तिसर्‍या मार्गाच्या शोधास पर्याय नाही !

विवेक मराठी    19-Sep-2025
Total Views |
Pandit Deendayalji Upadhyay
पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांनी एप्रिल 1965 मध्ये मुंबई येथे ‘एकात्म मानव दर्शन’ ( Integral Humanism) या विषयाची विस्तृत मांडणी केली. या घटनेस अलीकडेच 60 वर्षे पूर्ण झाली. 25 सप्टेंबर हा पं. दीनदयाळजींचा जन्मदिवस. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या अनन्यसाधारण मांडणीवर प्रकाशझोत टाकणारा हा (संपादित) लेख. विवेक प्रकाशनाच्या ‘राष्ट्रद्रष्टा पं. दीनदयाळ उपाध्याय - भविष्यवेध’ या पुस्तकात त्याचा अंतर्भाव आहे.
काय आहे ‘एकात्म मानव दर्शन’ मांडणीचे महत्त्व? या प्रकारच्या ‘दर्शन’ मांडणीचे किंवा प्रस्तुतीकरणाचे स्वतंत्र भारतात अनन्यसाधारण महत्त्व आहे. 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर राजकीय स्वातंत्र्याबरोबरच भारताची विकास वाटचाल स्वतंत्र व मूलभूत अशा मुद्द्यांच्या आधारे होणे आवश्यक होते. दुर्दैवाने त्या अर्थाने आपण पूर्ण स्वतंत्र झालो नाही. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक - अशा सर्वच अंगांनी नवभारताच्या वाटचालीसाठी नवविचार, नवप्राण यांची आवश्यकता होती. फारच मोजक्या लोकांनी स्वतंत्र विचार करून, पठडीबद्धता सोडून, धोपटमार्गाचा त्याग करून नव-मांडणी करण्याचा प्रयत्न केला. पंडित दीनदयाळजींचे नाव अशा नवीन विचार करणार्‍यांमध्ये अग्रणी असल्याचे मानता येईल. नवविचार मांडणीच जेथे झाली नाही किंवा कमी प्रमाणात झाली अशा सर्वच आघाड्यांवर गतानुगतिक पद्धतीने ‘मागील पानावरून पुढे चालू’ पद्धतीची वाटचाल सुरू राहिली.
 
 
‘भारत’ या देशाचे अस्तित्व केव्हापासूनचे आहे? त्याचा इतिहास व भूगोल काय आहे आणि कसा बदलत गेला, येथील लोक कोण होते, त्यांनी कशाकशात प्रगती केली होती, त्यांना जग माहीत होते का व जगाला त्यांची माहिती होती का, येथील माणसांचे व मानवसमूहाचे मन कसे होते, त्यांनी काय प्रकारचा समाज व संस्कृती निर्माण केली होती, त्यातील गुण-दोष कोणते, त्यातील दोषांचे निर्दालन व सद्गुणांचे संवर्धन कसे करता येईल, येथील समाजाला काय रुचते, पचते, मानवते; ‘समूह-मानसिकता’ म्हणून कोणत्या प्रकारचा प्रतिसाद येथील समाज देतो, तो गुलामगिरीत का अडकलेला राहिला व आता मुक्त झाल्यानंतर त्याला अभिप्रेत असलेले बदल काय आहेत, की जे त्याच्या स्वभावाला पूरक, परंतु कायमच पुरोगामी पद्धतीचे राहतील, या देशाने व समाजाने जगाला काही दिले आहे की नाही, ते काय आहे, त्याचे वेगळेपण कशात आहे, म्हणजेच त्याची अस्मिता कशात आहे, ती कशी व्यक्त होते, या समाजाचे म्हणून काही कार्यकर्तृत्व होते की नव्हते, असल्यास ते काय आणि या संपूर्ण अखंड अशा भारतवर्षाचे ‘जीवन-मिशन’ काय होते, आहे व राहील...
 
या सार्‍या गोष्टींचा विचार करत करत देश-प्रगतीची रूपरेखा व आराखडा आखणे अभिप्रेत होते.
 
 
प्रत्यक्षात मात्र “लोकहो, आता देश स्वतंत्र झाला आहे. आता काळजी करण्याचे कारण नाही. देशच तुमची काळजी घेईल” अशा आशयाचे आत्मघातकी विवेचन करण्यात 1947 नंतरचे पुढारी मग्न होते, असे दिसते. खरे म्हणजे, “लोकहो, आता आपल्याला अर्धे का होईना, खंडित स्वातंत्र्य मिळाले आहे, आपले अर्धेच काम झाले आहे. आता अखंड स्वराज्यनिर्मिती, सशक्त समाज उभारणी, बळकट आर्थिक घडी असलेला समाज व संपन्नतेकडे वाटचाल करणारे राष्ट्र म्हणून आपण उभे राहू या, सर्वांनी मिळून सर्व भेदाभेदांवर मात करून उभे राहू या व त्यासाठी प्रचंड काम करू या”- असे आवाहन करणे आवश्यक होते. ते झाले नाही. भ्रांत कल्पनात समाज अडकून राहिला. सत्ताधार्‍यांना राजकीय स्वातंत्र्यप्राप्तीमुळे अल्पसंतुष्टता आली!
 
