तीर्थ गोदावरीच्या तीरावरहिंदू-शीख ऐक्याचे मंगलदर्शन

विवेक मराठी    19-Sep-2025
Total Views |
nashik 
श्री गोदावरी महाआरतीत शीख समुदायाचा तेजस्वी सहभाग...
 
नाशिक : पुण्यमयी गोदावरी माईच्या पवित्र तीरावर जेव्हा सायंकाळच्या पावन आरतीच्या मंगलघंटा निनादू लागतात, तेव्हा निसर्गही थांबून त्या क्षणाचा साक्षीदार होतो. मात्र यंदाच्या आरतीत एक वेगळंच तेज, वेगळीच अनुभूती होती; जेव्हा शीख समुदायाच्या भाविकांच्या भावपूर्ण घोषणा त्या मंत्रगजरात मिसळल्या...
 
सत श्री अकाल!
 
वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह!
 
या उद्घोषांमुळे गोदावरीच्या लाटांनाही सामर्थ्य लाभले आणि आकाशही भारून गेलं. या दिवशी केवळ दोन समाज नव्हते; हे होते एक राष्ट्र, एक संस्कृती, एक श्रद्धा! गोदावरी सेवा समितीच्या पुढाकाराने आणि साथ संगतच्या मिलाफाने एक अद्वितीय अध्याय इतिहासात लिहिला गेला.
 
 
गुरुद्वारा श्री गुप्तसर साहिब, मनमाडचे मुख्य सेवक पूज्य जत्थेदार बाबा रणजीत सिंगजी आपल्या भाषणात म्हणाले की, शीख संप्रदायाची स्थापना ही केवळ धार्मिक नव्हती. ती होती हिंदू समाजाच्या रक्षणासाठी. श्री गुरु गोबिंद सिंग महाराजांनी खालसा साजरा केला, तो या भूमीवर धर्म, सत्य आणि रक्षण या तिन्ही स्तंभांवर उभा होता. गोदावरीच्या तीरावर होणारी आरती ही केवळ हिंदू परंपरा नव्हे; ती भारतमातेला समर्पित आहे. नांदेडचे गुरुद्वारा ही जिच्या पवित्र पाण्याने पावन झाली ती गोदावरी माई आज आम्हाला पुन्हा जोडत आहे. या आरतीच्या निमित्ताने हिंदू-शीख समाज एकत्र आले याचे मी मनःपूर्वक स्वागत करतो.
त्यांच्या या विचारांनी फक्त उपस्थितांचा नव्हे, तर संपूर्ण समाजाचा अभिमान जागा केला.
 
घोषणांनी दुमदुमला घाट परिसर
 
आरतीपूर्वी शीख समाजाच्या शिस्तबद्ध आणि तेजस्वी घोषणांनी संपूर्ण घाट दुमदुमून गेला. त्यांच्या हातात निशान साहिब ध्वज, मुखावर तेज आणि पावलांतील नाद; हे दृश्य डोळ्यांत आनंदाश्रू आणणारे होते. या गोदा संगमात शीख समुदायातील तरुणांचा व तरुणींचा उत्साह अतिशय वाखाणण्यासारखा होता. मनात निर्धार व हातांची वज्रमूठ हे तरुणाईचे आकर्षण ठरले. या भारलेल्या तरुणाईने घोषणा दिल्या :
 
nashik 
 
बोले सो निहाल सत श्री अकाल!
 
वाहेगुरुजी का खालसा, वाहेगुरुजी की फतेह!
 
जय श्रीराम!
 
भारतमाता की जय !
 
या घोषांमध्ये केवळ शब्द नव्हते, तर भारताच्या आत्म्याचे स्फूर्तिपूर्ण प्रतिबिंब होते. या ऐतिहासिक महाआरती प्रसंगी शीख समाजाचे मान्यवर उपस्थित होते. जत्थेदार बाबा रणजीत सिंगजी - गुरुद्वारा श्री गुप्तसर साहिब, मनमाड, बलजीतसिंग सिब्बल, इंदरसिंग घटोडे, सम्मी बग्गा, रणधीरसिंग रेणु, राजकमलसिंग, जसपालसिंग सिद्धू, चरणदीपसिंग आणि सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. अभय वालिया यांनी उपस्थितीची शोभा वाढवलीच, शिवाय आपल्या सेवावृत्तीने समाजात एकतेचा दीप उजळवला.
 
