‘एकला चलो रे’चा अर्थ उलगडणारा - बोरूनबाबूर बोन्धु

06 Sep 2025 11:47:37
वडिलांना ऐंशी वर्षे पूर्ण झाली याचे मुलांना कौतुक आहे. तरीही कौतुक असणे आणि करणे यात फार फरक आहे. एवढा खास दिवस असूनही मुलगी काही येऊ शकत नाही. तिच्या मुलीला आजोबांचे अप्रूप नाही. तिच्या नवर्‍यासाठी तर आपले सासरे फार विक्षिप्त गृहस्थ आहेत. घरापासून दूर राहाणार्‍या मुलाला वडिलांना काही चांगली वस्तू घ्यायची इच्छा आहे, पण पश्मिना शाल द्यायची वेळ येते तेव्हा एवढी महागाईची वस्तू कशाला द्या म्हणून त्याची बायको मोडता घालते. मोठा मुलगा वडिलांच्या बरोबरच राहत असल्याने त्याच्याच घरात माणसे जमतात, पण त्यात कौतुकापेक्षा कर्तव्याचा भाग जास्त आहे. आपल्या रक्ताच्या माणसांचे हे स्वरूप उत्सवमूर्ती जाणून असल्याने या प्रसंगातील त्यांचा वावर हा काहीसा तटस्थ आहे.
काही दशकं आधी भारतात एकत्र कुटुंबव्यवस्था होती. तीन ते चार पिढ्या एकत्र नांदत होत्या. घरातील वृद्ध व्यक्तीला कुटुंबप्रमुखाचा मान होता. त्याच्याच मार्गदर्शनाखाली नवीन पिढी तयार होत होती. गेल्या काही वर्षांत मात्र शिक्षण, नोकरी, व्यक्तिवाद, पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव, बदलती सामाजिक मूल्ये यामुळे नवीन पिढी, जुन्या पिढीपासून लांब होत गेली. नावीन्याची ओढ असणारी तरुण पिढी आणि स्वतःच्या मूल्यांना चिकटून राहणारी जुनी पिढी यातला संवाद कमी होत गेला.
 
 
एकाच कुटुंबात राहाणार्‍या दोन पिढ्यांमध्ये सरासरी वीस-एक वर्षाचे अंतर असते आणि हा काळ समाजपरिवर्तनाच्या बाबतीत लहान असेल तरी कुटुंबाच्या घटकांत तो मूलभूत फरक घडवून आणतो. याचा परिणाम गृहस्वास्थ्यावर होतो. याच परिस्थितीतून जात असूनही वरुण बाबू याचे कारण जाणून आहेत. ते म्हणतात, ‘परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. तो माझ्या शहराला सुद्धा लागू आहे. काळानुसार हे शहर व त्याचा आवाज बदलतो आहे. येथे वास्तव्य करणारा समाज हा शहराचा आत्मा असतो आणि त्यामुळेच तो कधी बदलेल, कसा बदलेल ह्याचे भाकीत करणे अवघड आहे.’
 
 
काही माणसे परिस्थितीशी तडजोड करतात, काही कोणत्याही अपेक्षा न ठेवता जगतात, काहींसाठी आपली मूल्ये, आपले संस्कार बदलणे अशक्य असते. घडणारे बदल काळानुरूप घडतात. त्यामुळे यात कोणतीही गोष्टी ठामपणे चांगली किंवा वाईट असे ठरवता येत नाही. कुणालाही दोष न देता यातील मुख्य पात्र आपला मार्ग सोडत नाही. मला बोरूनबाबूर बोन्धु (र्इेीीपलरर्लीी इेपवर्ही) सिनेमाचे हे विशेष वाटते. कालसुसंगत असा हा सिनेमा आहे.
 
 
तरुण वयातील वरुणबाबू हा राजकीय विषयावर लिखाण करणारा लेखक. त्याची पुस्तके गेली पन्नास वर्षे वाचनात आहेत. कम्युनिस्ट विचारसरणीने देशाचे भले होईल असा विचार करायला उद्युक्त करणारा तो काळ.
 
 
देशाला स्वातंत्र्य मिळते आणि स्वप्नावस्थेत असणारे काही नेते जागे होतात. सत्तेसाठी स्वप्नांशी, मूल्यांशी तडजोड करतात. वरुणबाबू ते करत नाहीत आणि राजकारणापासून फार दूर जातात. त्यांच्या नावाला आदर असतो, पण त्यातून काही मिळवावे अशी त्यांचीच अपेक्षा नसल्याने ते मागे पडतात.
 
