द बंगाल फाइल्स - जिनकी लाशों पर पग धर कर ...

11 Sep 2025 12:27:28
@महेश काळे 
The Bengal Files movie review
16 ऑगस्ट 1946ला मुस्लीम लीगच्या गुंडांनी कोलकात्यामध्ये हिंदूंचा जो नरसंहार केला, त्याचे भयानक चित्रण या चित्रपटात आहे. त्यामुळे मनाला भक्कम बनवून हा चित्रपट सर्वांनी बघायलाच हवा. भारताला स्वातंत्र्य ’बिना खड्ग बिना ढाल’ मिळाले आहे, असा गैरसमज बाळगणार्‍यांनी तर हा चित्रपट अवश्य बघायला हवा. पाकिस्तानच्या मागणीसाठी जिना याने दिलेल्या ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’च्या आदेशाची अंमलबजावणी करताना लीगच्या गुंडांनी कोलकाता, नोआखालीमध्ये जो हैदोस घातला त्याचे वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून आलेले वर्णन या निमित्ताने मोठ्या पडद्यावर आले आहे.
'द बंगाल फाइल्स’ पाहायचा असेल तर मन खरोखरीच घट्ट करून बघावा लागेल. भारताच्या इतिहासात वास्तविक घडलेल्या घटनांवर असा एखादा सिनेमा बनवणे हे तसे हिंमतीचे काम. अशी हिंमत विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांनी दाखवली आहे. मात्र हे सर्व पडद्यावर बघणे हे देखील खूप मोठ्या हिंमतीचे काम आहे. स्वातंत्र्यापूर्वी एक वर्ष अगोदर म्हणजे 16 ऑगस्ट 1946ला मुस्लीम लीगच्या गुंडांनी कोलकात्यामध्ये हिंदूंचा जो नरसंहार केला, त्याचे भयानक चित्रण या चित्रपटात आहे. पाकिस्तानच्या मागणीसाठी जिना याने दिलेल्या ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’च्या आदेशाची अंमलबजावणी करताना लीगच्या गुंडांनी कोलकाता, नोआखालीमध्ये जो हैदोस घातला त्याचे वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून आलेले वर्णन या निमित्ताने मोठ्या पडद्यावर आले आहे.
 
अतिरेकी अहिंसेच्या भोंगळ आणि विकृत तत्त्वज्ञानामुळे नपुंसक झालेला एखादा समाज आपला आत्मनाश कसा ओढवून घेतो, याचे हिंदू समाजासारखे दुसरे उदाहरण कुठले नाही. खंडित स्वातंत्र्य स्वीकारताना आपल्या लाखो बांधवांची निर्मम अशी कत्तल होत असताना हिंदू समाज किती असहाय्य होता याची जाणीव होते. मुळात ज्या पाकिस्तान नावाच्या वेगळ्या राष्ट्राच्या निर्मितीची कल्पना, जी की सात-आठ वर्षांपूर्वी कुठे चर्चेतही नव्हती ती पाहता पाहता 1947ला जिनांनी प्रत्यक्षात आणून दाखवली. त्यामागे होते ते हिंदू-मुस्लीम हे दोन्हीही स्वतंत्र आहेत, ते एकत्र कधीच राहू शकत नाहीत हे मूळ तत्त्वज्ञान. अशा आशयाचा गांधी-जिना यांच्यामधील संवाद या चित्रपटात देखील दाखवण्यात आला आहे. गांधी जिनांवर आरोप करतात की, तुम्ही मुस्लीम समुदायाचे ’ब्रेन वॉश’ केले आहे आणि जिना गांधींवर आरोप करतात की, तुम्ही हिंदू समाजाला ’हिप्नोटाईज’ केले आहे. थोडक्यात, अतिरेकी हिंसा आणि अतिरेकी अहिंसा या दोन टोकाच्या संघर्षाची परिणिती पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये झाली. मात्र ही मागणी मान्य करण्यासाठी जिनांच्या आदेशाने हिंदूंचा जो नरसंहार बंगालमध्ये झाला तो पडद्यावर पाहताना देखील मनाचा थरकाप होतो. या पृथ्वीतलावरील सर्वात विकृत आणि धर्मवेड्या समुदायाने पाकिस्तानच्या निर्मितीसाठी बंगालमधल्या हिंदूंचा जो भयानक नरसंहार केला तो पाहिल्यानंतर गांधी नावाचा ‘अहिंसेचा पुजारी’ या समुदायाकडून प्रेम, भाईचारा याची अपेक्षा कुठल्या आधारावर करत होता, हा प्रश्न मनात निर्माण झाल्यावाचून राहात नाही.
 
