राष्ट्रहित सर्वोपरि या आपल्या ब्रीदवाक्याला जागून मोदींनी काश्मीरचे कलम ३७० रद्दबातल केले, हजारो वर्षांच्या संघर्षातून अयोध्येला राममंदिराची उभारणी केली, जनतेचे दैनंदिन जीवन सुखावह होण्यासाठी अनेक पावले उचलली आणि भाजपच्या 'वचननाम्यातील अनेक आश्वासनांची पूर्तता केली. 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' असे म्हणतात.
@रघुनंदन भागवत
अर्थशास्त्रामध्ये 'लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल यूटीलिटी ' नावाचा एक प्रसिद्ध सिद्धांत आहे. एखाद्या वस्तूचा वारंवार उपभोग घेतला असता त्या वस्तूच्या उपभोगाने मिळणाऱ्या समाधानाचे/आनंदाचे प्रमाण प्रत्येक उपभोगाच्या वेळी घटत जाते असे या सिद्धांताचे सार आहे. एखाद्या निर्जीव वस्तूला/पदार्थाला अथवा अन्य कोणत्याही घटकाला लागू होणारा हा नियम राजकारणात/समाजकारणात सक्रिय असलेल्या कुठल्याही पुढाऱ्याला/नेत्याला सुद्धा तेवढाच 'फिट' बसतो. यामुळेच राजकारणात 'अँटी इन्कबन्सी' ही डाव्या विचारवंतांची आवडती संकल्पना प्रचलित आहे. एखादे नेतृत्व जर सलग काही काळ राज्य करत असेल (देशात अथवा कुठल्याही राज्यात) तर सरणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक प्रस्थापित नेतृत्वाची लोकप्रियता कणाकणाने कमी होत जाते हे गृहितक शिरसावंद्य मानणाऱ्या तथाकथित विचारवंतांना एका 'नेतृत्वाने' मात्र धक्का दिला आहे आणि हा धक्का असा तसा नाही तर या बुद्धीवाद्यांचा आत्मविश्वास ढासळून टाकणारा, त्यांना आपल्या ठोकळेबाज मांडणीचा फेरविचार करायला लावणारा असा आहे.
या नेतृत्वाचे नाव आहे 'नरेंद्र दामोदरदास मोदी', भारताचे सध्याचे पंतप्रधान.
२०१४ला नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले. सलग ११ वर्षें ते देशाची धुरा सांभाळत आहेत. मोदीविरोधक त्यांना सत्तेवरून उलथून टाकण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत पण मोदींची लोकप्रियता कमी होणे तर सोडाच, ती दिवसागणिक वाढतच चालली आहे. निरनिराळ्या सर्वेक्षणातून त्यांची वाढती लोकप्रियता अधोरेखित होत आहे. त्यामुळे देव पाण्यात घालून १० वर्षें होऊन गेली तरी अँटी इन्कबन्सीरूपी 'अलक्ष्मी' आपल्याला पावत का नाही म्हणून विरोधक नैराश्यग्रस्त झाले आहेत.
मोदींची लोकप्रियता तरी किती असावी? 'नोटबंदी'सारखी कडू गोळी जनतेच्या घशात उतरवून सुद्धा मोदींच्या विश्वासार्हतेला काडीचा धक्का लागू शकला नाही. त्यापाठोपाठ जी.एस.टीची अंमलबजावणी करताना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली तरी व्यापारी वर्ग मोदींच्या मागे ठामपणे उभा राहिला.
२०२०-२१ च्या कोरोना महामारीच्या साथीने मोदींच्या नेतृत्वाची कसोटीच पाहिली. जगात अनेक प्रगत/अप्रगत देशात हाहाकार माजला होता. भारतात सुद्धा आणीबाणीची स्थिती उद्भवली होती. मोदींनी लॉकडाऊन पुकारून जनतेला जणू काही 'स्थानबद्ध' केले होते. अर्थचक्र थंडावले होते आणि जनतेत उद्याच्या भविष्याबद्दल पूर्ण काळोख होता. याही स्थितीतून भारत तावूनसुलाखून बाहेर पडला. पात्र गरीब जनतेसाठी 'गरीब कल्याण योजना' राबवून जनतेच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागवल्या. भारताने प्रतिबंधक लस निर्माण करून भारताबरोबरच अवघ्या जगाला फुकट लस पुरवून 'वसुधैव कुटुंबकम' या आपल्या संस्कृतीचा परिचय अवघ्या जगाला करून दिला.
या सर्व परीक्षा पाहणाऱ्या काळात 'कठीण समय येता कोण कामास येतो?' या प्रश्नाचे उत्तर होते 'नरेंद्र दामोदरदास मोदी'. त्यामुळेच तमाम भारतीय नागरिक 'मतांच्या' रूपाने मोदींच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतात.
राष्ट्रहित सर्वोपरि या आपल्या ब्रीदवाक्याला जागून मोदींनी काश्मीरचे कलम ३७० रद्दबातल केले, हजारो वर्षांच्या संघर्षातून अयोध्येला राममंदिराची उभारणी केली, जनतेचे दैनंदिन जीवन सुखावह होण्यासाठी अनेक पावले उचलली आणि भाजपच्या 'वचननाम्यातील अनेक आश्वासनांची पूर्तता केली. 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' असे म्हणतात. भारतीय नागरिक म्हणूनच आज 'मोदीमय' झालेले दिसतात.
