संघशताब्दीनंतरची नवी क्षितिजे

05 Sep 2025 11:48:18
rss
आतापर्यंत जास्तीत जास्त आपल्या स्वयंसेवकांना उपदेश करणार्‍या संघाने आपले समाजातील जाहीर रूप ‘संघप्रवासाची 100 वर्षे - नवीन क्षितिजे’ व्याख्यानमालेच्या या निमित्ताने समोर मांडले आहे. आपल्या अस्मितेची बिंदूरेषा अधोरेखित करतानाच भविष्याचा वेधही घेतला आहे. एकूण काय, तर ही व्याख्यानमाला जनमानसात नवा विश्वास जागविणारी आणि नवीन क्षितिजाकडे भविष्यात उत्तुंग झेप घेणारी, पण तरीही भूतकाळातील मानबिंदूचे रक्षण करण्यावर भर देणारी ठरली नाही, तरच नवल वाटेल.
भारताबाहेर संघकार्य करताना त्या त्या देशाच्या काल परिस्थितीनुसार असा संघ उभा केला पाहिजे की, त्या देशातील लोकांनाही वाटले पाहिजे की, आमच्या देशासाठी आम्हाला असाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हवा आहे. या शब्दांत संघशताब्दीनंतरची नवीन क्षितिजे या विषयाची मांडणी करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत पुढे म्हणाले, भारताला विश्वगुरू करण्यात संघाची सार्थकता आहे आणि त्यासाठी जगाला, जगामध्ये ही भारताला आपले योगदान द्यावे लागेल आणि ती वेळ आता आली आहे.
या विजयादशमीला संघाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतरची शंभर नवीन क्षितिजे कशी राहतील, याचे आरेखन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नुकतेच दिल्लीत केले. नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात संघशताब्दीनिमित्त, ’संघप्रवासाची 100 वर्षे - नवीन क्षितिजे’ या विषयावरील व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी हे आरेखन केले. संघशताब्दीनिमित्य चार महानगरांत जी व्याख्यानमाला होणार आहे, त्यातले हे पहिले आयोजन होते.
 
 
सरसंघचालक यावेळी हिंदीतून बोलले. बोलताना त्यांनी इंग्रजीचाही आधार घेतला. काही वेळेला संस्कृत उदाहरणे त्यांच्या भाषणात होती. विज्ञानभवनात भाषांतराची जी व्यवस्था आहे. त्यामुळे हे भाषण इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश व जर्मन या भाषांमध्येही ऐकता आले. देश-विदेशातून 1000 वर निवडक व्यक्ती आमंत्रित होत्या. काही देशाचे राजनयिक प्रतिनिधी व राजदूतही यावेळी उपस्थित होते.
 
rss
 
वंदे मातरम् या गीतानी सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, पवन जिंदल व दिल्ली प्रांत संघचालक डॉ. अनिल अग्रवाल हे व्यासपीठावर होते, तर प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, अनुप्रिया पटेल, संयुक्त जनता दलाचे के. सी. त्यागी, योगगुरु बाबा रामदेव, अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन व ऑस्ट्रेलिया तसेच युरोपीय महासंघ आदींसह 25 देशांचे राजदूत सभागृहात उपस्थित होते.
 
