अजि आम्ही ‘प्रभुकुंज’ पाहिले

05 Sep 2025 14:55:02
उषाताई मंगेशकर 
भूलोकीच्या गंधर्वांचे जिथे वास्तव्य आहे अशा प्रभुकुंजमध्ये आपण कधी जाऊ हे मनातही नसताना आणखी काही तासांतच तिथे पोचणार आहोत, असे चित्र तयार झाले. निमित्त होते, विवेकच्या गणेश विशेष अंकाच्या प्रकाशनाचे. मनात दाटलेले औत्सुक्य आणि दडपण घेऊन दिलेल्या वेळी आम्ही प्रभुकुंजमध्ये प्रवेश केला. पहिल्या मजल्यावर पोचलो आणि कुठला फ्लॅट असावा याचा विचार करत असतानाच शिसवी लाकडाच्या दरवाजावरची, लता मंगेशकर नावाची पितळी नेमप्लेट दृष्टीस पडली. लतादिदींच्या सहीचा हुबेहूब ठसा अशी ती नेमप्लेट...काही क्षण तिघीही त्या दरवाजासमोर स्तब्ध उभ्या राहिलो.
साप्ताहिक विवेकच्या यंदाच्या ’गणेश विशेष’ पुरवणीत उत्तरा मोने यांनी ज्येष्ठ गायिका आणि चित्रकार म्हणूनही नावाजल्या गेलेल्या उषाताई मंगेशकर यांच्या आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. त्यांच्या हस्ते अनौपचारिकपणे का होईना, या अंकाचे प्रकाशन व्हावे ही इच्छा होती. गणपतीचे पहिले दोन दिवस विशेष गडबडीचे असल्याने त्यानंतर त्यांना जेव्हा वेळ असेल आणि चालणार असेल तेव्हा त्यांच्या घरी जाऊया व अंकाचे अनौपचारिक प्रकाशन करूया, असा आमचा विचार झाला. त्याप्रमाणे उत्तरा मोनेंनी फोन करून विचारल्यावर उषाताईंनी शनिवार 30 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजताची वेळ दिली.
भूलोकीच्या गंधर्वांचे जिथे वास्तव्य आहे त्या प्रभुकुंजमध्ये आपण कधी जाऊ हे मनातही नसताना आणखी काही तासांतच तिथे पोचणार आहोत, असे चित्र आलेल्या निरोपामुळे तयार झाले. मनात दाटलेले औत्सुक्य आणि दडपण घेऊन दिलेल्या वेळी आम्ही प्रभुकुंजमध्ये प्रवेश केला. पहिल्या मजल्यावर पोचलो आणि कुठला फ्लॅट असावा याचा विचार करत असतानाच शिसवी लाकडाच्या दरवाजावरची, लता मंगेशकर नावाची पितळी नेमप्लेट दृष्टीस पडली. लतादिदींच्या सहीचा हुबेहूब ठसा अशी ती नेमप्लेट...काही क्षण तिघीही त्या दरवाजासमोर स्तब्ध उभ्या राहिलो.
अजर, अमर अशा दैवी सुरांची वस्ती असलेल्या वास्तूत आपण प्रवेश करतो आहोत याची जाणीव खोलवर स्पर्शून गेली. दरवाजातून आत शिरताच समोर आले ते, उषाताईंच्या कुंचल्यातून साकार झालेले एक अप्रतिम चित्र. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांच्या भेटीचे ते चित्र होते. चित्रकार म्हणून उषाताईंची थोरवी सांगणारे. हे घर केवळ सकारात्मक ऊर्जेचेच नाही तर दैवी ऊर्जेचे कोठार आहे याची जाणीव पाऊल टाकताक्षणीच झाली.
दिवाणखान्यात आम्ही स्थानापन्न होऊन काही मिनिटे झाली असतील, समोरच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि अतिशय सुरेखशा गुलाबी छटेची साडी नेसलेल्या उषाताई आपल्या मदतनीसाचा हात धरून आल्या. आम्ही प्रतिक्षिप्त क्रिया झाल्यासारख्या उभ्या राहिलो. त्यांना हात जोडून नमस्कार केला. आमच्याकडे पाहून प्रसन्न स्मित करत त्या बसल्या. आणि मग, आमची औपचारिक ओळख करून दिल्यानंतर जो सहज संवाद सुरू झाला तो पुढे दीड पावणेदोन तास अखंड चालू होता...संवाद म्हणजे, आम्ही श्रवणभक्तीच केली. त्या आठवणींच्या जगाची सैर घडवत होत्या आणि आम्ही ते कानामनात साठवून ठेवत होतो. त्यात काही गाण्यांच्या संदर्भातले संस्मरणीय प्रसंग होते, भावंडांविषयीच्या रेशमी आठवणी होत्या, भाचवंडांचे कौतुक होते आणि सध्या सगळ्या घराचा केंद्रबिंदू असलेल्या राघव-अलख या दोघांवरची(आदिनाथची जुळी मुले) मायाही ओतप्रोत होती.
