उत्तराखंडातील दिव्य देसम् स्थाने

15 Sep 2025 13:18:20
Divya Desam
दिव्य देसम् मंदिरांतील वदनाडू म्हणजे तामिळनाडूच्या उत्तरेकडील मंदिरांचा मागोवा गेल्या काही लेखांतून आपण घेत आहोत. आजच्या लेखात आपण उत्तराखंडातील तीन दिव्य देसम् मंदिरांची माहिती घेणार आहोत.
उत्तराखंड... हिमालयाच्या कुशीत असणारे हे अत्यंत मनमोहक राज्य, साक्षात देवभूमी. पवित्र हिमालयाच्या सान्निध्यातील खूपच दैवी स्थाने इथे आहेत. हा प्रदेश म्हणजे भूतलावरील स्वर्गच जणू! वर्षातील बारा महिने खळाळत वाहणार्‍या नद्या, अत्यंत समृद्ध आणि हिरव्यागार वनश्रीने नटलेली खोरी आणि त्यांना चोहोबाजूंनी वेढणार्‍या, बर्फाच्छादित शिखरांनी सजलेल्या हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगा आणि अतिशय मनोहारी रंगीबेरंगी फुले, पक्षी यामुळे हिमालय मानवाला युगानुयुगे जबरदस्त मोहिनी घालतोय. उत्तराखंडातील शिवालिक व मध्य हिमाचल रांगांनी (सेंट्रलक्सीस ऑफ हिमालया) नटलेल्या हिरव्यागार दर्‍याखोर्‍यातील अनवट निसर्ग आपल्याला भुरळ पाडतो. त्याचबरोबर हिमालय आपल्याला रौद्रतेचीही जाणीव करून देतो.
 
 
ही देवभूमी गढवाल व कुमाऊँ या दोन भागांत विभागली आहे. दोन्ही प्रदेशांमध्ये अत्यंत वैविध्य आहे. उत्तराखंडातील महत्त्वाची तीर्थस्थाने ही गढवाल भागात एकवटली आहेत. ’छोटा चारधाम’ ही उत्तराखंडाची सगळ्यांत प्रसिद्ध यात्रा. बघताक्षणी भोवळ यावी अशा खोल दरींमधून फेसाळत वाहणार्‍या गंगा आणि यमुना या नद्यांनी ही देवभूमी समृद्ध केली आहे. कालिंदी नावाने ओळखली जाणारी यमुना नदी, यम्नोत्रीला उगम पावते. आपल्या कृष्णकन्हैयाने याच यमुनेच्या तीराशी असंख्य चमत्कार करून दाखवले. याच ब्रजभूमीतील म्हणजे पश्चिम उत्तर प्रदेशातील दोन दिव्य देसम् मंदिरे, ’यमुनेच्या तीरी, पाहिला हरी’ म्हणत शतकानुशतके उभी आहेत. तर भगीरथ राजाने अथक प्रयत्न करून गंगेरूपी स्वर्गधुनीला पृथ्वीवर आणले. तिच्या असंख्य धारा, एकमेकींना हाळी देत वेगवेगळ्या संगमांवर परस्परांना भेटतात आणि सरतेशेवटी देवप्रयागला त्या एकत्रितपणे गंगा म्हणून एकाच नदीरूपाने अवतीर्ण होतात. प्रयाग म्हणजेच संगम. यांत भागीरथी नदी, जिचा उगम गंगोत्रीजवळ गोमुखात होतो ती मूळची गंगा म्हणून ओळखली जाते. देवप्रयागला भागीरथीचा आणि अलकनंदाचा संगम होतो. अलकनंदा नदीला विष्णुगंगा म्हणतात. असं म्हणतात की अलकनंदा प्रत्यक्ष महाविष्णूच्या म्हणजेच उत्तराखंडाच्या टोकावर वसलेल्या श्रीबद्रिनाथाच्या पदस्पर्शाने पावन होऊन पुढे वाहात जाते. भौगोलिकदृष्टया पाहिले तर, श्रीबद्रिनाथाच्या जवळ असलेल्या ’सतोपंथ ग्लेशियर’ मधून अलकनंदा उगम पावते. उत्तराखंडातील तीनही दिव्य देसम् अलकनंदेच्या सान्निध्यात वसली आहेत. ही विष्णुगंगा केशवप्रयाग, विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग करत देवप्रयागला येते आणि भागीरथीमध्ये विसर्जित होते. याच देवप्रयागला उत्तराखंडातील एक दिव्य देसम् वसले आहे.
 
