रे आहेत. या केंद्रांमुळेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे युद्धात राजांचे पराभव झाले तेव्हा ऋषी-मुनी संत पुढे सरसावले. त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले. सामान्य लोकांनीही लढून, शौर्य दाखवून देशाचे रक्षण केले आहे. समाजात वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या वाईट गोष्टी, काही दोष निर्माण झाले. ते दूर करणारे लोकही याच समाजात तयार झाले. समाजाला त्या दोषांपासून मुक्त करणार्‍या अशा समाजसुधारकांची एक लांबलचक साखळी आपल्याला दिसून येते. अशा विविध प्रकारच्या सामाजिक व्यवस्था इथे कार्यरत राहिल्या. त्यामुळेच आपण गुलाम झालो; पण संपलो नाही; कारण आपला समाज कधीच फक्त राजांवर अवलंबून नव्हता.
 
 
आपल्याकडे बाह्य स्तरावर खूप विविधता आहे. लोकांच्या भाषा वेगळ्या, खाण्याच्या सवयी वेगळ्या, जीवनशैली वेगळी. वेगवेगळ्या प्रांतांमध्ये आणि राज्यांमध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. बाहेरून हा देश एकसारखा दिसावा अशा फार गोष्टी इथे नाहीत, आणि क्वचित कुठे दिसत असल्या तरी त्याचे प्रमाण फार कमी आहे. जर इतकी विविधता आहे, तर मग तो एक कसा असेल, त्याला एक कसे म्हणायचे? हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहू. हा देश काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि राजस्थानच्या सीमेपासून मणिपूरपर्यंत पसरलेला आहे. या देशात अनेक प्रकारचे सिद्धान्त वा मतप्रवाह आहेत. ते सारे सर्वत्र सारखेच असतात असे मानले जाते. परंपरेतून संस्कृतीचा उदय होत राहतो. ‘अतिथी देवो भव’ ही परंपरा भारतातील सुशिक्षित-अशिक्षित, श्रीमंत-गरीब, खेड्यात किंवा शहरात राहणारे, वनवासी इत्यादी प्रत्येकाच्या जीवनात दिसते. आपल्या संपूर्ण देशाला जोडणारी तीर्थक्षेत्रे आहेत. ती केवळ कोणत्याही एका प्रांताची, कोणत्याही एका जातीची, कोणत्याही विशिष्ट भाषा बोलणार्‍यांची नाहीत. केवळ उत्तरेची नाहीत किंवा दक्षिणेचीही नाहीत. 12 ज्योतिर्लिंगे, 52 शक्तीपीठे ही सर्व देशभर पसरलेली आहेत. त्यांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक येतात. शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार धामांची यात्रा करायची म्हटले तर हे चार धामही एकाच ठिकाणी नाहीत. आपण धर्मग्रंथातून शिक्षण घ्यायचे म्हटले, तर तेही अनेक प्रकारचे आहेत, मात्र उपदेश सगळ्यांचा साधारण सारखाच असतो. या देशातील महापुरुषांची यादी तयार करायची म्हटले, तर ती कोणत्या जातीची, कोणती भाषा बोलणारी वगैरे विचार आपल्या मनात येत नाहीत. थोर माणसे ही थोर माणसेच असतात. समाजात विविधता असू शकते; पण त्या विविधतेतच अडकून न पडता त्याच्या पलीकडे जात, प्रगती करत जगणारा असा भारतीय समाज आहे. जीवनाकडे, स्त्रियांकडे, पैशाकडे तसेच निसर्गाकडे पाहण्याचा आपला एक दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन सर्वांचा सारखाच असतो. दृष्टिकोन