कोणतेही आंदोलन, कोणताही नेता किंवा कोणतेही सरकार यावर कायमस्वरूपी तोडगा काढू शकणार नाही. त्या अपेक्षेत जगणे म्हणजे भ्रमात जगणे ठरणार आहे. आपल्याला सामना करायचा आहे तो वास्तवाशी. वस्तुस्थिती लक्षात घेऊन तिच्यावर विजय मिळवायचा आहे. तसा विजय मिळविता आला तर तोच खरा विजय ठरणार आहे.
राज्य सरकारने मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्यामुळे आझाद मैदानावरील आंदोलकांनी विजयाचा गुलाल उधळून पुन्हा परतीचा मार्ग धरला आहे. मुंबई महानगरीचे जनजीवनही पूर्वपदावर आलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय बिकट प्रसंगी निर्माण झालेला हा पेच कमालीच्या संयमाने हाताळलेला आहे. मात्र मराठा आरक्षणाचा हा तिढा सुटलेला आहे आणि पुन्हा असे आंदोलन उभे राहाणार नाही, असे सांगता येणे अवघड आहे. खरे पाहता, अशा प्रकारच्या लढ्यात एका पक्षाचा विजय कधीच होत नसतो. आरक्षण हा सामाजिक न्यायाच्या प्रश्नाशी निगडित विषय आहे आणि तो मोठ्या प्रमाणात भावनिक विषयसुद्धा आहे. त्यामुळे आरक्षण हा प्रश्न नसून भूतकाळातील सामाजिक समस्येवर शोधलेले त्यावेळचे एक उत्तर होते आणि ते एकमेव उत्तर होते असे म्हणता येणार नाही. आताचा काळ हा नक्कीच बदललेला आहे आणि सर्वच क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. त्यावेळी सामाजिक क्षेत्रात साचलेपण येऊन चालणार नाही. याचाही एकूण समाजातील सुजाण घटकाने विचार करणे आवश्यक आहे. आपण जितके जितके भूतकाळातील गोष्टींचा वारंवार विचार करू तितके आपले वर्तमानकाळातील समाज वास्तवाकडे दुर्लक्ष होत जाणार आहे हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे.
वर्तमानकाळात वेगवेगळे जीवनसंघर्ष आणि वेगवेगळी आव्हाने उभी राहत आहेत आणि त्याकडे उघड्या डोळ्याने पाहण्याची गरज आहे, हे नाकारून चालणार नाही. आजच्या तरुण पिढीला भावी काळातील प्रगतीची क्षितिजे खुणावत नाहीत का? नवनव्या संधीच्या वाटा दिसत नाहीत का? त्यांच्यामध्ये गोठलेपण आले आहे का? जर आपण एकाच मैलाच्या दगडापाशी गोठून उभे राहिलो तर हा जीवनाचा प्रवास सोपा होणार नाही.
विकासासाठी आर्थिक दृष्टीने मागास, सामाजिक दृष्टीने मागास अशा श्रेणींत विविध समाजघटकांना सामावून घेण्याचा आरक्षण हा एक मार्ग होऊ शकतो, पण या पलीकडेही अन्य कोणते मार्ग असू शकतात, याचा समाजाने आणि त्याचबरोबर समाजनेतृत्वाने विचार करण्याची गरज आहे. समाजाला जर प्रगतिपथावर घेऊन जायचे असेल तर मग विकासाचे बहुविध पर्याय शोधण्याची खरोखरच गरज आहे आणि तसे पर्याय समाजासमोर सातत्याने मांडण्याची, त्यानुसार विचारांना दिशा देण्याचीही तितकीच गरज आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा इतिहास पाहता त्यालाही विकासापासून वंचित राहिलेल्या मोठ्या समाजघटकाच्या भावनिक प्रश्नाची पार्श्वभूमी आहे. आजही मोठ्या संख्येने तरुण या आंदोलनात का उतरतो? याचाही विचार झाला पाहिजे. याचे कारण त्यांच्यासमोरचे जीवनसंघर्षाचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे आपल्याला मिळणारे आरक्षण हा प्रश्न सोडविण्याच्या कामी प्रभावी उतारा ठरणार आहे या भावनेने लोक या आंदोलनात सहभागी झाले आणि होतात. त्यांना आर्थिक विवंचना आणि विकासाचे प्रश्न भेडसावत आहेत आणि त्यातून सुटण्याचा मार्ग ते शोधत आहेत. अशा वेळी त्यांना योग्य मार्गाने नेण्यासाठी विकासाचे बहुविध पर्याय उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. आंदोलने हाताळण्यापेक्षा अशी आंदोलने भविष्यात उभी करावी लागणार नाहीत आणि आपल्या न्याय्य हक्कासाठी आंदोलनाचा मार्ग चोखाळण्याची कोणत्याही समाजघटकाला गरज राहाणार नाही अशी सामाजिक-आर्थिक संरचना कशी उभी राहील या दिशेने समर्पक प्रयास होण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्न आंदोलनापाशी येऊन ठेपणार नाही व सर्वच समाजघटकांना प्रगतीचे व विकासाचे मार्ग मोकळे होतील.