Pandit Deendayalji Upadhyay 
 
पं. दीनदयाळजींनी मुंबई येथील त्यांच्या भाषणामध्ये भ्रांत कल्पनांचा धुरळा व धुके कमी करण्याचा प्रयत्न केला.
 
 
मानवाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी अर्थातच दीर्घकालीन कल्याणासाठी सशक्त विचार त्यांनी मांडला. मानवाचा ‘मानव’ म्हणून विचार करण्यासाठीची सूत्रे त्यांनी नजरेला आणून दिली. अशा सूत्रांची शाश्वतता सोदाहरण स्पष्ट केली; पण त्याचबरोबर पं. दीनदयाळजींनी असा परिपूर्ण विचार न देणार्‍या, पण जगात बोलबाला असलेल्या अनेक विचारसरणींमधील मर्यादा अचूकपणे दाखवून दिल्या. त्या अर्थाने मूळ भारतीय विचार, ‘हिंदू जीवन-चिंतन’ सरस ठरते. हे नि:संकोचपणे सांगितले. ‘हिंदू जीवन-चिंतन’ हे त्या अर्थाने ‘दर्शन’ ठरते. येथील ‘दार्शनिकांनी’ केलेल्या विचार-प्रयोगातून समोर येणारी मानव-कल्याणाची रीती-नीती पद्धती ही व्यक्तीच्या विकासाबरोबरच देश आणि अखिल मानवसमूहाचाच केवळ नव्हे, तर संपूर्ण सृष्टीचा विचार करते आणि त्यामुळे या ‘दर्शनात’ एकात्मतेचा, अखंडतेचा, परस्परावलंबित्वाचा व परस्परानुकूलतेचा आणि त्यामुळेच interdependent ‘शाश्वत विकासाचा’ अंतर्भाव होतो.
 
 
मानवसमूहांच्या प्रगतीच्या वाटचालीत आवश्यक असा संतुलनाचा (Balance ) आणि समतोलाचा (equilibrium) विचार भारतीय म्हणजे हिंदू संस्कृती व परंपरेने खरे म्हणजे जगाला दिला. सध्याच्या बाजार-संचालित अर्थव्यवस्थेत मागणी-पुरवठ्याचा समतोल महत्त्वाचा असतो; परंतु मुळात समाजाच्या विचारसरणीतच समतोल जर नसेल तर तो बाजार-यंत्रणेतही दिसू शकत नाही, हे अत्यंत महत्त्वाचे सत्य पं. दीनदयाळजींनी त्यांच्या विचार-योगदानाद्वारे आपल्यापुढे आणले आहे.
 
 
आचार-विचार-उच्चारांच्या कोलाहलात सिद्धांत - प्रतिसिद्धांत विश्लेषण (Thesis - Antithesis - Synthesis..) यांच्या स्पर्धेच्या काळात भारत स्वतंत्र झाला आणि त्याने गोंधळलेल्या अवस्थेत ‘मिश्र अर्थव्यवस्था’ स्वीकारली. यात भांडवलवादी व समाजवादी विचारातील चांगले तेवढे घेण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा ठेवण्यात आली! व्यवहारात हे घडू शकले नाही. गोंधळलेली अवस्था दीर्घकाळ राहिली. ‘स्वतःचा स्वतंत्र विचार असू शकतो’ हा विचारही प्रकट होऊ शकला नाही. राजकीय गणिते लक्षात घेता पं. दीनदयाळजींच्या काळात त्यांचा पक्ष म्हणजे त्या वेळचा भारतीय जनसंघ. या पक्षाचे बळ तुटपुंजे आणि त्यामुळे मांडलेल्या सकस विचारांचे बळही अपुरे. एकात्म मानव दर्शन मांडणीला त्यामुळेच व्यापक जनसमर्थन मिळणे त्या काळी शक्य झाले नाही !
 
 
वस्तुतः भांडवलवादी व्यवस्था आणि समाजवादी व्यवस्था या अपुर्‍याच ठरल्या. भांडवलवादाने अतिरेकी व्यक्तिवाद व व्यक्ति-स्वातंत्र्याचे स्तोम माजवले. त्यातून सामाजिकतेचा र्‍हास झाला. समाजवादी व्यवस्था असलेल्या देशांमध्ये समानतेसाठी अतिरेकी, अघोरी प्रयोग झाले. धर्म नाकारण्यात आला. व्यक्तींच्या भावभावनांचे महत्त्व संपुष्टात आले. यातून व्यक्तिस्वातंत्र्य व व्यक्तित्व लयाला गेले व्यक्तींचे व समूहांचेही! व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक अंतिमतः समानतेचा गळा घोटतो आणि अतिरेकी समानता आणण्याचा प्रयोग व्यक्तिस्वातंत्र्याचा र्‍हास करतो! हे जगानेही अनुभवले; परंतु यासाठीचे उत्तर म्हणजे दोन्हीतील थोडे-थोडे मुद्दे घेऊन केलेले मिश्रण - ‘मिश्र अर्थव्यवस्था’ - असे मानून केलेली वाटचाल फलदायी ठरली नाही, कारण या स्वरूपाच्या कृत्रिम मिश्रणाच्या मर्यादा भारतातील प्रारूपाला होत्याच.
 
