दोन टोकांचा संघर्ष

18 Sep 2025 16:50:08
america
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासातील एक व्यक्ती म्हणून मान्यता पावलेला चार्ली कर्क यांची अमेरिकेत एका कार्यक्रमात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या दुर्दवी प्रसंगात एक देश आणि समाजासाठी आशादायी घटना म्हणजे, किमान अजून तरी या घटनेचे हिंसक प्रतिसाद कुठेही उमटलेले नाहीत. तरीदेखील एकूणच या घटनेमुळे अमेरिकेत असलेल्या दोन भिन्न विचारसरणी आणि त्यांच्यातील एकमेकांविरुद्ध असलेला टोकाचा विरोध परत दिसून येत आहे.
ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष न च कश्चिच्छृणोति मे।
धर्मादर्थश्च कामश्च स धर्मः किं न सेव्यते॥
(स्वर्गारोहणपर्व, महाभारत)
 
महाभारत युद्धातील नरसंहार प्रयत्न करूनही थांबवू न शकलेले महर्षी वेदव्यास शेवटी स्वर्गारोहण पर्वात म्हणतात, निराशेने हात वर करून मी आक्रोश करतो, पण कोणीही माझं ऐकत नाही. धर्माने केवळ मोक्षच नाही तर अर्थ आणि काम यांची देखील प्राप्ती होते. तरी देखील लोक धर्माने का वागत नाहीत?
 
जरी येथे पूर्णपणे कोणी कौरव अथवा पांडव नसले, तरी स्वत:ला विचारांच्या बेड्यात जखडून ठेवून दोन विचारांत विभागलेल्या अमेरिकन समाजाची स्थिती काहीशी अशीच झालेली आहे.
 
 
10 सप्टेंबर 2025 च्या दुपारची वेळ. Utah Valley University, ह्या एका पश्चिमेकडील राज्यातील विद्यापीठात चार्ली कर्क नावाच्या अमेरिकन आणि ख्रिश्चन परंपरावादी 31 वर्षाच्या तरुणाचा कार्यक्रम होता. विषय होता, Prove Me Wrong. मैदानात तयार केलेल्या मंचावर चार्ली आणि आयोजक होते आणि जवळपास 3,000 मुले आणि मुली त्या कार्यक्रमासाठी मैदानात उपस्थित होते. त्यात चार्लीची बायको आणि 2 लहान मुले पण होती. कार्यक्रम रंगात आला होता. सभेतील एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की, अमेरिकेत ज्या काही गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत, त्यातील किती तृतीयपंथी (ट्रान्सजेन्डर) व्यक्तींनी केलेल्या हिंसेच्या होत्या? चार्लीने त्याला उत्तर दिले आणि त्यासंदर्भातच पुढे बोलत असताना अचानक गोळीचा आवाज झाला. सर्वांसमोर आणि कॅमेर्‍याने टिपल्याप्रमाणे, दुरून म्हणजे साधारण 200 यार्ड वरून एका बिल्डिंगच्या छतावरून एक गोळी चार्लीच्या दिशेने आली आणि काही समजायच्या आत, त्याच्या गळ्याला अचूक लागली, पुढच्या क्षणी चार्ली रक्ताच्या थारोळ्यात होता. जरी त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तरी त्या एका गोळीने होत्याचे नव्हते केले होते.
 
