बौद्ध व हिंदू धर्मातीलजैविक नातेसंबंध!

12 Sep 2025 15:33:43
@रवींद्र माधव साठे
 
 
Buddhism
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 23 सप्टेंबर 1956 रोजी आपण अनुयायांसह येणार्‍या विजयादशमीला बौद्ध धर्म स्वीकारणार असल्याचे प्रसारमाध्यमातून अधिकृतपणे जाहीर केले. हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असे त्यांनी म्हटले होते. मात्र बाबासाहेबांनी स्वीकारलेला बौद्ध धर्म आणि हिंदू धर्माचे जैविक नाते होते याचे विवरण करणारा लेख.
इ.स. पूर्व सहावे शतक हे जागतिक इतिहासातील महत्त्वाचे शतक म्हणून ओळखले जाते. सर्व जगभर या काळात वैचारिक क्षेत्रात महत्त्वाच्या घटना घडल्या. इराणमध्ये झरतुष्ट्र, चीनमध्ये कन्फ्युशियस आपला प्रभाव पाडत होते. आत्मज्ञानप्राप्तीसाठी ज्ञानमार्ग श्रेष्ठ असून भौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक बल वाढविण्याचे प्रयत्न सुरू होते. भारतात या काळात, हिंदू धर्मातील विषमता, आचारपद्धतींमधील कृत्रिमता, यज्ञयागांचे स्तोम या दोषांमुळे भारतीय समाज ग्रासला होता. याच सुमारास भारतात जैन व बौद्ध धर्माचा उदय झाला.
 
 
बौद्ध धर्म हा हिंदू धर्मापासून फारकत घेऊन निर्माण झाला. मात्र त्याची तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, आध्यात्मिकता, परमार्थ व अनुभवाधारित शोध या क्षेत्रांमध्ये हिंदू धर्माशी अंतर्गत नाळ जोडली होती. या दोन्ही धर्ममतांच्या अनुयायांमध्ये वैचारिक भेद निश्चित होते. परंतु जगातील इतर धर्मांप्रमाणे त्यांच्यात कधीही न सुटणारा वैमनस्य भाव निर्माण झाला नाही, हे विशेष आहे. याचे मुख्य कारण हिंदू धर्माची सर्वसमावेशकता व परधर्मसहिष्णुता ही वैशिष्ट्ये. हिंदू धर्माने आपल्या व्याप्तीत मोठ्या प्रमाणात अपारंपरिक विचारांना सामावून घेतले. बौद्ध व जैन धर्मांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली तरी ते येथील विविधतेचा एक भाग म्हणूनच राहिले. हिंदू धर्म हा भारतातील सर्व धर्मांपेक्षा प्राचीन आहे हे ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे.
 
 
कॅरेन आर्मस्ट्राँग या विदुषीने ‘बुद्ध’ हे चरित्र लिहिले आहे. ती या पुस्तकात बुद्धाविषयी म्हणते, बुद्ध त्यांच्याकडे आलेल्यांना सांगे की मी धम्म शिकवतो. कोणत्या प्रसंगी कसे वागावे हे सांगतो. पण हा धम्म मी शोधून काढलेला नाही. माझ्या आधीपासूनच धर्म अस्तित्वात आहे. कारण माणूस, प्राणी व देव या सर्वांना तो लागू आहे. सृष्टी आणि धर्म दोन्ही बरोबरच अस्तित्वात आली आहेत. मी धर्माच्या बाबतीत काही केले असेल तर एवढेच की हा धर्म विस्मरणात गेला होता. तो मी पुन्हा जागा केला. सत्याचा शोध करताना गौतमाला जुने सत्य नव्याने सापडले होते, हे सत्य सापडल्याने तो बुद्ध झाला होता.
 

Buddhism 
 
हिंदू आणि बौद्ध धर्माच्या अनुयायांनी नेहमी परस्पर मतांचा आदर केला. क्षुल्लक अपवाद वगळता हिंदू राजांनी बौद्ध व जैन धर्मास नेहमी संरक्षण दिले व याचे अनेक ऐतिहासिक दाखले उपलब्ध आहेत.
 