मोदी वृत्तीने 'सन्यस्त' असले तरी त्यांनी 'सन्यस्त खडग' धारण केलेले नाही. 'सर सलामत तो पगडी पचास' या न्यायानुसार भारताच्या सामरिक शक्तीला अनन्यसाधारण महत्त्व देऊन आपल्या सीमा तर सुरक्षित केल्याच पण शत्रूराष्ट्राना 'बळी तो कान पिळी' अशी अद्दलही घडवली. 'ऑपरेशन सिंदूर'ची विजयगाथा आज सर्व जग गात आहे हे त्याचेच द्योतक आहे.
आपल्या सैनिकांवर मातेप्रमाणे ममतेचा वर्षाव करणारे हे नेतृत्व 'घास रोज अडतो ओठी, सैनिकहो तुमच्यासाठी' असे म्हणत प्रत्येक दिवाळी सीमेवरील जवानांसोबत साजरी करते, मग आपल्या सैन्यदलांचे मनोबल हिमालयाएवढे उंचावले नाही तरच नवल!!
१७ सप्टेंबर २०२५ हा मोदीजींचा ७५ वा वाढदिवस. .आपल्या वयाचा 'अमृतमहोत्सव' साजरा करणाऱ्या या 'विजिगिषु' नेत्याला आपल्या आयुष्यातील 'अमृतकाळा'पेक्षा मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा 'अमृतमहोत्सव' अधिक महत्त्वाचा व अर्थपूर्ण वाटतो यातच त्यांच्या महानतेचे गमक लपलेले आहे. 'राष्ट्र सर्वप्रथम' या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचे चालते बोलते प्रतिक म्हणजे नरेंद्र मोदी. साध्या संघस्वयंसेवकाच्या भूमिकेतून आपल्या राष्ट्र कार्याला सुरुवात करणारा हा द्रष्टा 'प्रचारक' आज हिंदुस्थानची भाग्यरेषा अवघ्या जगाच्या कॅनवासवर उंचावत आहे. बरं ही 'रेखा' दुसरी रेषा पुसून टाकून नव्हे तर त्या 'लकीरी' पेक्षा आपली लकीर मोठी करून. त्यामुळेच कुठलाही देश/प्रदेश 'पादाक्रांत' न करता भारतीय अर्थव्यवस्था ११ वर्षांपूर्वीच्या ११व्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेपावली आहे आणि येत्या दोन वर्षातच जगातील अग्रणी तीन अर्थसत्तात सामील होण्याची आस बाळगून आहे. मोदीजी एवढ्यावरच संतुष्ट नाहीत. त्यांनी भारताला २०४७ पर्यंत 'विकसित भारत' बनवण्याचा ध्यास उराशी बाळगला आहे. 'थिंक बिग', 'थिंक पॉझिटिव्ह' ही त्यांची मनोवृत्ती हा या आत्मविश्वासाचा स्रोत आहे.
मोदींची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे याचे मूळ त्यांच्याबद्दल भारतीयांच्या मनात वर्धिष्णू होत असलेल्या त्यांच्याबद्दलच्या विश्वासार्हतेत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
मोदींबद्दल जनतेला जो विश्वास वाटतो त्याचे कारण मोदींचे निःस्वार्थ आचरण हे आहे. जो माणूस सर्वसंगपरित्याग करतो त्याला भारतीय संस्कृतीत दैवत्व प्राप्त होते कारण भारत 'भोगाला' नव्हे तर 'त्यागाला' पूजतो.एका सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या मोदींनी राष्ट्रसेवेकरता सर्व ऐहिक पाश तोडून टाकले आहेत त्यामुळे 'भोगी' माणसांच्या गर्दीत 'योगी' मोदी ध्रुवताऱ्यासारखे अढळ भासतात. या निर्मोही वृत्तीमुळेच आज आसेतुहिमाचल प्रत्येक भारतीयाच्या हृदयात/मनात घर करून राहिलेला नरेंद्र मोदींशिवाय अन्य कोणी 'तपस्वी' राजनेता दिसत नाही.
मोदी कधी 'सत्तास्वयंवरात' उतरले नाहीत तरी सुद्धा सत्तासुंदरीने त्यांच्या गळ्यात 'राजमाला' घातली. ते नको म्हणत असताना गुजरातचे मुख्यमंत्रीपद त्यांच्या गळ्यात पडले. त्यानंतर एक तपाने ते थेट देशाच्या सिहासनावर आरूढ झाले आहेत ते आजतागायत. सलग २५ वर्षें ते 'राजयोग' भोगत आहेत ते जनतेचा'प्रधान सेवक' म्हणूनच.
आपल्या आयुष्याचे 'अमृतमहोत्सवी' वर्ष साजरे करणारा 'हा 'निर्मोही राजयोगी' आपले वयाचे 'शतकही' पूर्ण करेल अशी आशा व्यक्त करतानाच तमाम भारतीय नागरिक त्यांना मनोमन आशीर्वाद देत असतील की 'तुझे पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे!!!
रघुनंदन भागवत
७२०३९०२९८९