 
आपल्या प्रतिपादनात 1991च्या लक्ष्मणराव भिडे यांनी दिलेल्या एका बौद्धिकाचा उल्लेख करत मोहनजी म्हणाले, मी त्यावेळी विदर्भ प्रांत प्रचारक होतो व स्वर्गीय भिडे त्यावेळी पश्चिम क्षेत्राचे क्षेत्र प्रचारक होते. त्याआधी अनेक वर्ष ते विदेश विभागात प्रचारक म्हणून काम करत होते. हा बौद्धिक वर्ग भारताबाहेर संघ कार्य करणार्‍या स्वयंसेवकांच्या शिबिरात होता. हे सर्व स्वयंसेवक साधारणपणे 30-35 या वयोगटातील होते. भिडेजी त्यावेळी बोलताना म्हणाले, भारताबाहेर संघकार्य करणारी ही तिसरी पिढी आहे. भारताबाहेरची पहिली शाखा ही जहाजावर लागली होती. हे संघकार्य करताना पहिली पिढी त्या त्या देशातील हिंदूंचे संघटन करण्याचे पायाभरणीत लागली होती. तर दुसरी पिढी त्या कार्याला एक प्रभावी रूप देती झाली. आता तिसरी पिढी माझ्यासमोर बसली आहे. त्यांनी हे आव्हान पुढे न्यायचे आहे.
एका अर्थाने भारताचे विश्वगुरू होणे व जगाचे कल्याण करणे हे संघाचे नवीन क्षितिज आहे. स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या आवाहनाशी ते मिळतेजुळते आहे. ज्ञानेश्वरीनंतर संत ज्ञानेश्वरांनी विश्वकल्याणाचे जे पसायदान मागितले होते त्याच्याशी सुसंगत असे हे नवक्षितिज आहे. ’वसुधैव कुटुम्बकम्’ या दिशेने ही वाटचाल आहे. विश्वकल्याणाची ही संकल्पना नवीन नाही. संघात त्यावर चर्चा होतही असते, पण जाहीरपणाने मात्र हा विषय कुणीही मांडत नव्हते. तो मोहनजींनी आपल्या या भाषणातून मांडला आहे. ते पुढे म्हणाले, पूर्वी संघाची ताकद मोठी नव्हती आणि भारताची स्थिती ही जगाला काही ऐकविण्यासारखी नव्हती. त्यावेळी हे सांगितले असते तर विश्वकल्याण वगैरे बाबी श्रोत्यांना आणि जगालाही स्वप्नरंजन वाटले असते. आज परिस्थिती बदलली आहे. पूर्वी संघाने बोलावले असते तर कोणी आलेही नसते. फक्त स्वयंसेवकासमोरच बोलावे लागले असते. आज तशी स्थिती नाही. त्यावेळी कोणी आलाही असता तरी त्यांनी संघाला इतक्या गांभीर्याने घेतले नसते. आज ती स्थिती नाही. मागील वर्षी आणि यावर्षीही मोठ्या संख्येत निमंत्रित या भाषणाला येत आहे व संघ समजावून घेत आहेत. आपण पाहतो फक्त परसेप्शनवर संघाबाबतची मते तयार होत होती, पण आता लोक स्वतः संघात येऊन संघ समजून घेत आहेत. त्यांच्या मतात परिवर्तन होत आहे.
rss 
 
जयप्रकाश नारायण हे मन व मतपरिवर्तनाचे उदाहरण आहे. जपुजी 1942 च्या वेळी संघविरोधक होते, पण आणीबाणीपूर्वीच्या नवनिर्माण लढ्यात त्यांनी संघाला समवेत घेतले होते. ते नेतृत्व करत होते आणि त्या आंदोलनात आम्ही सहभागी झालो होतो. संघाबद्दलचे पूर्वग्रह त्यांच्या मनातून दूर झाले होते. संघाची शक्ती आणि विस्तार हे दोन्हीही वाढलेले आहेत. तसेच भारतही एक शक्तिशाली आणि वेगाने प्रगती करणारा देश म्हणून जगात ओळखला जाऊ लागला. शक्तिशाली वेगवान देश म्हणून भारत उभा ठाकला आहे. पण त्याचवेळी विश्वकल्याणाची चर्चा करताना आपल्याला आदर्श प्रतिमा, एक मॉडेल म्हणून उभी करावी लागेल. हिंदू विचार आचरणात आणावे लागतील. हे हिंदू विचार आपणच आचरणात आणणार नसू तर जग आपल्याकडे विश्वासाने बघणार नाही.
 
संघाने आपली सुरुवात हिंदूंचे संघटन अशी केली. तो प्रकार परीक्षेत सोपी प्रश्न आधी सोडविण्याचा होता, पण संघटन व चिंतन तर पूर्ण समाजाचे होते आणि ते आता आपण अधिक प्रकर्षाने करत आहोत.
 
