नामकरण सोहळा

06 Sep 2025 12:51:23
नामकरण हा विधी नवीन बाळाला त्याची ओळख देतो. तसेच बाळाला दिलेले नाव त्याला आपल्या भूमीशी, आकाशाशी, संस्कृतीशी, भाषेशी, देवाशी, धर्माशी आणि भारतीय विज्ञानाशी जोडते. आपल्या नावाविषयी आपल्याला आणि जवळच्यांना आस्था उत्पन्न होते. म्हणून नाव ‘आपले’ असावे.
रजनीकांत आणि रोहिणीला बाळ झाले. बाळ-बाळंतीण सुखरूप असल्याचे मेसेज आणि नवीन बाळाची छायाचित्रे कुटुंबाच्या व्हॉट्सअ‍ॅपग्रुपवर गेले सुद्धा! आता चर्चा सुरू झाली, बाळाचे नाव काय ठेवणार या विषयी!
 
 
रोहिणीच्या बहिणीचे, अश्विनीचे मत होते - उंह! त्यात काय एवढं? शेक्सपियरने ’रोमिओज्युलियेट’ नाटकात म्हणून ठेवले आहे - नावात काय आहे? आता गुलाबाला झेंडू म्हटले तरी त्याचा सुवास तर तसाच राहील ना? उगीच काहीतरी चर्चा! काहीपण नाव ठेवा!
 
 
अश्विनीचा नवरा म्हणाला, रोहिणी, ही काहीही बोलते! तू तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस! अगं, नावातच तर ओळख असते. नावात कीर्ती असते! ज्ञानेश्वर म्हणतात - श्रेष्ठ लोक आपली कीर्ती जपण्यासाठी आपलं आयुष्य खर्च करतात. तर रामदास स्वामी म्हणतात - मरावे परि कीर्तिरूपी उरावे! अर्थात मृत्यूनंतर सुद्धा मागे जे राहते ते आपले नाव! नावात शक्ती आहे. व्यक्तीची शक्ती त्याच्या नावात उतरते. मग जे काम व्यक्ती करते, तेच काम त्याचे नाव पण करते. ’अमक्या अमक्याने सांगितले आहे!’ म्हटले की काम होते हा आपला अनुभव आहे. प्रचंड शक्ती मिळवलेली नावे तर सिद्ध मंत्र होतात, जसे रामनाम! म्हणून उगीच काहीतरी नाव नको. चांगले नाव हवे.
 
 
छोटी तारा म्हणाली, मावशी! मावशी! किती मस्त नावे आहेत बघ माझ्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणींची - मायरा, अमायरा, समायरा, कियारा, सियारा, लीना, रीना, टीना, रेयांश, शिवांश, उमांशी, कियान, इवान, इष्का, मिश्का, तनिष्का, ईश्या, ग्रिषा, हुमिशा, उमिका, तुलिका, अस्वीका, यवनीका, काश्वी, शास्वी, अहान, लारा, राहा... तिची गाडी जोरदार सुटली होती!
 
 
रजनीकांतची आई, अनसूया म्हणाली, काय ही नावे! तुम्हाला दोघांना सांगते, काय ठेवायचे ते नाव ठेवा, पण अर्थपूर्ण नाव हवे! उगीच अरबी, तुर्की, किंवा लॅटिन भाषेत त्याचा अर्थ अमुक होतो आणि तमुक होतो असले नाव नको.
 
तनिष्का नाव छान आहे की आई!, रजनीकांत म्हणाला.
 
छे रे! ते सोन्याच्या दागिन्यांचे दुकान काढले तेव्हा नवीन शब्द तयार केला - तन + इष्क, असे मी तेव्हा वाचले होते.
बरं मग, कोण्या सेलिब्रेटीने आपल्या मुलांची नावे ठेवली आहेत, त्यापैकी काही?
 
अरे, ते काही स्टॅण्डर्ड आहे का? त्यापेक्षा संस्कृत कोशात, किंवा विष्णुसहस्रनाम मधून नावे पाहावीत. किती विविधता आहे आपल्या नावांमध्ये, अनसूया म्हणाली.
 