 
खरे म्हणजे, ‘समाजाचा बहुआयामी विकास ही जीवशास्त्रीय संकल्पना असली पाहिजे,’ असा विश्वास पं. दीनदयाळजींनी मांडला. यात समाजपुरुषाचा स्वाभाविक आविष्कार व्हावा. विकासाचे मानकही या मातीतील विचार, भावभावना, मानसिकता, संस्कृती आणि या सार्‍यांच्या आविष्कारातून तयार व्हावे तर ते यशस्वी होण्याची शक्यता वाढते. अशा प्रकारच्या समाजस्तरावरील आविष्कारास पं. दीनदयाळजींनी ‘चिती’ हा शब्दप्रयोग वापरला. ‘चिती’चे जागरण, समाजाचा एकसंध प्रतिसाद व अभिव्यक्ती याद्वारे या देशाच्या व समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या वाटा स्पष्ट दिसू लागतील, असा विश्वास पं. दीनदयाळजींनी त्यांच्या भाषणांद्वारे दिला. पं. दीनदयाळजी उपाध्याय यांनी मांडलेला ‘एकात्म मानव दर्शन’ हा सूत्ररूप विचार दिशादर्शक आहे. ‘एकात्म मानव दर्शन’ सार्‍या मानवजातीला विचार प्रवृत्त करणारे आहे.
 
 
एकात्म विचार
 
हा विचार ‘एकात्म’ आहे, तुटक-तुटक नव्हे. मानवाच्या कल्याणाचा विचार करताना आर्थिक संपन्नता, सामाजिक समता - समरसता, राजकीय संधी, सांस्कृतिक वैभव, मानसिक समाधान व आनंद, बौद्धिक क्षेत्रातील कार्यकर्तृत्व - या सार्‍यांचा वेगवेगळा विचार येथे अभिप्रेत नाही. अभ्यासार्थ वेगवेगळा विचार जरी करायचा म्हटले तरी अंतिमतः मानवकल्याणासाठी या सार्‍याच गोष्टींची गरज असते. मानवाचा विचार केवळ ‘आर्थिक मानव’, ‘सामाजिक मानव’, ‘राजकीय मानव’ असा वेगवेगळा करता येत नाही. केवळ भौतिक प्रगती साध्य झाल्याने मानवसमूह सुखी-समाधानी-आनंदी होईलच याची खात्री नाही. त्यामुळे मानवविकासाची संकल्पनासुद्धा एकात्मिकच असायला हवी, असा दृष्टीकोन यात आहे. हा दृष्टीकोन ‘एकात्म मानव दर्शनाचे’ वेगळेपण सांगून जातो.
 
 
कोणाही एका व्यक्तीबाबतच्या विकासाची संकल्पना पंचकोषात्मक विकासाची असते. ही मूळ भारतीय संकल्पना होय. आधुनिक मानसशास्त्र, व्यवस्थापनशास्त्रसुद्धा याच पद्धतीच्या व्यक्तित्व-विकसनाची कल्पना मांडते. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय कोषांचा विकास म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा विकास होय. या सर्व पैलूंचा विचार करून शैक्षणिक रचना उभ्या करता याव्यात हा यातून मिळणारा संदेश होय. त्यासाठीची सुयोग्य मांडणी, राजकीय इच्छाशक्ती, व्यावहारिक अंमलबजावणी व परिणामांचे परीक्षण या क्रमाने पुढे जावे लागेल. हे करणे म्हणजे पं. दीनदयाळजींच्या एकात्म मानव दर्शन मानकाची व्यावहारिक अंमलबजावणी होय! येथे भारतीय दृष्टीकोनाचे वेगळेपण महत्त्वाचे आहे, ते पं. दीनदयाळजी छोट्या-छोट्या उदाहरणांतून सांगतात. उदा. - "Survival of the weakest', हा तो विचार होय. "Survival of the fittest'' हा बाजार-यंत्रणेवर अवलंबून असणार्‍या प्रारूपातून पुढे येणारा विचार भारतीय विचार-परंपरेत बसत नाही.
 
 
अर्थात, कमकुवत गटांना विकासपथावर आणण्याच्या अर्थव्यवस्थेच्या प्रयत्नात वर्गसंघर्ष अपेक्षित नाही. Dualism अभिप्रेत नाही. एकात्मता अभिप्रेत आहे. येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली धर्माची व्याख्या मार्गदर्शक ठरते. ‘बंधुभाव हाच धर्म’ ही ती व्याख्या होय. ‘बंधुभावाचे जागरण’ हा भावात्मक विचार येथे आहे. येथे प्रतिक्रियात्मकता नाही. एकात्मता आहे. एकात्मता कृत्रिम नाही. बंधुभाव जागरणामुळे ती जैविक संकल्पना बनते. दीर्घकाळ टिकणारी ठरते. त्या अर्थाने सामाजिक, आर्थिक अशा सर्व कमकुवत गटांना प्रगतिपथावर नेण्याचे व्यक्तींचे, समाजाचे व शासनाचे प्रयत्न हे आत्मीयतेचे प्रयत्न ठरतात. त्या अर्थाने हे ‘धार्मिक‘ कार्य ठरते. "Workers of the world, unite together; because you have nothing to loose but your chains'  या मार्क्सवादी वर्गसंघर्षात्मक मांडणीतून जगाचे भले झालेले नाही. त्यामुळेच "workers of the world, unite the world' अशी घोषणा पं. दीनदयाळजींचा वारसा सांगणार्‍या कामगार चळवळीने पुढे दिलेली दिसते. एकात्म मानव दर्शनाचा आत्मीयता व समन्वय हा एक महत्त्वपूर्ण पैलू होय.
 