संघाच्या शंभर वर्षाच्या वाटचालीत काही वेळेला समाजपुरुषाने विरोध केला हे खरे असले, तरी समाजाचा आधार आणि पाठिंबा ही संघाची खरी ताकद होती. डॉ. मोहनजी भागवत यासंबंधी किस्सा सांगताना म्हणाले, बिहारमध्ये भागलपूरला एका प्रचारकाला पाठविले. त्यावेळी काही तीन-साडेतीन रुपये तिकीट होते आणि संघाने पाच रुपये देऊन त्या प्रचारकाला पाठविले होते. त्या प्रचारकाचे भागलपूरला तर सोडाच, पण अख्या बिहारातही कोणी ओळखीचे नव्हते. पाटण्याहून जाणारी पॅसेंजर गाडी रात्रभर तेथे थांबायची आणि ती सकाळी परत यायची. त्या प्रचारकाचा मुक्काम त्या गाडीतच होता. सकाळी स्टेशनवर सर्व कार्यक्रम आटोपून हा प्रचारक दिवसभर गावात फिरायचा. तिथे फुटाणेवाला होता. तो एका ढब्बू पैशाला फुटाणे द्यायचा. या प्रचारकाला तीन-चार फुटाणे अजून द्यायच्या. हे फुटाणे खाऊनच त्या प्रचारकाचा दिवस पार पडायचा. एकदा शाखेतील एका मुलाने घरी जेवायला बोलावले, त्याच्या घरी काहीतरी पूजापाठ होता. घरच्यांनी त्याची चौकशी केली, त्यावेळी या युवा प्रचारकाचा दिनक्रम त्यांना समजला. हेही समजले की, हा एम. कॉम. झालेला आहे. त्या घरातील मुलाच्या आईने सांगितले, आजपासून सकाळी अकरा वाजता आणि रात्री आठ वाजता ही तुझी जेवणाची वेळ. त्यानंतर तासाभराने मी घराबाहेर पडेन आणि तुझा शोध घेईन. तुझे जेवण झाले असले तर ठीक नाहीतर माझ्या घरी यायचे आणि जेवायचे. तुझे दोन्ही वेळचे जेवण झाल्याशिवाय मी जेवणार नाही.
 
त्यानंतर खूप वर्षांनी मी बिहारला क्षेत्र प्रचारक होतो आणि भागलपूरला मुक्काम होता. जिथे व्यवस्था होती तिथे मी जेवायला बसलो होतो. भाग संघचालकांनाही भोजनाचे आमंत्रण होते. पण ते नाही म्हणाले. ते म्हणाले की, प्रचारक जेवला आहे, हे घरी सांगितल्याशिवाय मला जेवता येणार नाही. इतकी वर्षे त्या घराने हे पथ्य पाळले होते. अशा समाजपुरुषांनीच प्रचारकांना आधार दिला. मोहनजींनी पुढे सांगितले की, आपल्या घरी प्रचारकाला जेवायला नेणारा जो बालक होता तोच आज भाग संघचालक झाला होता. पण प्रचारक जेवलेला पाहिल्याशिवाय आपण जेवायचे नाही हा नियम आजही त्या घरात पाळला जातो. समाजातल्या अशाच घरांनी म्हणजे समाजपुरुषांनी संघाला कार्यरत ठेवले आहे.
 
आज आपण शंभरी पूर्ण करतो आहे अशा महत्त्वाच्या टप्प्यावर संघाने समाज परिवर्तनाचे पाच आयाम ठरविले आहेत. या आयामांची अंमलबजावणी स्वयंसेवकांनी तर आधीच सुरू केली आहे. हे आयाम आहेत समरसता, पर्यावरण, स्व-जागरण, कुटुंब प्रबोधन आणि नागरिक कर्तव्य. मागील वर्षाच्या विजयादशमीच्या भाषणातही सरसंघचालकांनी या पंचसूत्रीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले होते. जन्माला आल्यानंतर आपण फक्त स्वतःसाठी जगतो आहे की आपला उपयोग समाजासाठी, या राष्ट्रासाठी होतो आहे, याचा विचार आपण केला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरदेखील सांगतात देहाकडून देवाकडे जाताना देश मध्ये लागतो, वाटेत लागतो. या देशाचे आपण देणे लागतो आणि म्हणूनच स्वतःपुरतं न जगता आपला उपयोग आपला समाज, आपल्या राष्ट्र यासाठी व्हायला हवा असाही या प्रतिपादनाचा अर्थ होता.
 
