कल्पसार प्रकल्पाचे आव्हान

19 Sep 2025 15:00:44
@ डॉ. श्रीकांत कार्लेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रकल्प कल्पसार विक्रमी वेळेत पूर्ण व्हावा यासाठी कठोर परिश्रम करीत आहेत. कल्पसार प्रकल्पासाठी 54,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असला तरी नरेंद्र मोदी त्याच्या आर्थिक व्यवहार्यतेबद्दल आशावादी आहेत. ते खाजगी गुंतवणूकदारांसाठी प्रकल्पाचे काही भाग पाडण्याची योजना आखत आहेत. केवळ वीज घटकासाठी ते सुमारे सहा कॉर्पोरेट कंपन्यांना सहभागी करून घेण्याची योजना आखत आहेत. धरणाचे बांधकाम सुरू झाल्यावर आपण फक्त सहा वर्षांत प्रकल्प पूर्ण करू शकू असा त्यांना विश्वास आहे. तो सार्थ ठरावा, हीच अपेक्षा.
पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्यासाठी तसेच औद्योगिक आस्थापनांसाठी उपयोग व्हावा म्हणून एक मोठा गोड्या पाण्याचा साठा निर्माण करण्यासाठी खंबायतच्या आखातात एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहे. कल्पसार प्रकल्प किंवा खंबायतचा आखात विकास प्रकल्प भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील खंबायतच्या आखातात 30 किमी लांबीचे धरण बांधण्याचा हा प्रस्तावित प्रकल्प आहे. 30 किमी लांबीचे समुद्रातील धरण असलेल्या ह्या प्रकल्पाची 10 अब्ज घनमीटर इतक्या गोड्या पाण्याचा साठा साठवण्याची क्षमता असेल. नर्मदा, माही, धाधर, साबरमती, लिंबडी-भागोवो आणि इतर दोन लहान नद्यांमधून गुजरातमधे जे सरासरी वार्षिक पावसाचे पाणी मिळते त्याच्या 25% इतका हा जलसाठा असेल. कल्पसार म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारा तलाव. या शब्दाची रचना कल्पवृक्ष या हिंदू पौराणिक ‘कल्पवृक्ष’ शब्दासारखी आहे.
 
vivek 
 
या धरणाच्या 35 मीटर रुंदीच्या पृष्ठभागाचे महामार्गात रूपांतर करता येईल आणि तो रेल्वे ट्रॅकसाठी देखील वापरला जाऊ शकेल आणि त्यामुळे सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील अंतर खूपच कमी होईल. सागरी पर्यावरणात जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर तयार करणार्‍या या प्रकल्पासाठी भरती-ओहोटीच्या वीज प्रकल्पाचा खर्च वगळता कोट्यवधी रुपये खर्च येईल. या प्रकल्पात खंबायतच्या आखातात मुख्य कल्पसार धरण आणि नर्मदा नदीवर आणखी एक भाडभूत नावाचा बंधारा आणि दोन्ही बंधार्‍यांना जोडणारा कालवा बांधणे हे सुद्धा समाविष्ट आहे.
 
 
साठवण क्षमता आणि धरणांच्या कमतरतेमुळे दरवर्षी नर्मदा नदीतून 30,000 दशलक्ष घनमीटरपेक्षा जास्त पाणी समुद्रात वाहून जाते, त्यामुळे कल्पसार प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी गुजरातच्या जल धोरणाचा आढावा प्राधान्याने घेण्याची मागणी तज्ज्ञ करत आहेत.
 
