‘सेवाभाव’, ‘संकल्पातून सिद्धी’ आणि ‘स्वदेशी’ची अमृतमहोत्सवी जीवनयात्रा

13 Sep 2025 15:44:29
@अश्विनी वैष्णव (केंद्रीय रेल्वे आणि माहिती-प्रसारण मंत्री)

Narendra Modi  
17 सप्टेंबर रोजी येणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस म्हणजे भारताला जागतिक स्तरावर एक नवीन ओळख मिळवून देणार्‍या विचारधारेचा उत्सव आहे. मोदींसाठी राष्ट्र हेच कुटुंब आहे आणि जनतेची सेवा हाच त्यांचा धर्म आहे. सेवावृत्ती, संकल्पातून सिद्धी आणि स्वदेशीच्या भावनेने भारलेला त्यांचा जीवनप्रवास कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देणारा आहे.
ज्याने देशाच्या राजकारणाची आणि विकासाची दिशा बदलली आहे, असे नेतृत्व आज भारताला लाभलेले आहे. एका नवीन भारताचा पाया रचून, लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्यास या नेतृत्वाने चालना दिली आहे. या नेतृत्वाने भारताला जागतिक स्तरावर नवीन उंची प्राप्त करून दिली आहे.
 
 
भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन अशा एका प्रवासाचे प्रतीक आहे की, जिथे एका सामान्य कुटुंबातील सदस्य ‘संकल्प’ आणि ‘सेवाभावा’मुळे संपूर्ण जगातील सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय नेता बनला आहे.
 
 
कठीण परिस्थितीत वाढलेले पंतप्रधान बालपणापासूनच सेवा आणि शिस्तीच्या भावनेने भारलेले होते. तरुणपणीच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले आणि एक प्रचारक आणि कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपले जीवन संघटनेला समर्पित केले. संघसंस्कारांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वावर देशभक्ती, संघटनकौशल्य आणि त्याग या मूल्यांचा खोलवर संस्कार झाला. याच संस्कारांमुळे पुढे राजकीय जीवनात त्यांची स्वतःची अशी ओळख निर्माण झाली.
 

Narendra Modi  
 
2001 पासून सुमारे 13 वर्षे त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळली. या काळात त्यांनी औद्योगिक विकास, पायाभूत सुविधा आणि सुशासन या क्षेत्रांत कारभाराचे एक आदर्श प्रारूप (मॉडेल) म्हणून गुजरातची नवीन ओळख प्रस्थापित केली. त्यांनी ’जनसहभाग’ हा प्रशासनाचा आधार बनवला आणि ’विकास’ केंद्रस्थानी ठेवून प्रशासन चालवले. मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत केलेल्या लक्षणीय आणि प्रभावी कामगिरीने त्यांना राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले आणि 2014 मध्ये ते देशाचे पंतप्रधान झाले.
 
Narendra Modi
 
2014 च्या निवडणुका भारतीय राजकारणाला कलाटणी देणार्‍या ठरल्या. पंतप्रधान मोदींनी ’सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र दिला आणि पहिल्याच कार्यकाळात अनेक ऐतिहासिक उपक्रम हाती घेतले. ’जन धन योजने’ने लाखो गरीब कुटुंबांना पहिल्यांदाच बँकिंग व्यवस्थेशी जोडले. ’स्वच्छ भारत अभियाना’ने स्वच्छतेला एक लोकचळवळ बनवले. ’उज्ज्वला’ योजनेने गरीब महिलांना ‘धूरमुक्त स्वयंपाकघर’ दिले. ’स्टार्टअप इंडिया’ने तरुणांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला. पंतप्रधान मोदींनी जनता आणि सरकार यांच्यात थेट संवाद स्थापित केला आणि सामान्य नागरिकाला प्रशासनाच्या प्रवाहात सक्रिय भागीदार बनवले.
 
2019 मध्ये ते पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने देशाचे पंतप्रधान बनले. या कार्यकाळात त्यांनी अनेक धाडसी पावले उचलली. कलम 370 रद्दबातल ठरवून त्यांनी काश्मीरला मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे ऐतिहासिक कार्य केले. तिहेरी तलाक कायदा रद्द केल्याने मुस्लीम महिलांना न्याय आणि प्रतिष्ठा मिळाली. ‘आयुष्मान भारत’ योजनेने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आरोग्यसुरक्षा प्रदान केली. याच काळात ’जल जीवन मिशन’ सुरू करण्यात आले, ज्यामध्ये प्रत्येक घरात नळाने पाणी पोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. या उपक्रमांमुळे हे स्पष्ट झाले की, पंतप्रधान मोदींचा उद्देश केवळ धोरणे तयार करणे हा नसून तर जमिनीवरील परिवर्तन हा आहे.
 