 
भगवान गौतम बुद्ध हे विष्णूचा शेवटचा अवतार आहेत, असे अनेक हिंदू मानतात. हुआन श्वांग हा चिनी यात्रेकरू भारतात आला होता. तो लिहितो, नालंदा विद्यापीठात शिकणारे दहा हजार विद्यार्थी केवळ बौद्ध साहित्याचा अभ्यास करत नव्हते तर त्याचबरोबर अथर्ववेद, तर्कशास्त्र, व्याकरण, सांख्य तत्त्वज्ञान या विषयांची तिथे नित्य प्रवचने होत. तत्कालीन राजांनी विद्यार्थ्यांसाठी केवळ वास्तू व वसतिगृहे निर्माण केली नाहीत तर तेथील शिक्षकांसाठी साहित्यही उपलब्ध करून दिले. या राजांपैकी बहुतेक राजे हिंदू होते. (एन्शंट इंडिया, आर. सी. मजुमदार, पृष्ठ 455.)
 
 
कृ. अ. केळुसकर यांनी ‘गौतमबुद्धाचे चरित्र’ लिहिले. हे पुस्तक वाचल्यावर माझ्यात काही निराळाच प्रकाश पडला, असे डॉ. आंबेडकर म्हणत. केळुसकर लिहितात, बुद्ध धर्मास अशोक व कनिष्क या दोन सार्वभौम प्रतापी राजांचा आश्रय मिळाल्यामुळे त्याचा प्रसार हिंदुस्थानात सर्वत्र झाला. परंतु बुद्ध धर्मामुळे ब्राह्मणी धर्माचा र्‍हास झाला असे समजता कामा नये. हे दोन्ही धर्म अशोक राजाच्या वेळापासून इसवी सनाच्या आठव्या शतकांपर्यंत सुमारे एक हजार वर्षे एकमेकांशी चढाओढ करीत असत, असे पुष्कळ गोष्टीवरून मानण्यास आधार आहे. कित्येक राजे बुद्ध धर्माचे अभिमानी निपजले तसेच कित्येक राजे ब्राह्मणी धर्माचे अभिमानी निपजले.... इ.स. 399 पासून 413 पर्यंत फाहायम नामक एक बुद्धधर्मानुयायी चिनी यात्रेकरू येथे चोहीकडे फिरला. त्याने स्वप्रवासवृत्त लिहून ठेवले आहे. त्यावरून असे कळते की, सदरील शतकात ब्राह्मणी धर्माचे गुरू व बौद्ध धर्माचे गुरू यास सारखाच मान असून ब्राह्मणांच्या देवळालगत बौद्धांचे धर्ममठ असत... अनेक बौद्धधर्मीय व ब्राह्मणीधर्मीय राजे त्यांचा धर्म कोणताही असो, सर्व पंथांच्या लोकास दानधर्म करत असत. (पृष्ठ. 264, 265)
 
 
डॉ. उपिंदर सिंग या अलीकडच्या काळातील प्रसिद्ध इतिहासकार. त्या आपल्या पुराव्यांशी प्रामाणिक आहेत. त्या लिहितात, प्राचीन बुद्धकालीन कोरीव शिल्पांत, यक्ष, यक्षिणी, नाग आणि नागिणीसारख्या हिंदूच्या सांस्कृतिक व अलंकारिक प्रतीकांचे प्रतिबिंब आढळते. बौद्ध स्तूपांमध्ये वारंवार आढळणारे एक चिन्ह म्हणजे नंदीपादाचे वृषभचिन्ह. गुप्तकालीन राजे हिंदू धर्माचा प्रचार करीत पण ते बुद्ध धर्मासही संरक्षण देत. परमार्थ हा बौद्ध विद्वान होता. तो लिहितो की, विक्रमादित्याने आपली राणी व राजपुत्रास वसुबंधु या बौद्ध विद्वानाकडे, अभ्यास करण्यासाठी पाठविले. त्यानंतरच्या काळात कुमार गुप्त आणि बुधगुप्त यांनी नालंदा येथे बौद्ध मठ बांधले. पुढे हर्षवर्धन, पलस व चौलांनी जैन व बौद्धांच्या आस्थापनांचे संरक्षण व संवर्धन केले. (ए हिस्टरी ऑफ एन्शंट अँड मेडिएवल इंडिया, डॉ उपिंदर सिंग, पृष्ठ 463, 521).
 
