मुंबईचा कौल भाजपाला

16 Jan 2026 18:45:25
 @पार्थ कपोले
'हिंदुत्व + विकास + राष्ट्रीय सुरक्षा’ आणि देवेंद्र फडणवीसांचे निर्णायक नेतृत्व
BJP
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मिळवलेला ऐतिहासिक विजय हा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तांतर नसून, मुंबईकरांनी दिलेला एक स्पष्ट वैचारिक आणि राजकीय संदेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि भाजपच्या ’हिंदुत्व + विकास + राष्ट्रीय सुरक्षा’ या ठाम अजेंड्यावर मतदारांनी विश्वास व्यक्त केला आहे. प्रथमच मुंबईचे महापौरपद भाजपकडे येणार असून, देशाच्या आर्थिक केंद्राची सूत्रे थेट भाजपच्या हाती जाणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे वळण मानले जात आहे.
मुंबई महानगरपालिकेवर दीर्घकाळ ठाकरेंचे वर्चस्व राहिले. या दीर्घ सत्ताकाळात पालिकेवर आपलाच हक्क असल्याचा समज निर्माण झाला आणि त्यातूनच आत्मसंतुष्ट कारभार सुरू झाला. शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला ब्रेक लागला, ही बाब मुंबईकरांनी प्रत्यक्ष अनुभवली. विशेषतः 2019 नंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तोडली आणि त्यासोबत हिंदुत्वाच्या भूमिकेलाच तिलांजली दिल्याचा आरोप झाला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणार्‍या नेतृत्वाकडून हिंदुत्वाकडे पाठ फिरवली जात असल्याची भावना मुंबईतील हिंदू समाजात तीव्र होत गेली.
 
 
याच काळात मुंबईमध्ये अल्पसंख्यांकांचे वर्चस्व वाढू लागले. बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीचे प्रश्न गंभीर झाले. देशाचे आर्थिक नेतृत्व करणार्‍या शहरात बहुसंख्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. ’लव्ह जिहाद’ आणि ’लँड जिहाद’सारख्या मुद्द्यांवर ठाकरे गटाने सोयीस्कर मौन पाळले, असा आरोप होत राहिला. त्याउलट भाजपने या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली आणि 2019 नंतर मुंबईत हिंदुत्वाचा स्पष्ट, निर्भीड आणि आक्रमक आवाज म्हणून देवेंद्र फडणवीस पुढे आले.
 
 
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले असोत किंवा शहराची डेमोग्राफी बदलण्याचे प्रयत्न असोत, या सर्वांविरोधात भाजप ढाल म्हणून उभी राहिली. या लढ्यात कार्यकर्त्यांना कायदेशीर मदत, राजकीय पाठबळ आणि संरक्षण देण्यात पुढाकार घेण्यात आला. त्यामुळे ’हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी भाजप हा विश्वासार्ह पर्याय आहे’ ही भावना मुंबईकरांच्या मनात अधिक बळावली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्यांक मतदानाचा ट्रेंड मुंबईकरांनी पाहिला होता आणि त्यामागील संभाव्य धोकेही त्यांच्या लक्षात आले होते. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट कौल मिळाला.
 
BJP 
 
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदुत्व आणि विकास यांची प्रभावी सांगड. हिंदुत्व केवळ घोषणांपुरते न ठेवता, त्यांनी मुंबईसाठी ठोस विकासकामांना गती दिली. ठाकरेंच्या विरोधाला न जुमानता मुंबई मेट्रो प्रकल्पांना वेग देण्यात आला. आज मेट्रोचे जाळे झपाट्याने विस्तारत असून, लोकलवर अवलंबून असलेल्या लाखो मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासा ठरला आहे. त्याचप्रमाणे कोस्टल रोड आणि अटल सेतू प्रकल्पांमुळे रस्तेमार्ग कनेक्टिव्हिटीला नवे परिमाण मिळाले आहे. कोस्टल रोड थेट विरारपर्यंत जाणार असल्याने भविष्यात मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडणार आहे.
 
 
गृहनिर्माणाच्या प्रश्नावरही भाजपने ठोस भूमिका घेतली. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता. मराठी माणसाच्या हक्कांची भाषा करणार्‍या ठाकरेंच्या शिवसेनेने या प्रश्नावर काहीही ठोस केले नाही, असा आरोप होत राहिला. भाजपने मात्र बीडीडी चाळींचा पुनर्विकास यशस्वीपणे सुरू करून मराठी आणि हिंदू मध्यमवर्गीयांना हक्काचे घर दिले. त्याचबरोबर धारावी पुनर्विकासासारखे कठीण शिवधनुष्य पेलण्याची क्षमता भाजपने दाखवून दिली.
 
विकासाचा ठोस अजेंडा नसल्याने उद्धव ठाकरे यांनी आपले बंधू राज ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करून भावनिक राजकारणाचा आधार घेतला. भाजप मराठीविरोधी आहे, मराठी शाळा बंद पडतील, हिंदी-गुजराती सक्ती होईल, मुंबई गुजरातला जोडली जाईल असे जुने आरोप पुन्हा पुढे आणले गेले. यासाठी शिवसेना (उबाठा), मनसे आणि कथित सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लेखक यांची एक इकोसिस्टीम कार्यरत करण्यात आली. मात्र या नकारात्मक प्रचारामुळे मुंबईतील गुजराती, मारवाडी, तमिळ, तेलुगू भाषिक मतदार ठाकरे गटांपासून दूर गेले.
 
 
ठाकरे बंधूंच्या प्रचारात शहराच्या भविष्यासाठी काहीही सकारात्मक नव्हते. तब्बल 25 वर्षे महानगरपालिकेत सत्ता असूनही मुंबईचा विकास का खुंटला, याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. प्रचार स्वतःभोवती केंद्रित राहिला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक, अश्लाघ्य टीका करण्यातच धन्यता मानली गेली. याउलट भाजपने पुढील 50 वर्षांची मुंबई कशी असावी, याचे स्पष्ट व्हिजन मांडले आणि आतापर्यंत केलेल्या कामांचा परफॉर्मन्स मतदारांसमोर ठेवला. नकारात्मक प्रचार आणि विकासाचा अजेंडा यातील फरक मतदारांनी स्पष्टपणे ओळखला.
 
 
मुंबई महानगरपालिकेतील भाजपच्या विजयामुळे देशाच्या आर्थिक राजधानीत समतोल विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून मुंबईची ओळख अधिक दृढ होईल, असा विश्वास निर्माण झाला आहे. याचबरोबर या निकालातून देवेंद्र फडणवीस यांचे राज्यव्यापी नेतृत्व अधोरेखित झाले आहे. मुंबईसह एकाचवेळी 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये प्रचाराचे अचूक नियोजन, स्थानिक गरजांची ओळख आणि विकासाचे स्पष्ट व्हिजन मांडत भाजपने 20 हून अधिक ठिकाणी महापौरपद मिळवण्याची वाट मोकळी केली. मुंबईकरांनी दिलेला हा कौल म्हणजे हिंदुत्वाची पुनर्स्थापना, विकासाचा वेग आणि राष्ट्रीय सुरक्षेवर व्यक्त केलेला ठाम विश्वास असून, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
 
- पार्थ कपोले, नवी दिल्ली
- लेखक भारतीय राजकारणाचे अभ्यासक आहेत
Powered By Sangraha 9.0