मेक्सिकोमध्येसुद्धा ’डे ऑफ द डेड’ (मृतांचा दिवस) साजरा केला जातो. कोको हा सिनेमा याच विषयावर आधारित आहे. आपले पूर्वज आणि आपल्यामधील बंधाची जपणूक करण्याचा संदेश या सिनेमात दिला आहे. जरी ही कथा मेक्सिकोमध्ये घडत असली तरीही जी जी व्यक्ती आपल्या कुटुंबावर प्रेम करते त्या सर्वांनाच या कथेचा गाभा समजून येईल.
नवीन संस्कृती, भाषा, नवीन प्रदेश, तेथील माणसे लोकांना आकर्षित करतात. स्वतःच्या शहरातून बाहेर न जाता, एखाद्या शहराचा, तेथील संस्कृतीचा, रूढी-परंपरेचा अभ्यास करणे, त्याची माहिती करून घेणे सिनेमामुळे सहज शक्य होते. सिनेमा आणि माहितीपट यात फरक आहे. सिनेमात माणसे असतात, कथा असते, घटना असते, घटनेचे होणारे पडसाद असतात आणि ते जगातील कोणत्याही कानाकोपर्यात गेले तरी सारखे असतात. माणसांचे चेहरे, रंग, अंगकाठी वेगळी असेल पण भावना सर्व विश्वाला एका धाग्यात बांधून ठेवतात.
कोको हा सिनेमा पाहिलात तर मेक्सिको-भारत यातील शेकडो मैलांचे अंतर तुमच्या मनातून पुसले जाईल याची मला खात्री आहे.
आपल्याकडे आत्ताच पितृपक्ष झाला. हा पंधरवडा पूर्वजांच्या स्मरणार्थ पाळला जातो. अशी मान्यता आहे की, या दिवसांत आपले पूर्वज पितृलोकांतून पृथ्वीवर येतात. या काळात श्राद्ध, पिंडदान आणि दानधर्म करून पूर्वजांना आदराने स्मरले जाते आणि त्यांच्या आशीर्वादाची कामना केली जाते.
मातृऋण, पितृऋण, गुरूऋण यासारखेच अनेक संस्कृतीत पितृऋण महत्त्वाचे समजले जाते. आपले आयुष्य घडवण्यात आपल्या पितरांचा वाटा असतोच. त्यांचा देह जरी नष्ट झाला तरी आपल्या रूपाने त्यांचा वारसा जिवंत राहतो. त्यांचे स्मरण ठेवणे म्हणजे त्यांच्याशी असलेला बंध कायम ठेवणे.
मेक्सिकोमध्येसुद्धा ’डे ऑफ द डेड’ (मृतांचा दिवस) साजरा केला जातो. कोको हा सिनेमा या विषयावर आधारित आहे. आपले पूर्वज आणि आपल्यामधील बंधाची जपणूक करण्याचा संदेश या सिनेमात दिला आहे.
मेक्सिकोच्या सांता सिसिलिया शहरात इमेल्डा नावाची एक स्त्री एका संगीतकाराशी लग्न करते. हा संगीतकार, मी परत येईन असे सांगून संगीत क्षेत्रात काहीतरी भव्य कार्य करण्यासाठी निघून जातो. इमेल्डा आणि त्यांची मुलगी कोको त्याची अनेक वर्ष वाट पाहतात पण तो काही परतत नाही. या दुःखाने इमेल्डा आपल्या जीवनातून संगीताला हद्दपार करते आणि चप्पल बनवण्याच्या व्यवसायाकडे वळते. बरीच वर्षे उलटून जातात. तेव्हा लहान मुलगी असलेली कोको आता एक वृद्ध स्त्री झालेली असते. तिला विस्मरणाचा त्रास सुरू होतो.
खूप वर्षांनी याच कुटुंबात जन्माला आलेला मॅगेल, इमेल्डाचा खापर पणतू, मात्र प्रसिद्ध संगीतकार एर्नेस्तो डेला क्रूजचा भक्त असतो. त्यांच्या गाण्याच्या रेकॉर्डस् ऐकून गिटार शिकतो. हा मृत संगीतकार आपला खापर पणजोबा असणार असे मानून आपल्या कुटुंबियांच्या विरुद्ध जाऊन संगीतकार बनण्याचा निश्चय करतो.
सांगीतिक स्पर्धेत भाग घेऊन आपले कौशल्य दाखवण्याच्या महत्त्वाकांक्षेने भारलेला मॅगेल, एर्नेस्तोच्या स्मारकात शिरून त्याची गिटार हस्तगत करतो. जेव्हा तो गिटारची तार छेडतो, तेव्हा एक चमत्कार घडतो. मॅगेल मृत माणसांच्या जगात प्रवेश करतो. आता त्याची गाठ त्याच्या मृत नातेवाईकांशी पडते. ते त्याला आपल्या जगात परत जाण्याचा आग्रह करतात. मदतीची तयारी दाखवतात पण मॅगेलची इच्छा वेगळी असते.
मृतांच्या या जगात मॅगेलची भेट हेक्टरशी होते; जो एकेकाळी एर्नेस्तोबरोबर काम करत असतो. एर्नेस्तो आपला पणजोबा आहे अशी मॅगेलची समजूत असल्याने त्याला आपल्या खापरपणजोबांचे आशीर्वाद हवे असतात, जेणेकरून तो आपल्या जगात परत जाईल आणि एक संगीतकार म्हणून यशस्वी होईल.