 
बिनय बहल हे नामवंत चित्रपट निर्माते व कला इतिहासकार आहेत. त्यांनी भारतातील प्राचीन काळातील धार्मिक स्थळांवर संशोधनपूर्ण अनुबोधपट बनवले आहेत. ते म्हणतात की, बुद्ध धर्माचा भारतात जेव्हा पूर्णपणे प्रभाव होता, त्यावेळी सुद्धा हिंदू धर्म हा साहाय्यभूत भूमिकेत होता. इ.स. पूर्व आठव्या शतकात, या भूमीतील प्राचीन तत्त्वज्ञानाच्या परंपरांमधून उपनिषदांची रचना झाली. उपनिषदांमधील अंतर्भूत विचार हे पुढील सर्व प्रमुख भारतीय धर्मांचा पाया ठरले. बौद्ध व जैन यांनी या दोघांनीही उपनिषदकालीन तत्त्वज्ञान शिकविले आहे. त्या शिकवणीत उल्लेखनीय साधर्म्य आढळते. बौद्ध व जैन कलाकृतीत दिसणारी पहिली औपचारिक देवता म्हणजे दोन्ही बाजूंनी हत्तींकडून पाण्याचा अभिषेक घेणारी गजलक्ष्मी आहे. यक्षिणीप्रमाणे ती ही निसर्गाच्या विपुल समृद्धीचे प्रतीक आहे. शुंगकाळात विदिशाजवळ सांची आणि बारहट येथे स्तूप व उत्तम बौद्ध कलाकृती तयार झाल्या. सातवाहन राजे वैदिक धर्माचे कट्टर अनुयायी होते. परंतु त्यांनी परधर्मीयांचा छळ केला नाही उलट त्यांना आश्रय व दान दिले. उत्तर भारतीय गुप्तकालीन राजवटीत नालंदा विद्यापीठ व बोधगया येथील महाबोधी मंदिर निर्माण झाले. (द ग्रेट हिंदू सिव्हिलायझेशन: अचिव्हमेंट, निग्लेक्ट, बायस अँड द वे फॉरवर्ड - पवन वर्मा, पृष्ठ 26, 27.)
 
 
गौतम बुद्ध आणि हिंदू धर्म या दोघांमध्ये मूलभूत फरक फारच थोडा आहे, हे आनंद कुमार स्वामी व ओल्डनबर्ग या संशोधकांनी दाखवून दिले आहे. हिंदू धर्माप्रमाणेच गौतम बुद्ध सुद्धा जीवन-मरणाच्या म्हणजेच दुख:मय जीवनाच्या फेर्‍यातून सुटका ही जीवनाची इतिकर्तव्यता समजतो.
 
 
हिंदू आणि बौद्ध धर्मात अनेक समानता आहेत, ज्यात त्यांची उत्पत्ती, कर्मावरील श्रद्धा, पुनर्जन्म आणि नैतिक जीवन जगण्याचे महत्त्व यांचा समावेश आहे. इ.स. 8व्या शतकात हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन केल्याचे श्रेय ज्या आदि शंकराचार्यांना दिले जाते त्यांना हिंदू धर्मातील टीकाकारांनी ‘क्लेप्टो’ बुद्ध असे त्याकाळी संबोधले. दोन्ही धर्म आध्यात्मिक मुक्ती आणि नैतिक आचरणाच्या शोधावर भर देतात. ते ध्यानासारख्या पद्धतींचा देखील समावेश करतात आणि वास्तवाच्या स्वरूपाबद्दल समान तात्त्विक दृष्टीकोन बाळगतात.
 
 
दोन्ही धर्मांमध्ये, कर्माची संकल्पना महत्त्वाची भूमिका बजावते. कर्म म्हणजे कृती आणि त्यांचे परिणाम, आणि ते एखाद्याच्या भविष्यातील अस्तित्वावर प्रभाव पाडते. चांगले कर्म सकारात्मक परिणामांना जन्म देते, तर वाईट कर्म नकारात्मक परिणामांना जन्म देते.
 

Buddhism 
 
पुनर्जन्म ही आणखी एक सामायिक श्रद्धा आहे. हिंदू आणि बौद्ध धर्माचे अनुयायी जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्माच्या चक्रावर विश्वास ठेवतात. संसार म्हणून ओळखल्या जाणार्‍या या चक्रातून मुक्त होणे आणि मुक्ती (हिंदू धर्मात मोक्ष आणि बौद्ध धर्मात निर्वाण) प्राप्त करणे हे ध्येय आहे. याव्यतिरिक्त, दोन्ही परंपरांमध्ये नैतिक आचरणावर भर दिला आहे. हिंदू धर्म, धर्म म्हणून ओळखल्या जाणार्‍या आचारसंहितेचे पालन करतो, तर बौद्ध धर्म अष्टांगिक मार्ग मांडतो, ज्यामध्ये योग्य समज, योग्य हेतू, योग्य भाषण, योग्य कृती, योग्य उपजीविका, योग्य प्रयत्न, योग्य सजगता आणि योग्य एकाग्रता यांचा समावेश आहे.
 