america 

चार्ली कर्क वर म्हणल्याप्रमाणे पुरोगामी (कन्झर्व्हेटिव्ह) विचारांचा तरुण नेता होता. 2012 साली म्हणजे वयाच्या 18 व्या वर्षी त्याने टर्निंग पॉइंट यूएसए या तरुणांना पुरोगामी आणि अमेरिकन राष्ट्रीय विचारांच्या बाजूने जोडण्यासाठी म्हणून संस्था स्थापली. विद्यार्थी व तरुण मतदारांना जागृत करण्यासाठी त्याने कॅम्पस अध्याय, राष्ट्रीय परिषद आणि स्थानिक मोहिमा उभारल्या. त्याने टर्निंग पॉइंट ऍक्शन या निवडणुकीसंदर्भात जागृती आणणार्‍या पुरोगामी संस्थेचीही स्थापना केली. आपल्या ठाम भूमिकांसाठी चार्ली प्रसिद्ध होता - गर्भपात, शस्त्रनियंत्रण आणि विविधता, समानता व समावेश (ऊएख) कार्यक्रमांना त्याने विरोध केला, तर मुक्त बाजारपेठ, मर्यादित शासन व ख्रिश्चन मूल्ये यांचा त्याने प्रचार केला. या प्रत्यक्ष सामाजिक चळवळी बरोबरच त्याचा चार्ली कर्क शो हे रेडिओ व पॉडकास्ट खूप प्रसिद्ध झाला होता. त्याने अमेरिकन राष्ट्रवाद, अमेरिकन उजव्या बाजूची विचारसरणी, ख्रिश्चन धर्म आणि समाज आदी संदर्भात पुस्तके लिहिली. त्यामुळे वयाची तिशी ओलांडायचा आधीच चार्ली आपल्या पिढीतील सर्वात दृश्यमान पुरोगामी आवाजांपैकी एक महत्त्वाचा आवाज ठरला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसर्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या वेळेस चार्लीने जे काही पुरोगामी मतदारांना जागरूक करण्याचे काम केले, त्याचा प्रत्यक्ष फायदा ट्रम्प यांना निवडणूक निर्णायक पद्धतीने जिंकण्यात झाला असे म्हणतात. परिणामी, चार्ली जरी प्रत्यक्ष राजकारण आणि सत्तेच्या केंद्रस्थानी नसला तरी ट्रम्प यांच्या विश्वासातील एक व्यक्ती म्हणून मान्यता पावलेला होता.
 
जेव्हा ओबामा यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाची पहिली चार वर्षे चालू होती तेव्हा म्हणजे 2012 ला चार्लीची सामाजिक आणि राजकीय नेतृत्वाची सुरुवात झाली आणि ओबामा यांच्यानंतरच्या काळात ती ट्रम्प यांची पहिली चार वर्षे, बायडन यांची चार वर्षे, आणि परत आता आलेल्या ट्रम्प सरकारच्या काळात सातत्याने टिकली आणि वृद्धिंगतच होत गेली. पण ह्याच काळात अमेरिकन समाज हा, एका बाजूस टोकाचे डावे, त्यात भर म्हणून वोक्स हा सध्याच्या काळात चळवळे आणि दुसरी कुठलीही बाजू समजून न घेणारे टोकाचे डावे - बहुतांशी तरुण जनता, अशांनी भरला गेला होता, तर दुसर्‍या बाजूस टोकाचे उजवे जे प्रामुख्याने ख्रिश्चन असलेले, स्पष्ट बोलले नाहीत तरी पूर्वीची अमेरिका म्हणजे गौरवर्णीयांचे वर्चस्व आणण्याचा विचार करणारे ज्यांना बाहेरील स्थलांतरित अजिबात नको आहेत, अशा समुदायाने भरलेले. दोन्ही बाजूस मध्याच्या जवळ येणारे पण आहेत तसे नाहीत असे म्हणणे हे चुकीचे ठरेल. पण त्यांची संख्या आणि आवाज दोन्ही क्षीण होत गेला. दोन्ही बाजू एकमेकांच्या पूर्ण विरोधात गेल्या. डाव्यांच्या सातत्याने वाढत चाललेल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष धर्मविरोधाने आणि वाढलेल्या वोकिझमला चार्ली कर्क सारखे उजव्या बाजूचे विरोधक हे एक बुद्धिवादी आणि सुसंस्कृत होऊ शकणारे उत्तर होते.
 
america 
चार्लीचा भर हा सभ्यतेने केलेल्या वादविवादावर होता. त्यामुळे त्याचा भर हा समोरच्याला, विशेष करून वैचारिक विरोधकांना त्यांचे म्हणणे ऐकून, त्या म्हणण्याला योग्य शब्दात उत्तरे देत जिंकून घेण्याच्या प्रयत्नावर असे. याचा अर्थ असा नाही की, समोरच्याला त्याचे सगळे म्हणणे पटेल अथवा तो सर्वार्थाने सर्वसमावेशकच विचार करणारा होता असे नाही. भारतीयांच्या दृष्टीने त्याने मध्यंतरी केलेले एक ट्विटरमाध्यमातून केलेले खालील विधान हे वादग्रस्त ठरले होते. त्यात तो म्हणाला होता:
 