Divya Desam  
 
चारधाम यात्रेमध्ये यम्नोत्री, गंगोत्री, केदारनाथ व श्रीबद्रिनाथाचा समावेश होतो. केदारनाथ तर ज्योतिर्लिंग आहे. उत्तराखंडावर निःसंशय महादेवाची सत्ता आहे. पण ही पंचकेदारांची मंदिरे संपल्यानंतर व गोपेश्वरच्या गोपीनाथ मंदिरानंतर महाविष्णूची सत्ता सुरू होते. याचा अर्थ असा आहे की, चमोलीच्या गोपेश्वरनंतर, पुढे विष्णुमंदिरे आहेत. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या हरिद्वार व ऋषिकेशपासून देवप्रयागला जाता येते. केदारनाथला जाण्यासाठी रुद्रप्रयागला वेगळा रस्ता जातो व त्याच भागात पंचकेदार मंदिरे आहेत. मात्र आपण दिव्य देसम् विषयी जाणून घेत असल्याने आपण रुद्रप्रयागच्या दिशेने न जाता अलकनंदेच्या काठाने ज्योर्तिमठला जाऊया.
 
 
श्रीबद्रिनाथ या अत्यंत महत्त्वाच्या महाविष्णू मंदिरात जाण्यासाठी आपल्याला ज्योर्तिमठ किंवा जोशीमठ येथे यावे लागते. इथे अजून एक दिव्य देसम् आहे आणि बद्रिनाथाचा समावेश अर्थातच दिव्य देसम् मध्ये होतो. ज्योर्तिमठ ते बद्रिनाथाच्या प्रवासात बेलाग हिमालयाच्या गिरीशिखरांचे अत्यंत रौद्रभिषण दर्शन होते. तर अशी ही उत्तराखंडातील तीन दिव्य देसम् मंदिरे. सगळ्यांत महत्वाचे असे बद्रीनाथ किंवा बद्रीनारायण पेरूमाळ, ज्योर्तिमठ येथील परमपुरुषा पेरूमाळ नृसिंह मंदिर तर देवप्रयाग येथील निलमेघा पेरूमाळ रघुनाथजी मंदिर. यांविषयी आपण जाणून घेणार आहोतच पण या नारायणभूमीत अत्यंत अनोखी अशी सप्तबद्रि स्थाने आहेत ती सुद्धा पाहूया.
 
 
नर आणि नारायण या पर्वत रांगेने वेढलेल्या बद्रिनाथ धामाला भूवैकुंठ म्हणतात. यास्थानी भगवान विष्णुंनी गहन तपश्चर्या केली होती. हिमालयाच्या कुशीत असलेल्या ह्या स्थानी सदोदित थंडी असते. या थंडीपासून श्रीविष्णूचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मीदेवीने बदरी वृक्षाचे रूप धारण केले. या लक्ष्मीमातेला ’अरविंधवल्ली नच्चियार’ या नावाने ओळखले जाते. मंदिरातील श्रीविष्णूची मूर्ती हिरेमाणकांनी नटलेली आणि रत्नखचित मुकुट परिधान केलेली आहे. कपाळावर मोठा तेज:पुंज हिरा आहे. साक्षात लक्ष्मीदेवीचा पती असल्याने श्रीविष्णू अलंकारप्रिय आहे. हा पद्मासन घातलेला गंडकी शिळेतील शाळिग्राम विग्रह आहे. गर्भगृहात उद्धव, गरुड, नारदमुनी, कुबेर यांच्या मूर्ती आहेत. लक्ष्मीमातेचे मंदिर श्रीबद्रीनाथ गर्भगृहाच्या बाजूला आहे.
 
 
आदि शंकराचार्यांनी या मंदिराची आणि बौद्धांनी मंदिराच्या समोर असलेल्या अलकनंदेत फेकलेल्या मूळ बद्रिनाथ विग्रहाची आठव्या शतकात पुन:स्थापना केली. बद्रिनाथाचे स्थान आत्यंतिक थंडीच्या प्रदेशात असल्याने दिवाळीच्या सुमारास हे स्थान विधिपूर्वक बंद होते. त्यावेळेस बद्रिनाथाची उत्सवमूर्ती वाजतगाजत ज्योर्तिमठ नृसिंह मंदिरात आणली जाते. तिथे सहा महिने म्हणजे अक्षयतृतीयेपर्यंत पूजा केली जाते. सहा महिने बद्रिनाथला शाळिग्राम विग्रहाची व सहा महिने ज्योर्तिमठ उत्सवमूर्तीची पूजा केली जाते. आदि शंकराचार्यांनी आठव्या शतकात हे नियमन केले होते.
 
 
Divya Desam
 
कपाट बंद असताना म्हणजेच हिवाळ्यात ज्यावेळेस श्रीबद्रिनाथाचे मंदिर बर्फाच्या घट्ट आवरणाखाली झाकळले जाते, त्यावेळी प्रत्यक्ष नरनारायण भगवान बद्रिनाथाची आराधना करतात अशी श्रद्धा आहे. इथून अगदी जवळच माना गाव आहे. हे भारतातील सर्वात पहिले गाव आहे. इथे सरस्वती नदी उगम पावून लगेचच लुप्त होते. याच भागातून पांडव स्वर्गात गेले अशी श्रद्धा आहे. व्यासमुनींनी गणरायाला याच भागात महाभारत सांगितले व गणरायाने ते लिहून काढले अशी आख्यायिका येथे सांगितली जाते. हनुमानाने केलेले भीमाचे गर्वहरण इथे जवळच हनुमानचट्टीला घडले होते. खरोखरच!! अत्यंत अलौकिक स्थान आहे हे!!
 