सारखा असल्यामुळे जीवनमूल्येही सारखीच असतात. सत्य, प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम करण्याची वृत्ती, परस्पर सहकार्य, सगळ्यांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची भावना, न्याय इत्यादी मूल्ये आहेत. अन्याय करणार्‍यांना लोक घाबरतात. मात्र याचा अर्थ असा नाही की, त्यांना ते स्वीकारतात. चारित्र्य आणि शील ही जीवनमूल्ये आहेत, जीवनाचा दृष्टिकोन आहेत. त्याच्या आधारेच जीवनपद्धती विकसित झाली आहे. तुम्ही भारतभरात कुठेही गेलात तरी तुम्हाला एकच जीवनशैली पाहायला मिळेल. अशा प्रकारे हा समाज देशभर पसरलेला आहे. हा संपूर्ण हिंदू समाज देशाच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. केवळ साक्षीदारच नाही तर यामागचे कारणही हा हिंदूच आहे. देशाचा गौरवशाली काळ ज्यांच्यामुळे होता तेही हिंदूच होते आणि देशाच्या अधोगतीला जबाबदार कोण आहे, तर तोही हिंदूच आहे. देशाचे भवितव्य वेगळे आणि हिंदूंचे भवितव्य वेगळे, असे कधीही होणार नाही. ते दोन्ही एकच आहे. देशाच्या उदय आणि अस्ताचा साक्षीदार हिंदू आहे आणि या प्रगती आणि अधोगतीसाठी जबाबदारही हिंदूच आहे. त्यामुळे हजारो वर्षांत देशात जे काही प्रयत्न झाले, ते हिंदू समाजाला समोर ठेवूनच झाले; कारण हिंदू समाजाचा संबंध भारताशी आहे. त्याला वगळून भारताचा विचारही करता येत नाही. हिंदू समाजाचे गुणगानही गायले गेले आहे आणि त्यांच्यावरच टीकाही केली गेली आहे. समाजसुधारणेचे प्रयत्नही हिंदू समाजात झाले आहेत. समाजसुधारकांनी त्या वेळच्या समाजाच्या संदर्भात आपल्या भावना , संताप व्यक्त केला, तर कधी सुधारणेसाठी उपाय सुचवले. हे सर्व कोणासाठी केले गेले? देशातील हिंदू समाजाला डोळ्यासमोर ठेवून हे केले गेले. या लोकांनी जे आघात केले तेही हिंदू समाजाच्या रूढींवर केले; कारण या महापुरुषांना वाटत होते, की या परिस्थितीसाठी येथील हिंदू समाज जबाबदार आहे. त्यांच्यात सुधारणा व्हायला हवी. शेवटी हे सर्व समाजसुधारक तरी कोण आहेत? हे सर्व समाजसुधारक हिंदू आहेत. त्यामुळे हा देश आणि हिंदू यांना वेगळे करता येऊ शकत नाही. या देशाच्या केंद्रस्थानी हिंदू राहिला आहे. ज्या कुणाला देशासाठी काही काम करायचे आहे, त्याला हिंदू समाजाला बरोबर घेऊन काम करावे लागेल, हिंदू समाजासाठीच काम करावे लागेल. हिंदू समाजाला निर्दोष आणि सामर्थ्यवान बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील; कारण तोच जबाबदार आहे. हिंदू समाजासाठी काम करणे ही संकुचित किंवा जातीयवादी कल्पना नाही. ते कोणाच्या विरोधातही नाही. जे समाजसुधारक होते ते कोणाच्याही विरोधात नव्हते. हिंदू समाजाला जागृत करण्याचे, हिंदू समाजाला संघटित करण्याचे काम करत आहेत - याचा अर्थ ते कोणाच्या विरोधात आहेत असा होत नाही. असा विचारही कोणी करू नये. आपण आत्मविश्वासाने संपूर्ण जगाला सांगू शकतो की, भारत देशात हिंदूंनी सामर्थ्यवान असणे आवश्यक आहे. हिंदूंची