’डायरेक्ट अ‍ॅक्शन’ ही काही अचानक स्फुरलेली कल्पना नव्हती तर त्यासाठी किती आधीपासून तयारी झाली होती, हे या चित्रपटातून लक्षात येते. शस्त्र जमवण्यापासून ते विविध पोलीस ठाण्यांच्या हिंदू पोलिस अधिकार्‍यांना हटवण्यापर्यंत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आखणी करून हिंदूंचा हा नरसंहार घडविण्यात आला. पुस्तकांमधील आकडे काहीही सांगत असले तरी या सर्व अ‍ॅक्शनमध्ये 40 हजारापेक्षा अधिक हिंदू मारले गेले हे कागदोपत्री सिद्ध झालेले आहे. हे सर्व करत असताना पोलीस यंत्रणा, हिंदू-मुस्लीम बंधुभाव, अहिंसा तत्त्वज्ञान, न्यायव्यवस्था याची धर्मवेड संचारलेला एक समुदाय कशी पायमल्ली करतो, याचे चित्रण चित्रपटात आहे.
 
आत्यंतिक अहिंसेच्या कल्पनेतून वास्तवाकडे लक्ष गेल्यावर आपल्यावर होणार्‍या सुरुवातीच्या हल्ल्यातून सावरल्यानंतर हिंदू समाजाने देखील या सगळ्या हल्ल्यांना जबरदस्त प्रत्युत्तर दिल्याचे लक्षात येते. त्यातीलच एक प्रमुख पात्र या चित्रपटात आहे, ते म्हणजे गोपालचंद्र मुखोपाध्याय. मांसविक्रीचा व्यवसाय असलेले गोपालचंद्र समस्त हिंदू समाजाला जातीभेदाच्या भिंती तोडून एकत्रित येण्याचे प्रयत्न करतात. त्यांच्या प्रेरणेतून जागृत झालेला हिंदू समाज या हल्लेखोरांना जबरदस्त प्रत्युत्तर देतो. मात्र अपेक्षेप्रमाणे गांधीजी उपोषण करून सर्वांना शस्त्रास्त्र खाली ठेवण्याचा आदेश देतात. पण गोपालचंद्र शस्त्र खाली ठेवण्यास स्पष्टपणे नकार देतात.
 
 
प्रश्न असा आहे की, इतिहासात हे सर्व घडले होते त्यामुळे आता झाले गेले विसरून दोन्ही समुदाय मिळून नव्याने पुन्हा सुरुवात करूया अशी स्थिती आज आहे का? याचे नकारात्मक उत्तरही चित्रपटातून मिळते. कारण पाकिस्तान निर्मिती आणि त्यानंतरची डायरेक्ट अ‍ॅक्शन यामागे जे तत्त्व आणि मानसिकता होती तशाच प्रकारची मानसिकता आजदेखील शांतीवादी समुदायांमध्ये दिसून येते.
 