 
ऐतिहासिक तिसर्‍या कार्यकाळात पंतप्रधान मोदीजींनी 2047 पर्यंत भारताला ‘विकसित भारत’ करण्याचा संकल्प सोडला. आज ’डिजिटल इंडिया’मुळे शासकीय सेवा पारदर्शक आणि सुकर झाल्या आहेत. हरित ऊर्जा (ग्रीन एनर्जी) आणि ‘राष्ट्रीय हायड्रोजन मिशन’मध्ये भारताला स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रणी म्हणून प्रस्थापित करण्याची क्षमता आहे. ‘गती शक्ती योजने’ने पायाभूत सुविधांच्या विकासाला एका नवीन उंचीवर नेले आहे. उत्तरेला चिनाब पूल, दक्षिणेला पंबन पूल, पश्चिमेला 2027 मध्ये सुरू होणारी देशातील पहिली बुलेट ट्रेन, आणि स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर ईशान्येकडील मिझोरामला राजधानी दिल्लीशी जोडणारा बैराबी-सैरांग रेल्वेमार्ग ही सर्व मोदीजींच्या दूरदर्शी विचारसरणी आणि दृढ निश्चयाची फलश्रुती आहे.
 
 
 
मोदीजींचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाशी थेट संपर्क साधून केलेले काम. ’परीक्षा पे चर्चा’ या माध्यमातून ते विद्यार्थ्यांशी मित्र, तत्त्वज्ञानी आणि मार्गदर्शक म्हणून संवाद साधतात; त्यांना आत्मविश्वासयुक्त आणि तणावमुक्त राहण्याची प्रेरणा देतात. ’उज्ज्वला’ आणि ’मातृत्व लाभ’ योजना आणून त्यांनी महिलांचे जीवन सुरक्षित आणि सुकर केले.
 

Narendra Modi  
 
मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना गृहनिर्माण योजना आणि कररचनेत सुधारणांद्वारे दिलासा देण्यात आला. प्रथम प्राप्तीकर आणि आता जीएसटीमध्ये सवलत देऊन मोदीजींनी आगामी सणांचा उत्साह आणखी वाढवला आहे. पंतप्रधान-किसान सन्माननिधी आणि कृषी विमा योजनांद्वारे शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यात आली. मुद्रा कर्ज आणि डिजिटल व्यवहारांसारख्या विविध सुविधांद्वारे लहान व्यापार्‍यांसाठी व्यवसाय सुलभ करण्यात आला.
 
मोदीजींचे व्यक्तिमत्त्व राष्ट्रीय सीमांच्या पलीकडेही तितकेच प्रभावी राहिले आहे. आज त्यांची गणना जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये केली जाते. अमेरिका, युरोप, जपान, ऑस्ट्रेलियापासून ते आफ्रिकन राष्ट्रांपर्यंत त्यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी यांची प्रशंसा केली जाते. त्यांनी जी 20, ब्रिक्स, क्वाड, एससीओ या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताचा आवाज बुलंद केला आहे. ‘आंतरराष्ट्रीय सौर आघाडी’ (इंटरनॅशनल सोलर अलायंस) आणि ‘मिशन लाईफ’सारखे उपक्रम भारताला जागतिक पर्यावरण संवर्धन क्षेत्रात मार्गदर्शकाच्या भूमिकेत घेऊन जात आहेत. आतापर्यंत 27 देशांनी आपल्या सर्वोच्च नागरी सन्मानाने मोदींना सन्मानित केले आहे.
 
राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर त्यांची कामगिरी बहुपेडी आहे. कोविड-19 महामारीच्या काळात लस मैत्री उपक्रमाने जगाला भारताच्या मानवतेचे दर्शन घडविले. 2023 मध्ये संपन्न झालेली जी-20 शिखर परिषद ही भारताच्या राजनैतिक यशाचे एक उदाहरण. चांद्रयान-3 आणि गगनयान मोहिमांनी अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारताला आघाडीच्या देशांमध्ये स्थान मिळवून दिले. युपीआयद्वारे डिजिटल पेमेंटमध्ये जगात भारत आज आघाडीवर आहे आणि कोट्यवधी लोक त्याचा लाभ घेत आहेत.
 
 
सेवा हेच पंतप्रधान मोदी यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे. त्यांनी नेहमीच सत्तेकडे सेवा आणि त्यागाची संधी म्हणून पाहिले आहे. संकल्पातून सिद्धीकडे हा त्यांच्या कार्यशैलीचा पाया आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ असो किंवा ’आत्मनिर्भर भारत’चा संकल्प असो, त्यांनी प्रत्येक ध्येय साध्य करण्यासाठी लोकसहभाग आणि प्रबळ इच्छाशक्ती यांनाच आधार बनविले आहे. ’व्होकल फॉर लोकल’ आणि ’मेक इन इंडिया’ सारख्या अभियानामध्ये त्यांचा स्वदेशी आणि स्वावलंबनाचा आग्रह स्पष्टपणे दिसून येतो. आज भारत संरक्षण, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर्ससारख्या क्षेत्रांत स्वावलंबी होत आहे आणि जागतिक उत्पादन आणि निर्यात केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस म्हणजे भारताला जागतिक स्तरावर एक नवीन ओळख मिळवून देणार्‍या विचारधारेचा उत्सव आहे. मोदींसाठी राष्ट्र हेच कुटुंब आहे, आणि जनतेची सेवा हाच त्यांचा धर्म आहे. सेवावृत्ती, संकल्पातून सिद्धी आणि स्वदेशीच्या भावनेने भारलेला त्यांचा जीवनप्रवास कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देणारा आहे.
Powered By Sangraha 9.0