वजन झटपट कमी करावे का?

10 Jan 2026 12:38:15
डॉ. अविनाश भोंडवे
 9823087561
weight loss 
वजन कमी करण्यासाठी आहारात आपल्या शरीराला आवश्यक असणार्‍या सर्व अन्नघटकांचा योग्य प्रमाणात समतोल दृष्टीने समावेश असावा. वजन कमी करण्यासाठी अनेक ’विशिष्ट आहार’ सुचवले जातात. त्यांना फॅड डाएट म्हणतात. यांच्यात आपल्याला आवश्यक असलेल्या कॅलरीजपेक्षा खूप कमी कॅलरीज असतात. त्यामुळे त्यांच्या नादी लागू नये. त्याऐवजी मान्यताप्राप्त आहारतज्ज्ञांकडून आपला आहार आणि त्याबद्दलच्या टिप्स समजून घ्याव्यात आणि त्याचे निक्षून पालन करावे.
वजन खूप जास्त असलेल्या सर्वांच्या मनात आपले वजन कमी व्हायला पाहिजे अशी एक सुप्त इच्छा असते. पण आजच्या या झटपट जमान्यात हे वाढलेले वजनसुद्धा ताबडतोब आणि झटदिशी कमी व्हायला पाहिजे असे त्यांना मनोमन वाटत असते. त्यामुळे ’आठ दिवसांत दहा किलो वजन कमी करा!’ असे स्वप्न दाखवणार्‍या वर्तमानपत्रातल्या, मीडियामधल्या आणि टेलिव्हिजनवरच्या असंख्य झकपक जाहिराती त्यांना खुणावू लागतात. या प्रकारात भरपूर पैसे गमावून झाल्यावर त्यांच्या लक्षात येते की, वजनकाट्याचा बाण आहे तिथेच आहे.
 
 
काही पद्धतींमध्ये वजन झटपट कमी होत असेलही, पण लक्षात ठेवा की कुठलाही आजार नसताना असे वेगाने वजन कमी करण्याचे प्रयत्न आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक ठरू शकतात. आपण होईल तितक्या लवकर सडपातळ व्हावे असे वजन कमी करण्याची तीव्र मनीषा असलेल्या प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे. काही जगावेगळ्या उपायात आणि डाएटमुळे पहिल्या काही दिवसात वजन भरभर कमी होताना दिसते खरे; पण पाण्यात बुडवलेला चेंडू जसा सर्रकन पुन्हा वर येतो, तसे हे सटासट कमी झालेले वजन तेवढ्याच वेगाने परत वाढते.
 
 
साहजिकच वजन कमी करायचे असेल तर ते हळूहळू पण निश्चित स्वरूपात कमी होणे आवश्यक असते. वजनातील घट ही साधारणतः आठवड्याला 500 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत व्हावी आणि आदर्श वजनापर्यंत आपले वजन आले की ते कायमस्वरूपी स्थिर राहावे. वजन कमी करताना या दोन गोष्टी पक्क्या ध्यानात ठेवणे आवश्यक असते. आरोग्यदृष्ट्या आदर्श उपायात कित्येकदा ठरावीक वजन कमी झाले की त्याखाली ते उतरत नाही. अशा वेळेस शास्त्रीयदृष्ट्या आहार आणि व्यायाम यात थोडे बदल करावे लागतात.
 
 
weight loss
 
आठवड्याला 500 ग्रॅम ते 1 किलो हा नियमदेखील फारसा पक्का नाही. कारण प्रत्येकाच्या शरीराची ठेवण, रचना, चयापचय क्रिया आणि शरीरांतर्गत कार्यपद्धती वेगळी असल्याने काही जणांच्या बाबतीत हे आकडे यापेक्षा कमीसुद्धा असू शकतात.
शारीरिक तोटे - वेगाने वजन कमी करण्याचे उपाय केले तर,
 
