मणिपूर भेट - आशादायी आणि आश्वासक

19 Sep 2025 18:04:27
@सुनील किटकरू  9890489978

manipur
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मणिपूरला भेट दिली. विविध विकासकामांचे भूमीपूजन केले. अशांत मणिपूरला धीर देण्याचा प्रयत्न केला. अवघड परिस्थितीला संयम, आत्मियतेने, भूतकाळातील उज्ज्वल काळाचे स्मरण देत सर्वांच्या दुःखावर आत्मियतेची फुंकर घातली. घार जशी आकाशी तरी चित्त तिचे पिल्लापाशी, अशीच अनुभूती देशाच्या पूर्वोत्तर टोकावर असलेल्या या आपल्या बांधवांना आली व उद्याची पहाट आशा व विश्वासाने भरलेली असेल हाच उत्साह निर्माण झाला.
बहुप्रतिक्षित अशी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची अशांत मणिपूरला 13 सप्टेंबरला दोन जनसभांसकट अभूतपूर्व भेट झाली. मे 2023 नंतर कुकी मैतेईमध्ये सुरू झालेल्या वांशिक दंगलींनंतर दोन वर्ष उलटून गेली. पंतप्रधान मणिपूरला का जात नाहीत म्हणून विरोधक टाहो फोडत होते. परंतु समाजात एकता नांदावी, योग्य सहायता मिळावी, समस्येची उकल व्हावी नंतर कशा पद्धतीने शांतता होऊ शकते यावर केंद्र सरकार सतत प्रयत्नशील होते. काँग्रेेस काळात झालेला नागा कुकी संघर्ष सहा वर्ष चालला, त्यात हजारो नागरीक मृत्युमुखी पडले होते. त्या तुलनेत मोदी सरकारने स्थिती बरीच नियंत्रणात ठेवली. आज मणिपूरला राष्ट्रपती राजवट आहे.
 
 
प्रथमतः मोदीजी चुराचंदपुर जिल्ह्यात गेले. हा कुकीबहुल पहाडी प्रदेश आहे. येथूनच संघर्ष सुरू झाला. विस्थापितांच्या शिबिरास त्यांनी भेट दिली, संवाद साधला. त्यानंतर पार पडलेल्या सभेत ते म्हणाले की, लोक शांतीपूर्ण मणिपूरसाठी आतुर आहेत. उज्ज्वल इतिहास असलेला तसेच महान महापुरुषांचा प्रदेश आपल्या भावी पिढीसाठी ही स्थिती बदलण्यास तत्पर आहे. सात हजार तीनशे कोटीच्या विविध प्रकल्प योजनांची त्यांनी यावेळी घोषणा केली. पाचशे पन्नास कोटींचे आय टी पार्क, एकशे बेचाळीस कोटींचे दहा हजार मुलींसाठीचे वसतिगृह, सुपर स्पेशालिटी दवाखाना, विस्थापितांसाठी सहा हजार घरे बांधण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे चुराचंदपूरला मोदीजी दीड तास कारने प्रवास करून पोहोचले, कोणाच्याही कल्पनाविश्वात नसलेल्या या जिल्ह्यात 1988 ला राजीव गांधी गेले होते. त्यानंतर जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच आहेत. तत्पूर्वी त्यांनी मिझोरामला बैराबी सैरांग रेल्वेचे उद्घाटन केले. 45 बोगदे, 55 मोठे पूल, 87 लहान पूल बांधल्यावर अत्यंत कठीण दुर्गम पहाडात बांधलेली राजधानी एक्सप्रेस आईझोल ते दिल्ली जाईल. या राज्यात लोकांनी प्रथमच रेल्वे पाहिल्याने ते आनंदीत आहेत. अशक्यप्राय अशी ही गोष्ट झाली आहे. मिझोराम शांत राज्य आहे. त्यामुळे चौफेर प्रगती होत आहे. मोदीजींनी इथे सांगितले की शांतता व प्रगती हातात हात घालून येत असतात.
 
