पुन्हा हिंदी चिनी भाई भाई ?

03 Sep 2025 16:28:24
 
 
china
या भेटीत चीन बरोबरचा सीमावाद संपेल अथवा त्यात काही प्रगती होईल असे मानणे म्हणजे भाबडेपणा ठरेल. भारतीय धुरिणांचाही तसा गैरसमज नाही. मोदी हे चीनबरोबर समर्थ राष्ट्राचे हस्तांदोलन करत आहेत ना की दुबळ्या राष्ट्राचे अलिंगन देत आहेत. नेहरुंच्या ’हिंदी चिनी भाई भाई’ची पुनरावृत्ती मोदीनी केली नाही याची प्रचिती ’शांघाय सहकार्य परिषदेच्या’ संयुक्त घोषणापत्रामध्ये आली आहे. 
 
@रघुनंदन भागवत 72039 02989
 
Bhagwat
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य परिषदेच्या ’हेडस ऑफ स्टेट्स’च्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी चीन दौर्‍यावर गेले. ही मोदींची तब्बल सात वर्षानंतर चीनला दिलेली पहिलीच भेट आहे. चीनमध्ये मोदींचे पायघड्या घालून स्वागत झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून आल्या आहेत. (चीनला जाण्यापूर्वी मोदींनी जपानला भेट दिली).
 
 
मोदींच्या चीन भेटीमुळे बर्‍याच शंकासुरांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही ’हितचिंतक’ मोदींच्या चीन भेटीबद्दल नाके मुरडत आहेत. मोदी डोकलाम व 2020ची गलवानची चकमक विसरले का? ’ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान चीनने पाकिस्तानला उघड पाठिंबा तर दिलाच पण त्याशिवाय पाकिस्तानला सर्व प्रकारची लष्करी मदत केली. भारताने तर असा जाहीर आरोप केला आहे की, त्या संघर्षादरम्यान चीन हा पाकिस्तानला ’रिअल टाइम इंटेलिजन्स’ पुरवून भारताच्या लष्करी हालचालींची माहिती देत होता. इतकं असूनही मोदींना चीनला जाण्यावाचून एवढे काय नडले होते असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला असेल तर नवल नाही.नेहरुंच्या ’भोळसट’ चीन धोरणाबद्दल सतत ’बोटे मोडणारे’ मोदी आता चीनच्या गळ्यात गळा घालायला एवढे आतुर का? असेही मोदींचे टीकाकार विचारत आहेत. वरील सर्व आक्षेप आपापल्या परीने तर्कशुद्ध वाटतात. मग तरीही मोदी चीनला का गेले? या प्रश्नाचे उत्तर सध्याच्या विलक्षण ’चंचल’ अशा जागतिक भूराजकीय परिस्थितीत दडले आहे.
 
 
एकविसाव्या शतकाचे एकमेव ’स्थिर’ वास्तव आहे ते म्हणजे ’अस्थिरता’. आपण पाहात आहोत की, जागतिक रंगमंचावर रोज अक्षरशः ’तासातासाला’ नवनवीन नाट्यप्रयोग रंगत आहेत. कालचा नायक आज खलनायकाची भूमिका वठवत असतो तर कालचा खलनायक आज नायकाच्या भूमिकेत जगासमोर येत आहे. या परिप्रेक्ष्यातून पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, भारताच्या दृष्टीने कालपर्यंत ’नायकच्या’ भूमिकेत दिसणारे ’ट्रम्प’ नामक बहुरूपी आज खलनायक ठरले आहेत तर ’शी जिनपिंग’ नावाचा दगाबाज, पाताळयंत्री शेजारी आता ’शेजारधर्म’ पाळण्यासाठी उत्सुक दिसत आहे. याचे कारण म्हणजे ’जगाचा फिरता रंगमंच’ पृथ्वी गोल आहे याची जाणीव प्रत्येक राष्ट्राला करून देत आहे.
 
 
त्यामुळे प्रत्येक देशाने खूणगाठ बांधली आहे की, कोणताही देश आपला कायमस्वरूपी मित्र नाही तसेच कोठलेही राष्ट्र आपले कायमस्वरूपी शत्रू नाही. प्रत्येक देश स्वदेशाचे हित सर्वोतोपरी मानत असल्यानेच ’स्वार्थ’ साधणे हेच प्रत्येकाचे अंतिम उद्दिष्ट आहे.
 
 
china
 
अंतर्गत व बहिर्गत राजकारणातील हे सत्य कालातीत आहे आणि म्हणूनच मोदीजी नेहमी आठवण करून देतात की, आपल्या देशाला आपली ’विरासत’ विसरून चालणार नाही. जो देश आपला ’इतिहास’ विसरला त्या देशाचे भविष्य अंधःकारमय असते हे ते पुन्हा पुन्हा सांगतात. भारताच्या इतिहासाने भविष्यातील मार्ग दाखवला आहे, म्हणूनच आपल्या इतिहासाची आठवण करून देणे अगत्याचे ठरते.
 