 
वर्गसंघर्षात्मक व प्रतिक्रियात्मक मांडणीच्या आधारे चालणार्‍या वाटचालीत जगातील देशांना अपयश का आले? कारण हा विचार संघर्षात्मक व सार्वत्रिक विनाश ओढवणारा ठरला.
 
 
‘एकात्म मानव दर्शन’ मात्र ‘समाजपुरुष’ अथवा ‘राष्ट्रपुरुष’ असा विचार मांडते. या विचारात सहवेदना व संवेदना - म्हणजेच ‘माणूसपण’ जिवंत ठेवण्याची इच्छा आढळते. या संकल्पनेचे वर्णन पं. दीनदयाळजींनी ‘अंगांगी भाव’ म्हणून केलेले आढळते. पेशी जिवंत तर माणूस जिवंत आणि माणूस जिवंत तर पेशी! भावात्मक विचारांच्या व्यक्ती-व्यक्तींनी समाज बनतो; पण समाजाच्या अस्तित्वाशिवाय व्यक्तीही नाही! एकात्म-मानव दर्शन मांडणीत ‘समाज’ हासुद्धा एक एकक म्हणून वावरताना आढळतो. त्याला अस्तित्व आहे, विचार आहे, भावना आहेत, सामूहिक मन आहे, इच्छा-आकांक्षा आहेत, ते एक जिवंत अस्तित्व आहे. समाज हा कराराने बनत नाही. त्याची धारणा नैसर्गिक समान भावभावनांमधून होते. अशा समाजातूनच आध्यात्मिक अथवा सांस्कृतिक राष्ट्रवादाची कल्पना साकार होते. भारतात हे घडलेले आहे. अशा राष्ट्राला म्हणूनच भारतीय लोक ‘भारतमाता’ स्वरूपात मानतात, असा पं. दीनदयाळजींच्या मांडणीचा रोख आहे.
 
 
या प्रकारचा राष्ट्रवाद ‘अहं ब्रह्मास्मि’ ते ‘सर्वं खल्विदं ब्रह्म’ या दोन्ही संकल्पना मानतो आणि म्हणूनच या प्रकारच्या राष्ट्रवादाची प्रखर भावना कधीही आक्रमणकारी अथवा वसाहतवादी राष्ट्रवादात परावर्तित झालेली भारतात आढळली नाही. ‘एकात्म मानव दर्शन’ अशा प्रकारच्या राष्ट्रवादास प्रोत्साहन देऊ इच्छिते. शोषणाधारित रचनांमधून संपन्नता प्राप्त करण्यास विरोध करते.
 
 
समग्र विचार
 
एकात्म मानव दर्शनाचे वैशिष्ट्य हे की, त्यात ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या विचारसूत्रानुसार संपूर्ण समाज, पर्यावरण व सृष्टीचा विचार केलेला आढळतो. ज्याप्रमाणे व्यक्तींचा विकास पंचकोषात्मक असावा, त्याप्रमाणेच सामाजिक स्तरावरही परस्परावलंबी, परस्परपूरक, परस्परानुकूल असा ‘समग्र विचार’ केलेला आढळतो. ’वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना समग्र (Holistic) विचाराला पोषक मानलेली दिसते. व्यक्ती समाजापासून वेगळी, तुटून राहू शकत नाही. ती जोडलेली राहते. समाज सृष्टीशी म्हणजेच निसर्ग, नैसर्गिक पर्यावरण - झाडे, प्राणी, पक्षी, डोंगर, नद्या, दर्‍या यांच्याशी जोडलेला राहतो आणि अंतिमरित्या व्यक्तीला परमेश्वराशी म्हणजेच अफाट अशा शक्तीशी जोडून घेण्याची प्रेरणा असते. या संकल्पनेची मांडणी व्यष्टी - समष्टी - सृष्टी - परमेष्टी अशी करता येते. हाच विकासक्रमही मानता येतो. व्यक्तींचा आवाका येथे वाढवत-वाढवत नेलेला दिसतो. समजूतही वाढते. व्यक्तींचे उन्नयन होते. सृष्टीचे अति शोषण न करता संगोपन, दोहन करतच व्यक्ती व समाज वाटचाल करू शकतात; तर त्या पद्धतीच्याच आर्थिक रचना उभ्या राहाव्यात! निसर्गदत्त साधनसामग्रीचा पर्याप्त वापर व्हावा. सृष्टीला ओरबाडून स्वतःसाठी आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. त्यातून आनंद निर्माण होऊही शकत नाही. ही झाली ‘एकात्म मानव दर्शना’ची मार्गदर्शक शिकवण. या सूत्राचा व्यावहारिक पातळीवरचा आविष्कार अर्थशास्त्री, राज्यशास्त्री, समाजशास्त्री इ. मंडळींनी करायचा आहे व त्या आधारे प्रारूपे ( models) उभी करायची आहेत. हे काम करणे हा काही मूठभर अथवा पं. दीनदयाळजी उपाध्याय यांना मानणार्‍यांचा विषय राहात नाही. हे आव्हान सार्‍या भारतवासीयांना आहे. खरे म्हणजे ते जगातील सर्वच मानवांना आहे. म्हणूनच ‘कुठे आहे एकात्म मानव दर्शनचे प्रारूप?’ असे म्हणून थट्टा करणे तात्कालिक गमतीचे वाटेल; पण समाज व सृष्टीपुढील भयानक समस्यांना तोंड देताना सध्याच्या भांडवलवादी शोषणाधारित आर्थिक-राजकीय प्रारूपांचा पुनर्विचार करावाच लागेल! तो पं. दीनदयाळजींच्या मार्गाने असू शकेल, असे सांगणे आज शक्य आहे. ‘एकात्म मानव दर्शन’चा आधार घ्यायचा नसेल तर विविध मार्गदर्शक सूत्रांपासूनच पुन्हा एकदा मूलभूत विचार करावा लागेल. तो कोण करेल?
 