हिंदू-शीख ऐक्याचे दर्शन
 
शेवटी आरती झाल्यानंतर दोन्ही समाजातील बांधव एकत्र उभे होते. सर्वांनी कपाळावर तिलक लावलेले आणि सर्वांनीच पगडी बांधलेली, कुणी पंचायतीक वस्त्रधारी, तर कुणी खालसा पोशाखात; पण सर्वांच्या अंतःकरणात होती एकच भावना एकच ज्वाला भारतमाता! गुरुद्वारामधून आलेल्या पवित्र प्रसादाचे वितरण करण्यात आले. त्या प्रसादात होते प्रेम आणि आपुलकी.
 
गोदा सेवकांचा उत्साह
 
पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात न्हालेल्या त्या सायंकाळी, गोदावरीच्या घाटांवर उभा असलेला प्रत्येक सेवक जणू कोणत्यातरी अदृश्य तेजाच्या स्पर्शाने झळाळून निघाला होता. पौर्णिमेचा चंद्र जेव्हा शांत आकाशात उगम पावतो, तेव्हा दूर सागरालाही एक आंतरिक ओढ निर्माण होते; लाटांच्या उधाणात जे अपूर्व आकर्षण असते, तसंच काहीसं त्या क्षणी प्रत्येक गोदा सेवकाच्या अंतःकरणात घडत होतं. तेज, श्रद्धा आणि सेवाभाव यांच्या संगमनातून त्यांच्या मुखकमलांवर प्रफुल्लता नांदू लागली.
 
 
महाज्योतीच्या दिव्यतेने ती प्रफुल्लता सौंदर्यसंपन्न तेजात रूपांतरित झाली होती. आरतीची लय, घोषणांचे अनुनाद आणि दिव्यतेच्या त्या स्फुल्लिंगांनी सार्‍या घाटाभोवती एक विलक्षण आध्यात्मिक आभा पसरवली होती. ही आरती केवळ विधी नव्हती, ती एक अंतरंगातून वाहणारी आध्यात्मिक ऊर्जा होती, जी शीख आणि हिंदू अशा दोन महान परंपरांना एकत्र बांधणारी दीपरेषा ठरत होती.
 
 
शेवटचा सूर : एकसंघ राष्ट्राचा
 
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सर्वच विश्वस्त तीर्थपुरोहित मंडळी, सर्व मान्यवर विश्वस्त आणि शीख बांधव या सर्वांनी मिळून एक अद्भुत आध्यात्मिक संयोग साकारला. विशेष म्हणजे रामतीर्थ समितीचे विश्वस्त सरदार रणजीतसिंग आनंद व गोपाल लाल यांनी या कार्यक्रमासाठी मोठे प्रयत्न केले सोबत समितीचे अध्यक्ष जयंतराव गायधनी यांचे अमूल्य मार्गदर्शन होते.
 
 
ही आरती म्हणजे केवळ एक विधी नव्हती. ती होती भारतीयत्वाची प्रतीक-आरती; जिच्यात मंत्रगर्जना, खालसा घोषणा, वैदिक स्तोत्रं आणि गोदावरी माईचा आशीर्वाद... सगळं एकत्र सामावलेलं होतं.
 
 
जत्थेदार रणजीत सिंगजी यांनी शेवटी म्हणाले की, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा उपक्रम हा आजच्या काळात ‘सेवा ही श्रद्धा’ याचे जिवंत उदाहरण आहे. या आरतीच्या निमित्ताने एकरूपता जोपासणार्‍या या प्रयत्नाला माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद!
ही केवळ आरती नव्हती, होती ती हिंदू-शीख स्नेहाची अविरल अभिषेक धारा! गोदावरी माईच्या चरणी अर्पण झालेली श्रद्धा, सेवा आणि समरसतेच्या दिव्यत्वाचा अपूर्व वर्षाव या रामरायाच्या देवगंधर्व नगरीवर घडला.
 
- मुकुंद खोचे
लेखक रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सचिव आहेत.