मनाला वाटणारी चिंता

20 Sep 2025 12:06:38
Karunastake 
समर्थ एका श्लोकात म्हणतात की, माझे प्रारब्ध खोटे आहे म्हणजे चांगले नाही. त्यामुळे मला अहंकार बाळगण्याची दुर्बुद्धी झाली. अहंकाराने माझे नुकसान केले व मी रामाला दुरावलो. याचे मला वाईट वाटते, याचीच माझ्या मनाला खूप चिंता लागून राहिली आहे. मला काळजी याच गोष्टीची आहे की, हा मला चिकटलेला अहंकार केव्हा जाईल आणि माझ्या रामाची भेट होईल.
मागील लेखात सांगितल्याप्रमाणे विवाहसोहळा सुरू होण्यापूर्वी नारायण स्वतःच्या लग्नमंडपातून पळाला आणि त्याने रामरायाच्या दर्शनाच्या ओढीतून नाशिक गाठले. नाशिकला बारा वर्षे एकनिष्ठपणे तप:साधना केली. रामाचा साक्षात्कार झाला. रामाच्या आज्ञेने भारतभर बारा वर्षे तीर्थयात्रा करून आपल्या विहित कार्यासाठी नारायण महाराष्ट्रात कृष्णातटाकीच्या प्रांतात आला. नारायणाचा रामदास झाला. आदराने लोक त्यांना समर्थ रामदास स्वामी म्हणू लागले.
 
 
समर्थांनी अफाट साहित्यनिर्मिती केली. त्या रचना त्यांनी कोठे, केव्हा केल्या हे सांगणे कठीण आहे. स्वामींच्या वाङ्मयनिर्मितीच्या स्थळकाळाची नोंद कोठे नाही. तथापि त्यातील भावार्थ जाणून तो काळ समर्थांच्या आयुष्यातील कोणता असावा याचा अंदाज बांधता येतो. साधकदशेतील साध्याची उत्कंठा, आतुरता, तळमळ, औत्सुक्य हे सारे भाव करुणाष्टकांत स्पष्टपणे दिसून येतात. त्यावरून काही करुणाष्टकांच्या रचना स्वामींच्या नाशिक येथील साधकदशेच्या काळातील असाव्यात असे मानायला हरकत नाही. साधकदशेच्या सुरुवातीच्या काळात भौतिक ताप, जननिंदा सहन करण्यासाठी आधार शोधावा लागतो. आपले आराध्य दैवत राम याच्यावरील दृढ श्रद्धेने स्वामींना रामाचा भक्कम आधार वाटत होता. म्हणून स्वामींनी, ’आधार तुझा मज मी विदेसीं। सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी ॥’ असे उद्गार काढले आहेत. ते आपण मागील श्लोकाच्या विवरणात पाहिले. रामाची भेट मागत असताना आपण रामापासून का दुरावलो यावर विचार करून श्री स्वामी पुढील श्लोकात म्हणतात की -
 
प्रारब्ध खोटें अभिमान आला ।
स्वामी समर्था वियोग जाला ।
तेणें बहु क्षीति वाटे मनासी ।
सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी ॥ 2 ॥
अन्वयार्थ - स्वामी समर्थ (रामाचा) वियोग (नशिबी) आला (कारण) माझे प्रारब्ध खोटे (वाईट) आहे. (प्रारब्धवश) माझ्या मनात अहंभाव निर्माण आला. यामुळे माझ्या मनाला खूप चिंता वाटत आहे. सर्व गुणांनी श्रेष्ठ असलेल्या रामा, मला तू केव्हा भेट (दर्शन) देशील?
रामाची भेट व्हावी, अंतरंगात रामाचा साक्षात्कार व्हावा म्हणून स्वामींनी बालवयातच अनेक शारीरिक, मानसिक हालअपेष्टा तसेच जननिंदा सहन करून आपली साधना चालू ठेवली. घरादारापासून, प्रेमळ सुहृदांपासून दूर असलेल्या नाशिक क्षेत्री स्वामी येऊन राहिले. तेथे ना कुणाची ओळख, ना कुणाचा आश्रय अशा परिस्थितीत आराध्य दैवताच्या आधारावर स्वामींनी तपःसाधनेत खंड पडू दिला नाही. व्यावहारिक जगात भौतिक ध्येय प्राप्तीसाठी खूप कष्ट सोसावे लागतात हे आपण पाहतो. मग आध्यात्मिक साधक अवस्थेतील राघवाचा भक्तिपंथ सहजसुलभ कसा असू शकेल? तसेच ध्येयप्राप्तीचा मार्ग सापडला तरी ध्येय गाठण्यासाठी किती काळ साधना करावी लागते याचे काही मोजमाप नाही, गणित नाही. व्यवहारात प्रपंचात एखादा पूल बांधायचा तर अनुभवी अभियंते, मजूर, अत्याधुनिक यंत्रसामग्री, उपलब्ध साधनसामग्री याची माहिती असेल तर ते काम अमुक दिवसात पूर्ण करता येईल, असे सांगता येते. पण अध्यात्म ध्येयप्राप्तीसाठी, भक्तिमार्ग साधनेसाठी व्यावहारिक गणित पद्धती उपयोगी पडत नाही.
 