हेक्टरलासुद्धा आपले अपुरे हिशोब पुरे करण्यासाठी एर्नेस्तोला भेटायचे असते. आता हे दोघे मृतांच्या जगात एर्नेस्तोचा शोध घेतात. मॅगेल लपून छपून एर्नेस्तोच्या आलिशान हवेलीत प्रवेश करतो आणि त्याचवेळी हेक्टरसुद्धा तिथे पोचतो. तो एर्नेस्तोवर आपली गाणी चोरल्याचा आरोप करतो. त्या दोघांच्या वादात अजूनपर्यंत दडलेले एक सत्य मॅगेलला समजते.
एर्नेस्तो आणि हेक्टर हे दोघेही मित्र असतात. एकत्र काम करत असतात. घरच्या आठवणींने व्याकुळ झालेला हेक्टर हे क्षेत्र सोडून आपल्या घरी परतायचे ठरवतो पण एर्नेस्तोला त्याच्याशिवाय काम करणे शक्य नसते.
तो हेक्टरला विष देतो, त्याची गाणी चोरतो आणि स्वतः संगीतकार होऊन यश मिळवतो.
या झटापटीत मॅगेलला आपल्या खापर पणजोबांचा शोध लागतो. ज्यांच्यावर आपल्या कुटुंबाला सोडून गेल्याचा आळ आलेला असतो, ते खरे तर निर्दोष असतात. त्यांची हत्या झालेली असते आणि त्याची कल्पनाही कुटुंबाला नसते.
मृतांच्या या जगात इमेल्डा आणि हेक्टर भेटतात. त्यांचे मिलन होते आणि मॅगेल आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घेऊन आपल्या जगात परततो.
मॅगेल नाहीसा होतो तो दिवस असतो आपल्या कुटुंबातील मृत माणसांची आठवण करण्याचा दिवस. मेक्सिकोमध्ये हा मोठा उत्सव असतो. या दिवशी घर सजवले जाते. या जगातून गेलेल्या आपल्या माणसांचे फोटो लावतात. सजवतात. त्यांना आवडणारे पदार्थ करतात. सर्व कुटुंबीय एकत्र येऊन त्यांची आठवण जागवतात. वर्षातले एक दिवस आपले पूर्वज इथे येऊन, आपल्या आतिथ्याने तृप्त होतील आपल्याला आशीर्वाद देतील अशी त्यांची श्रद्धा असते. कर्मकांडापेक्षासुद्धा महत्त्वाचे असते ते त्यांची आठवण काढणे. कृतज्ञता दाखवण्याचा हा एक प्रकार. यामागे अजून एक श्रद्धा आहे जर एखाद्या माणसाची आठवण करणारे कुणी नसेल तर त्या माणसाला मृत माणसांत सुद्धा जागा मिळत नाही. तो दिशाहीन होतो. मॅगेलच्या पणजोबांचे तेच होणार असते पण मॅगेलमुळे त्यांच्या गायब होण्यामागचे रहस्य त्याच्या कुटुंबियांना समजते. कोकोला हे रहस्य समजल्यावर तिच्या मनातील खंत, वडील परत न आल्याचा राग निघून जातो आणि तिची आठवण परत येते.
या मोठ्या प्रवासात, मॅगेलला उमजते, आपले कुटुंब आपले जग असते. त्यांना सुखी करणे यातच आयुष्याचे समाधान दडलेले असते.
चित्रपट मॅगेलच्या नजरेतून उलगडतो तरीही चित्रपटाची नायिका आहे, मॅगेलची पणजी- कोको. कोको आणि तिचे वडील यांच्या दोघातील बंध, त्यांची एकमेकांवर असलेली माया, विश्वास, मृत होऊनसुद्धा एकमेकांच्या मनात जिवंत असलेली स्मृती यावर चित्रपट बेतला आहे.
कोको हा ऍनिमेशन चित्रपट आहे पण हा फक्त मुलांचा सिनेमा नाही. तो खरे तर जगण्याचा अर्थ उलगडून दाखवणारा सिनेमा आहे. माणसाचा मृत्यू हा देहाचा त्याग नाही. जेव्हा आठवणी पुसल्या जातात तेव्हाच माणसाचा मृत्यू होतो. मॅगेल आपल्या पूर्वजांना लक्षात ठेवतो, त्यांच्या वारशाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो.
आपले पूर्वज कोण होते ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का? खरेतर त्यांच्याच रक्ताचा आपण एक भाग असतो.
चित्रपटात रूढी परंपरा यांनाही महत्त्व दिले आहे.
रूढी परंपरा म्हणजे केवळ कर्मकांडे नाहीत किंवा अंधश्रद्धाही नाहीत. आपल्या भूतकाळाला जोडणारा तो एक धागा आहे. कुटुंबाला, पिढ्यांना जोडणारा, त्यांच्यातील संबंध बळकट करणारा धागा. परंपरा, पदार्थ, कौशल्ये ही वाहती असतात. नावीन्याच्या नावाखाली आपण आपला इतिहासच पर्यायाने आपली ओळख विसरतो आहे का हा विचार करायला हा सिनेमा भाग पाडतो.
’तुमच्या स्वप्नांचा वेध घ्या’, हा महत्वाचा संदेश कोको देतोच पण याबरोबर तो अनेक गोष्टी उलगडून सांगतो. यश मिळवण्याचे अनेक फायदे तर माहिती असतातच पण यशाला कुठपर्यंत महत्त्व द्यायचे ते हा सिनेमा सांगतो.
'In this world and the next, family is forever' कोको सिनेमाची ही टॅगलाईन आहे. जरी ही कथा मेक्सिकोमध्ये घडत असेल तरीही जी जी व्यक्ती आपल्या कुटुंबावर प्रेम करते त्या सर्वांनाच या कथेचा गाभा समजून येईल.