 
मुळात या चित्रपटाची सुरुवातच वर्तमान स्थितीतील गीता मंडल या एका पत्रकार मुलीच्या अपहरणातून सुरू होते. बंगालमधील सरदार हुसेनी नावाचा एक सत्ताधारी आमदार पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था, प्रशासन यांच्यावर वचक ठेवत जे साम्राज्य निर्माण करतो त्या साम्राज्याच्या विरोधात उभे राहणार्‍या गीता मंडलचे अपहरण आणि नंतर पोलीस अधिकार्‍यासमोरच तिची गोळ्या झाडून हत्या केली जाते. त्याच्यावर साधा एफआयआर दाखल करण्याची हिंमत देखील पोलीस यंत्रणा दाखवू शकत नाही. उलट त्याच्या चौकशीसाठी गेलेल्या शिवा पंडित या धाडसी सीबीआय अधिकार्‍याला सरदारची माफी मागण्यासाठी वरिष्ठ अधिकारी प्रवृत्त करतात. संघटित धर्मवेड्या जमावाच्या भीतीपोटी प्रशासकीय पोलीस यंत्रणा आजही कशी हतबल आहे, हे चित्रपटात दाखवले आहे.
 
 
भूतकाळातील जिना, सुरावर्दी काय किंवा आजच्या काळातील सरदार हुसेनी सारख्या प्रवृत्ती काय... या निर्माण होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे अहिंसेचे भोंगळ तत्त्वज्ञान आणि असंघटित हिंदू समाज हेच असल्याचा सूचक संदेशही या चित्रपटातून देण्यात आला आहे. तब्बल सव्वातीन तासाचा या चित्रपटाचा अधिकांश भाग हा हिंसाचाराने भरलेला आहे. हिंदू महासभेचे नेते चौधरी यांचे हिंदूंना प्रतिकारासाठी सिद्ध करण्यासाठीचे प्रयत्न, त्यामुळे मुस्लीम जमावाकडून त्यांची नंतर झालेली हत्या किंवा खाटीकखान्यातील बकर्‍यांच्या जागी लटकलेले हिंदू महिलांचे मृतदेह, रस्त्यारस्त्यांवर पडलेला प्रेतांचा खच अशा अनेक घटना बघताना संवेदनशील आणि हळवे मन विचलित होऊ शकते.
 
 
असे असले तरी मनाला भक्कम बनवून हा चित्रपट सर्वांनी बघायलाच हवा. भारताला स्वातंत्र्य ’बिना खड्ग बिना ढाल’ मिळाले आहे, असा गैरसमज बाळगणार्‍यांनी तर हा चित्रपट अवश्य बघायला हवा. अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या कवितेत म्हटल्यानुसार ’जिनकी लाशों पर पग धर कर आजादी भारत में आई’ अशा हजारो - लाखो हिंदूंच्या त्यागातून, बलिदानातून आपण स्वातंत्र्य मिळवले आहे. त्यामुळे हा चित्रपट देखील अशा बलिदानी वीरांना समर्पित केलेला आहे. चित्रपटाच्या शेवटी सत्ताधारी आमदार सरदार हुसेनी याची सीबीआय अधिकारी शिवा पंडित यांच्याकडून हत्या झाल्याचे दाखवले आहे. हा प्रसंग पाहताना एक वाक्य चटकन डोळ्यापुढे येते ’दहशतवाद हा असाच संपवावा लागतो.’
 
 
मुळात पाकिस्तान निर्मितीमागे जे तत्त्व, जी विचारप्रणाली होती त्याची मुळे अजूनही भारतात फोफावत आहेत. हा संघर्ष संपलेला नाही, तो अजून चालूच राहणार आहे असा मार्मिक संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. 14 ऑगस्टला जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हाचा प्रसंग या चित्रपटात आहे. गुलाम नावाचा लीगचा नेता 14 ऑगस्टला रात्री बारा वाजता लोकांना उद्देशून एक वाक्य म्हणतो..
 
 
'पार्टिशन अभी हुआ नही है, पार्टिशन अभी शुरू हुआ है’
...’द बंगाल फाईल्स’चा हाच महत्त्वाचा संदेश आहे.
Powered By Sangraha 9.0