हिंदू नावांमध्ये वैविध्य असण्याचे एक कारण आहे भाषेतील शब्दसंख्या. बाळाचे नाव ठेवताना, वेगवेगळ्या क्षेत्रातील नाम व संज्ञा वापरल्या जातात. जसे -
 
पराक्रमाशी संबंधित नावे -सुधीर, रणजित, वीर, वीरेंद्र, अजिंक्य, जय, विजय, अजेय, अजित...
अर्थाशी संबंधित नावे- लक्ष्मी, धनश्री, राशी, निधी, समृद्धी, ऐश्वर्या, संपदा, वैभव, रजत, स्वर्ण, कनक, कांचन, माणिक, मोती, सुवर्णा, द्रव्या...
 
बुद्धीशी संबंधित नावे- प्रज्ञा, मेधा, प्रेरणा, स्फूर्ती, प्रतिभा, विवेक, सुमती...
भूमितीशी संबंधित नावे- बिंदू, रेखा, कला, अंश, मंडल, व्यास, कर्ण...
गणिताशी संबंधित नावे- संख्या, प्रथम, एकनाथ, अनंत, एकता, साम्य, समता...
विज्ञानाशी संबंधित नावे - विद्या, वेदवती, ज्ञान, विज्ञान, ज्ञानेश्वर, सुबोध, तरंग, प्रवीण, कौशल, कुशल, समीक्षा, परीक्षा...
तत्त्वज्ञानाशी संबंधित नावे- सिद्धांत, अद्वैत, अद्वय, माया, प्रकृती, योगेश, विवेक, नीती, सुनीती, संस्कृती...
स्थापत्याशी संबंधित नावे - रचना, आकृती, सीमा, शिखर, निर्मिती, कृती, मंदिरा, प्रतीक...
गावांची नावे - वैशाली, उज्जैनी, अवंतिका, अयोध्या, मथुरा, मिथिला, कांची, द्वारका ...
वेदांशी संबंधित नावे- वेद, ऋग्वेद, अथर्व, वेदांत, श्रुती, वैखरी, प्रणव, ओंकार...
भाषेशी संबंधित नावे - सुभाष, प्रियभाष...
साहित्याशी संबंधित नावे - कथा, कादंबरी, संहिता, कोश, ...
काव्याशी संबंधित नावे - ऋचा, श्लोक, ओवी, आर्या, गायत्री, कविता, काव्या, गीत...
गायनाशी संबंधित नावे - श्रुती, रागिणी, आलापिनी, आरोही, स्वराली...
स्वरांची नावे -स्वरा, षड्ज, रिषभ, गंधार, पंचम, कोमल, निषाद...
रागांची नावे - मल्हार, केदार, भूपाली, कल्याण, सारंग, ललत, राजेश्वरी, भैरवी, बसंत, दुर्गा, भैरव...
वाद्यांची नावे - वेणू, सानिका, वीणा, हरिप्रिया, सारंग...
कलांशी संबंधित नावे - कलावती, कला, कलापिनी, शिल्पा, चित्रा...
रंगांशी संबंधित नावे - श्वेता, कृष्ण, नील, धवल, शुभ्रा, हेमा...
अलंकारांची नावे - माणिक, केयूर, कंगना, माला, मेखला, नुपूर...
मनातील भावांची नावे - भावना, प्रीती, अशोक, आनंदी, मुग्धा, स्मिता, शांत, प्रशांत, प्रमोद, आमोद...
सूर्याशी संबंधित नावे - रवि, आदित्य, मित्र, वरुण, इंद्र, विष्णू, सविता, गायत्री, सावित्री, किरण, संक्रांत, ...
चंद्राशी संबंधित नावे - सोम, शशी, सुधांशू, रजनीकांत, पौर्णिमा...
नक्षत्रांची नावे - अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, चित्रा, स्वाती, अनुराधा, विशाखा ...
ग्रह-तार्‍यांची नावे - अरुंधती, श्रवण, ध्रुव, अभिजित, अगस्ती, मंगल, हर्षल...