 
त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी असणारी सहचारिणी आता आजाराने पलंगाला खिळून आहे. त्यांना डोळ्यांनी आता कमी दिसते. आधीच औषधांचा आणि वेगवेगळ्या तपासण्यांचा खर्च जास्त आहे. त्यात मिळणारी पेन्शन आता कमी पडते. सरकारला विनंती केली तर तुम्हाला मदत मिळू शकेल असे मुलगा सुचवतो पण हात पसरणे त्यांच्या स्वभावात नाही. त्यांच्या अशा तत्त्ववादी पण हट्टी स्वभावामुळे मुलं त्यांच्यापासून लांब गेली आहेत.
 
 
मोठा मुलगा एका सरकारी कचेरीत काम करतो. त्याचा पगार कमी असल्याने स्वतंत्र राहणे त्याला परवडणारे नाही, म्हणून तो आईवडिलांबरोबर राहतो. ते वरुणबाबू जाणून आहेत. दुसरा मुलगा चांगल्या कंपनीत नोकरीला आहे. त्याची पत्नीसुद्धा एका कॉलेजात नोकरीला आहे. मुलगा पत्रकारितेमध्ये पाय रोवायची धडपड करत आहे आणि एका व्यवसायिक श्रीमंत माणसाच्या मुलीच्या प्रेमात पडल्याने लवकर स्थायिक होण्याची त्याची इच्छा आहे. मुलगी कोलकातापासून लांब राहते. मनात असूनही कोलकाताला येऊन भेटायला तिला जमत नाही. या सगळ्या गोतावळ्यात वरुणबाबूंवर मनापासून प्रेम करणारी दोनच माणसे आहेत. एक त्यांचा बालमित्र सुकुमार, जो अविवाहित आहे आणि दुसरा त्यांच्याबरोबर राहणारा त्यांचा लहान नातू.
वरुणबाबूंच्या ऐंशी आणि एक्याऐंशी या दोन वाढदिवसांमधल्या एका वर्षाच्या काळात ही कथा घडते.
 
 
वडिलांना ऐंशी वर्षे पूर्ण झाली याचे मुलांना कौतुक आहे. तरीही कौतुक असणे आणि करणे यात फार फरक आहे. एवढा खास दिवस असूनही मुलगी काही येऊ शकत नाही. तिच्या मुलीला आजोबांचे अप्रूप नाही. तिच्या नवर्‍यासाठी तर आपले सासरे फार विक्षिप्त गृहस्थ आहेत. घरापासून दूर राहाणार्‍या मुलाला वडिलांना काही चांगली वस्तू घ्यायची इच्छा आहे, पण पश्मिना शाल द्यायची वेळ येते तेव्हा एवढी महागाईची वस्तू कशाला द्या म्हणून त्याची बायको मोडता घालते. मोठा मुलगा वडिलांच्या बरोबरच राहत असल्याने त्याच्याच घरात माणसे जमतात, पण त्यात कौतुकापेक्षा कर्तव्याचा भाग जास्त आहे. आपल्या रक्ताच्या माणसांचे हे स्वरूप उत्सवमूर्ती जाणून असल्याने या प्रसंगातील त्यांचा वावर हा काहीसा तटस्थ आहे.
 
 
‘तू काही माझ्यासारखा एकटा नाहीस. तुझा मुलगा तुझ्या जवळ आहे. याबद्दल तरी तू कृतज्ञ राहा’, असे जेव्हा मित्र सुचवतो तेव्हा ते सहज सांगतात की,‘ती त्याची गरज आहे, प्रेम नाही.’ अर्थात हे सांगण्यात कुठेही कडवटपणा नाही. आहे तो केवळ उघड्या डोळ्यांनी केलेला स्वीकार.
 
 
त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या दरम्यान अजून एक गोष्ट समांतररित्या घडत असते. वरुणबाबूंच्या एकेकाळच्या खास मित्राचे नाव राष्ट्रपतीपदासाठी निवडले जाते. कोलकाता शहरासाठी ही अभिमानाची गोष्ट असते. त्याचे पडसाद वरुणबाबूंच्या परिचयाच्या लोकांत सुद्धा उमटतात. वरुणबाबूंनीच या मित्राला राजकारणाचे प्राथमिक धडे दिलेले असतात.
 