आपले भारतीयत्व, हिंदुत्व जपण्यासाठी समाजाने अंगी करावयाचा पहिला मंत्र आहे समरसता. यात सर्व धर्म, पूजापद्धती, पंथ, उपासना यांना समान मानण्याचा भाव आहे. आपल्या उत्सवाला, सणासमारंभाला सर्व स्तर आणि जाती व पंथ यातील व्यक्तींना सहभागी करून घ्या व स्वतःही त्यांच्या सणात, उत्सवात सहभागी व्हा, हा त्याचा पहिला मंत्र आहे. पर्यावरणाचा मंत्र अंगिकारताना, संघाचे गीतच आहे. ते आपल्या जीवनात आपल्याला प्रत्यक्षात आणावे लागेल. स्वार्थ साधना के आंधी में वसुधा का कल्याण न भुले, हा आपला जीवनमंत्र झाला पाहिजे. सिंगल यूज प्लास्टिक टाळावं, असेही त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले. झाड लावून त्याचे संगोपन करणे, त्याचे वर्धन करणे यावरही आपल्याला भर द्यावा लागेल.स्व-जागरणात आपण घरी कोणती वेशभूषा करतो, हे महत्त्वाचे आहे. जरुरी असेल तर बाहेर फुलपँट वापरा. त्याला हरकत नाही, पण घरात वावरताना आपण आपला पोशाख जरूर वापरा. लुंगी, पैजामा यातच वावरा. सणासुदीला भारतीय पोशाख वापरा. धोतर आपल्याला नेसता आले पाहिजे. जशी आपली भूषा, आपली भाषा हिंदू धर्मानुकूल आणि परिस्थितीला अनुकूल असली पाहिजे. तसेच भोजनही आपले घरी तयार केलेले असले पाहिजे. बर्गर, पिझ्झा वगैरे एखाद्या वेळेला खायला ठीक आहे. पण आपला आहार हा घरगुती राहिला पाहिजे. आठवड्यातून एकदा तरी घरातील सर्वांनी एकत्र बसून जेवले पाहिजे, गप्पागोष्टी केल्या पाहिजेत, भोजन आणि भजनही केले पाहिजे, तरच आपल्यात बंधुभाव जागृत होईल.
 
हे जीवन जगताना नागरिक कर्तव्याचे पालनही करावे, याचे स्मरण सरसंघचालकांनी यावेळी यानिमित्ताने करून दिले. वाहतूक नियम पाळा, हेल्मेट घाला, वाहतूक सिग्नलचे पालन करा, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नका, हे नियम सरकारने तुमच्यासाठी केले आहेत, त्याचे पालन करा, घराचा टॅक्स, आलेली सर्व बिल व्यवस्थित भरा, हा नागरी जीवनाचा पाठ आपण सर्वांनी अंगीकारला पाहिजे.
 
संघाबद्दलचे आकलन करणारे आता म्हणू लागले आहेत की, संघ आता बदलू लागला आहे. परिवर्तन संघातही होऊ लागले आहे. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या सर्व बाबतीत परिवर्तन होऊ शकते, पण भारत हे हिंदू राष्ट्र आहे या मूळ चिंतनात मात्र कसलाही बदल होणार नाही, कारण आपल्या प्रगतीचा गाभाच हे चिंतन आहे. आतापर्यंत जास्तीत जास्त आपल्या स्वयंसेवकांना उपदेश करणार्‍या संघाने आपले समाजातील जाहीर रूप या निमित्ताने समोर मांडले आहे. एकीकडे आपले म्हणणार्‍यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले तर दुसरीकडे लोकांचे डोळे उघडण्याचाही प्रयास यानिमित्ताने झाला आहे. आपल्या अस्मितेची बिंदूरेषा अधोरेखित करतानाच भविष्याचा वेधही घेतला आहे. एकूण काय, तर ही व्याख्यानमाला जनमानसात नवा विश्वास जागविणारी आणि नवीन क्षितिजाकडे भविष्यात उत्तुंग झेप घेणारी, पण तरीही भूतकाळातील मानबिंदूचे रक्षण करण्यावर भर देणारी ठरली नाही, तरच नवल वाटेल.
Powered By Sangraha 9.0