 
गौतम बुद्धांच्या सांगण्याप्रमाणे, जीवन दुःखमय असते त्याचे कारण तृष्णा आहे. कारण जेथे वासना तेथे आसक्ती असलीच पाहिजे. आसक्तीमुळे बोधी वा मुक्ती मिळविण्यात अडचणी येतात आणि बोधी नाही म्हणजे नवा जन्म पाठोपाठ आलाच आणि दुःख, शोक, जरा, व्याधी, मृत्यू हे ओघाने आलेच.
 
 
ही दुःखपरंपरा मुळात अज्ञानामुळे सुरू होते. म्हणून जीवनचक्राचे आद्य कारण अज्ञान होय. बुद्धाच्या काळात अनेक तपस्व्यांना अज्ञानाऐवजी तृष्णा हे आद्य कारण वाटत होते. उपनिषदे व सांख्यांच्या मते अज्ञान हे आद्य कारण होते. अज्ञानाने पछाडल्याने जीव मुक्तिमार्गाकडे वळत नाहीत, असे उपनिषदे म्हणतात व सांख्यही म्हणतात. बुद्धाने तृष्णा व अज्ञान या दोन्ही बाबी एकत्र केल्या.
 
 
तुझी खरी ओळख जे तुझ्या अंतर्यामी आहे ती आहे. जे जे दिसते त्याच्या पलीकडे जे आहे तेच खरा ’तू’. ’तू’ सर्वत्र भरून आहेस, त्याला जन्म नाही व जन्म नाही म्हणून मृत्यू नाही, ही नवी आध्यात्मिक शिकवणूक लोकांमध्ये बुद्धकाळात प्रिय होत होती. अर्थात ही नवी शिकवणूक आपल्या बाजूने वेदांचीच साक्ष काढत होती. परंतु तो वेदांचा मूळ अर्थ नव्हता तर वेदांचा तो नवा अन्वयार्थ होता. हे सर्व तत्त्वज्ञान उपनिषदांमध्ये ग्रथित झाले आहे. यज्ञयागाने नव्हे तर ब्रह्म अनुभवल्याने मोक्ष मिळतो. जन्ममरणाचा फेरा संपुष्टात येतो. ही नवी शिकवणूक उपनिषदांमुळे रुढ झाली. बुद्धावर या शिकवणुकीचा खूप प्रभाव होता.
 
 
प.ल. वैद्य हे बौद्ध धर्माचे एक अभ्यासक. ते लिहितात, बौद्धधर्मातील निर्वाणाचा मार्ग आणि वैदिक धर्मामधील वानप्रस्थांचा आणि यतींचा मोक्षमार्ग यांत पुष्कळ साम्य आहे. वानप्रस्थ आणि यती यांचे संसाराविषयी वैराग्य हे बौद्धभिक्षूच्या अंगी पूर्णपणे बाणावेच लागतात. वानप्रस्थाने करावयाचे यज्ञयाग व वेदप्रामाण्य आणि यतीची वेदप्रामाण्यावरची श्रद्धा ही वर्ज्य केली तर, बौद्ध भिक्षू आणि वैदिक यतिवानप्रस्थ यांमध्ये काहीच भेद दिसणार नाही इतके हे दोन धर्म जवळ जवळ आहेत.
 
 
बौद्धांच्या मते संसार हा दुःखस्वरूप आहे; मरणोत्तर अर्हतांचे काहीही मागे उरत नाही. अशा तर्‍हेने मरणोत्तर त्यांना प्राप्य असे काही नसल्यामुळे जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत ते या जगातील अत्युच्च आनंदाचा सुखाचा अनुभव घेत राहतील, आणि तसे ते ध्यानमग्न राहतातही. या अवस्थेला वैदिक पंथात जीवन मुक्ती असे नाव दिले आहे.
 
 
उपनिषदांतील तत्त्वज्ञानात जीवनमुक्तीची कल्पना जुनी आहे, पण नंतरच्या वेदान्तात क्रममुक्तीची जी कल्पना आहे, ती बौद्धांच्या क्रमाने प्राप्त होणार्‍या निर्वाणाच्या कल्पनेसारखीच आहे.
 