तिथीची नावे - प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी
वेळेची नावे - उषा, संध्या, प्रभात, शर्वरी, विभावरी, निशा, आरुषी...
अवकाशाची नावे - क्षितिज, आकाश, गगन, अंबर, दिशा, पूर्वा, उत्तरा...
निसर्गाशी संबंधित नावे - निसर्ग, सागर, समुद्र, गोवर्धन, मंदार, मेघ, मेघा, वर्षा, इंद्रधनू, विद्युत, दामिनी, वरुण...
नद्यांची नावे - गिरिजा, गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, शरयू, गोदावरी, तुंगभद्रा, भीमा, कृष्णा, कावेरी...
झाडा-फुलांची नावे - अबोली, निशिगंधा, सायली, जाई, जुई, प्राजक्ता, पराग, चंदन, कमल, पंकज, पंकजा, पद्मा, पद्मजा, अर्जुन...
प्राण्यांशी संबंधित नावे - कोकिळा, मयूर, मयुरी, मृगनयना, मिनाक्षी, मृगा...
ऋतूंची नावे - शिशिर, वसंत, शरद, वर्षा, हेमंत, ग्रीष्मा...
ह्या शिवाय धार्मिक नावे आहेत, देवतांची नावे आहेत. विष्णू, शिव, गणपती, देवी प्रत्येकाची सहस्रनामावली आहे. तसेच यज्ञाची, उपासनांची, तंत्रांची विविध नावे आहेत. ऐतिहासिक व्यक्तींची नावे आहेत. अशी अर्थपूर्ण नावे असावीत.
साधारणपणे नाव ठेवताना मुलींची नावं आकारांत अथवा ईकारांत असावीत. तर मुलांची नावं अकारांत असावीत. दीर्घ स्वरांवर (आ, ई) अंत होणारी नावे शृंगार, करुणा, माधुर्य, सौंदर्य, मृदुता दर्शवतात. तर ह्रस्व स्वरांवर (अ) अंत होणारी नावे उत्साह, वीर्य, पराक्रम, शक्ती आणि स्थैर्य दर्शवतात. काही परंपरेनुसार मुलींच्या नावांमध्ये विषम (3, 5, 7) अक्षरसंख्या शुभ मानली जाते. तर मुलांच्या नावांमध्ये सम (2, 4, 6) अक्षरसंख्या शुभ मानली जाते. असे केल्याने मुलींच्या नावाच्या उच्चाराची गती माध्यम किंवा मंद असते तर मुलांच्या नावाच्या उच्चाराची गती जलद असते.
बाळाला दिल्या जाणार्‍या पाच नावांच्या पैकी एकनाव जन्म नक्षत्रानुसार ठेवले जाते. ज्यामुळे जन्म किती वाजता झाला, कोणत्या नक्षत्रावर झाला हे लक्षात ठेवावे लागत नाही. कधीही आपले नक्षत्र-नाव सांगितले की ते कळते.
नामकरण हा विधी नवीन बाळाला त्याची ओळख देतो. तसेच बाळाला दिलेले नाव त्याला आपल्या भूमीशी, आकाशाशी, संस्कृतीशी, भाषेशी, देवाशी, धर्माशी आणि भारतीय विज्ञानाशी जोडते. आपल्या नावाविषयी आपल्याला आणि जवळच्यांना आस्था उत्पन्न होते. म्हणून नाव ‘आपले’ असावे. उगीच ’अथेना’, ’अपोलो’, ’पॅरिस’ वगैरे नाव ठेवले तर ग्रीसबद्दल आपलेपणा निर्माण व्हायचा ... तसे नको. आधी आपली नाळ आपल्या भूमीशी जुळलेली असली पाहिजे. या करिता बाळाचे नाव ठेवताना ते आपल्या भाषेतले असावे याबद्दल दक्ष राहावे.
Powered By Sangraha 9.0