साधारण सव्वा तासाने गप्पांमध्ये ब्रेक घेत ज्यासाठी गेलो होतो त्या अंकाचे प्रकाशन झाले. त्यांनी अतिशय आस्थेने संपूर्ण अंक पाहिला. विवेक प्रकाशनाची तीन पुस्तके त्यांना भेट दिली. विनीता तेलंग यांचे ‘रसमयी लता’, भारतीताई ठाकूर यांचे ’गोष्ट नर्मदालयाची’ आणि म.मो.पेंडसे यांनी अनुवादित केलेले श्रीकांत तलगेरी यांचे ‘आर्य आक्रमणाचा सिद्धांत’...तीनही विषय उषाताईंच्या जिव्हाळ्याचे, आस्थेचे. लतादिदींवरचे पुस्तक आणि त्यामागची संकल्पना त्यांना विशेष आवडली. अतिशय उत्सुकतेने त्यांनी पूर्ण पुस्तक चाळले. त्यातले फोटो पाहिले. काही फोटोंशी निगडित असलेल्या त्यांच्या आठवणी सांगितल्या. ‘पुस्तकं वाचून आवर्जून कळवते,’ असे म्हणाल्या. आम्ही भरून पावलो. अंक प्रकाशन करताना आणि पुस्तक भेट देताना फोटो काढून झाले.
त्यांनतर पुन्हा गप्पा सुरू झाल्या. म्हणजे आमची श्रवणभक्ती सुरू झाली. घड्याळाचे काटे वेगाने पुढे सरकत होते पण निघायला आमचे मन तयार नव्हते. अखेर मनाला मुरड घालत उठलो. त्यांना म्हटले,‘एकच विनंती आहे...आम्हांला दिदींच्या खोलीचं दर्शन घ्यायचं आहे. पाहू शकतो का?’
त्या म्हणाल्या,‘जरूर दाखवते. पण तिथे फोटो काढायचे नाहीत.’ ती अट आम्ही तत्काळ मान्य केली. दिवाणखान्याला अगदी लागूनच दिदींची खोली आहे. मदतनीस मुलीने दार उघडले मात्र, समोरच्या दर्शनाने आम्ही निःशब्द उभ्या राहिलो. खोलीच्या मध्यभागी असलेला दिदींचा पलंग, त्यावर ठेवलेले प्रसन्न भावमुद्रेतले त्यांचे दोन फोटो, पलंगामागेच भिंतीवर असलेली भारतरत्न किताबाची फ्रेम, आणि पलंगावर उशीला टेकून ठेवलेला शब्दशः सोनसाखळ्या ल्यालेल्या त्यांच्या रेखीव पावलांचा फोटो...त्यावर लावलेले गंध..खूप काही सांगून जाणारे. पलंगाच्या मध्यभागी विराजमान भारताचा तिरंगा...दिदींना अखेरचा निरोप देताना याच तिरंग्यात प्रखर राष्ट्रभक्त दिदींचा देह गुंडाळला होता, त्याची आठवण झाली. त्या पलंगासमोर नमस्कार करताना तुडुंब भरून आलेले डोळे घळघळा वाहू लागले, ते कळलेच नाही. साक्षात सरस्वतीच्या दरबारात उभे असल्याची भावना मनात भरून राहिली होती.
घरातून बाहेर पडताना काही क्षणांसाठी का होईना पंडित हृदयनाथ मंगेशकरांची भेट झाली.
अतिशय जड अंतःकरणाने आणि कृतज्ञ भावनेने आम्ही उषाताईंचा आणि त्या पवित्र वास्तूचा निरोप घेतला. या दोन तासांनी जे दान आमच्या पदरात घातले ते शब्दांपलिकडचे आहे. ती अनमोल ठेव आहे. आयुष्यभर काळीजकुपीत जपून ठेवावी अशी...
Powered By Sangraha 9.0