शक्ती कधीही विध्वंसक होणार नाही. हिंदूची शक्ती ही समाजाची, मानवजातीची संरक्षक शक्ती आहे. हिंदू शक्तिशाली असतानाही त्यांनी कोणत्याही देशावर हल्ला केला नाही. या देशात जी काही युद्धे झाली ती स्वसंरक्षणासाठी लढली गेली. प्रत्येकाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे; कारण मरण समोर उभे ठाकले तरी स्वत:चे रक्षण करायचे नाही, शस्त्रे उचलायची नाहीत, हे तत्त्व निसर्गालाही मान्य नाही. दुर्बल माणूसही शस्त्र घेऊन उभा असतो. त्यामुळे या देशात ज्याला कुणाला काम करायचे आहे त्याला हिंदू समाजासाठी काम करावे लागेल, हिंदू समाजाच्या प्रबोधनाचे, त्याला सामर्थ्यवान बनविण्याचे काम करावे लागेल. या कार्याला कोणी जातीयवादी म्हणू शकत नाही. हे काम कोणाच्या विरोधात नाही. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवारजी यांनी संघाचे कार्य सुरू केले तेव्हा त्यांना लोकांनी विचारले, ‘तुम्ही ख्रिश्चनविरोधी आहात का? तुम्ही मुस्लिम विरोधी आहात का?’ त्यांनी उत्तर दिले, ‘नाही!’ त्यावर ‘मग तुम्ही कशाच्या विरोधात आहात?’ अशी विचारणाही केली गेली होती. जेव्हा एखादी कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला जातो, जेव्हा कोणी शक्तिशाली बनतो तेव्हा त्याला शत्रू असायलाच हवा, असे आवश्यक आहे का? समाज बलशाली होण्याची ही जन्मजात प्रवृत्ती का नसावी? समाजाने बलवान आणि ताकदवान असणं हा गुन्हा आहे का? हा गुन्हा नसून नैसर्गिक प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही आम्ही व्यायाम करून आपले शरीर निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा याचा अर्थ असा होत नाही की, आपल्याला कोणाला तरी मारायचे आहे; पण माझ्यावर कोणी हल्ला केला तर मला स्वतःचे संरक्षण करता आले पाहिजे, असे वाटणे स्वाभाविक आहे. ‘आम्ही कोणाच्याही विरोधात नाही’, असे डॉ. हेडगेवार सुरुवातीपासूनच म्हणायचे. केवळ संघच नाही, तर हिंदू समाजाला अग्रस्थानी ठेवून रचनात्मक, सुनिश्चित विचाराने काम करणार्‍या प्रत्येकाचा दृष्टिकोन नेहमीच सकारात्मक राहिला आहे. हिंदू तत्त्वज्ञानात नकारात्मकतेला स्थान नाही, आणि जर तशी नकारात्मकता कुठे असेल तर त्याला विकृती म्हटले पाहिजे. नकारात्मक भूमिका मांडून कोणतीही कल्पना, कोणतेही तत्त्वज्ञान यशस्वी झालेले नाही. भविष्यातही ते होणार नाही. सकारात्मक विचार घेऊन पुढे जाणारे लोकच यशस्वी होतात.
 
 
भौतिक मापदंडांवर पाहिले तर आज भारत सातत्याने प्रगती करत आहे. परंतु जेव्हा या सर्व गोष्टींचे योग्य नियोजन होईल तेव्हाच सर्वांची प्रगती होईल, ‘सर्वजन सुखाय-सर्वजन हिताय’ हे सूत्र अमलात आणता येईल. ज्याला या क्षेत्रात काम करायचे आहे, त्याला सर्व शक्ती आणि संसाधनांचा समन्वय साधणारी एक चांगली व्यवस्था भारतात निर्माण करावी लागेल. हे फक्त सरकारचे काम आहे, असे मी म्हणणार नाही. हे सर्व समाजाचे कार्य आहे. हे काम सर्वांना मिळून करावे लागेल.