 
आता मात्र त्या दोघांच्या परिस्थितीत बरेच अंतर पडलेले असते. कठीण काळात आपल्या मित्राने आपली साथ दिली नाही, शिवाय राजकारणात पाय रोवण्यासाठी आपल्या तत्त्वांशी तडजोड केली म्हणून वरुणबाबूंनी संबंध कमी केलेले असतात. अनेक वर्षे त्यांचा संपर्क नसला तरी त्यांच्या मैत्रीची गोष्ट अनेकांना माहिती असते. आता तोच मित्र एवढ्या मोठ्या पदाला पोचला म्हटल्यावर वरुणबाबूंचे महत्त्वसुद्धा वाढते आणि अचानक ते प्रकाशझोतात येतात. समाजापासून ठरवून दूर गेलेले वरुणबाबू अचानक मिळणार्‍या या प्रसिद्धीने अस्वस्थ होतात. त्यात त्यांच्या एक्याऐंशीव्या वाढदिवसाला राष्ट्रपती घरी येणार, असल्याचे पत्र घरी पोचते आणि गल्लीपासून घरापर्यंत सर्वांचा नूर बदलतो.
 
 
नगरसेवक भेटीला येतो, शेजार्‍यांच्या चकरा वाढतात, कधीही न येणारा जावई खास एका दिवसासाठी विमानाचे तिकीट बुक करतो, नातवंडे आजोबांना फोन करतात, गेल्या वर्षी न काढली गेलेली पश्मिना शाल आता बाहेर काढली जाते. घर सजवले जाते, मेजवानीच्या पदार्थांची यादी वाढवली जाते. ते आता फक्त वरुणबाबू नसतात तर राष्ट्रपतींचे खास मित्र वरुणबाबू असतात.
अचानक मिळणार्‍या या कौतुकाच्या पाठी काय हेतू असतात? वरुणबाबूंच्या वाढदिवसाला राष्ट्रपती येतात का? हा वाढदिवस कशा तर्‍हेने साजरा होतो? या प्रश्नांची उत्तरे जाणण्यासाठी हा सिनेमा पाहायला हवाच.
 
 
आजच्या काळात अनेक ठिकाणी केवळ गरजेपोटी एकत्र राहाणार्‍या कुटुंबाचं वस्तुनिष्ठ चित्रण यात आलं आहे. बदललेले राहणीमान, वाढलेल्या अपेक्षा, चंगळवाद यात अडकलेली नवीन पिढी आणि आपल्या आदर्शांना कवटाळून बसलेली जुनी पिढी यातला संघर्ष अटळ आहे. त्यामुळेच जेव्हा कुटुंबातील काही व्यक्तींवर वरुणबाबू खेकसतात किंवा त्यांना त्यांच्या वागण्यातील विसंगती दाखवून देतात, तेव्हा ते विक्षिप्त वाटत नाही. उलट आपल्या विचारसरणीशी एकनिष्ठ असल्यामुळे एकाकी पडलेल्या त्या वृद्धाबद्दल प्रेक्षकांना सुद्धा आत्मीयता आणि सहानुभूती वाटते.
 
 
थोडासा उपहास, थोडीशी थट्टा, जगण्यात सहज येणारे संवाद आणि अप्रतिम अभिनय यामुळे हा सिनेमा, दिग्दर्शक अनिक दत्त यांनी वेगळ्याच उंचीवर नेला आहे.
 
 
यात कुणी खलनायक नाही. परिस्थितीनुसार वागणारी पात्रे आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात चांगले आणि वाईट असे दोन्ही गुण आहेत, अगदी मुख्य पात्राच्या व्यक्तिमत्त्वातील आडमुठेपणा सुद्धा त्यांच्याच मित्राच्या तोंडून दिग्दर्शकाने प्रेक्षकांना सांगितला आहे. त्यामुळेच कुठेही उपदेशाचा आव न आणता सुद्धा हा सिनेमा प्रेक्षकांच्या सद्विवेकबुद्धीला साद घालतो.
 
 
कधीतरी स्वतःला मेकअपशिवाय आरशात निरखून बघायचे असेल तर हा सिनेमा जरूर बघा. कुठेतरी आपल्यातच लपलेली ही पात्रे तुम्हाला ओळखीची वाटतील.
 
अ‍ॅमेझॉन प्राईमवर हा सिनेमा बघता येईल.
Powered By Sangraha 9.0