ज्योतीत ज्योत समर्पित

18 Sep 2025 17:35:17
rss
मधुभाईंनी एकाच ‘निरंजनाची’ आराधना केली. ते निरंंजन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. तरूण वयात भुलवणार्‍या असंख्य विचारधारा होत्या, पण मधुभाईंनी आपले चित्त संघ निरंजनापासून ढळू दिले नाही. गोरखनाथ यांच्या भजनातील शेवटच्या चरणात ते म्हणतात,‘मैं ज्योेति में ज्याते मिलाउँ जी’ मधुभाईंनी आपली जीवनज्योत संघज्योतीत एकरूप केली आहे.
संघ जीवन कसे जगायचे, याचा महान आदर्श ठेवून मधुभाई कुलकर्णी पंचतत्त्वात विलीन झाले आहेत. जिल्हा प्रचारक, विभाग प्रचारक, पुणे महानगर प्रचारक, गुजरात प्रांत प्रचारक, गुजरात-महाराष्ट्र-विदर्भ या पश्चिम क्षेत्राचे प्रचारक, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, असा त्यांच्या संघ दायित्वाचा प्रवास आहे. संघाबाहेरील व्यक्तीला ही संघ दायित्वे काय असतात याचे वरील शब्दाने आकलन होणे कठीण आहे. प्रचारक याचा अर्थ ज्याने गृहत्याग केला आहे, जो अविवाहित आहे, त्याने आपले संपूर्ण जीवन संघाला समर्पित केले आहे, संघ सांगेल ते दायित्व म्हणजे जबाबदारी पार पाडणे अशी ज्याची मनस्थिती असते, ज्याची व्यक्तिगत संपत्ती शून्य असते, त्याला प्रचारक म्हणतात. पारंपरिक भाषेचा उपयोग करायचा तर हा संन्यास धर्म आहे. परंतु भारतातील काही संन्यासी भगव्या वस्त्रात असले तरीही मठ आणि मठाच्या कोट्यवधी संपत्तीचे मालक असतात. प्रचारक हा संपत्तीच्या दृष्टीने शून्य असतो, मधुभाई तसे होते.
 
आपल्या प्रचारकी जीवनात मधुभाईंनी प्रचारक धर्माचे आदर्शवत पालन केले. प्रचारक धर्मात अत्यंत मृदु भाष्य, सर्व स्वयंसेवकांशी आत्मीय संबंध, त्यांच्या सुखदुःखात दुधात साखर जशी विरघळून जाते त्याप्रमाणे समरस होणे, प्रत्येकाची कार्यक्षमता ओळखून त्याच्या आंतरिक शक्तीचा विकास घडवून आणणे, संघकामाचे म्हणजे राष्ट्रकार्याचे यथोचित दायित्व त्याच्याकडे देणे, असे सगळे भाग येतात. हे काम अतिशय शांतचित्ताने, कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीच्या सर्व माध्यमांपासून हजारो हात दूर राहून करण्याचे कार्य आहे. एखाद्या विशाल वृक्षाचे बीजारोपण होते आणि मग तो क्रमाक्रमाने वाढत जातो. वाढता वाढता त्याची एक पूर्ण विकसित अवस्था निर्माण होते. अशा बीजाचे प्रारंभीच्या काळात अतिशय जागरूकतेने भरणपोषण करावे लागते. मधुभाईंनी आपल्या प्रचारकी जीवनात अशी किती बीजे संगोपित केली असतील याची गणती करणे अवघड आहे.
 
या ठिकाणी एका संस्कृत सुभाषिताची आठवण येते. तो सुभाषितकार धो धो पावसाला उद्देशून म्हणतो,“हे पर्जन्य राजा तुझे बरसणे सुखकारक असले तरी रखरखीत उन्हाळ्यात बीजाचे रक्षण करण्यात एका माळ्याने जे कष्ट घेतले ते तुझ्यापेक्षाही महान कार्य आहे.” आज संघ शताब्दी वर्षामध्ये संघ प्रशंसेचा धो धो पाऊस पडतो आहे. तो आनंददायी आहे हे खरे आहे, परंतु संघाच्या अतिशय कष्टदायक कालखंडात मधुभाईंसारख्या प्रचारकांनी स्वत:च्या रक्ताने आणि घामाने जे बीज अंकुरत ठेवले, त्याची महानता या प्रशंसेपेक्षा मोठी आहे.
 
