श्रीनिवासा गोविंदा... गोविंदा रे गोविंदा.

06 Sep 2025 12:38:39

vivek
दिव्य देसम् मंदिरांपैकी तिरूपती बालाजी हे 75 वे मंदिर आहे. या मंदिराला ’भू लोकीचे वैकुंठ’ तर प्रत्यक्ष देवाला 'कलियुग प्रत्यक्ष दैवम’ म्हणतात. असं मानलं जातं की, व्यंकटेशाची मूर्ती फक्त कलियुग असेपर्यंतच अस्तित्वात असणार आहे. महाविष्णूच्या स्वयंभू आठ स्थानांपैकी हे एक स्थान आहे. ही भूमी वराहाने व्यंकटेशाला दिली अशी आख्यायिका आहे. आजही स्वामी पुष्करणी येथे असलेल्या भू-वराहाचे दर्शन घेऊनच व्यंकटेशाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.
श्रीव्यंकटेशस्वामी म्हणजे दाक्षिणात्यांचे नाही तर पूर्ण भारतवर्षाचे परम दैवत... आयुष्यात निदान एकदा तरी तिरुपतीला जाण्याची मनिषा भक्तांच्या ठायी असते. इतर कोणती मंदिरे माहीत नसतील तरी तिरुपती माहीत नसलेला जवळपास कोणीच नसेल. आपण या भगवान विष्णूला ’बालाजी’ या नावाने ओळखतो, पण दक्षिणेत श्रीनिवास, व्यंकटेशस्वामी आदी नाना नावांनी ओळखले जाते. भक्तांचा अक्षरशः महापूर येणारे हे देवस्थान अतिशय दैवी आहे. इथे दिव्य दर्शन, फ्री दर्शन असे वेगवेगळे पर्याय असले तरीही दर्शन घेण्यासाठी लागणारा वेळ, रांगेत उभे राहण्याचा त्रास काही औरच आहे. बरेच जण मनात असूनही केवळ मंदिरातील गर्दी झेपणार नाही यासाठी तिरुपतीला कधीच जात नाहीत. मात्र रांगेत उभं राहिल्यानंतर श्रीव्यंकटेशाचे दर्शन जेव्हा अवघ्या काही सेकंदासाठी मिळते तो क्षण अत्यंत अलौकिक असतो. चोहोबाजूंनी ’गोविंदा गोविंदा’चा गजर होत असतो. समयांच्या प्रकाशात उजळून निघालेला श्रीव्यंकटेशाचा अद्वितीय देखणा विग्रह बघून आपले भान हरपते. व्यंकटेशाचे मनोहरी, तेज:पुंज रूप पाहून आपल्या डोळ्यांचे पारणे फिटते. देव समोर येताच आपल्याला वाटते की ’जणू याचसाठी केला होता अट्टाहास’...
 
 
काही वर्षांपूर्वीपर्यंत व्यंकटेशाचे मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत असे हिंदू मंदिर होते. मात्र थिरूअनंतपुरम येथील पद्मनाभस्वामी मंदिरातील खजिन्याचा शोध लागल्यानंतर व्यंकटेशाचा आता जगात दुसरा क्रमांक आहे. सांगायची गोष्ट अशी की, पद्मनाभस्वामी आणि व्यंकटेशाची मंदिरे दिव्य देसम् अंतर्गत येतात. आंध्र प्रदेशातील ज्या दोन मंदिरांचा समावेश दिव्य देसम् ’वदनाडू’ या गटात होतो त्यांतील हे एक मंदिर आहे. दुसर्‍या अहोबिळम मंदिराची माहिती आपण मागच्या भागात घेतली.
 
 
व्यंकटेशाचे मंदिर ऐतिहासिक काळापासूनच सुप्रसिद्ध होते. श्रीरामानुजाचार्य ह्या मंदिरात त्यांच्या जीवनभरात तीन वेळा आले. व्यंकटेशाच्या भावाचे, गोविंदराजाचे तिरुपती येथील मंदिर श्रीरामानुजाचार्यांनी त्यांच्या तिसर्‍या व शेवटच्या भेटीदरम्यान स्थापले व तिरुपती नगरीचा पाया घातला. व्यंकटेशाच्या मंदिरातील पूजाअर्चा, उत्सव यांचे नियमन श्रीरंगमप्रमाणेच श्रीरामानुजाचार्यांनी घालून दिले होते. श्रीरंगमप्रमाणेच ’वैकुंठ एकादशीचा’ अभूतपूर्व सोहळा इथे संपन्न होतो. श्रीरामानुजाचार्यांनी इथे ’जियरमठ’ स्थापून गुरुशिष्य परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या चार मंदिरांपैकी हे ’मलई कोविल’ आहे. मलई म्हणजे टेकडी. हे मंदिर सप्तगिरीवर आहे. याचा अर्थ तिरुपतीहून सप्त टेकड्या ओलांडून तिरुमला येथे जाता येते. या सप्त टेकड्यांची वेगवेगळी नावे आहेत, जसं की वृषभाद्री, अंजनाद्री, नीलाद्री, गरुडाद्री, शेषाद्री, नारायणाद्री आणि व्यंकटाद्री. ही सात शिखरे आदीशेषाची शिरे आहेत अशी मान्यता आहे. सगळ्यांत शेवटच्या व्यंकटाद्रीवर, तिरुमला येथे मंदिर स्थित आहे. तिरुपतीहून पायी अलिपिरीमार्गे जातानाही या घाटाची कल्पना येते. मंदिरांचा सप्तटेकड्यांचा घाट कठीण असून आजुबाजूला घनदाट जंगल आणि जंगली श्वापदे आहेत. जंगलातून जाणारा, प्रत्येक डोंगर ओलांडल्यावर कमान असणारा हा रस्ता फार सुंदर आहे. ह्या सप्तटेकड्या ’शेषाचलम’ टेकडीचा भाग आहेत.
 

