भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांतातर्फे रविवार, 14 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई शहरातील माजगाव या परिसराची वारसा सहल आयोजित करण्यात आली होती. मध्ये 85जणांनी सहभाग घेतला होता. वारसा सहलींचे मार्गदर्शक आणि इतिहास संकलन समितीचे कार्यकर्ते मल्हार गोखले यांनी वैकुंठमाता गावदेवी, वसईच्या लढाईत यश मिळावे म्हणून खुद्द चिमाजी अप्पा पेशवे यांनी तिला केलेला नवस या परिसराचे वैशिष्ट याची माहिती सांगितली...
इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीने सन 1662 नंतर मुंबईचा ताबा घेतला होता. स्थानिक लोकांशी फटकून राहाणार्या गोर्या इंग्रजांनी नंतर स्वतःच्या वापरासाठी मुंबई फोर्ट आणि त्याच्यालगतचे बंदर विकसित केले. आज तोच सगळा भाग मुंबई पोर्ट किंवा मुंबई हार्बर म्हणून ओळखला जातो. पण इंग्रज, पोर्तुगीज आणि मुसलमान सुलतान यांच्या आधीच्या यादव, शिलाहार या हिंदू राजवटींमध्ये माजगाव हेच मुंबईमधले मुख्य व्यापारी बंदर होते.
संपर्क - भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत 7208555458
याची मुख्य खूण म्हणजे नामशेष असलेला माजगाव किल्ला आणि त्याच्या डोंगराच्या पूर्व उतारावर आजही असलेली माजगाव गावाची गावदेवी वैकुंठमाता.
माणकेश्वर मंदिर
सुमारे 85 सहभागींच्या वारसा सहलीचे मार्गदर्शक आणि इतिहास संकलन समितीचे कार्यकर्ता म्हणून मल्हार गोखले सोबत होते. वैकुंठमाता गावदेवी, वसईच्या लढाईत यश मिळावे म्हणून खुद्द चिमाजी अप्पा पेशवे यांनी तिला केलेला नवस इत्यादी माहिती त्यांनी सांगितली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील कानडी शिलालेख
नंतर सर्वजण भंडारवाडा हिल या टेकडीवर असलेले काका बाप्टिस्टा उद्यान बघण्यास गेले. ही टेकडी म्हणजेच माजगावचा मूळ किल्ला. सन 1690 मध्ये सिद्दी याकूत याने तो जाळून टाकला.
लोकमान्य टिळकांचे एकनिष्ठ अनुयायी आणि गरिबांचे वकील म्हणून प्रसिद्ध असलेले, माजगावचे रहिवासी बॅरिस्टर काका बाप्टिस्टा यांचीही माहिती सांगण्यात आली. आज या किल्ल्याच्या जागीच महापालिकेचा पाण्याचा तलाव आहे.
त्या नंतर सहभागींनी ईस्ट इंडिया कंपनीच्या दारूगोळा तयार करण्याच्या गन पावडर लेन, दारूखाना यांची माहिती घेतली. सन 1869 साली इंग्रजांनी कारखाना इथून हलवून पुण्याजवळ खडकी येथे नेला.
माजगाव गावाची गावदेवी वैकुंठमाता मंदिर
मग सर्वांनी माजगाव हे गाव स्थापन करणारा अनामिक महापुरुष आणि त्याच्या लगतचे पाण्याचा जिवंत झरा असणारे सूर्यकुंड पाहिले.
या नंतर प्राचीन असे माणकेश्वर मंदिर, तेथील छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील कानडी शिलालेख, एक अज्ञात साधूची जिवंत समाधी, आणि त्या परिसरातील अनेक सुंदर, सुघड मूर्ती यांची माहिती घेतली. त्याच वेळी मुंबईचा गव्हर्नर सर जॉन चाईल्ड, खुद्द औरंगजेबाने त्याची केलेली हकालपट्टी, इंग्रजांनी औरंगजेबाला भेट म्हणून पाठवलेले माजगावचे हापूस आंबे, आजही माजगावमध्ये असणारे दुबार फळ देणारे आंब्याचे झाड इत्यादि रंजक माहिती देण्यात आली. तसेच दारूखाना भागातील एकेकाळचे प्रसिद्ध व्यापारी गुलुभाई जसदनवाला यांचीही माहिती देण्यात आली. गुलुभाई हे प्रख्यात गायक अल्लादिया खाँ साहेब यांचे शिष्य होते. गुलुभाईंच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात खुद्द पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी त्यांचा गंडा बांधून शिष्यत्व पत्करले होते, इत्यादि वेगळी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.
या नंतर सहलीच्या अंतिम टप्प्यात घोडपदेव या प्रसिद्ध मंदिरातील स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर, त्या निमित्ताने माजगाव या एकेकाळच्या बेटाचा विकास इत्यादि माहिती सांगण्यात आली.
मुंबई शहराला इतिहासच नाही किंवा असलाच तर तो इंग्रज आणि पोर्तुगीज या परक्या राजवटींपासून सुरू होतो, असे अनेकांना वाटते. हे खरे नसून यादव, शिलाहार यांच्या हिंदू राजवटींमध्येही मुंबईत लोकजीवन होते, हा स्थानिक इतिहास सांगणारी ही सहल सुमारे पाच तास सुरू होती.
भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांतातर्फे अशा अस्मिता जागृत करणार्या वारसा सहली वेळोवेळी विनामूल्य आयोजित केल्या जातात.
- प्रतिनिधी