साधकाच्या प्राथमिक अवस्थेत अध्यात्म ध्येयाची वाटचाल करीत असताना मनातील चंचलता, अहंकार, इतर विकार यांना आवरायला किती काळ लागेल, तसेच भगवंताविषयी भक्तिभाव उदय पावायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. सर्वप्रथम साधकाला आपला अहंकार, अहंभाव जिंकावा लागतो. प्रपंचात सुद्धा अहंकारी गर्विष्ठ माणसे यशस्वी होत नाहीत, त्यांनी कितीही फुशारक्या मारल्या तरी अहंकारामुळे ते दुसर्‍यांचा द्वेष-मत्सर करतात आणि समाधान हरवल्यामुळे अपयश त्यांच्या वाट्याला येते. समर्थांनी मनाच्या श्लोकांत अहंभावाचे दुष्परिणाम सांगितले आहेत.

अहंतागुणे सर्व ही दु:ख होते।
मुखे बोलिलें, ज्ञान तें वेर्थ जाते। (161)
अहंभाव व गर्विष्ठपणा यामुळे सर्व प्रकारे दु:ख अनुभवावे लागते. गर्विष्ठ मनुष्य सर्व ठिकाणी दुःख अनुभवतो, मनुष्य ज्ञानी असला आणि त्याला त्याच्या ज्ञानाचा गर्व झाला तर त्याच्या ज्ञानाचा काही उपयोग होत नाही. अहंकारामुळे तोंडाने ज्ञानाची बडबड केली ती फुकट जाते. तेव्हा अध्यात्म साधनेत अहंकाराला मोठा शत्रू समजले जाते.
स्वामी करुणाष्टकाच्या वरील श्लोकात म्हणतात की, या अहंकारामुळे मी रामाला दुरावलो. अहंकार वाढल्याने मी रामापेक्षा कोणीतरी वेगळा आहे, या कल्पनेनेे रामाचा वियोग झाला, असा हा अहंकार माझ्या अंतःकरणात कसा ठाण मांडून बसला याचे उत्तर मला सापडत नाही. अहंकार वाईट आहे तरी तो मला का सोडून द्यावासा वाटत नाही. एकंदरीत विचार करता मला असे वाटते की, माझे प्रारब्ध चांगले नसले पाहिजे. त्यामुळे मला हा अहंकार सोडवत नाही आणि या अभिमानामुळे समर्थ रामाचा वियोग झाला असे स्वामी या श्लोकात म्हणतात. स्वामींनी तेथे प्रारब्धाचा उल्लेख केल्याने प्रारब्ध म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे. सर्वसाधारण प्रारब्ध हा शब्द आपण व्यवहारात नशीब, दैव या अर्थी वापरतो.
 
तथापि प्रारब्ध म्हणजे काय पाहू.
आपण काही ना काहीतरी कर्म करीतच असतो. त्याला शास्त्रीय भाषेत क्रियमाण असे म्हणतात. काही कर्माची फळे त्वरित मिळतात. काही कर्माची फळे मिळण्यासाठी योग्य परिस्थितीची वाट पाहावी लागते. ती कर्मे संचितात साठवली जातात. परिस्थितीनुसार संचितातील कर्मे, चांगले वा वाईट, भोग देण्यासाठी पुढे येतात, त्याला प्रारब्ध म्हटले जाते. त्यात पाप-पुण्यात्मक दोन्ही प्रकारची कर्म असतात. त्यामुळे एखादी गोष्ट प्रयत्न करूनही साधता येत नाही, ती प्रारब्धात नाही असे आपण म्हणतो. असो, समर्थ या श्लोकात म्हणतात की, माझे प्रारब्ध खोटे आहे म्हणजे चांगले नाही. त्यामुळे मला अहंकार बाळगण्याची दुर्बुद्धी झाली. अहंकाराने माझे नुकसान केले व मी रामाला दुरावलो. याचे मला वाईट वाटते, याचीच माझ्या मनाला खूप चिंता लागून राहिली आहे. मला काळजी याच गोष्टीची आहे की, हा मला चिकटलेला अहंकार केव्हा जाईल आणि माझ्या रामाची भेट होईल. रामाची भेट, रामाचा साक्षात्कार हे साधकाचे ध्येय असते. ती अतींद्रिय व तरल असते. त्यातून अत्युच्च समाधान प्राप्त होते. हे साधकाचे नव्हे तर मनुष्यजन्माला येणार्‍या प्रत्येकाचे ध्येय असते. यासाठी स्वामी रामाला विनवणी करीत आहेत की, ’हे रामा, सर्वोत्तमा, जास्त वाट पाहायला न लावता तू मला केव्हा भेट देशील, ते मला कळू दे. तू मला लवकर भेट दे.’
Powered By Sangraha 9.0