संघगीताची एक ओळ आहे, ‘सिंच रहे है अगणित माली’ मधुभाईंची गणना रखरखीत उन्हात संघबीजाचे संवर्धन करणार्‍या सिंचनकाराची आहे. त्यांच्या परलोकगमनाचे वृत्त ऐकून महाराष्ट्र आणि गुजरात प्रांतातील किती हजार घरांमध्ये शोककळा पसरली असेल हे सांगणे अवघड आहे. आपल्या महान दर्शनकारांनी जीवनाचे सार्थक कशात आहे, हे अतिशय सुंदर रितीने मांडले आहे. जन्माला आल्यानंतर स्वतःसाठी जगायचे आहे हे कुणाला शिकवावे लागत नाही. प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार तशी धावपळ करीतच असतो. परंतु या जगण्यात जीवनाची सार्थकता नाही. जीवनाची सार्थकता,‘परोपकाराय पुण्याय’ यात आहे आणि त्यातही आपले संपूर्ण जीवन समाजाला समर्पित करण्यात जीवनाची सर्वश्रेष्ठता आहे. मधुभाईंनी तसे जीवन जगून तसा आदशर्र् ठेवला आहे.
 
गोरखनाथांचे एक भजन आहे,‘गुरूजी मैं तो एक निरंजन ध्याऊँ जी। दूजे के संग नहीं जाऊँ जी।’ त्याचा अर्थ होतो, गुरूजी मी एकाच निरंजनाची आराधना करीन, माझे चित्त दुसरीकडे अजिबात जाणार नाही. मधुभाईंनी एकाच ‘निरंंजनाची’ आराधना केली. ते निरंंंजन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. तरूण वयात भुलवणार्‍या असंख्य विचारधारा होत्या, पण मधुभाईंनी आपले चित्त संघ निरंंजनापासून ढळू दिले नाही. गोरखनाथ यांनी हे भजन त्यांच्या गुरूंना उद्देशून लिहिले आहे. मधुभाईंची पिढी परमपूजनीय श्रीगुरूजींच्या विशाल, आल्हाददायी, कर्तव्याभिमुख करणार्‍या छायेखाली वाढलेली आहे. प्रचारकांचे वैचारिक, आध्यात्मिक, कर्तव्याभिमुख भरणपोषण करण्याचे कार्य श्रीगुरूजींनी आपल्या दिव्य वाणीने केलेले आहे. याच भजनातील शेवटच्या चरणात गोरखनाथ म्हणतात,‘मैं ज्योेति में ज्योत मिलाउँ जी’ मधुभाईंनी आपली जीवनज्योत संघज्योतीत एकरूप केली आहे.
 
म्हणून त्यांचे जाणे केवळ पार्थिवाचे जाणे आहे. मनुष्यदेह हा पंचमहाभूतांचा बनलेला असतो. देहातून ज्योत गेली की राहिलेला देह पंचमहाभूतात विलीन होतो असे विज्ञानदेखील आहे आणि श्रद्धादेखील आहे. ज्योतीरूपाने मधुभाई अमर आहेत. संघज्योतीत जीवनज्योत विलीन झाली की, तिचे अस्तित्त्व संपत नाही, तर ती संघज्योतीच्या रूपाने प्रकाशमान असतेच आणि ऊर्जा नित्य संक्रमित करणारी असते. या महान जीवन ज्योतीस विनम्र अभिवादन करणे एवढेच आपल्या हाती आहे. आणि त्यांच्या जीवनप्रकाशात आपली वाटचाल करणे आपल्या हातात आहे.
Powered By Sangraha 9.0