आपल्या देशातील विविध क्षेत्रातील वातावरण निराशेचे नसून बर्याचशा प्रमाणात आश्वासक आहे ही या दृष्टीने जमेची बाजू म्हटली पाहिजे. खाजगी उद्योग क्षेत्रात निर्माण होणार्या विविध संधींचा शोध घेतला पाहिजे. आयटी, सेमीकंडक्टर, विविध स्टार्ट अप, प्रक्रिया उद्योग अशी नवनवीन क्षेत्रे शोधून त्यात यश संपादन करण्याच्या दृष्टीने प्रावीण्य मिळविण्यासाठी तरुणांनी पुढे सरसावले पाहिजे. फक्त आणि फक्त सरकारी नोकरी नोकरी मिळविणे आणि त्यात स्थिरावणे हा मोठे होण्याचा किंवा विकासाचा एकमेव मार्ग म्हणता येणार नाही. आरक्षणाची कमाल पातळी गाठल्यावर ती सुविधा संपुष्टात येणार हे वास्तव आपण लक्षात घेतले पाहिजे. शिक्षण, उद्योग, स्वावलंबन व स्वयंविकास हाच प्रगतीचा शाश्वत मार्ग आहे. कोणतेही आंदोलन, कोणताही नेता किंवा कोणतेही सरकार यावर कायमस्वरूपी तोडगा काढू शकणार नाही. त्या अपेक्षेत जगणे म्हणजे भ्रमात जगणे ठरणार आहे. आपल्याला सामना करायचा आहे तो वास्तवाशी. वस्तुस्थिती लक्षात घेऊन तिच्यावर विजय मिळवायचा आहे. तसा विजय मिळविता आला तर तोच खरा विजय ठरणार आहे. बाकी आंदोलनात सरकारला नमविले, मागण्या मान्य करून घेतल्या हे समाधान विकासाच्या दृष्टीने व सर्व समस्यांच्या उकलीच्या दृष्टीने चिरस्थायी मानता येणार नाही. समाज एका विशिष्ट चौकटीत जर अडकून पडला तर चौकटीबाहेरचा विचार करण्यासाठी ते विशाल विश्वच तो पाहू शकणार नाही. या दृष्टीने समाजाचे प्रबोधन घडविणे हेच सर्व पुढारी मंडळींसमोरचे आव्हान आहे व त्यांना ते पेलून समाजाला पुढे न्यायचे आहे व आपले नेता हे बिरुद सार्थ करायचे आहे. कोणत्याही प्रश्नाला अनेक पैलू असतात आणि कंगोरे असतात, त्यामुळे मग त्यात गुंता निर्माण होतो. काही मंडळींना असा गुंता तयार करण्यात रस असतो, ही बाबही खरीच आहे. पण प्रश्नाला आज अनेकविध उत्तरे शोधण्याचा पुरुषार्थ करण्याची गरज आहे. आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि वारसा आहे. ज्यांनी जहागिरीच्या तुकड्यावर संतुष्ट होऊन लाचारीने जगणे नाकारून पराक्रमाचा पुरुषार्थ करून आपले स्वतंत्र स्वराज्य निर्माण केले होते. ती विजिगीषु प्रवृत्ती आपल्यात पुन्हा कशी जागृत होईल व ते सळसळणारे रक्त आपल्या धमन्यांतून पुन्हा कसे प्रवाहित होईल याचा आत्मशोध आपण घेतला तर आपल्यासमोर विकासाचे असे पर्याय दत्त म्हणून अवश्य उभे राहतील, हे नक्की.