स्नायू कमकुवत होणे - वजन कमी करण्याच्या उपायात शरीरातील चरबी कमी करण्याचे प्रयत्न होत असतात. मात्र बहुतेक वेळा वजन वेगाने कमी करताना शरीरातील स्नायू आणि मांसपेशी यांची झीज होऊन त्या कमीकमी होऊ लागतात. त्यामुळे कमालीचा अशक्तपणा येतो आणि आपल्या दैनंदिन कामात आपल्याला सतत थकवा जाणवतो. वजन कमी करायचे असते ते आपला फिटनेस वाढावा आणि दिवसभर उत्साही वाटावे म्हणून. पण मांसपेशी कमी झाल्याने नेमका उलटा परिणाम दिसून येतो.
 
 
weight loss
 
चयापचय क्रिया मंदावणे- शरीराला रोजच्या कामासाठी ठरावीक म्हणजे 1500 कॅलरीजची गरज असते. वजन कमी करण्यासाठी असलेल्या बहुतेक आहारात त्यापेक्षा खूप कमी कॅलरीज म्हणजे 500 ते 1000 देण्याची प्रथा आहे. यामुळे शरीराला तितक्याच कमी कॅलरीजमध्ये या क्रिया करण्याची सवय लागते. याचा परिणाम म्हणून चयापचय क्रिया मंदावते. स्नायू आणखी दुर्बल होतात. थायरॉइडसारखे हार्मोन कमी प्रमाणात स्त्रवतात आणि त्या व्यक्तीला जास्तच अशक्तपणा येतो. तसेच त्याच्या सर्व शारीरिक हालचालीत मंदपणा जाणवतो.
 
 
जीवनसत्वांचे आणि खनिजांचे अभाव निर्माण होणे- लोह, कॅल्शियम, जीवनसत्व बी-12, डी-3, फोलेट अशा अत्यावश्यक अन्नघटकांचा अभाव निर्माण होऊन अ‍ॅनिमिया, हाडे ठिसूळ होणे, केस गळणे, थकवा येणे, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे अशी लक्षणे दिसू लागतात.
 
 
पित्ताशयात खडे- खूप झटपट वजन कमी करण्याच्या हव्यासाने पित्ताशयाच्या थैलीतील पित्तरस घट्ट होऊन पित्ताचे खडे निर्माण होतात. यामुळे अपचन, छातीत जळजळणे, पोटात दुखणे असे त्रास आढळून येतात आणि पोटाची शस्त्रक्रिया करून पित्ताशयाची थैली काढून टाकण्यावाचून पर्याय उरत नाही.
 
 
कातडी लोंबणे- खूप भरभर वजन कमी केले गेले तर चरबी घटते पण त्यावरील त्वचा पूर्ववत राहते, त्यामुळे स्थूल व्यक्तींच्या दंड, मांड्या, पोट, कंबर, पार्श्वभाग या भागातली त्वचा लोंबताना दिसते. वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेनंतर हा प्रकार प्रकर्षाने आढळून येतो.
 
 
लवकर वजन कमी करण्याच्या घाईमुळे इतर अनेक त्रासदायक लक्षणे या व्यक्तीत उद्भवू शकतात. उदाः- भुकेने हैराण होणे, सतत चिडचिड होणे, हातपाय थंड पडणे, पायांना गोळे येणे, गरगरणे, तोंडाला कोरड पडणे, बद्धकोष्ठाचा त्रास होणे, अधूनमधून जुलाब होणे वगैरे. भराभर वजन कमी करणार्‍या स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये अनियमितपणा येऊ शकतो. थोडक्यात सांगायचे तर, अशा झटपट उपायांनी जाडजूड असलेली निरोगी व्यक्ती रोगट बनते.
 
 
काही गंभीर आजार
 
काही अतिशय गंभीर आजारांमध्ये रुग्णाचे वजन भराभर कमी होत जाते. अनेकदा या व्यक्ती स्थूलपणा कमी करण्यासाठी काही उपाय करत असतात. त्यांना वाटते की, त्या उपायांनी वजन कमी होते आहे. पण प्रत्यक्षात त्यांच्या शरीरात एखाद्या आजाराची सुरुवात झालेली असते. या आजारात खाली दिलेल्या आजारांचा समावेश असू शकतो.
 