 
manipur
 
मणिपूरला कांगला फोर्ट इंफाळ शहरात दुसर्‍या जनसभेला देखील मोदीजींनी संबोधले. अ‍ॅक्ट ईस्ट अंतर्गत मणिपूरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. इंफाळला एक हजार दोनशे करोडच्या प्रकल्पांची घोषणा झाली. मणिपूरचा गौरवशाली इतिहास, महिलांद्वारा संचालित इमा बाजार तसेच मणिपूरचे खेळात असलेले स्थान आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये वीरगती प्राप्त झालेले दीपक चिंगकाम यांचे स्मरण केले. धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान तसेच अठरा एकलव्य निवासी विद्यालयांची प्रशंसा केली.
 
 
कुकीबहुल क्षेत्रात केंद्रशासित प्रदेश स्वतंत्र प्रशासन भागाची मागणी आहे. पंतप्रधानांनी स्थानिक समितींना महत्त्व देण्यास सांगितले. मैतेईंचा स्वतंत्र प्रशासनास विरोध आहे, तर कुकींचा मैतेईंना जनजातीचा दर्जा देण्यास विरोध आहे. दोन्ही जमातींचे एकमेकाच्या भागात जाणे बंद आहे. फ्री मुव्हमेंट बंद आहे. ती लवकर सुरू होईल व तशी तयारी केंद्राने सुरू केली आहे. पूर्वीसारखेच सर्व एकत्र शांततेने प्रगती करीत, विश्वासाने एक व्हावे हाच मार्ग आहे हे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच कुकी संघटनांशी युद्ध विराम केला. जेणेकरून येजा सुरू होईल. पंतप्रधान दिल्लीत परतल्यावर परत कुकी नेत्यांच्या घरावर हल्ले झाले. दोन्हीकडच्या अतिरेकी संघटना पूर्णपणे स्वस्थ बसत नाहीत. परंतु पहिल्यापेक्षा स्थिती नियंत्रणात आहे. राज्यपाल अजय भल्लाजींनी सभेत घुसखोर, ड्रग माफिया विरोधात कडाडून हल्ला केला. मंचावर दोघेच होते. या भेटीत मोदीजींनी राजकारणी मंडळींशी भेट टाळली हे विशेष.
 
 
आर्थिक सहायता प्रकल्प उभारणी करत प्रगती करा हाच मोदीजींचा सल्ला होता. मैतेई कुकींनी कोणत्याही आंतरराष्ट्रीय शक्तींशी संबंध न ठेवता आपापसात संवाद साधावा यातच त्यांचे दीर्घकालीन हित आहे. राष्ट्रीय महामार्ग, मुक्तसंचार, उद्योगशील वातावरण यावर भर दिला. विशेष म्हणजे कुकी हे ख्रिश्चन असल्याने ख्रिश्चन महाशक्ती तिथे सक्रिय आहे. तर मैतेयीमध्ये अनेक उग्रवादी संघटना आहेत. त्यामुळे भू राजनैतिक कसरत केंद्राला करावी लागते. संपूर्ण ईशान्य भारत मोदींच्या कार्यकाळात शांत असताना केवळ मणिपूरचे गालबोट आहे. काही तास राहत पंतप्रधानांनी सर्वांशीच संवाद, भरघोस आर्थिक मदत करणे व करीत राहणे तसेच शत्रूपासून दूर राहणे यावर जनतेस योग्य मार्गदर्शन केले. अवघड परिस्थितीला संयम, आत्मियतेने, भूतकाळातील उज्ज्वल काळाचे स्मरण देत सर्वांच्या दुःखावर आत्मियतेची फुंकर घातली. घार जशी आकाशी तरी चित्त तिचे पिल्लापाशी, अशीच अनुभूती देशाच्या पूर्वोत्तर टोकावर असलेल्या या आपल्या बांधवांना आली व उद्याची पहाट आशा व विश्वासाने भरलेली असेल हाच उत्साह निर्माण झाला.
Powered By Sangraha 9.0