 
खरे म्हणजे कोणी करणार नाही! नव-व्यवस्थापनशास्त्रसुद्धा नवीन पद्धतीने Profit People Planetचा विचार करते आहे. त्याची बीजे व्यष्टी - समष्टी - सृष्टी या विचारप्रवाहात आहेत, असे म्हणायचे की, ‘सर्व श्रेष्ठ लोकांचे श्रेष्ठ विचार सारखेच असतात.’ (The great men think alike) असे म्हणायचे? काहीही म्हटले तरी ‘एकात्म मानव दर्शन’ या विचारांचे महत्त्व नाकारता येत नाही! त्यावर अभ्यास -संशोधनाची गरज मात्र राहते.
 
व्यक्तिपरिवर्तनातून समाजपरिवर्तन
 
‘राष्ट्रीय प्राध्यापक’ डॉ. अशोकराव मोडक यांनी ‘एकात्म मानवदर्शना’वर भाष्य करताना अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. तो असा की, ‘व्यक्ति-परिवर्तनाविना’ क्रांती दीर्घकालीन यश देत नाही, हे युनियन ऑफ सोव्हिएट सोशालिस्ट रिपब्लिक (USSR)च्या पतनाने सिद्ध झाले आहे. त्यांनी संदर्भ दिला समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहियांच्या Economics after Marxचा. लोहियाजी समाजवादी-साम्यवादी कार्यकर्ता व विशेषतः नेतृत्वाला प्रश्न विचारतात की, ‘मालमत्तेची हाव तुम्ही (तरी) मनातून काढलीत का?’ उत्तर वेगळे देण्याची गरज नाही!
 
 
आशय असा की, व्यक्ती-व्यक्तीत, मनामनात बदल घडवणे महत्त्वाचे. ‘एकात्म मानव दर्शन’ अशा बदलांचा, व्यक्तित्वातील बदलांचा विचार करायला लावते. हा मार्ग अत्यंत सावकाशीचा आहे. क्रांतिकारी परिवर्तनाची ताकद तेथे दिसत नाही; पण तोच जर एकमेव मार्ग असेल, तर सुयोग्य बदलांसाठीचा तोच द्रुतगती मार्ग मानावा लागेल. ‘व्यक्तिपरिवर्तनातून समाजपरिवर्तन’ हा एकात्म मानव दर्शनास अभिप्रेत असलेला मार्ग दिसतो. अशा परिवर्तनासाठी व्यापक स्तरावर कार्य उभे करण्याची आवश्यकता समाज व शासन अशा दोन्हींना आहे. ‘सर्व काही शासन करेल, करू शकेल’ असा दृष्टीकोन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बदल घडवण्याची जबाबदारी फक्त शासन-व्यवस्थेची, असा दृष्टीकोन बदलण्याची गरज येथे आढळते.
 
 
भारतात परंपरेनेच असे आढळते की, येथील समाजाला आवश्यक अशा सवयी व्यक्ती व कुटुंबाला लागाव्यात यासाठी ‘पद्धती’ उभी करण्यात आली. उदाहरणार्थ दातृत्वाची संकल्पना! काय करावे, काय करू नये, काय अवश्यमेव करावे, हे सांगताना आवश्यक त्या गोष्टी समाजाच्या आचरणात कशा येतील व दीर्घकाळ कशा रुजतील अथवा पाझरतील आणि त्यामुळे एकूणच समाजाचा पोत कसा उंचावेल, याचे उत्तम उदाहरण म्हणून हिंदू संस्कृती व समाज याकडे पाहता येईल. सद्यःकाळात सुयोग्य व आवश्यक बदल स्वीकारून, समाजातील दोषांचे निर्मूलन आणि निर्दालन करून सद्गुण-संपन्न समाजनिर्मिती करण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याची आवश्यकता सर्वांनाच पटते; पण हे बदल व्यक्तिपरिवर्तनाविना घडत नाहीत. व्यक्तिपरिवर्तनावर व सामान्यातून असामान्य कर्तृत्वाची माणसे भक्कमपणे उभी करण्यावर दृढ विश्वास व त्यानुसार सातत्यपूर्ण कृती करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पं. दीनदयाळजी उपाध्याय हे स्वयंसेवक होते. त्यांनी समाजपरिवर्तनाचा सावकाश वाटचाल असलेला, पण सुनिश्चितपणे परिवर्तन घडवू शकणारा मार्ग स्वीकारला, आयुष्यभर आचरणात आणला आणि आचरण करतानाच त्याची मांडणी केली. ‘व्यक्तिपरिवर्तनातून समाजपरिवर्तन’ हे ‘एकात्म मानव दर्शना’चे महत्त्वपूर्ण सूत्र बनले. अतिरेकी व्यक्तिस्वातंत्र्यातून समाजावर व समानतेवर होणारे अतिक्रमण भांडवलवादी व्यवस्थेतून पुढे येताना दिसते. ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ व ‘सहिष्णुतेसाठी’ गळा काढणार्‍या समाजवादी - साम्यवादी व्यक्तींची असहिष्णुता आपल्याला प्रखरपणे जाणवते. अशा काळात आवश्यक असे संतुलन राखणे व्यक्तिपरिवर्तनावाचून अशक्य दिसते.
 