vivek 
 
भृगू ऋषींनी वैकुंठात, श्रीविष्णूच्या छातीला पाय लावून अपमान केल्यामुळे तिथे विराजमान असलेली लक्ष्मी कोपाने करवीर नगरी, कोल्हापूरला निघून गेली. त्यावेळी श्रीविष्णूने वकुला मातेच्या पोटी जन्म घेऊन लक्ष्मीच्या एका रूपाशी म्हणजे ’पद्मावतीशी’ विवाह केला. म्हणूनच व्यंकटेशाच्या दर्शनाबरोबरच तिरुपती येथील पद्मावतीचे दर्शन घेणे हे अनिवार्य आहे. पद्मावतीबरोबरचा विवाह सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी व्यंकटेशाने कुबेराकडून कर्ज काढले. श्रीव्यंकटेश स्तोत्रातही म्हटले आहे, ’कुबेर तुझा भांडारी’... आज हेच देवाचे कर्ज फिटवण्यासाठी भाविक देवाच्या हुंडीत म्हणजे ’श्रीवरी हुंडीत’ धनदौलत अर्पण करतात. व्यंकटेशस्वामी म्हणजे ऐश्वर्य देणारा देव म्हणून ओळखला जातो. मंदिरात प्रसादरुपी मिळणार्‍या लाडूला ॠख नामांकन मिळाले आहे. एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या दैवी आवाजातील ’सुप्रभातम’ व ’विष्णुसहस्त्रनामाचा’ मंदिर परिसरात जयघोष होत असतो.
दिव्य देसम् मंदिरांपैकी हे 75 वे मंदिर आहे. या मंदिराला ’भू लोकीचे वैकुंठ’ तर प्रत्यक्ष देवाला ’कलियुग प्रत्यक्ष दैवम’ म्हणतात. असं मानलं जातं की, व्यंकटेशाची मूर्ती फक्त कलियुग असेपर्यंतच अस्तित्वात असणार आहे. महाविष्णूच्या स्वयंभू आठ स्थानांपैकी हे एक स्थान आहे. मंदिराच्या गर्भगृहाला ’आनंद निलयम’ म्हणतात. तिथे व्यंकटेशाची ’निंद्रा’ म्हणजे उभ्या स्वरूपातील मूर्ती स्थित आहे. या मूलवरमला ’धृवबेरम’ म्हणतात. काळ्या पाषाणातील हा विग्रह आठ फूट उंचीचा असून वक्ष:स्थळावर श्रीलक्ष्मीचा वास आहे (म्हणूनच श्रीनिवास) ’श्रीनिधी श्री वत्सलांच्छनधरा’ या उक्तीप्रमाणे, वक्ष:स्थळावर अतिशय पवित्र असे ’श्रीवत्स’ हे लांच्छनरूपी चिन्ह विराजमान आहे. मूलवरमने हाती शंख आणि चक्र ही आयुधे धारण केली असून उजवा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी ’वरदहस्त’ ह्या मुद्रेत आहे तर डावा हात कटीवर स्थित आहे.
 
 