 
ज्योर्तिमठ येथील नृसिंह मंदिर हे उत्तराखंड येथील दुसरे दिव्य देसम. ह्याच मंदिरात बद्रिनाथाची उत्सवमूर्ती आणली जाते म्हणजेच ही भगवान बद्रिनाथाची शीतकालीन गादी आहे. तसेच इथे आदि शंकराचार्यांचीही गादी आहे. त्यांनी स्थापन केलेला सगळ्यांत प्रथम क्रमांकाचा उत्तरदिशेकडील मठ या मंदिराच्या जवळच आहे. मंदिरात दहा इंची शाळिग्राम रूपातील नृसिंहाची गंडकी शिळेतील मूर्ती आहे. या मंदिरातील श्रीलक्ष्मी ’परिमलावल्ली नच्चियार’ म्हणून पूजली जाते. हे मंदिर अत्यंत पुरातन म्हणजे जवळपास बारा हजार वर्षांपूर्वीचे आहे हे सिद्ध झालंय.
इथली नृसिंह मूर्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मूर्तीची डावी भुजा हळूहळू क्षीण होत चालली आहे. अशी भविष्यवाणी आहे की, कलियुगाच्या शेवटी ही भुजा क्षीण होत पूर्णपणे गळून पडेल त्याचक्षणी नर- नारायण पर्वत कोसळून बद्रिनाथ येथे जाणारा मार्ग कायमस्वरूपी बंद होईल. त्यावेळी श्रीबद्रिनाथ मानवी हस्तक्षेपापासून दूर जाणार आहेत. मानवासाठी हे स्थान अत्यंत दुर्गम होणार आहे आणि हे स्थान फक्त नर आणि नारायणासाठीच उपलब्ध असेल. मात्र अजून एक अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मर्त्य मानवासाठी हे श्रीबद्रिनाथ, भविष्यबद्रि येथून दर्शन देणार आहेत. भविष्यबद्री हे सप्तबद्रिपैकी एक स्थान आहे. दिव्य देसम् मंदिरांविषयी जाणून घेताना आपण पाहिले होते की, मर्त्य मानव त्याच्या जीवनकाळात 108 दिव्य स्थानांपैकी फक्त 106 स्थानांचे दर्शन घेऊ शकतो. 107 स्थान असलेल्या ’क्षीरसागराचे’ दर्शन काही अंशी या नृसिंह मंदिराने साध्य होते.
 
 
 
तिसरे दिव्य देसम् स्थान आहे ते म्हणजे देवप्रयागचे. भागीरथी आणि अलकनंदेच्या संगमाजवळ असलेलं हे रघुनाथ मंदिर श्रीरामाच्या नावे ओळखले जाते. इथे श्रीरामाने तपश्चर्या केली होती अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे. इथल्या श्रीलक्ष्मीला ’पुंदरीकावल्ली नच्चियार म्हणतात’.
 
 
उत्तराखंडाची जवळपास सगळीच मंदिरे कस्त्युरी शैलीतील आहेत. चमोली जिल्ह्यात सप्तबद्रि स्थाने आहेत. स्थानिक पातळीवर पंचबद्रि स्थाने ओळखली जातात, परंतु सहा बद्रि मंदिरांना भेट देण्याचा प्रघात आहे. सातवे स्थान कुठे आहे याबद्दल निश्चित अशी माहिती कुठेही उपलब्ध नाही. मी या सहा स्थानांचे दर्शन घेतले आहे. पहिले स्थान अर्थातच, बद्रिनाथाचे आहे. दुसरे स्थान, पंडुकेश्वर येथील योगबद्रि आहे. तिसरे स्थान तपोवनजवळील भविष्यबद्रि आहे. याच मंदिरातून आपल्याला भविष्यात श्रीबद्रिनारायण दर्शन देणार आहेत. भविष्यबद्रिची मुद्रा तिथे एका पाषाणात हळूहळू तयार व्हायला सुरुवात झालीये. चौथे स्थान वृद्ध बद्री आहे. इथे श्रीविष्णूची वृद्ध स्वरूपातील मूर्ती आहे. पाचवे स्थान दुर्गम खोर्‍यातील ध्यान बद्रि आहे. या मंदिरात श्रीविष्णू गहन ध्यानासाठी बसले आहेत. याच मंदिराच्या जवळ कल्पेश्वर हे पंचकेदारपैकी एक स्थान आहे. तर शेवटचे मंदिर आहे, आदिबद्रि. हे स्थान कर्णप्रयागजवळ आहे. उत्तराखंडाच्या ह्या सगळ्यांच बद्रिंची स्थाने अत्यंत गूढरम्य आहेत यांत मला कोणतीच शंका नाही.
Powered By Sangraha 9.0