 
- मधुमेह, क्षयरोग, कर्करोग, अ‍ॅडिसन्स डिसीज, सिलीअ‍ॅक डिसीज, क्रॉह्न्स डिसीज, एचआयव्ही-एड्स, हायपरथायरॉइडिझम् इत्यादी.
 
 
कुठल्याही व्यक्तीमध्ये वजनाच्या 10 टक्के किंवा 4.5 किलोग्रॅम वजन अचानकपणे कमी झाल्यास डॉक्टरांकडून संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
 
 
याउलट अशास्त्रीय पद्धतीने वजन कमी करण्याच्या उपायांनी खालील आजार उद्भवू शकतात.
 
* स्थूलपणा जास्त वाढणे.
 
* दात कमजोर होणे किंवा दंतक्षय.
 
* उच्च रक्तदाब.
 
* रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणे.
 
* हृदयविकाराचा झटका येणे
 
* अर्धांगवायू.
 
* मधुमेह टाईप-2.
 
* हाडे ठिसूळ आणि अशक्त बनणे.
 
* कर्करोग उद्भवणे.
 
काही महत्त्वाच्या सूचना
 
1. वजन कमी करण्यासाठी आहारात आपल्या शरीराला आवश्यक असणार्‍या सर्व अन्नघटकांचा योग्य प्रमाणात समतोल दृष्टीने समावेश असावा.
 
2. वजन कमी करण्यासाठी अनेक ’विशिष्ट आहार’ सुचवले जातात. त्यांना फॅड डाएट म्हणतात. यांच्यात आपल्याला आवश्यक असलेल्या कॅलरीजपेक्षा खूप कमी कॅलरीज असतात. त्यामुळे त्यांच्या नादी लागू नये. त्याऐवजी मान्यताप्राप्त आहारतज्ज्ञांकडून आपला आहार आणि त्याबद्दलच्या टिप्स समजून घ्याव्यात आणि त्याचे निक्षून पालन करावे.
 
3. नियमित व्यायामाची जोड असल्याशिवाय निरोगी पद्धतीने वजन कमी होत नाही. स्थूल व्यक्तींना व्यायामाचा कंटाळा असतो. त्यामुळे ते जाहिरातीत दिसणारे वेट लॉस प्रोग्रॅम, फॅड डाएट यांच्या भजनी लागून फसगत करून घेतात.
 
4. वजन कमी करण्यासाठी पोटाला बांधायचे पट्टे, यंत्राच्या व्हायब्रेशन्सने वजन कमी करणे हा एक भूलभुलैया आहे. हे उपाय मुळीच शास्त्रीय नाहीत. यांच्या नादी लागून खिसा जरूर हलका होईल पण वजन नक्कीच नाही.
 
5. वजन कमी करण्यासाठी औषधे मुळीच वापरू नयेत. यात कॅफीनयुक्त गोळ्या असतात ज्यांनी हृदयाचे विकार, निद्रानाश, डोकेदुखी, उच्चरक्तदाब असे त्रास होऊ शकतात. काही गोळ्यांमध्ये हार्मोन्स असतात, काहीमध्ये भूक मंदावणारी औषधे असतात. यांचा त्रास होऊ शकतो. मधुमेहासाठी वापरले जाणारे मेटफॉर्मिन नावाचे औषध काही लोक वापरतात, त्यामुळे रक्तातील साखर कमी होऊन बेशुद्ध होण्याची शक्यता असते.
 
 
वजनवाढीमुळे अनेक आजार उद्भवतात, त्यामुळे ते कमी करायचे असते. कुठलेही अशास्त्रीय किंवा अघोरी उपाय करून वजन कमी करणे आणि आजारांना आमंत्रण देणे हा तद्दन वेडेपणा नाही का?
Powered By Sangraha 9.0