हिंगणघाट येथे घोळे कुटुंबाला सवत्स गोदान

विवेक मराठी    26-Sep-2025
Total Views |
पुणे : हिंदू धर्मात ’गोदान’ करण्याचे फार मोठे महत्त्व सांगितले आहे. सवत्स धेनूचे दान अधिक पुण्यकारक समजले जाते. हिंदुस्थान प्राचीन काळापासून कृषीप्रधान देश असल्याने शेती आणि शेतकरी यांच्याशी निगडित उपक्रम आपल्या संस्कृतीची सुंदर सामाजिक वीण अधोरेखित करतो. काळाच्या ओघात या संस्काराकडे दुर्लक्ष झालेले दिसते. तथापि सध्याच्या स्थितीतही दुर्मीळ झालेला ’गोदान’ संस्कार कधीकधी घडतो. हा गोदानाचा संस्कार पुण्याजवळ, हिंगणघाट (उरळीकांचन) ता. हवेली येथे नुकताच पार पडला.
या संस्काराचे मुख्य प्रवर्तक शशिकांत शेंडे यांनी सांगितले की, माझे स्नेही एक निवृत्त बँक अधिकारी आहेत, त्यांना नुकत्याच दिवंगत झालेल्या पत्नीच्या स्मरणार्थ गरजू शेतकर्‍यास गाय दान द्यावयाची आहे. तेव्हा शेंडे यांनी गोविज्ञान संशोधन संस्थेचे, पुणे कार्यवाह बापूराव कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला. गोविज्ञान संशोधन संस्था, पुणे भारतीय गोवंश रक्षण, संवर्धन आणि गोआधारित शेती या क्षेत्रात गेली 25 वर्षापासून काम करीत आहे. योग्य आणि गरजू शेतकरी यांचा शोध घेऊन ’गोदान’ संस्काराचा कार्यक्रम शनिवार, 13 सप्टेंबर 2025 रोजी हिंगणघाट येथील घोळे यांच्या शेतावर आयोजित केला होता. घोळे हे एमएस. सी. अ‍ॅग्रिकल्चरपर्यंत शिकले आहेत. गोदानासाठी निवडलेले शेतकरी चिंतामणी रघुनाथ घोळे हे स्वतः मोठ्या पगाराची नोकरी सोडून आपले गाव हिंगणघाट येथे परतले आणि गेले 10 वर्षापासून शेती करत आहेत. त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग करून देशी गाय पालन व गोआधारित सेंद्रिय शेती उत्पादनात अग्रगण्य स्थान प्राप्त केले आहे. घोळे यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. नितिन पेडणेकर, वसई (ठाणे) यांच्याकडून कॉकरेज जातीची, सवत्स धेनू प्राप्त झाली. हा ’गोदान’ संस्काराचा कार्यक्रम धार्मिक पद्धतीनुसार संपन्न झाला. याचे पौरोहित्य प्रीतम तिखे गुरूजी यांनी केले. मात्र गोदान देणार्‍या निवृत्त अधिकार्‍यांने कोठेही नामोल्लेख न करण्याची अट घातल्यामुळे त्यांचे नाव जाहीर केलेले नाही. त्या अज्ञात कुटुंबांचे मनोमन आभार मानले पाहिजेत.
 
 
या कार्यक्रमास गोविज्ञान संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी लुंकड, गोभक्त बंकट मुंदडा, प्रमोद कुलकर्णी, संजय पांडे, शशिकांत शेंडे, घोळे कुटुंबीय आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र महाबळेश्वरकर यांनी केले. उपस्थितांचे व गोदान देणार्‍या कुटुंबांचे आभार मानून या सुंदर सोहळ्याची सांगता झाली.
- सुधाकर पोटे