सर्वसमावेशकता
 
उपरोल्लेखित ‘संतुलन’ अथवा ‘समतोल’ व्यक्ती-व्यक्तींच्या मनात निर्माण होणे यालाच ‘सामाजिक शहाणपण’ म्हणता येईल; पण असे सामाजिक शहाणपण ‘सर्वसमावेशकता’ या मूल्यावाचून निर्माण होऊ शकत नाही. भारतीय समाजाचे हे वैशिष्ट्य बनू शकले ते शेकडो-हजारो वर्षांपूर्वीपासून कोणी ना कोणी प्रयत्न करत राहिल्यामुळे, समाजाची घडी त्या पद्धतीची बसवल्यामुळेच. पं. दीनदयाळजींच्या ‘एकात्म मानव दर्शन’ मांडणीतून आपल्या समाजाचे वैशिष्ट्य म्हणून पुढे येणारा मुद्दा हा ‘सर्वसमावेशकता’ (Inclusiveness) हा आहे. तो स्वतंत्रपणे सिद्ध करण्याची आवश्यकता आहे काय?
 
आर्थिक संपन्नता
 
भारतीय समाजात ‘अभ्युदय’ आणि ‘निःश्रेयस’ अशा दोन्ही संकल्पना भिनलेल्या आढळतात. म्हणजेच आर्थिक संपन्नतेला, सुखी-समाधानी जीवननिर्मितीला महत्त्व दिलेले आढळतेच. या भौतिक प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे महत्त्वही लक्षात येते. पं. दीनदयाळजींच्या मांडणीत अत्यंत पुरोगामी असे द्रष्टेपण आहे.
 
1) पं. दीनदयाळजींनी ‘पूर्ण रोजगार’ या संकल्पनेला महत्त्व दिलेले आहे. सध्याच्या परिभाषेतील ‘बेरोजगारी निर्माण करणारी आर्थिक वृद्धी’ (jobless growth) असता कामा नये, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच समग्रलक्ष्यी आर्थिक रचनाच अशी असावी, की आर्थिक वृद्धीबरोबरच उत्पादन घटकांचा रोजगार वाढावा, टिकून राहावा. ‘रोजगारकेंद्रित उत्पादन रचना’ निर्माण करणे महत्त्वाचे. यातूनच ‘हर हाथ को काम, हर खेत को पानी’ हे सूत्र पुढे आले. भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ यांच्या मांडणीतही हा विचार प्रकर्षाने पुढे आलेला दिसतो.
परंतु केन्स यांच्या अर्थशास्त्रीय मांडणीला - म्हणजेच कृत्रिमरीत्या व उत्पादकतेचा विचार न करता (अनुत्पादक) रोजगारनिर्मितीला पं. दीनदयाळजींनी विरोध केलेला आढळतो. ज्याचा जन्म झाला त्याला पोट भरावे लागणार, हा निसर्गनियम मान्य करतानाच स्वतः काम करून, राष्ट्रीय उत्पन्नात योगदान देऊन स्वतःच्या कमाईने स्वत:चे पोट भरणे आणि ज्यांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमतांच्या मर्यादांमुळे असे करता येत नाही त्यांची काळजी समाजाने घेणे आवश्यक आहे, असे पं. दीनदयाळजी म्हणतात. समाजाने काळजी घ्यायची याचा अर्थ भ्रातृभावाने, बंधुभावाने, कुटुंब-व्यवस्थेद्वारे व सध्याच्या काळात विविध स्वरूपांच्या स्वयंसेवी-सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अशा विकलांगांची काळजी घेणे. या ठिकाणी शासन-व्यवस्थेची भूमिका महत्त्वाची ठरेल; परंतु सर्वतोपरी शासनावर अवलंबून राहण्याची मानसिकता असणार नाही. शासनाला ते परवडतही नाही, हे आता लक्षात आले आहे. ‘समाजाची काळजी समाजानेच घ्यायची’ (शासनाने नव्हे !) यासाठी उपयुक्त व निसर्गत: वृद्धिंगत झालेली आणि भारतात बर्‍यापैकी आजही टिकून असणारी ‘कुटुंबव्यवस्था’ ही केवळ चांगली समाजव्यवस्थाच प्रकट करते असे नव्हे; तर ही व्यवस्था चांगली ‘अर्थरचनाही’ प्रकट करते.
 