 
1975 मध्ये UNDP तज्ज्ञ एरिक विल्सन यांनी खंभातचे आखात हे भरती-ओहोटीच्या वेळी वीजनिर्मिती करता येण्यासाठी एक योग्य ठिकाण असल्याचे निरीक्षण नोंदविले होते. त्यानंतरच्या सरकारांनी कल्पसार नावाच्या प्रकल्पाची शक्यता तपशीलवार मांडली. डॉ. अनिल केन (एमएस विद्यापीठाचे माजी कुलगुरू) यांनी 80 च्या दशकात एक व्यवहार्य प्रकल्प म्हणून त्याची संकल्पना मांडली होती. 1988-89 मध्ये खंबायतच्या आखातावरील धरणासाठी एक शोध अहवाल तयार करण्यात आला. अहवालात असा निष्कर्ष काढण्यात आला की, मजबूत पायाभूत परिस्थिती गृहीत धरून, आखात बंद करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होऊ शकेल.
 
कल्पसार धरणाचा मुख्य उद्देश खंबायतच्या आखातात, आखाताच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍याला जोडणारे धरण बांधून गोड्या पाण्याचा मोठा साठा निर्माण करणे हा आहे. साबरमती, माही, धाधर आणि नर्मदेचे प्रवाह, सौराष्ट्रातील नद्यांचे पाणी खंभातच्या आखातात निर्माण होणार्‍या या जलाशयात सोडले जाईल. सौराष्ट्रातील पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय म्हणून कल्पसार हा एक उत्तम पर्याय असल्याचे मानले जात आहे.
एकदा आखाताचा वरचा भाग धरण बांधून बंद झाल्यानंतर, जलाशयातील पाण्याची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते. आखाताच्या जलाशयाबाहेरील भागात नेहमीच्या भरती-ओहोटीतील चढउतार चालूच रहातील आणि भरती-ओहोटीच्या ऊर्जेच्या निर्मितीसाठी त्याचा वापर केला जाऊ शकेल.
 
 
गोड्या पाण्याचा साठा आणि भरती-ओहोटीच्या वीज निर्मितीव्यतिरिक्त, कल्पसारचा उद्देश जमीन पुनर्प्राप्ती, वाहतूक सुधारणा आणि मत्स्यपालन विकास हा देखील आहे. या प्रकल्पामुळे गुजरात राज्यातील पाणी, वीज, रस्ते-रेल्वे वाहतूक आणि बंदरांचा विकास या चार महत्त्वाच्या समस्या सोडवल्या जातील.
 
vivek 
 
या प्रकल्पाच्या मूळ योजनेत भरती-ओहोटीच्या वीज प्रकल्पासह मोठ्या धरणाची बांधणी करावी असा विचार होता. राज्य सरकारच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते की, वर्ष 2020 पर्यंत पूर्ण होणार्‍या 54,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात 16,791 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा असलेला एक विशाल गोड्या पाण्याचा साठा असेल. खंबायतचे आखात ओलांडून 64 किमी लांबीचे प्रस्तावित धरण भावनगरमधील घोघा आणि भरूच जिल्ह्यातील हांसोट यांना जोडेल. यात 5,880 मेगावॅट क्षमतेचे भरती-ओहोटीचे वीजनिर्मिती गृह असेल. ऑक्टोबर 2010 मध्ये सरकारने आणखी एक योजना सुचविली होती ज्यात प्रस्तावित धरण पश्चिमेकडील भावनगरच्या थोडेसे उत्तरेकडून पूर्वकडील दहेजमधील अलदारपर्यंत बांधले जाणार असल्याचे म्हटले होते. 2017 मध्ये, सुधारित प्रकल्प योजनेत 64 किमी लांबीच्या धरणाच्या मूळ योजनेऐवजी फक्त 30 किमी समुद्री धरणासह तलावाचा आकारही कमी करण्यात आला.
 
 
2017 मध्ये धरण प्रकल्पाची व्याप्ती आणि आकार कमी करण्यात आला. आता खंबायतच्या आखातावर एक 30 किमी लांबीचे कल्पसार धरण असेल, तसेच नर्मदा नदीवरील आणखी एक भादभूत बंधारा आणि या दोघांना जोडणारा एक कालवा असेल. धरणनिर्मिती प्रक्रियेशी निगडित इतर पर्यावरणीय समस्याही अजून सोडवायच्या आहेत.
 