 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली तेव्हा त्या काळातील लोकांच्या मनात मूळ विचार हाच होता. मुख्यतः डॉ. हेडगेवार यांच्या मनात आलेला विचार हा होता की, देशातील जनता जागृत होत नाही, तोपर्यंत हे होणे शक्य नाही. त्या वेळी स्वातंत्र्य चळवळ सुरू होती. मात्र स्वातंत्र्य चळवळीव्यतिरिक्त काही काम केले पाहिजे, असा विचार डॉ. हेडगेवार यांनी केला. मग त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि आपले लक्ष त्यावर केंद्रित केले. समाजात नवीन काहीतरी करावे लागेल ही कल्पना वरवरची नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही स्वतंत्र भारत आणि स्वतंत्र भारतातील लोक कसे असतील याचा विचार करणे आवश्यक होते. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे, जर या सगळ्याला हिंदू जबाबदार असतील तर या हिंदू समाजाने हिंदू समाजातच काम करण्याची गरज आहे. या कल्पनेतूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात झाली. यामागील कल्पना अशी आहे की, आपण लोकांमध्ये जावे, त्यांच्याशी संपर्क साधावा. तसेच आपण ज्यांच्या संपर्कात येतो त्यांना संस्कार (संस्कृती) प्रक्रियेत आणले पाहिजे
 
 
आज सज्जनाची व्याख्या काय आहे, सज्जन कोणाला म्हणतात? जो कोणत्याही कामात भाग घेत नाही, अलिप्त राहतो; त्याचे काम चांगले आणि प्रामाणिकपणे करतो; परंतु आजूबाजूला त्याचे लक्ष नसते; समाजात काय चालले आहे याची त्याला पर्वा नसते, त्याचा विचारही तो करत नाही, अशा व्यक्तीला हल्ली ‘सज्जन’ म्हणतात.डॉ. हेडगेवार म्हणतात, हे योग्य नाही. जे चांगले आहे त्याला चांगले म्हटले पाहिजे; जे वाईट आहे त्याला वाईटही म्हणता यावे. अन्याय होत असेल तर अन्याय थांबवण्यासाठी पुढे आले पाहिजे. जे सुसंस्कृत आणि संघटित दोन्ही आहेत अशा सज्जनांची ताकद हवी. त्यांनी केवळ संघटित होणे पुरेसे नाही, त्यांच्यात जागृतीही व्हायला हवी. समाज आणि देशासमोरील समस्याही त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. ही जागरूकता असणारे आणि समस्या समजून घेणारे लोक तयार करावे लागतील. देशासमोरील समस्या आणि प्रश्न काय आहेत हे त्या लोकांना समजावून सांगावे लागेल. समाजाचे प्रश्न हे कधीच एका समूहाचे नसतात, ते संपूर्ण समाजाचे असतात.
 
 
जेव्हा काश्मीरवर हल्ला होतो तेव्हा आपण विचार करतो की, आपल्यावर हल्ला झाल्यावर बघू! असं कसं चालेल? देशाच्या आर्थिक विकासाच्या संदर्भात असो, सुरक्षेच्या संदर्भात असो किंवा समाजातील दुष्प्रवृत्तींच्या संदर्भात, विविध क्षेत्रांतील समस्यांची जाण असणारे संघटित आणि जागरूक लोक असणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रबोधनाची व्याप्ती मोठी असावी. मात्र आपल्या समाजात निष्क्रियतेमुळे मोठे नुकसान झाले आहे. चाणक्य म्हणाले होते - या देशाचे जेवढे नुकसान दुर्जनांमुळे झाले आहे त्यापेक्षा अधिक नुकसान चांगल्या लोकांच्या निष्क्रियतेमुळे झाले आहे. महर्षी अरविंद म्हणाले - निष्क्रियता हा तामसी गुण आहे. तो सात्विक किंवा राजसी नाही. जोपर्यंत हा तामसी गुण समाजात आहे तोपर्यंत समाजाची सात्त्विकतेकडे वाटचाल कशी होणार? म्हणून, निष्क्रियता दूर करणे आवश्यक आहे. जगातील ज्या ज्या देशांनी प्रगती केली आहे ती अशा लोकांच्या सक्रियतेमुळेच. त्यामुळे सज्जनांनी सक्रिय असणे आवश्यक आहे हेच सूत्र घेऊन संघात काम सुरू झाले आणि सुरू आहे.
 
 
आज संघ शताब्दीच्या वर्षात आहे. हिंदू समाजात काम करायचे असेल, तर जिथे जिथे हिंदू समाज आहे, तिथे प्रबोधन संस्कार आणि संघटन कार्य केले पाहिजे, असे संघाने सुरुवातीपासूनच ठरवले होते. आज देशाच्या कानाकोपर्‍यात संघाच्या शाखा सुरू आहेत. ‘मी स्वयंसेवक आहे’ असे म्हणणारे लोक देशभरात आहेत. एवढेच नव्हे तर भारताबाहेर गेलेल्या हिंदूंना जागृत करण्याचे कामही होते आहे; आज जवळपास 45 देशांमध्ये संस्काराचे काम सुरू आहे. जिथे जिथे हिंदू आहेत तिथे तिथे हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून गेल्या 99 वर्षांपासून या सूत्राचा प्रचार-प्रसार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून लाखो स्वयंसेवक कामासाठी तयार झाले आणि या स्वयंसेवकांच्या प्रयत्नांमुळे करोडो लोक संघाच्या जवळ येऊ लागले. ते केवळ शाखेत येतील, यावे अशी मूळ कल्पना नव्हतीच, तर विचारांशी जोडले जाणे, प्रवाहात येणे, सर्वसमावेशक शक्ती म्हणून उभे राहणे, ही संकल्पना होती.
