@जगन्नाथ हुक्केरी
‘सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक’ हे ब्रीद घेऊन गेल्या वीस वर्षांपासून साहित्य क्षेत्रात समरस होत विषयनिष्ठ साहित्य संमेलने भरविणारी आणि वेगवेगळ्या विषयांना वाचा फोडणारी समसरता साहित्य परिषद. याच समरसता साहित्य परिषदेच्या वतीने गुरुगोेविंदसिंहजी साहित्य नगरी नांदेड येथे 20 वे समरसता साहित्य संमेलन ‘नव्वदोत्तरी साहित्य आणि समरसता’ हा विषय घेऊन पार पडले. या संमेलनात सगळेजण इतके समरस होऊन गेले होते की त्यावरुन केवळ चळवळीचा हा सोहळा न वाटता समतेचा मेळा वाटला. विद्यार्थ्यांपासून ते रसिक, ज्येष्ठांपासून ते बालकांपर्यंत, युवकांपासून ते रक्षकांपर्यंत आणि नारीशक्तीपासून ते किन्नर भगिनीपर्यंतचा सहभाग असलेला हा विचारांचा जागर पाहून ‘अवघा रंग एक झाला’ असेच वाटले. चळवळीच्या या साहित्य सोहळ्याच्या रंगी सारस्वतांबरोबरच रसिक, अभ्यासक, विचारवंत रंगून गेले, हे या संमेलनाचे केवळ यश नव्हे तर त्याचे बाहू विस्तारत असल्याचे द्योतकच आहे.
अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥
मी तूंपण गेले वायां । पाहतां पंढरीच्या राया ॥
नाही भेदाचें तें काम। पळोनि गेले क्रोध काम ॥
देही असोनि विदेही। सदा समाधिस्त पाही॥
पाहते पाहणें गेले दूरी । म्हणे चोखियाची महारी॥

संतश्रेष्ठ चोखामेळा यांना अभिप्रेत असलेल्या आणि सर्वांना सामावून घेत त्यांच्यात समरस होण्यासाठी सतत विचारांचे बीजारोपण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या समरसता साहित्य परिषदेने आतापर्यंत जळगावपासून गोव्यापर्यंत आणि आता मराठवाड्यातील लातूरनंतर नांदेड येथे संमेलन घेऊन केवळ विचारांची पेरणी केली नाही तर संविधानाला अभिप्रेत आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील समाज निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली त्यातून अनेक विचार पुढे आले. ‘नव्वदोत्तरी साहित्य आणि समरसता’ या विषयातून ‘केवळ मी नाही, तर तुम्ही’, हा संदेश देत केवळ वैचारिक मांडणी करण्यावर भर न देता समाजाला अपेक्षित आणि बाजारू होत असलेल्या व्यवस्थेला विचार करायला लावणारा महामंत्र दिला गेला. व्यवस्थेचे आसूड शब्दांच्या शस्त्रांनी बाजूला सारत वैचारिक क्रांती करण्यास भाग पाडलेले पद्मश्री नामदेव कांबळे हे संमेलनाध्यक्ष होते, हीच या संमेलनाची नवी वाट होती. याच वाटेवरुन साठोत्तरीनंतर नव्याने रुजलेल्या आणि समाज, व्यवस्था, यंत्रणा, दारिद्रय, दैन्य, जागतिकीकरण, जीवघेणी स्पर्धा, गुदमरुन जाणारी समाजमने यावर धाडस करुन ज्यांनी साहित्याची चळवळ आपले शब्द आणि पुस्तकांनी सुरू केली, त्या साहित्यिकांच्या विचारांवर मंथन घडले. समुद्रमंथनातून हलाहल पचवून भगवान शंकरांनी अमृत वाचविले. तसेच नांदेडच्या विचारमंथनातून व्यवस्थेचे हलाहल पचवून ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती’ या संतश्रेेष्ठ तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे जे साहित्यिक अचल राहिले आणि ज्यांच्या लेखनाचे चिंतन करण्यासाठी समाज आणि व्यवस्थेला भाग पडले, यावर खुलेआम संवाद झाला. तो संवाद इतका प्रभावी होता की प्रत्येक जण अंतर्मुख होत स्वत:च्या अंत:करणात डोकावून पाहत आत्मपरीक्षण करत होता. संमेलनाच्या विषयाप्रमाणे परिसंवादाचेही विषयही विचारपूर्वक ठरवलेले, उपस्थितांच्या विचाराला चालना देणारे होते. श्री गुरुगोविंदसिंघजी साहित्यनगरीत कै. गंगाधरराव दादा पवार व्यासपीठावर रंगलेल्या उद्घाटन सत्रामध्ये सहभागी झालेल्यांच्या चेहर्यांवर एक आत्मिक समाधान दिसत होते. शिवाय श्री संत बाबा बलविंदरसिंघजी, स्वागताध्यक्ष खा. डॉ. अजित गोपछडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती आणि त्यांनी केलेली मांडणी ही समरसतेचा विचार पुढे नेणारी ठरली.