कल्पसार धरणाचे स्थान आणखी उत्तरेकडे सरकवण्यात आल्याने, नर्मदा नदीचे पाणी थेट कल्पसार धरणाच्या जलाशयात जाणार नाही. त्याऐवजी नर्मदेचे पाणी भरुच जिल्ह्यातील भादभूत जवळ समुद्रात जाण्यापूर्वी नर्मदेच्या मुखाच्या वरच्या बाजूला 25 किमी अंतरावर जलाशयात जाईल. यासाठी 600 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेचा आणखी एक 1.7 किमी लांबीचा बंधारा बांधून पाणी कल्पसार धरणात वळवले जाईल. हे धरण नर्मदा नदीत खार्‍या पाण्याचा शिरकाव रोखण्यास मदत करील.
 
 
नर्मदा नदीचे पाणी भादभूत धरणामधून कल्पसार धरणांत हस्तांतरित करण्यासाठी, भादभूत धरणापासून कल्पसार धरणापर्यंत एक लाख क्युसेक पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेला 30 किमी लांबीचा एक नवीन कालवा बांधला जाईल.
 
 
नर्मदा नदीच्या किनार्‍यावरील, भादभूत गावापासून उत्तरेला 5 किमी अंतरावर आणि नदीच्या मुखापासून 25 किमी अंतरावर, जिथे ती खंबायतच्या आखातात प्रवेश करते तिथपर्यंत, 1.7 किमी लांबीचा बंधारा बनवण्याची योजना आहे. हा बंधारा सरदार सरोवर धरणातून बाहेर पडणारे बहुतेक अतिरिक्त पाणी समुद्रात जाण्यापासून रोखेल आणि अशा प्रकारे नदीवर 600 दशलक्ष घनमीटर आकाराचे गोड पाण्याचे तळे तयार करेल. या बंधार्‍यावरुन जाणारा सहा पदरी रस्ता देखील असेल जो नदीच्या डाव्या आणि उजव्या काठांना जोडेल आणि सुरत आणि भरूचमधील दोन मोठ्या औद्योगिक वसाहतींमधील अंतर कमी करील. या प्रकल्पामुळे अतिवृष्टीच्या काळात पडणार्‍या जास्त पावसामुळे येणारे पूर देखील रोखता येतील. हा प्रकल्प मोठ्या कल्पसर प्रकल्पाचा एक भाग आहे.
 
 
वर्ष 1975 ते 2004 या काळातील खराब नियोजन आणि अंमलबजावणीची मंदगती यामुळे या प्रकल्पाचे काहीही काम झाले नाही. वर्ष 2012 मध्ये बांधकाम सुरू होण्याची अपेक्षा असलेला, हा प्रकल्प अजूनही विलंबित अवस्थेत आहे. 2014 ते 2017 या कालावधीत राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (एनआयओटी, चेन्नई) च्या देखरेखीखाली समुद्राच्या तळाची पातळी निश्चित करण्यासाठी संपूर्ण खंबायतच्या आखातात समुद्राच्या तळातील खोलीचा अभ्यास (Bathymetry) आणि भू-सर्वेक्षण केले जात होते. 2021-23 पर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते.
 
 
कल्पसार प्रकल्प आजही प्रस्ताव आणि नियोजन टप्प्यातच आहे. जुनी संकल्पना असूनही तो पूर्ण होण्यासाठी लक्षणीय विलंब होत आहे. या प्रकल्पावर वर्षानुवर्षे चर्चा आणि पुनरावलोकन केले जात असले तरी, मोठ्या प्रमाणावर असलेल्या गुंतागुंतीच्या आव्हानांमुळे त्याचे बांधकाम अनिश्चित काळासाठी आज थांबले आहे. खाडीतील प्रकल्पाचे काम पर्यावरणीय संतुलन आणि आर्थिक व्यवहार्यतेमुळे आव्हानात्मक झाले आहे. त्याकरिता मोठे संशोधन सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाची किंमत एक लाख 30 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होणार असल्याचा अंदाज आहे. सुमारे 45 संशोधनांपैकी निम्म्याहून अधिक संशोधन पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतिपथावर आहे.
 