vivek 
 
’श्री व्यंकटेश स्तोत्र’ या स्तोत्रात, व्यंकटेशाचे अमाप सुंदर असे वर्णन आहे. ’मुखचंद्रमा अति निर्मळ। भक्तस्नेहाळ गोविंदा’ या अशा अनेक श्लोकांतून श्रीव्यंकटेशाचे वर्णन वाचून मनाला असीम समाधान मिळतो. आनंद निलयम गर्भगृहात भोग श्रीनिवास, उग्र श्रीनिवास, मय्यप्पा स्वामी, कोलुवू श्रीनिवास आणि गरुडाचे विग्रह म्हणजेच उत्सवमूर्ती आहेत. आळ्वारांपैकी ’कुळशेखर आळ्वार’ यांचा विग्रह दाराजवळ स्थित आहे. अनंत काळापासून देवाचे अस्तित्व इथे असले तरी मंदिर बांधण्याची सुरुवात साधारण तिसर्‍या शतकात झाली.
श्रीनिवासावर नम्मळवार, पेरियाळ्वार, थोंडारादीपोड्डी, थिरूमलीसई आणि कुळशेखर या आळ्वरांनी पासुरामी रचल्या आहेत व ’नालयिरा दिव्य प्रबंधम’ या ग्रंथामधली या पासुरामी मंदिरात वेळोवेळी आळवल्या जातात. प्राचीन काळी अत्यंत कठीण व धोकादायक मार्ग असलेले मंदिर केवळ ’पर्वतावरील देव’ असे न राहता आळ्वारांच्या कार्याने संपूर्ण वैष्णव जगतातील एक अत्यंत दिव्य क्षेत्रम म्हणून गौरवले गेले.
प्राचीन काळी चोळांचे ’श्रीरंगम’ आणि ’व्यंकटेशाचे’ मंदिर हे आराध्यदैवत होते. अगदी संस्कृत श्री व्यंकटेश स्तोत्रातही ’चोळपुत्रप्रिय शांतो ब्रहमादीनां वरप्रदः’ हा श्लोक आहे. पल्लवांच्या ’समवाई’ या राणीने नवव्या शतकात मंदिराला दागिने आणि भूमी अर्पण केल्याचा उल्लेख आहे. मात्र खर्‍या अर्थाने मंदिराचे रूप पालटले ते ’विजयनगर’ साम्राज्यामुळे. हंपीची साळवु व तुळवू ही घराणी वैष्णव भक्तीत लीन झालेली होती. विशेषतः सम्राट कृष्णदेवराय याने अपार धनसंपत्ती मंदिराला अर्पण केली. मंदिराचा सोन्याचा कळसही त्यानेच अर्पण केला आहे. त्याची व्यंकटेशावर अतिशय श्रद्धा होती. त्याचा पुतळाही मंदिरात वसलेला आहे. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयावेळी या मंदिराला भेट दिल्याचा उल्लेख आहे. तंजावूरचे मराठी सेनापती, राघोजी भोसले प्रथम यांनी मंदिरात दर्शनाचे नियमन केले.
परकीय आक्रमणाच्या वेळी श्रीरंगनाथाची नम्मपेरूमाळ ही उत्सव मूर्ती सुरक्षिततेसाठी ह्या मंदिरात 1320 ते 1369 याकाळात ठेवली होती. याशिवाय व्यंकटाद्री टेकडीवर अजून काही मंदिरे आहेत. यांत शिलातोरणम, चक्रतीर्थ, श्रीवरी पादालु, पापविनाशम, आकाशगंगा, वेणुगोपाळ मंदिर आणि जाबाली हनुमान मंदिर यांचा समावेश होतो. असं म्हटलं जातं की, शिलातोरणम इथली दगडी नैसर्गिक कमान भेदून व्यंकटेशाचे या टेकडीवर आगमन झाले आणि जिथे पाऊल ठेवले ती जागा म्हणजे श्रीवरी पादालु. वास्तविक अशी दगडी कमान संपूर्ण जगात फक्त इथे आणि अमेरिकेतील उटाह इथेच आहे. कार्बन डेटिंगने याचे वय सात मिलियन वर्षांचे आहे. तर अन्य मंदिरे ही पूर्ण जंगलात असून अपार निसर्ग सौंदर्य ल्यायलेली आहेत. विशेषतः जाबाली हनुमान मंदिरात जाण्याचा मार्ग अत्यंत मनोहारी आहे. तिरुपती येथे व्यंकटेशाची बरीच मंदिरे आहेत. त्यांत ’श्रीनिवास मंगापुरम’ येथे श्रीनिवास व पद्मावतीचा विवाह झाला होता म्हणून या मंदिराला ’कल्याण व्यंकटेशा’ म्हणतात. या मंदिरातील मूर्ती हुबेहूब, तिरुमलाच्या मुख्य मूर्तीसारखी असल्याने आपल्याला इथे व्यंकटेशाचे अद्वितीय रूप डोळ्यात साठवून ठेवता येते.
’कपिलातीर्थ’ हे एकमेव शैव मंदिर या वैष्णव नगरीत आहे. पूर्वांपार अशी मान्यता आहे की, व्यंकटाद्री टेकडीवर आदिवराहाचा वास होता. हिरण्याक्ष या राक्षसाला मारल्यानंतर आदिवराहाने इथे विश्रांती घेतली होती. त्यावेळेस भूदेवीला वराहाने वरदान दिले होते की, याच जागी श्रीव्यंकटेश भगवान स्थानापन्न होतील. म्हणून असं म्हटलं जातं की, वराहाने ही भूमी व्यंकटेशाला दिली. आजही स्वामी पुष्करणी येथे असलेल्या भू-वराहाचे दर्शन घेऊनच व्यंकटेशाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. वराह हा अवतार फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो. दक्षिणेत मात्र वराहाची बरीच मंदिरे आहेत. श्रीविष्णुच्या अष्ट स्वयंभू क्षेत्रांपैकी दोन स्थाने पुष्कर व श्रीमुश्नम ही वराहाशी संबंधित आहेत. तर अन्यत्र खजुराहो, रामटेक, वाराणसी येथे वराहाची मंदिरे आहेत...
भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणार्‍या ह्या शेषाचल अवतार श्रीनिवासाला नमस्कार असो.
गोविंदा गोविंदा...
Powered By Sangraha 9.0