 
आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण बघू या. शिवाजी महाराजांचे उद्दिष्ट होते ’हिंदवी स्वराज्याची स्थापना’. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि नंतर स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी अनेक डावपेच खेळले. त्यातील महत्त्वाचं सूत्र म्हणजे एका वेळी एकाच शत्रूशी लढणे. त्यासाठी त्यांनी कधी मोगलांशी हातमिळवणी केली तर कधी विजापूरच्या आदिलशाहीशी जुळवून घेतले, पण एक काळजी घेतली, ती म्हणजे हे दोघे शत्रू एकत्र येता कामा नयेत. अफझलखान चालून आला तेव्हा महाराजांनी मोंगलाना शांत ठेवले होते. औरंगजेबशी लढताना आदिलशाहीबरोबर मित्रत्वाचे तह केले होते.
 
 
राज्याभिषेका नंतर कर्नाटकात स्वारी करताना त्यांनी वाटेत गोवळकोंड्याच्या कुतुबशाहशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले, कारण काय तर आपल्या मागे कुतुबशाहने स्वराज्याला काही त्रास देऊ नये म्हणून. नंतर कर्नाटकातील स्वारीत जिंकलेल्या प्रदेशातील व महसुलातील अर्धा वाटा ठरल्याप्रमाणे कुतुबशाहला देण्यात मात्र शिवाजी राजांनी टाळाटाळ केली. परिणामी, दोघांच्यात वितुष्ट निर्माण झाले पण तोपर्यंत महाराजांनी आपला स्वार्थ साधून घेतला होता.
 
 
महाराज पन्हाळ्यावर अडकले होते तेव्हा इंग्रजानी सिद्दी जोहरला मदत केली म्हणून महाराजांनी संधी मिळेल तेव्हा इंग्रजाना धडा शिकवला. पण सुरतेवरील स्वारीत त्यांनी ब्रिटिशांच्या वखारी लुटल्या नाहीत, कारण इंग्रज व्यापार करत असल्याने आपल्या रयतेच्या हातात पैसा खेळू लागला आहे याची त्यांना जाणीव होती. या एका कारणामुळे शिवाजीराजे कायम इंग्रजाशी उदारपणे वागले.
 
 
china
 
पुढे पेशव्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्याच रणनीतीचा अवलंब केला. पण पानिपतच्या लढाईत मराठे एकटे पडले आणि मुसलमान राजे मात्र अहमदशाह अब्दालीच्या नेतृत्वात ’एक’ झाले, जरी त्यांच्यात आपसामध्ये मतभेद होते. (ही नजीबुल्लाची किमया) परिणाम काय झाला तो सर्वश्रुत आहे. तरी सुद्धा लढाईनंतर मराठ्यांनी अब्दालीशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते.अब्दालीनेही मराठ्यांना प्रतिसाद दिला की त्याचे मराठ्यांशी वैर नव्हते. मराठे लढाईत दिल्लीच्या बादशाहच्या वतीने उतरले म्हणून त्याला मराठ्यांशी लढावे लागले.
 
 
तसेच अखेरच्या क्षणी युद्ध टाळण्यासाठी मराठ्यांनी ’तहाचा’ प्रस्ताव अब्दालीकडे पाठवला होता व काही प्रदेश (उत्तरेकडचा) सोडण्याची तयारी दाखवली होती. जर त्या वेळी शीख, जाट, राजपूत, मराठे एकत्र लढले असते तर इतिहास निराळाच झाला असता.
 
 
पुढे महादजी शिंदे व नाना फडणवीस यांनी शिवाजी महाराजांच्या कूटनीतीचा अवलंब करून ’पानिपत’मुळे गेलेली पत परत मिळवली आणि दिल्ली पुन्हा आपल्या आधिपत्याखाली आणली.
 
 
महाराणा प्रताप शिवाजी महाराजांसारखाच ’युगपुरुष’ होता, पण त्याने अकबराविरुद्ध कायम ’एकला चलो रे’ हे तत्त्व अवलंबले आणि त्यामुळे तो आपल्या सम्राज्याला कायमचा मुकला. त्याच्या नशिबी वनवास आला.
 
 
वरील उदाहरणे लक्षात ठेवली तर आताचे भारताचे परराष्ट्र धोरण समजून घेण्यास मदत होईल. ’सामायिक परस्पर हितसंबंध’ साधायचे असतील तर परराष्ट्र धोरण लवचीक ठेवावे लागते.
 