America does not need more visas for people from India. Perhaps no form of legal immigration has so displaced American workers as those from India. Enough already. We're full. Let's finally put our own people first.
एकीकडे अमेरिकेबद्दल असलेले प्रेम, अमेरिकन लोकांबद्दलची आस्था, सद्यस्थितीबद्दलची प्रामाणिक काळजी, आणि ख्रिस्ती धर्माचेच वर्चस्व असावे अशी वक्तव्ये वाटणार्‍या चार्लीच्या बोलण्यातील दुसरी बाजू ही त्याचा स्थलांतरितांना त्यात भारतीयांना असलेला विरोध, मुस्लिमांना असलेला धर्माधारित विरोध, समलिंगी-तृतीयपंथींना असलेला विरोध, आदी गोष्टींमुळे त्याला एका बाजूस प्रचंड समर्थक लाभू लागले तर दुसर्‍या बाजूस विरोधक जमा झाले. अर्थात यातील कुठल्याच गोष्टीमुळे त्यावरील प्राणघातक हल्ल्याचे समर्थन होऊ शकत नाही आणि कुठल्याही सभ्य व्यक्तीने, पक्षाने ते करू नये, हेच अपेक्षित होते आणि आहे. डाव्या बाजूच्या दृकश्राव्य माध्यमात प्रसिद्ध असलेल्या व्यक्ती, विचारवंत, राजकारणी आदींनी या दुर्घटनेचा निःसंशय निषेध केला. तरी देखील काही प्राध्यापक, शिक्षक आणि इतर व्यावसायिक यांनी चार्ली कर्क याच्या हत्येचे समर्थन वाटावे अशी अथवा काही उदाहरणात त्या हिंसेचे सरळ समर्थन करणारी वक्तव्ये केली. दुसरीकडे उजव्या बाजूच्या नेतृत्वाने आणि जनतेने देखील अपराधी मिळण्याच्या आधीच, तो टोकाचा डावाच आहे आणि वैचारिक अतिरेकी आहे असे जाहीर केले.
 
 
अखेर अपराधी मिळाला तो टायलर रॉबिन्सन नावाचा 21 वर्षाचा तरुण आहे. टायलर हा गौरवर्णी मॉर्मन ख्रिश्चन आहे. अजूनपर्यंत तरी त्याच्याबरोबर अजून कोणाचा कारस्थानी मिळालेला नाही. ऋइख ने जेव्हा त्याचा फोटो जाहीर केला तेव्हा ह्या टायलरच्या वडिलांच्या लक्षात आले आणि त्यांनीच त्याला FBI च्या ताब्यात दिले. या टायलरच्या घरातील सर्वच ट्रम्प समर्थक आहेत आणि रजिस्टर्ड रिपब्लिकन आहेत. फक्त टायलर हा कुठल्याच पक्षाशी संलग्न नाही. त्यामुळे जी काही सार्वजनिक माहिती आहे त्यावरून त्याला विचारसरणी नाही असे वाटते. पण त्याचा रूममेट आणि मित्र हा तृतीयलिंगी होता, त्यामुळे टायलर हा डाव्या विचारसरणीचा असावा असे म्हटले जात आहे. पण अजून सरकारकडून त्याच्या विचारसरणीबद्दलचे पुरावे अथवा त्याने असले भीषण कृत्य करण्यामागचे नक्की कारण काय ह्या बद्दल काहीच माहिती जाहीर केलेली नाही. आता त्याला अटक केले गेलेले आहे आणि कोर्टाने जामीन नाकारल्यामुळे खटला चालेपर्यंत तुरुंगात ठेवले जाणार आहे. कायद्याप्रमाणे त्याला फाशी होऊ शकते पण हे सर्व कोर्टात ठरायला अजून बराच काळ जावा लागणार आहे.
 
 
या सर्व दुर्दवी प्रसंगात एक देश आणि समाजासाठी आशादायी घटना म्हणजे, किमान अजून तरी या घटनेचे हिंसक प्रतिसाद कुठेही उमटलेले नाहीत. तरीदेखील एकूणच या घटनेमुळे अमेरिकेत असलेल्या दोन भिन्न विचारसरणी आणि त्यांच्यातील एकमेकांविरुद्ध असलेला टोकाचा विरोध परत दिसून येत आहे.
Powered By Sangraha 9.0