 
भारतात जर कुटुंबव्यवस्थेचा र्‍हास झाला तर आवश्यक असणार्‍या पाळणाघरे, वृद्धाश्रम, मानसोपचार केंद्रे, बाल-सुधारगृहे (आणि कारागृहेसुद्धा!) या सर्वांची निर्मिती आणि पालन-पोषण शासनाला झेपणे अशक्यप्रायच दिसते आहे. म्हणून शासनाने कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत, खर्चही करावा. तो परवडेल! असा विधायक कामांचा प्रयत्न करणारी मंडळी ‘संस्कृतिरक्षकांच्या’ (दांभिक) भूमिकेत जातात, अशी ओरड करणारे तथाकथित पुरोगामी अर्थशास्त्राचा सुयोग्य विचार करताना आढळत नाहीत. एकीकडे ते स्वतःला भौतिक प्रगतीचे भौतिकवादाचे अग्रणी समजतात! कुटुंबव्यवस्था टिकणे हा देशासाठीचा आर्थिक विचार आहे. ही व्यवस्था टिकवण्याचा पुरस्कार पं. दीनदयाळजी करतात. पं. दीनदयाळजींचा विचार ‘अर्थशास्त्रीय’ नव्हे काय?
 
 
‘जो जन्मा सो खायेगा, खानेवाला कमायेगा, और कमानेवाला खिलायेगा भी’ या स्वरूपाचा विचार पं. दीनदयाळजींनी मांडला आणि जोडूनच ‘अंत्योदयाची’ आवश्यकता प्रसृत केली.
 
 
2) ‘अंत्योदयाचे’ महत्त्व विशद करताना पं. दीनदयाळजींनी फार सुंदर कल्पना मांडली. तिचे नाव ‘अर्थायाम’. जसा ‘प्राणायाम’ तसा ‘अर्थायाम’! अर्थाचे महत्त्व आणि नियमन. महत्त्व अशा दृष्टीने की, अर्थावाचून, पैशावाचून काही चालू शकत नाही. चांगले जीवन जगण्यासाठी पैशाची नितांत आवश्यकता आहे; पण पैसा मिळवण्याचा मार्ग, साधन आणि मात्रा या सर्वांचे महत्त्व आहे. पैशाचा अभाव व प्रभाव दोन्ही वाईटच! त्याचे नियमन झाले पाहिजे. पैसा आपल्या उपयोगाचा आहे. तो आपल्यावर स्वार होता कामा नये, अन्यथा अनर्थ ओढवतो !
 
 
परंतु ‘अंत्योदयाची’ योजना जर पूर्णत्वाला न्यायची झाली तर शासनाची सार्वजनिक-वित्तासंबंधीची भूमिका महत्त्वाची ठरते. करप्रणाली, कररचना, सार्वजनिक खर्च, त्याची उत्पादकता असे मुद्दे समोर येतात. याबाबतचा विस्तार सध्याच्या अर्थतज्ज्ञांनाच करावा लागेल. मूळ मार्गदर्शक सूत्र मात्र विसरून चालणार नाही.
 
 
3) पावसावर अवलंबून न राहणारी शेती, (‘अदेवमातृका कृषी’) भारतात विकसित व्हावी, असा आग्रह पं. दीनदयाळजींच्या विचारसूत्रात दिसतो. ‘हर खेत को पानी...’साठीच्या विविध योजना यासाठी साकार कराव्या लागतील, हे तर आवश्यकच आहे; परंतु पं. दीनदयाळजींनी यासाठी आवश्यक सुधारित बियाणांचा उपयोग, तंत्रज्ञानाधारित शेती-अवजारे, उपकरणे यांचा उपयोग, खतांचा संतुलित उपयोग इ.चे विवेचन केले आहे.
 
 
4) उद्योग - उद्योगाचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून पं. दीनदयाळजींनी मार्मिक विवेचन केले आहे. यंत्राचा विरोध कुठेही केलेला नाही. पर्याप्त उपयोगाचा आग्रह धरला आहे. पर्याप्तता ठरवण्यासाठी ‘रोजगारनिर्मिती’ व ‘वृद्धी’ असली पाहिजे याकडे लक्ष दिले आहे. यंत्र व तंत्रज्ञान हे आधुनिक विज्ञानाचे दर्शकही आहे आणि उत्पादनही आहे. ते ‘साधन’ आहे; पण ते आधुनिकतेचे प्रतिनिधी नव्हे, असे पं. दीनदयाळजी सांगतात. ‘यंत्र आहे म्हणून आम्ही आधुनिक आहोत’ ही भूमिका यंत्राचे प्राबल्य निर्माण करेल, म्हणून तशी भूमिका नसावी, असे पं. दीनदयाळजींचे मत आहे. आवश्यक तेथे यंत्राचा वापर करण्यास त्यांचा विरोध नाही.
 
 
उद्योग, तंत्रज्ञान, विज्ञान, उपकरणे, यंत्रे यांच्या स्वदेशी उत्पादनांचा आग्रह पं. दीनदयाळजी धरतात; परंतु येथे कोणताही दुराग्रह नाही. त्या अर्थाने पं. दीनदयाळजी पूर्ण खुल्या भूमिकेने गरजेनुसार विदेशी यंत्र, तंत्र, विज्ञान स्वीकारतात. दोन ठळकपणे मार्गदर्शक भूमिका त्यांनी मांडलेल्या दिसतात.
 