 
मोदी आता ट्रम्पचा नक्षा उतरवण्यासाठी चीनने पुढे केलेला मैत्रीचा हात स्वीकारत आहेत पण त्याच वेळी ते चीनला नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थापन झालेल्या Quad गटात अमेरिकेच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत, हे लक्षणीय आहे. (Quad ची बैठक या वर्षी भारतात होणार आहे आणि ट्रम्प त्यासाठी भारतात येऊ शकतात.)
 
 
तसेच मोदींच्या चीन भेटीपूर्वी भारताने अग्नी 5 या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. (या क्षेपणास्त्राचा पल्ला 5000 ते 7000 किलोमीटर आहे). हे क्षेपणास्त्र पाकिस्तानसाठी नसून चीनसाठी आहे, हे न ओळखण्याइतके ’शी’ दूधखुळे नाहीत. तरी सुद्धा ते भारताला मैत्रीची साद घालतात, कारण ’परस्परा सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ ही सद्यस्थितीत काळाची गरज आहे आणि ’आरआयसी’ (रशिया, इंडिया, चीन) मिळून अमेरिकेला शह देऊ शकतात, याची त्यांना कल्पना आहे. मोदी चीनला येण्यापूर्वी चीनचे शत्रूराष्ट्र असलेल्या जपानला गेले, याची योग्य ती नोंदही चीनने घेतली असेल. जपान सुद्धा Quadचा सदस्य देश आहे.
 
 
या भेटीत चीन बरोबरचा सीमावाद संपेल अथवा त्यात काही प्रगती होईल असे मानणे म्हणजे भाबडेपणा ठरेल. भारतीय धुरिणांचाही तसा गैरसमज नाही. मोदी हे चीनबरोबर समर्थ राष्ट्राचे हस्तांदोलन करत आहेत ना की दुबळ्या राष्ट्राचे अलिंगन देत आहेत. नेहरुंच्या ’हिंदी चिनी भाई भाई’ची पुनरावृत्ती मोदीनी केली नाही याची प्रचिती ’शांघाय सहकार्य परिषदेच्या’ संयुक्त घोषणापत्रामध्ये आली आहे.
 
 
या परिषदेचे संचित खालील पाच मुद्यांत सामावलेले आहे:
 
1. भारताने जगाला स्पष्ट संदेश दिला आहे की, भारत कदापि राष्ट्रहिताशी तडजोड करणार नाही. अमेरिकेच्या दबावाला झुगारून रशियाकडून तेलखरेदी चालूच राहील. भारताने या तेलखरेदीत 20% वाढ केल्याची बातमी या परिषदेदरम्यानच वाचनात आली.
 
 
2. भारत पहलगाम हल्ल्याचा उल्लेख संयुक्त घोषणापत्रामध्ये करून घेण्यात यशस्वी झाला. एवढेच नाही तर दहशतवादाबरोबरच दहशतवाद पुरस्कृत करणार्‍या शक्तींचा तीव्र निषेध करण्यात आला. पाकिस्तानच्या उपस्थितीत व चीनच्या नाकाखाली सर्व 22 देशांची दहशतवादाविरुद्ध सहमती घडवून आणणे, हे भारताचे मोठे यश मानले गेले पाहिजे.
 
 
3. चीनचा आग्रह होता की, सीमावाद बाजूला ठेवून व्यापार वृद्धीला महत्त्व द्यावे. पण भारताने स्पष्ट शब्दात सांगितले की, सीमा सुरक्षित असल्याशिवाय व्यापारवृद्धी होणार नाही. म्हणजेच भारताने सूचित केले की, चीनने भारताचा 1962 मध्ये बळकावलेला भूभाग परत केल्याशिवाय परस्परसंबंध सामान्य होऊ शकत नाहीत.
 
 
4. भारत व रशिया यांची दोस्ती मोदी व पुतीन यांच्यातील विशेष जवळीकीमुळे अधोरेखित झाली. दोघांनी एका कारमधून प्रवास केला व कोणाही मदतनीसाशिवाय 45 मिनिटे बोलणी केली.राजनैतिक शिष्टाचारात अशा प्रसंगाना विशेष महत्त्व असते.
 
 
5. अमेरिकेला स्पष्ट संदेश मिळाला की चीन, भारत, रशिया यांच्या एकत्रित शक्तीपुढे अमेरिकेची दादागिरी आता चालणार नाही.
सर्वात शेवटी मोदींनी जगाला जी त्रिसूत्री दिली -सिक्युरिटी, कनेक्टिव्हिटी, कोऑपरेशन हेच ’न्यू नॉर्मल’ असणार आहे आणि हेच शांघाय शिखर परिषदेचे ’फलित’ मानता येईल.
 
Powered By Sangraha 9.0