तरुणांसाठी स्वदेशी सल्लागार कंपन्यांचे बळ

11 Sep 2025 13:32:18
 @ मंगल प्रभात लोढा
मंत्री, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य
भविष्यातील भारत हा आपल्या युवकांच्या कौशल्यावर अवलंबून आहे. ऊर्जा, नवकल्पना आणि मेहनत या तीन गोष्टींमुळे तरुणाईकडे भारताला विकसित राष्ट्रांच्या शर्यतीत अग्रस्थानी नेण्याची क्षमता आहे. परंतु ही क्षमता योग्य दिशेने नेण्यासाठी आपल्या धोरणांत स्वदेशी विचारांचा समावेश असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विकास विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून, आता कौशल्य क्षेत्रातील संशोधन, धोरणनिर्मिती आणि सल्लागाराची भूमिका केवळ भारतीय सल्लागार कंपन्याच पार पाडतील. हा निर्णय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारताच्या’ स्वप्नाला आणि ‘विकसित भारत 2047’ संकल्पनेला नवसंजीवनी देणारे पाऊल ठरणार आहे.

vivek
आज मी कौशल्य विकास विभागाचा मंत्री म्हणून नव्हे तर एक जागरूक नागरिक म्हणून आपल्याशी संवाद साधत आहे. कारण हा विषय केवळ सरकारच्या एका विभागापुरता मर्यादित नसून, आपल्याला ‘राष्ट्र’ म्हणून पुढे घेऊन जाणारा, आत्मनिर्भरतेच्या दिशेने मार्गदर्शन करणारा निर्णय आहे. भारतातील युवकांच्या हातात आज जगाला गवसणी घालण्याची क्षमता आहे. त्यांची ऊर्जा, ज्ञान, कार्यक्षमता ही जगातील कोणत्याही देशाशी स्पर्धा करू शकेल अशी आहे. परंतु या क्षमतेला योग्य दिशा देण्यासाठी आपल्या कौशल्य विकासाच्या धोरणांमध्ये आणि पद्धतींमध्ये भारतीय मूल्ये, भारतीय विचार आणि भारतीय दृष्टीकोन प्रतिबिंबित होणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही ठरविले आहे की, महाराष्ट्रातील कौशल्य विकास विभागाच्या सर्व संस्थांमध्ये संशोधनात्मक काम आणि सल्लागाराची भूमिका आता केवळ स्वदेशी सल्लागार कंपन्याच निभावतील.
 
 
विदेशी कंपन्यांवर अवलंबून न राहता आता स्वदेशी सल्लागार कंपन्या कौशल्य विभागाशी संलग्न होणार आहेत. या निर्णयामुळे भारतीय तरुणांना रोजगार आणि कौशल्य विकासासाठी स्वदेशी सल्लागार कंपन्यांचे थेट योगदान लाभणार आहे. महाराष्ट्रातील सर्व आयटीआयमध्ये रोजगारासंबंधी संशोधन, धोरण निर्मिती, अभ्यासक्रमाची आखणी आणि कार्यशाळांचे नियोजन, या सर्व गोष्टींमध्ये भारतीय कंपन्यांचा सहभाग असेल. हा बदल म्हणजे आपल्या युवकांच्या भविष्याकडे स्वदेशी दृष्टीकोनातून पाहण्याचा निर्धार आहे.
 

vivek (फोटो सौजन्य : google) 
 
‘आत्मनिर्भर भारत’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला मंत्र आता ‘स्किल्ड इन इंडिया’च्या प्रवासाला नवी दिशा दाखवतो आहे. भारतीय स्टार्टअप संस्कृती आणि कन्सलटन्सी कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत दाखवून दिलेल्या गुणवत्तेमुळे हा निर्णय अधिक सक्षम ठरतो. त्यामुळे येणार्‍या काळात नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळ आणि या माध्यमातून ‘विकसित भारत 2047’ या राष्ट्रीय स्वप्नाच्या दिशेने वाटचाल अधिक वेगाने होईल, याबाबत विश्वास आहे.
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात कौशल्य क्षेत्रात आधुनिकीकरण आणि अत्याधुनिक बदल घडवून आणले जात आहेत. परंतु या बदलांच्या प्रवासात भारतीय मूल्ये जपली गेली पाहिजेत. म्हणूनच स्वदेशी कंपन्यांचा सहभाग हा आमचा ठाम निर्धार आहे. कौशल्य विकास विभागाने घेतलेला हा निर्णय रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, विविध रोजगार सेवा योजन कार्यालये आणि कौशल्य विकास विभागाच्या इतर सर्व संस्थांमध्ये अंमलात आणला जाणार आहे.
 
 
आज आपल्याला केवळ रोजगारनिर्मिती नाही तर दर्जेदार, स्पर्धात्मक आणि नैतिक मूल्यांनी सज्ज असे कुशल कारागीर तयार करायचे आहेत. हे कारागीर जगाच्या बाजारपेठेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. तेव्हा स्वदेशी कन्सलटन्सी कंपन्यांचा सहभाग हा केवळ एक प्रशासकीय निर्णय न राहता राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने उचललेले ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.
 
 
या निर्णयातून आपल्या युवकांना केवळ कौशल्य नव्हे तर आत्मविश्वास देखील मिळणार आहे. आपणही जगाला काही देऊ शकतो ही भावना त्यांच्या मनामध्ये रुजणार आहे. यामुळे रोजगाराचा प्रश्न सुटेलच, त्याचबरोबर नवोन्मेष, संशोधन आणि तंत्रज्ञानात भारतीय तरुण आपली स्वतंत्र छाप उमटविण्यास सज्ज होणार आहेत. आपल्या राज्यातील कौशल्ययुक्त कारागिरांच्या हातातील कला, आपल्या अभियंत्यांचे संशोधन, आपल्या स्टार्टअप्सची धडाडी या सर्व गोष्टी स्वदेशी कन्सलटन्सींच्या मार्गदर्शनाने अधिक प्रभावी ठरतील. गावोगावी, शहरांमध्ये कौशल्य विकासाची नवी ऊर्जा केंद्रे उभे राहतील. महिला, युवक, वंचित घटक अशा सर्वांना या नव्या दृष्टीकोनाचा लाभ होईल.
 
 
आज आपण जे निर्णय घेत आहोत ते उद्याच्या पिढ्यांच्या स्वप्नांना बळ देणारे आहेत. स्वदेशी संकल्पनेच्या माध्यमातून आपण केवळ आर्थिक आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत नाही, तर आपल्या संस्कृतीचा, आपल्या विचारांचा आणि आपल्या अभिमानाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. माझा ठाम विश्वास आहे की, भारतीय युवक जेव्हा स्वदेशी कन्सलटन्सींच्या मार्गदर्शनाखाली कौशल्यसंपन्न होतील, तेव्हा आत्मनिर्भर भारताचा, ‘मेक इन इंडिया’ पासून ‘स्किल्ड इंडिया’पर्यंतचा प्रवास जगाला एक नवा संदेश देईल. आत्मनिर्भरतेच्या दिशेने मार्गक्रमण करणारा भारत विकसित होऊन विश्वगुरू बनलेला असेल.
 
Powered By Sangraha 9.0