 
1) जे ‘स्वदेशी’ आहे ते ‘युगानुकूल’ करून घेणे आणि
 
 
2) जे आवश्यक ‘विदेशी’ आहे ते ‘देशानुकूल’ करून घेणे. दोन्ही ठिकाणी कालसुसंगत व ‘राष्ट्रीय-स्वार्थ साधण्याची’ त्यांची मनोभूमिका दिसते. त्यांच्या या भूमिकेमुळे ‘स्वदेशी’ची व्याख्या नव्याने करता येऊ शकते. ‘स्वदेशी म्हणजे राष्ट्रीय-स्वार्थ साधणारी अर्थनीती!’ अर्थातच या प्रकारची व्याख्या केल्यावर ‘राष्ट्रीय-स्वार्थ’ ठरवणे आणि त्यासाठीची ‘अर्थनीती’ निश्चित करणे, हे आपल्यासमोरील आव्हान ठरते. याचे सर्व तपशील कालसुसंगततेने निश्चित करता येऊ शकतात. यात मूलभूत सूत्रांच्या दृष्टीने सनातनता राहते; परंतु त्यात विविध पैलू आणणे, तपशील ठरवणे यासाठीही मोकळीक असल्यामुळे नित्यनूतनता राहते, प्रवाहीपणाही राहतो. ‘प्रवाह’ हा वाहता आणि त्यामुळेच सतत बदलता व नवीनतेचा ध्यास घेणारा असतो आणि त्यातूनच चिरकालीन टिकणारा संपन्न समाज उभा राहू शकतो. साचेबंदपणाची दुर्गंधी यात असत नाही आणि पोथिबंदपणाही राहत नाही. ‘एकात्म मानव दर्शनाच्या’ मांडणीतील अर्थविचारांची नित्यनूतनता आणि आधुनिकता अशा पद्धतीने ‘विकसनशील प्रस्तुतीकरण’ स्वरूपात पुढे येते. तिचे विविधता दर्शवणारे रंग-रूप स्वीकारण्यास पं. दीनदयाळजींचा आक्षेप नाही!
 
 
अशा रीतीने सृष्टीतील साधनसामग्रीचा सुयोग्य वापर, त्याद्वारे वस्तू व सेवांचे विपुल उत्पादन आणि उत्पन्नाचे समन्यायी वितरण, या देशातील कोणीही अर्धपोटी राहू नये अशी व्यवस्था - याचा पुरस्कार पं. दीनदयाळजी उपाध्याय त्यांच्या ‘एकात्म मानव दर्शन’ मांडणीत करतात. याला अनुकूल सामाजिक, राजकीय, आर्थिक रचना उत्पन्न करण्यासाठी शासनाबरोबरच समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. शासनयंत्रणेच्या मर्यादा लक्षात घेऊन स्वयंसेवी संस्थांनी पुढे आले पाहिजे. हे कार्य करताना व्यक्ती, संस्था व शासन या सार्‍यांचेच सामाजिक भान टिकले पाहिजे ‘व्यक्तिपरिवर्तनातून समाज व देशपरिवर्तन’ ही भूमिका असल्यामुळे व्यक्तिपरिवर्तनासाठी कुटुंबव्यवस्था टिकून राहण्यास प्रोत्साहन, शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध तंत्रे व कौशल्ये शिकवतानाच विविध मूल्यांचे प्रयत्नपूर्वक शिक्षण, धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक मार्गांनी व्यक्तीला जीवनध्येयाप्रति जागृत करणे, वैभवसंपन्न राष्ट्रउभारणीची प्रेरणा सर्वच व्यक्ती व देशवासीयांमध्ये उत्पन्न करणे - या गोष्टी आवश्यक ठरतात.
 
 
वाढती लोकसंख्या आणि माणसाच्या मनातील अमर्याद गरजा यामुळे उपलब्ध साधनसंपत्ती पुरेनाशी झाली आहे. अमर्याद गरजा व मर्यादित साधनसंपत्तीतील द्वंद्व सार्‍या मानवजातीला व आपल्या देशवासीयांना संकटांकडेच घेऊन जाईल. अर्थशास्त्राच्या सध्याच्या व्याप्तीत ‘संयमित उपभोगाचे शिक्षण’ येऊ शकत नाही; परंतु भारतीय परंपरेतील अर्थशास्त्राच्या मांडणीची (उदा. कौटिल्याचे अर्थशास्त्र) व्याप्ती अधिक मोठी आहे. त्यात अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, न्यायशास्त्र, समाजशास्त्र या सार्‍यांचा समावेश होतो. त्यामुळेच भारतीय अर्थशास्त्राच्या संकल्पनेत असा बदल होऊ शकेल; पण संयमित उपभोगाची मानसिकता ही कोणत्याही शास्त्रात अथवा सिद्धांतात असून उपयोगाची नाही. त्यासाठी तशी जीवनरचना, समाजरचना उभी करावी लागेल. मनावरील नियंत्रणाचे शिक्षण विविध पद्धतींनी समाजात रुजावे लागेल. या सार्‍याचा मार्ग ‘एकात्म मानव दर्शन’ यातून सापडण्याची शक्यता आहे. यासाठीचे मार्गदर्शन पं. दीनदयाळजींनी त्यांच्या भाषणांतून, लेखनांतून देऊन ठेवले आहे. या मार्गाने वाटचाल करणार्‍यांची संख्या वाढली पाहिजे.
 
- आनंद य. लेले