 
 
त्यामुळे देशभर पसरताना संघ समाजातही सर्वदूर पसरला. संघातील व्यक्ती काश्मीरची असो वा कन्याकुमारीची, संघाच्या या प्रयत्नांमुळे देश एकसंध राहिला आहे. काश्मीरमध्ये कोणतीही घटना घडली तर संघाच्या संपर्कात असलेले लोक तिथे उभे राहतात. आसाममधील घुसखोरीलाही ते स्वतःची समस्या मानतात. दहशतवादामुळे हिंदू समाजाचे होणारे नुकसान त्याला आपलेच नुकसान वाटते. विविध प्रकारच्या शक्ती भारताला आर्थिक मुद्द्यांवर पुन्हा एकदा आपल्या प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी स्वदेशीच्या कल्पनेच्या पाठीशी उभे राहावे लागेल, असे संघाच्या लोकांना वाटते.
 
 
या देशासमोर समस्या आहेत आणि त्या समस्यांवर उपायही आपल्याकडे आहेत, असे संघ पूर्वीपासून सांगत आला आहे.संघाच्या व्यक्तिमत्त्व घडण आणि स्वयंसेवक घडवण्याच्या कल्पनेत ही गोष्ट स्वाभाविकपणे विकसित झाली आणि पुढे संक्रमित झाली. संघाने प्रश्न उपस्थित करणारी माणसे निर्माण केलेली नाहीत, तर असलेले प्रश्न समजून घेऊन त्यांची उत्तरे शोधणारे स्वयंसेवक निर्माण केले आहेत. संघाची ताकद देशव्यापी आहे असे आपण म्हणतो तेव्हा आता हीच स्वयंसेवकांची ताकद समस्या समजून घेणारी झाली आहे. आपल्या समस्यांसाठी इतर कोणीही जबाबदार नाही तर आपणच आहोत, असे आम्ही स्वयंसेवक मानतो आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी काम करतो. समाजातील प्रश्न जेव्हा लोकांना समजू लागले तेव्हा स्वयंसेवक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी विविध प्रकारची कामे करू लागले. संघाच्या स्वयंसेवकांनी शेती, शिक्षण, कायदा, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थविषयक तसेच समाजातील वैयक्तिक परस्पर नातेसंबंध आणि व्यवहार,कौटुंबिक समस्या अशा सर्व क्षेत्रात काम केले. त्यातील प्रश्नांची भारताच्या मूलभूत विचारसरणीशी संबंधित अशी उत्तरे शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. या प्रकारच्या विचारांसाठी व्यासपीठे असावीत म्हणून संघाच्या स्वयंसेवकांनी वैविध्यपूर्ण रचना उभ्या केल्या आहेत. संघ सामाजिक परिवर्तनाची कल्पना घेऊन काम करतो आहे. समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी जागतिक संदर्भात भूमिका मांडायची असेल, तसा भारत घडवायचा असेल, तर संपूर्ण समाजाने त्याच पद्धतीने प्रतिबिंबित होऊन ताकदीने उभे राहणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हाच प्रयत्न आहे. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर समाजात संघाची मान्यता वाढत आहे, याचा मला आनंद आहे. ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ म्हणत मोठा गट तयार झाला आहे. या सर्व प्रकारच्या शक्तींचा आपण जितका प्रभावीपणे वापर करू शकतो, तितकेच आपण सामाजिक परिवर्तनाचा एक चांगला आदर्श निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकतो. प्रत्येकाने हे काम समजून घेऊन जमेल ते सहकार्य केले पाहिजे.