 
केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, गुजरात सरकार आणि कल्पसार प्रकल्प प्राधिकरणाने पुण्यातील ’सीडब्ल्यूपीआरएस’ला संशोधन करून अहवाल तयार करण्याचे काम दिले आहे. त्यानुसार संशोधन सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे पुण्यातील केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्रात (सीडब्ल्यू अँड पीआरएस) प्रारूप तयार करण्यात आले असून त्यासंबंधीचा सविस्तर अभ्यास आणि संशोधन सुरू आहे. प्रत्यक्ष प्रारूप चाचण्या, समुद्रातील लाटा, गाळ यांचा अभ्यास, किनारपट्टीच्या संरचनांच्या त्रिमितीय प्रारुपांची चाचणी, भरती-ओहोटीचे विश्लेषण, समुद्रकिनारी असलेल्या तटबंधाची रचना आणि संबंधित किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी किंवा समुद्राच्या पाण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उभारलेली धरणे, बंधारे, तटबंदी आणि पूर नियंत्रणासाठी इतर जल-व्यवस्थापन संरचनांवर विस्तृत प्रयोगशाळात्मक प्रारुपे यांची मांडणी करण्यात आली आहे. मर्यादित गाळ, लाटा/तरंग यांचा प्रभाव, झीजरोधक उपाय, जल-अवरोधक व धरणाची रचना, मातीचा प्रकार आणि धरणाच्या बांधकामात वापरलेल्या घटकांसंबंधी शिफारसी करण्यात आल्या आहेत.
 
 
हा प्रकल्प अत्यंत अवघड असून, त्याच्या बांधकामात अनेक तांत्रिक आव्हाने आहेत. खंबायतच्या खाडीत येणार्‍या आठ मीटर उंचीच्या लाटांचा सामना करण्यासाठी विशेष दगडांचा वापर केला जाणार आहे. या दगडांचे वजन 40 टन आहे. या दगडांवर लाटा आदळून पाण्याचे संतुलन राहते. मात्र, दगडांची झीज व त्याचे परिणाम याबाबतचे संशोधन महत्त्वाचे असून, याबाबतही चाचणी सुरू आहे.
या प्रकल्पाला बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत आहे. खाडीतील पाण्याच्या लाटांमुळे तेथे येणारे नद्यांचे पाणी खारे होत असून, ते शुद्ध करण्यासाठी खाडीच्या मध्यभागी हा बांध उभारण्यात येत आहे. या ठिकाणी तीव्र वेगाने येणार्‍या लाटा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थोपवून पाणी खाडीत मिसळण्यापूर्वीच त्यावर प्रक्रिया केली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रकल्प कल्पसार विक्रमी वेळेत पूर्ण व्हावा यासाठी कठोर परिश्रम करीत आहेत. कल्पसार प्रकल्पासाठी 54,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असला तरी नरेंद्र मोदी त्याच्या आर्थिक व्यवहार्यतेबद्दल आशावादी आहेत. ते खाजगी गुंतवणूकदारांसाठी प्रकल्पाचे काही भाग पाडण्याची योजना आखत आहेत. केवळ वीज घटकासाठी ते सुमारे सहा कॉर्पोरेट कंपन्यांना सहभागी करून घेण्याची योजना आखत आहेत. धरणाचे बांधकाम सुरू झाल्यावर आपण फक्त सहा वर्षांत प्रकल्प पूर्ण करू शकू असा त्यांना विश्वास आहे. तो सार्थ ठरावा, हीच अपेक्षा.
Powered By Sangraha 9.0