नव्वदोत्तरी साहित्य बदलते स्वरूप, जागतिकीकरण आणि समाज परिणाम व समस्या, नव्वदोत्तरी साहित्यात दिसणारे औद्योगिकीकरण, महानगरीय जाणिवा, नवे विषय नवी मांडणी, नव्या संवेदना या परिसंवादाने भूतकाळाच्या डोंगर कपारीतून भविष्याची पहाट उजाडण्याची प्रेरणा दिली. प्रदीपदादा रावत (पुणे) यांची मुलाखत फार काही सांगून गेली. ‘वंचितांचे नव्वदोत्तरी साहित्य’ या परिसंवादातील दलित-उपेक्षित समाजातील आत्मकथने, नव्वदोत्तरी काळातील चित्रपट, कथा, नाटक इत्यादी माध्यमातून दलित, वंचित व महिलांचे चित्रण, नव्वदोत्तरी साहित्यातील दलित, वंचित काव्यांचे बदलते स्वरूप या विषयांनी प्रत्येकाला भूतकाळात हरवायला भाग पाडला. काहीजण विचारमग्न झाले.
नंदिग्राम काव्ययात्रा संतकवी श्री दासगणू काव्य मंच येथे झाली. यात नांदेडपासून ते सोलापूर, पुणे, मुंबई, कोल्हापूरच्या कवींनी सहभाग घेत आपल्या रचनांच्या रुपाने समसरतेची ज्योत प्रज्ज्वलित केली. यामुळे समाजमनाच्या हृदयाची कवाडे उघडी झाली आणि संविधानावर आधारित आणि बलशाली झालेल्या भारताची अखंडता, एकता आणि देशप्रेम या संकल्पनांची आवर्तने झाली. सांस्कृतिक कार्यक्रमाने तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व, ममत्व, देशाभिमान, समाजाविषयी तळमळ, विकासाभिमुख दृष्टिकोनाचा इतिहास समोर उभा केला. किन्नर भगिनींनी आपला कलाविष्कार सादर करुन सगळ्यांची वाहवा तर मिळवलीच. पण आपणही समसरतेच्या वाटेवरील पांथस्थ आहोत, हे ठणकावून सांगितले.
डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांच्या बीजभाषणाने संमेलनाची उंची वाढवली. आधुनिक सामाजिक-राजकीय चळवळी व नव्वदोत्तरी साहित्य या परिसंवादात भटके विमुक्तांच्या क्षेत्रात संघाने उभी केलेली चळवळ; रचना व व्याप्ती, चळवळी स्व-केंद्री झाल्या आहेत का?, स्वातंत्र्योत्तर काळात चळवळी राजकारणाने अपहृत केल्यात का?, सेवाक्षेत्रातील सांस्कृतिक पुनरुज्जीवनवादी सुधारणाकार्यांना साहित्याने बहिष्कृत का केले आहे? हे विषय रसिकांसह अभ्यासकांनी फार मनावर घेतले, हीच या संमेलनाची फलश्रुुती ठरली.

गझल मुक्तमंचमध्ये गझलकारांनी तिरस्कार, बहिष्कार, समाजातील व्यंग, परिवारवाद, एकाधिकारशाहीच्या या युगातील दंभावर चांगलेच आसूड ओढले. एका परिसंवादात संमेलनाध्यक्ष पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या निवडक साहित्यकृती-विद्यार्थ्यांच्या नजरेतून मांडण्यात आल्या. परिवर्तनवादी साहित्य असल्याचे सांगत समाजाला समरस होण्याची भावना त्यांनी आपल्या साहित्यातून मांडल्याचा सूर वक्त्यांनी आळविला. समारोपसत्राने भरभरुन नक्षत्रांचे देणेच दिले. एकाहून एक सरस विचार मांडण्यात आले. कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील यांनी समरसतेच्या ब्रीद वाक्यापासून ते विचार, कृतीपर्यंतचा प्रवास कथन केला. मध्येच आडकाठी आणणर्यांचे कान टोचत दादा इदाते यांचे उदाहरण दिले. समरसतेचे कार्य करणारे आम्ही कार्यकर्ते म्हणजे आम्ही नीळकंठ आहोत, हे सांगितले. चांगलं करण्यासाठी विष पचविण्याची ताकद म्हणजेच समरसता भाव असं ते म्हणाले. ‘नांदेडमध्ये संमेलन सोडा, पाऊल तर ठेऊन बघा’ असे म्हणणार्यांना संमेलन यशस्वी झाले आणि यातील व्यापक, लक्षणीय सहभाग हेच मोठे उत्तर असल्याचे त्यांनी सांगितले तेव्हा सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. साहित्य संमेलनाच्या आयोजनात अभिनव भारत शिक्षण संस्था, ज्ञानभारती विद्या मंदिराचा मोठा पुढाकार होता. इतरांचा सहभाग ही संमेलनाची ताकदच ठरली.