 
जरी उपनिषदांतील ब्रह्मात्म्यैक्य किंवा ब्रह्मनिर्वाण हे बौद्धांच्या निर्वाणापेक्षा निराळे असले तरी कामापासून सुटका झाल्याशिवाय मोक्ष किंवा निर्वाण नाही हे मत दोहोंतही सारखेच आहे. दोन्हीही पंथांमध्ये निर्वाणमार्ग हा त्या वेळच्या तपस्वी लोकांच्या आचाराचाच एक प्रकार आहे, त्यास ब्रह्मचर्य म्हणतात; या ब्रह्मचर्याचरणाशिवाय निर्वाण प्राप्त होणार नाही. (बौद्ध धर्माचा अभ्युदय आणि प्रसार- प.ल. वैद्य, प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई, पृष्ठ 65-71.)
 
 
बौद्धधर्मामध्ये ध्यानाचे जे प्रकार सांगितले आहेत व जी पूर्वतयारी सांगितली आहे, त्यांचे वैदिक ध्यान किंवा सांख्य व योग या पंथांतील ध्यान व पूर्वतयारी यांशी बरेच साम्य आहे.ध्यान ही दोन्ही धर्मांमध्ये एक सामान्य पद्धत आहे. आध्यात्मिक वाढ, आत्म-साक्षात्कार आणि आंतरिक शांती मिळविण्यासाठी ते एक साधन म्हणून वापरले जाते. हिंदू आणि बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान जगाच्या भ्रामक स्वरूपावर आणि सांसारिक इच्छांच्या पलीकडे जाण्याचे महत्त्व यावर चर्चा करते.
 
 
भारतीय संविधानाच्या कलम 25च्या अनुच्छेद दोन मधील स्पष्टीकरण आणि 1947 नंतरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांमध्ये हिंदू, बौद्ध, जैन धर्म आणि मध्ययुगीन काळात उदयास आलेला शीख धर्म यांच्यातील जैविक परस्परसंबंध आहे याची पुष्टी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाह कायदा (1955) संदर्भात निर्णय देताना या तत्त्वाला मान्यता दिली की, ज्यावेळी ‘हिंदू’असा उल्लेख होईल त्यांत बौद्ध, जैन किंवा शीख धर्मीय व्यक्तींचाही नेहमी समावेश समजला जाईल.
 
 
बौद्ध धर्म आणि जैन धर्म हे हिंदू धर्मातून उदयास आलेले विलक्षण प्रबुद्ध असे उपप्रवाह होते व एका व्यापक हिंदू सांस्कृतिक भावविश्वाचा भाग होते. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी गौतम बुद्धांनी हिंदू धर्माचे शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचे मत व्यक्त केले होते. महास्थविर चंद्रमणी आणि इतर काही भिक्षूंनी धर्मांतराच्या दीक्षा समारंभाच्या वेळी जे पत्रक प्रसिद्ध केले त्यांत हिंदू धर्म व बौद्ध धर्म या एकाच वृक्षाच्या फांद्या आहेत असे म्हटले होते.
 
 
डॉ. र्‍हिस डेव्हिस हे बौद्ध धर्माचे अभ्यासक. ते गौतम बुद्धांविषयी लिहितात, गौतम हा हिंदू म्हणून जन्मास आला. हिंदू म्हणून जगला व हिंदू म्हणून मृत्यू पावला. त्याची शिकवणूक जरी दूरवर परिणाम करणारी व स्वतंत्र असली, प्रचलित धर्माचे विद्ध्वंसन करणारी असली तरी ती सर्व दृष्टींनी भारतीयच होती. तो सर्व हिंदूंत थोर, शहाणा आणि उत्कृष्ट हिंदू होता. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखक- धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन, पृष्ठ 579.)
 
हिंदू समाजातील विषमता व जातीयतेविरुद्ध लढा देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935 मध्ये, मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा केली होती. परंतु त्यांनी भारतीय भूमीतच जन्मलेल्या व येथील भावविश्वाशी नाळ जोडलेल्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला, म्हणून बाबासाहेबांबद्दल आपण सदैव कृतज्ञ असले पाहिजे.
 
 
लेखक महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठानाचे सचिव आहेत.
Powered By Sangraha 9.0